फुसके बार – २६ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 25 November, 2015 - 15:18

फुसके बार – २६ नोव्हेंबर २०१५
.
१) आला रे आला, आणखी एकदा २६/११ चा दिवस आला. ओंबाळेंचे स्मरण करू. पोलिस असल्याने गोळ्या वगैरे झेलणे, त्या नोकरीपोटी पगार घेतात म्हणून गरज पडल्यास मरणे हे तर त्यांचे कामच होते, असे म्हणू.
आपण काही पोलिसात, लष्करात नसल्याने मरणे हे काही आपले काम नाही. त्यामुळे कोणी बेशिस्तपणे, बेकायदेशीरपणे काही करत असेल, वागत असेल तर त्याबाबत आम्ही काही करण्याचे काही कारण नाही. कारण ते काम पोलिसांचे, सरकारचे, आमचे नाही.
त्यापेक्षा आजच्या आणि पुढच्या किती तरी २६/११ला ओंबाळे, करकरे, कामते, साळसकर, उन्नीकृष्णन यांच्या नावाने भावनांचे कढ काढू, मेणबत्त्या लावू.
देशातला, आपल्या सभोवतालचा बकालपणा घालवायला स्वत: कायदेशीरपणे, अंधश्रद्धांशिवाय वागण्याची जी आपली जबाबदारी आहे ती पार पाडण्यापेक्षा आणि दुस-यांकडूनही तशाच वागण्याचा आग्रह धरण्यापेक्षा एक दिवस त्यांची आठवण करणे किती सोपे आहे. आपण सारे तेच करू.

२) केन्द्रसरकारकडून कडधान्यांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी अनेक परिपत्रके पाठवण्यात आली. मुंबई ग्राहक पंचायतीने याबाबत महाराष्ट्र राज्याचे मंत्री बापट यांना याबाबत विचारले व सदर परिपत्रकांच्या प्रती त्यांना दिल्या. मात्र त्यांच्या मंत्रालयातील अधिका-यांना याबाबत काहीच माहित नसल्याचे कळले. या प्रकारामागे काय गौडबंगाल असावे?

३) शिंडलरची कैफियत

आज अनेक वर्षांनी पुन्हा शिंडलर्स लिस्ट पहात आहे. पराकोटीचे क्रौर्य व त्यातील माणुसकीची ओऍसिस. काटा आणणारी दृश्ये. एकमेकांचा द्वेष करणा-यांना हा सिनेमा दाखवला पाहिजे. म्हणजे थोडी तरी टाळकी ताळ्यावर येतील. भाजीपाल्यासारखे माणसे मारणा-या उद्दाम अधिका-याला शिंडलर पॉवर म्हणजे काय ते हे तो दारूच्या नशेत सांगतो, तरी ते त्याच्या लक्षात राहते. पण तिथल्या बंदीवान ज्युंसाठी ते क्षणिक समाधानाचेच ठरते. माणसाचा हैवान झालेला असला की कशानेच काही फरक पडत नाही हे खरे.

त्या काळात माणूस जगणार की नाही हे छापाकाट्यावर किंवा समोरच्या दैत्याच्या लहरीवर ठरत होते. स्त्रिया व पुरूषांची चाळणी करून झाल्यावर अचानक मुलांनी भरलेले ट्रक जाताना पाहताना त्या मुलांच्या आयांच्या उठलेल्या किंकाळ्या. वर्णन करणे अशक्य आहे.

लाच देणे कधी चांगले असते याचे हे एकमेवाद्वितीय उदाहरण असावे.

ज्युंचा निरोप घेतेवेळी ज्यु लोक दातातले सोने वितळवून शिंडलरला भेट देण्यासाठी अंगठी तयार करतात. ती त्यांच्याकडून शिंडलरच्या मनात येतो की ही सोन्याची अंगठी देऊन मला कमीत कमी दोघांचे तरी प्राण वाचवता आले असते. एकाचे तरी नक्कीच वाचले असते. मी माझी गाडी तरी माझ्यासाठी का ठेवली? आणखी दहा-पंधरा जणांचे तरी प्राण वाचवता आले असते. अशा प्रसंगांनी मनाचा बांध फुटतो. सुरूवातीला ज्युंकडे केवळ धंदेवाईकपणे पाहणा-या ऑस्कर शिंडलरचा देवमाणूस होतो. नव्या पिढीला हा सिनेमा आवर्जून दाखवला पाहिजे.

स्पिलबर्गला अणि लियाम नीसनला पुन्हा एकदा सलाम. स्पिलबर्गचे इतर दहा सिनेमे एकीकडे आणि ऑस्कर शिंडलरची ही यादी एकीकडे.

शिंडलरच्या कैफियतीच्या धर्तीवर आपल्याकडे एक तरी मूल शिकवा ही चळवळ चालू करण्यास काय हरकत आहे?

४) बाजीराव-मस्तानीच्या पिंगावरून निर्माण झालेल्या वादावरून पेशव्यांच्या व़ंशजांची मुलाखत घेतलेली पाहिली. त्यांनी सांगितलेला एक मुद्दा यापूर्वी ऐकण्यात आला नव्हता. तो म्हणजे पूर्वी लग्ने बरीच आधी होत असत. शिवाय मंगळागौरीचे उद्यापन पाच वर्षांनी व्हायचे म्हटले तरी त्यावेळी काशीबाई वयाने फारच लहान असणार. त्यामुळे मस्तानीबरोबर काशीबाईने नाचणे तर अशक्यच, पण प्रियांकाच्या वयाची काशीबाई नाचवणेही अयोग्य. मुद्दा बरोबर वाटतो.

पण आमीरखानला देशद्रोही ठरवण्याच्या नादात हा वाद अगदी मागे पडलाय. गंमत आहे.

५) राजस्थानातल्या कोट्यामध्ये आयआयटीसाठी छाप पाडण्यासाठीचे कारखाने चालतात, हे सर्वांनाच माहित आहे. हे लोण अाता हैद्रावाद, मुंबई, पुणे या शहरांसह अगदी लातुरपर्यंत पोहोचले आहे. कोट्यात शिकणा-या अठरा वर्षाच्या मुलीने पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याची खंत बाळगत आत्महत्या केल्याबाबतीत एक लेख एक्सप्रेसमध्ये आला आहे. मुलांपुढे कोणती आव्हाने आहेत हे पाहता एकीकडे निगेटीव्ह गुणांचीही पद्धत नसल्यामुळे एखाद्याचे करियर ठरवाणारी सीईटी परीक्षा निरर्थक केली गेली आहे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अवघड असलेल्या जेइइ परिक्षेसाठीच्या तयारीसाठीच्या या फॅक्ट-या मुलांच्या जीवावर उठत आहेत ही अतिशय काळजीची गोष्ट आहे.

६) सिरियातील आयसिसच्या तळांवर बॉंबहल्ले करणा-या रशियाचे एक लढाऊ विमान टर्की विमानाने मिसाइलने पाडले. एरवी रशियाचे विमान पाडले ही खुपच मोठी बातमी व खूप मोठा गुन्हा. पण टर्की पडला अमेरिकेचा मित्र. त्यामुळे रशियाला कितीही राग आला तरी काही करता येत नाहीये. याचा वचपा रशिया आगामी दिवसांमध्ये कसा काढतो ते पहावे लागेल. कारण रशियाचे एक प्रवासी विमानही अलीकडेच इजिप्तमध्ये पाडण्यात अलेले आहे. त्यापाठोपाठ वरील घटना घडूनही त्याबाबत काहीही करता येत नसलयामुळे पुतीन यांच्या कडक प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.

आयसिससारख्या छुप्या शत्रुचा पाडाव करणे हे कसे अवघड आहे, हे अशा घटनांमुळे कळते.

७) आता असहिष्णुता कोणाकडून हेदेखील तपासून घेण्याची वेळ आली आहे. ए. आर. रहमान सध्याच्या वादामध्ये आमीरखानच्या मदतीला धावला व त्यालाही असहिष्णुतेचा सामना करावा लागल्याचे त्याने सांगितले. पण हा त्रास हिंदूंकडून झाला की मुस्लिमांकडून याचा उच्चार त्याने केलाय का? कारण मोहम्मदावर एका इराणी दिग्दर्शकाने काढलेल्या सिनेमाच्या संदर्भात भारतातील काही जणांनी रहमानविरूद्ध फतवा काढल्याचे वाचनात आले होते. तेव्हा काही जणांना देशातील असहिष्णुतेबद्दल लोकांचे दाखले देताना रहमानच्या नावाचे हत्यार करता येईल की नाही याबद्दल शंका आहे. काही जणांनी रहमानच्या नाराजीचेही घाईघाईत भांडवल केलेले पाहिले, पण बहुधा त्यांना निराश व्हायला हवे.

८) पाकिस्तानबरोबर क्रिकेट कोणाला हवे?

पाकिस्तानविरूद्धचे क्रिकेट सामने श्रीलंकेत व्हावेत यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संमती दिली आहे. अशा पद्धतीने काही मार्ग काढावा असे वक्तव्य बीसीसीआयच्या राजीन शुक्ला यांनीही अलीकडेच केले होते. परंतु पाकिस्तानबरोबर असे सामने खेळण्याबाबत भाजप सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. याची काहीही गरज नाही.

प्रत्येक वेळी सीमेवर रक्त सांडणा-या जवानांचा हवाला देत याला विरोध करण्याचे कारण नाही. परंतु याची अजिबात गरज नाही.

की पूर्वीप्रमाणे पाकिस्तानबरोबर क्रिकेट चालू झाले की लोकांचे लक्ष सहजपणे अंतर्गत मुद्द्यांवरून हटते असा अनुभव असल्याने सध्या विविध मुद्द्यांवरून टीकेला सामोरे जावे लागणा-या भाजप सरकारचाही या दौ-याला पाठिंबा त्याच कारणाने द्यायचा आहे? याबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट करायला हवी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे लिखाण चांगले आहे. पण मे बी बरेच लेख झाल्याने लोक तुमचे लेख ओलांडून पलिकडे जायला लागले आहेत. यासाठी काही करता येईल का ते प्लीज बघा. सगळेच मुद्दे चांगले आहेत.

धन्यवाद पियू.
या लेखमालेत विविध मुद्दे असल्यामुळे तसे होणे साहजिक आहे. वाचकांपैकी कोणाला कशात रस असेल हे सांगता येत नाही. शिवाय प्रत्येक मुद्दा येथे वेगळा टाकावा, तर बरीच गर्दी होईल.ते योग्य होणार नाही. हा प्रकारच थोडा ना असल्यामुळे वाचकांना सवय होण्यास काही काळ जाईल. त्याला काही पर्याय नाही. पुन्हा धन्यवाद.