मुंबई पुणे व्हाया लोणावळा

Submitted by Abhiram ramdasi on 25 November, 2015 - 11:56

ती या ब्लॉग सीरिज मधला दूसरा ब्लॉग- मुंबई पुणे व्हाया लोणावळा
"एकशे पंच्याण्णव रूपये साहेब"खालापुर टोलनाक्यावर काम करणाऱ्या माणसाने गेल्या दीड तासात कारमध्ये असलेली शांतता भंग केली.तो पाकीट काढणार तोच तिने पर्सच्या वरच्या कप्प्यातले सुट्टे एकशे पंच्याण्णव रूपये काढले आणि त्या टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्याला दिले."धन्यवाद मॅडम,आजकाल सुट्या पैशाचा फार प्रोब्लेम असतो"कर्मचारी पावती देताना म्हणाला.ह्या दोघांत काहीतरी बिनसलं असावं असा विचार करुन टोलवरच फाटक उघडलं.पावती बाजूला ठेवत त्याने गिअर बदलला,या वेळेला क्लच जरा जास्तच जोरात सुटला आणि धक्का बसला.आयुष्याचे गिअर बदलताना असे झटके बऱ्याच वेळेला बसतात,एव्हाना दोघांना असे धक्के पचवायची सवय झाली होती.
मुंबई पुणे प्रवास करताना नेहमीच बरं वाटतं,पण पावसात जरा जास्तच छान वाटतं तिथून जाताना,तिचही तसच होतं कोणत्याही कपड़यात सुंदर दिसणारी ती तिच्या हिरव्या कुरतीत फार गोड दिसत होती.पाण्याच्या थेंबासारखी छोटीशी टिकली तिच्यावर जरा जास्तच जमून आलेली.गाडीच्या काचेवर पडलेल्या दवबिंदुची सुंदर नक्षी आणि ती आज अगदी सारखेच होते.अगदी सुंदर म्हणजे,आपण बघू शकतो, जाणवू शकतो अगदी आपल्या समोर असतं सगळ,पण जवळ असूनही खुप लांब! काचेवर पडलेले दव बघुन नकोसा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याची अस्वस्थता आणि गाडीची स्पीड हळुहळु वाढत होती.तिच आज नेमकं काय बिनसलय हे त्याला अजूनही कळत नव्हतं किंवा तो तस दाखवत नव्हता."प्लीज पाणी देशील" कमी स्वरात तो पुटपुटला!"तू आजही पाण्याची बाटली नाही आणलीस?"डोळे मोठे करुन तिने विचारलं! बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवत जा हां तिचा हुकुम तो नेहमीच विसरायचा!
त्याने एसी बंद करून काचा उघडल्या,तिचे केस डोळ्यावर येत होते. त्या बटा ती अलगद पणे बाजूला करायला लागली होती.लेफ्ट मिरर मध्ये बघून ती केस बांधायला लागली होती.गाडी चालवताना आरशात चोरट्या नजरेने तो तिला न्याहाळत होता.सहा वर्षापूर्वी ,कॉलेज मध्ये लेक्चर चालू असताना तिला पहिल्यांदा केस बांधताना पाहिलेलं त्याला आठवलं.परपल रंगाची कुरती,कानातले झुमके,गालावरची ती खळी अजूनही त्याला त्या गाडीच्या लेफ्ट मिरर मध्ये दिसत होती.सहा वर्षापूर्वीच्या त्या धुक्यात तो परत एकदा हरवला होता.धुकं म्हणजे त्याच्या जिव्हाळयाची गोष्ट, त्या धुक्यात आपल्याला पुढच्या क्षणी काय होणार ह्याची किंचितशीही कल्पना नसते, काहीच दिसत नसतं, तरीही आपण पुढे जात राहतो,कदाचित एकमेकांवर असलेला विश्वास ते अंधुक धुकं पार करून देतो. पाठच्या Travels वाल्याने त्याला हॉर्न मारून भानावर आणलं,शिव्या देऊन Travels वाला पुढे निघून गेला,कॉलेजला असताना बाइकवर फिरतानाही असच व्हायचं दोघे एकमेकांत एवढे गुंतलेले असायचे की आपण रस्त्यावर गाडी चालवतोय हे तो विसरून जायचा,शिव्या ऐकायला लागायच्या पण तिला फार हेवा वाटायचा त्याचा आणि का वाटू नये?आपण सोबत असताना तो फक्त आपला विचार करतो याचं तिला प्रचंड समाधान मिळायचं आत्ताही अगदी तसच घडत होतं,त्याचं ड्राइविंग मध्ये लक्ष नाहिये हे तिला जाणवलं होतं.कॉलेजची डबलसीट राइड आठवून तिला फार प्रसन्न वाटायला लागलं होतं."कॉफ़ी घेउया" घाटा आधीचा फुड मॉल आल्यावर ती म्हणाली! त्याने गाडी थांबवली.ती गाडीत बसून राहिली आणि तो कॉफ़ी आणायला बाहेर पडला.तो पुढे गेल्यावर तिही गाडीच्या बाहेर आली.केस बांधत गाडीला टेकून उभी टाकली.तो कॉफ़ी शॉपच्या रांगेत उभा होता तिला दिसत होता."किती प्रेम करतो तो आपल्यावर आणि मी सारखी चिडचिड करते त्याच्यावर,पण मी कितीही रुसले तरी तो नेहमी माझी समजूत काढतो तोच नेहमी मला समजून घेतो.कॉलेज मध्ये असतानाही असच व्हायचं घरी काही कटकट झाली की सगळा राग त्याच्यावर निघायचा आणि तो सगळ मुकाट्याने ऐकून घ्यायचा! सहा वर्ष झाली आता वय वाढलं आहे पण तिच्यासाठी अजूनही कॉलेज मधला तो तसाच आहे" दुरून दिसणारया खंडाळयाच्या डोंगराकड़े बघताना तिच्या मनात विचार येउन गेला.कॉफ़ीशॉप च्या रांगेत आता तो दिसत नव्हता,आता तिची नजर त्या गर्दीत त्याला शोधत होती.त्याला फोन करणार तोच खांद्याला हात लावून कोणीतरी पाठून बोलावलं.'कॉफ़ी'तो कॉफ़ीचे दोन कप घेउन उभा होता.मनोमन ती सुखावली.विकत आणलेल्या पाण्याची बाटली त्याने गाडीत ठेवली.काहीच न बोलता दोघांनी कॉफ़ी संपवली."कस बोलू"ह्या विचाराने दोघेही नर्व्हस झालेले.कमी वेगात घाटाकड़े गाडी निघाली होती.दूर लांब घाटाची अवघड वळण दिसत होती.तो घाट दोघांच्या मुड स्विंग्स सारखा होता.स्मूथ, सहज पार करता येइल असा पण तरीहीथोडा अवघड.खरतर दोघांत आज काहीही भांडण झालं नव्हतं तरीही उगाच चिडचिड होत होती.
" जिंदगी के सफर में गुजर जाते है जो माकाम,वो फिर नहीं आते,वो फिर नाही आते" त्याने FM चालु केल्यावर किशोर कुमारच गाणं लागलं.तिच्या चेहरयावरचं छोटंस हसू त्याने पाहिलं.आपण हसतोय हे त्याने पाहील्यावर तिने FM CHANNEL चेंज केला."तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू मै,तेरे मासूम सवालोसे परेशान हू मै"आर.डी.बरमनच ते गाणं ऐकून आता दोघेही हसायला लागले होते.खोल दरी बाजुला दिसू लागली होती.रागाचा अर्धा घाट एव्हाना पार झाला होता.डोंगरावरचे धबधबे बघून दोघांच मन प्रसन्न झालेलं!लोणावळयाच्या एका ठिकाणी त्याने गाडी बाजूला लावली.मक्याच कणीस खाताना तिने त्याचा एक हात बगलेत पकडून ठेवला होता.तो तिच्या तळ हातावर मध्येच किस करत होता.'सॉरी' दोघेही एकत्र म्हणाले आणि जोरात हसायला लागलेले.पायाखाली असलेल्या दरीत राग एव्हाना निखळला होता,आणि उंचावरुन पडणारया धबधब्या सारख प्रेम ओसंडून वाहू लागलं होतं.प्रेमाच्या धबधब्यात दोघेही मनोसोक्त भिजले होते.निघताना तिने त्याला घट्ट मिठी मारून माफ़ी मागितली.तो नेहमी सारखच काहीही न बोलता खुप बोलून गेला होता.मुंबई पुण्याच्या या प्रवासात लोणावळयाने एक वेगळाच मौसम सुरु करून दिला होता.पुन्हा इथे यायच म्हणत प्रेमाची गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली होती.क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cute ☺

सुरेख

dhnyawad