आठवणी अज्ञातांच्या

Submitted by निशदे on 23 November, 2015 - 12:05

​आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.


-------------------------------------------------"येडी"---------------------------------------------

अगदी लहान असताना मला आईबाबांनी जणू देवाला सोडलेल्या बैलाप्रमाणे गावासाठी सोडलेले होते. त्यामुळे शाळा सुटली की घरी दप्तर फेकून मी जे पसार व्हायचो, ते थेट रात्रीच्या जेवणाआधी किंवा जेवणानंतरच घरी हजर व्हायचो. माझे गाव पंचक्रोशीतले सर्वात मोठे, पण तरीही ते गावच! त्यामुळे रोज फिरण्याच्या जागाही ठरलेल्याच! रोज घरून निघाल्यावर सर्व मित्रमंडळ गोळा झाले की प्रथम गणपतीच्या देवळात नमस्कार करून आम्ही खेळत असू. खेळून झाले की नुसते सगळीकडे फिरत बसायचे हादेखील शिरस्ता ठरलेला.

अशाच एका गावभ्रमंतीच्या वेळी ती पहिल्यांदा दिसली.
मारुतीच्या देवळाबाहेर पायर्‍यांवर ती बसली होती. विस्कटलेले केस, धुळीने माखलेले अंग, ठिकठिकाणी फाटलेली आणि न फाटलेल्या ठिकाणी धुळीच्या रंगाबरोबर एकरूप झालेली साडी, सावळा वर्ण आणि तोंडाने अखंड कसलीतरी बडबड चाललेली. अशा अवतारात तिला पाहून आम्ही सर्वांनी भेदरून धूम ठो़कली. घरी आल्यावर मी आमच्या कामवाल्या आत्यांना सांगितले.
"आरं ती वाडीतल्या मांगाची सून हाय" आत्याने सांगितले.
"पण मग अशी का फिरते?"
"येडी हाय ती. कोनाचा तरी हात धरुन पळाली. त्यानं संधी साधून दिली सोडून येडीला! आता मांगबी परत घेईना. तसं येड लागलं तिला. आता फिरत अस्ती गावात कुटंकुटं."

नंतर ती अशीच कुठेनाकुठे दिसत राहिली. कधी एखाद्या देवळासमोर, कधी डोंगरांजवळ तर कधी कोणाच्यातरी दारात जेवताना दिसायची. नजरेसमोर असून काही लोकांच्या अस्तित्वाची दखल आपण घेत नाही, तसेच काहीसे तिच्याबरोबर झाले.
नंतर शिक्षणासाठी पुण्याला आलो आणि मग पुण्याचाच झालो. गावाकडे फेर्‍या कमी होत गेल्या आणि तिच्याबद्दल तर विसरूनच गेलो. ५-६ वर्षांपूर्वी अशाच आमच्या घरी काम करणार्‍या आत्यांना विचारले तर आधी त्यांनाही ती आठवेना.

"आरं लई येडी लोकं फिरत्यात, कोनाकोनाला ध्येनात ठिवायचं?"
"अगं पण ती मारुतीच्या देवळाबाहेर बसायची आणि गावात फिरायची ना, तीच गं"
अशी काही वेळ झटापट झाल्यावर त्यांना एकदम ती आठवली.
"आरं त्या येडीनं जीव दिला"
एकदम कसलीतरी अस्वस्थता मनात दाटून आली.
"का?"
"आता कुनाला म्हाईत का? गुरवानंच केलं नंतर सगळं......."

आतासुद्धा कधीतरी ती डोळ्यासमोर उभी राहते. कोणाच्यातरी प्रेमात पडून घरदार सोडून जायचं धाडस दाखवलं तिने, त्याच्या बदल्यात तिला बहिष्कृत होण्याचं बक्षिस मिळालं. काय वाटलं असेल तिला जीव देताना? माझ्यासाठी तरी ती अज्ञातच होती आणि अज्ञातच राहिली.

--------------------------------------------अशोक---------------------------------------------------

पुण्यात राहत असताना मी जिथे खाणावळीला जात असे तिथल्याच एका मुलाची ही गोष्ट. माझ्या घराच्या समोरच खाणावळ होती. खाणावळीच्या मालकीण पिंपळे काकू. काकूंच्या हाताला छान चव होती. मी जायला सुरुवात केली तेव्हा खाणावळ नुकतीच चालू झालेली होती. नियमितपणे येणारी आम्ही दोन-तीनच मुले होतो. त्यावेळी मी आठवीत होतो.
काकूंना एक मुलगा व एक मुलगी. थोरला मुलगा अशोक बुद्धिने थोडा कमी होता. म्हणजे मतिमंद नव्हे पण slow growth असलेला. त्याला नियम, पद्धती वगैरे चटकन समजत नसत. तीन-चारवेळा सांगितले की मग लक्षात येत असे. अशोकचे वडील आम्हाला कधी दिसायचे नाहीत. त्यांची रात्रपाळी असते असे काकूंकडून सांगितले गेल्याने आम्हीही कधी विशेष चौकशी केली नाही.

मी समोरच्याच इमारतीत राहायचो. आमच्या सोसायटीमधील मुलांबरोबर खेळायला अशोक नेहेमी यायचा. त्याचे वेगळेपण बहुतेक सर्वांना माहित होते पण कोणी कधी त्याला त्याच्यावरून काही बोलल्याचे आठवत नाही. तोसुद्धा आमच्याबरोबर खेळताना खुश असायचा. आपल्याला कमी समजते, इतर मुलांप्रमाणे खेळता येत नाही याची जाणीव त्याला असावी पण तो कधी त्याचे वाईट वाटून घ्यायचा नाही. सदैव हसतमुख असल्याने आम्हालाही तो खेळताना हवाहवासा वाटायचा.
असाच एकदा अंधारामुळे खेळ थांबल्याने आम्ही सर्व गप्पा मारत बसलेलो. एकेकाच्या घरून हाका यायल्या लागल्या तसे सर्वजण आपापल्या घरी जात होते. शेवटी फक्त मी आणि अशोकच उरलो. अशोक त्यादिवशी गप्पच होता. खेळतानाही त्याचा नेहेमीचा आनंदी मूड नव्हता. मी त्याला विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण अजून खोदून विचारताच तो अक्षरशः ओक्साबोक्शी रडायला लागला.

अशोकच्या वडिलांनी त्याला आणि त्याच्या आईला आदल्या रात्री दारूच्या नशेत प्रचंड मारले होते. ट्रक ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी वर्दीवरून ८-१० दिवसांनी परत आल्यावर काकूंकडे दारूसाठी पैसे मागितले. ते न मिळाल्यामुळे त्यांना मारहाण केली. पैसे चोरून दारू पिऊन आल्यावर पुन्हा एकदा मारहाण झाली. यावेळी अशोक घरात असल्याने आणि त्याने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने त्याला धुणे वाळत घालायच्या काठीने झोडपून काढले गेले. मारहाणीचे प्रकार नेहेमीचेच असले तरी यावेळी अक्षरशः अशोकच्या अंगावर व्रण उठेपर्यंत त्यांनी मारले होते. हे सर्व सांगताना त्याला रडू आवरत नव्हते.
मी कमालीचा अस्वस्थ होऊन घरी आलो. आईला सगळे फोनवरून सांगताना तिलाही माझ्या आवाजातला तणाव समजला असावा. तीन दिवसांनंतर ती पुण्यात येणार होती. तिने आल्यावर काकूंशी बोलण्याचे मला आश्वासन दिले आणि त्याआधीच काही घडले तर मला पोलिस स्टेशनला जायला सांगितले.

दुसर्‍या दिवशी रात्री खाणावळीची आदल्या महिन्याची फी द्यायला मी काकूंकडे गेलो. सुमारे साडेसहाची वेळ असावी. संपूर्ण वाड्यात एक विचित्र शांतता पसरली होती. चुकीच्या ठिकाणी शांतता कधीकधी भितीदायक वाटते त्यातलीच ती एक शांतता! वाड्यातील इतर सर्व भाडेकरूंचे दरवाजे बंद होते. माझ्या आठवणीत तरी वाड्यातील सर्व दरवाजे बंद असलेले मी पहिल्यांदाच पाहिले. समोरासमोर घरे आणि मधे अंगण असलेल्या त्या वाड्यात डावीकडचे शेवटचे घर पिंपळे काकूंचे होते. तिकडून कसलातरी अस्पष्ट आवाज येत होता. मी तसाच तिकडे गेलो आणि दाराच्या अलीकडील थोड्याश्या उघड्या खिडकीजवळ येऊन थबकलो.

दोन खोल्यांच्या घरातील बाहेरच्या खोलीमधील कॉटवर अशोक व त्याची बहीण बसली होती. बहिण अशोकच्या खांद्यात स्वत:चा चेहरा जोरात दाबून रडत होती. अशोक डोळे विस्फारून समोर बघत होता. त्याच्या समोर काका पिंपळे काकूंना मारत सुटले होते. तोंडाने शिव्यांचा पाऊस सुरू होता. तारवटलेले डोळे पाहता माणूस पूर्ण नशेत आहे हे कळतच होते. मारताना स्वतःचाच तोल जाऊन ते मधेच पडत होते आणि पुन्हा उठून मारायला सुरुवात करत होते. काकू प्रत्येक फटक्यानिशी विव्हळत होत्या आणि अखंड रडत होत्या. किलकिलत्या खिडकीतून मी थिजून हे सर्व पाहत होतो.
तेव्हढ्यात काका एकदम थांबले आणि काकूंच्या पदराला हात घातला आणि ते काकूंना आतल्या खोलीत ओढू लागले. काकूंनी कमालीच्या तिरस्काराने त्यांच्याकडे पाहिले आणि तो हात तसाच झटकून टाकला. संतापाने त्यांनी कमरेचा पट्टा काढला आणि आता ते पुन्हा मारायला सुरुवात करणार तेव्हढ्यात...
पुढच्या काही घटना विजेच्या वेगाने घडल्या. बहिणीला बाजूला झटकून अशोक ताडकन उठला. त्याने वडिलांना आईपासून बाजूला ढकलले. वडिल आतल्या खोलीच्या दारातच आपटले. दारात आतल्या बाजूला असलेल्या शेगडीवरचे पातेले अशोकने उचलले आणि आत उकळणार्‍या आमटीला सरळ बापाच्या तोंडावर ओतले. आत्तापर्यंत मुलगा काय करतोय हे जरी वडिलांना कळाले नसले तरी या गोष्टीने मात्र त्यांना चांगलेच भान आले. पण अशोक तेव्हढ्यावर थांबला नाही. रिकामे झालेल्या पातेल्याने त्याने वडिलांना झोडपायला सुरुवात केली. खुनशी चेहर्‍याने तो ते पातेले वडिलांवर आदळत होता आणि वडील त्याच्या पायावर लोळण घेत गयावया करत होते. पैसे खिडकीत ठेवून मी तसाच माघारी वळलो.

दोन दिवस अशोक न दिसल्याने आम्ही सर्व त्याच्या वाड्यात गेलो. तिथे जातानाही माझे पाय थरथर कापत होते. पिंपळे काकूंच्या घराला कुलुप होते. शेजारी चौकशी केली तर ते आदल्या दिवशी वाडा सोडून गेल्याचे कळाले.

नंतर कधीच अशोकचा पत्ता लागला नाही. वाड्यात कोणालाच त्याची माहिती नव्हती आणि त्याचे कोणी नातेवाईक आम्हाला माहित नव्हते. आयुष्यात अश्या प्रसंगाचे वेळी कसे वागावे हे माझ्या पांढरपेशी मनाला सर्वप्रथम अशोकने शिकवले. आजही त्याचा ठावठिकाणा माझ्यासाठी अज्ञात आहे. कधीतरी जर तो मला भेटला तर त्याला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहे. शिक्षण व बुद्धीच्या क्रमवारीत इतर समवयस्क समाज त्याच्यापेक्षा काही प्रमाणात पुढे असेलही पण जेव्हा अन्यायाविरुद्ध प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा तो सर्वांना केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेला होता.

----------------------------------------------------ख्रिस-------------------------------------------

अमेरिकेतील ओहायोमधील एका छोट्या गावातील एका मित्राची आठवण मला अनेकदा अस्वस्थ करते. ओहायोमधे फिंडले हे एक छोटेसे गाव आहे. लोकसंख्या सुमारे ८,०००. बहुतांश लोक 'मॅरॅथॉन पेट्रोलियम' या कंपनीच्या तिथल्या मुख्य ऑफिसात कामाला. त्या कंपनीच्या जोरावरच हे गाव उभे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कामाच्या निमित्ताने सुमारे एक वर्षभर मी तिथे राहायला होतो. त्याच दरम्यान तिथे ख्रिस स्टोन कामाला लागला. अंडाकृती चेहर्‍याचा, डोक्यावरील सर्व केस गेलेला, पोट सुटलेला ख्रिस, फिंडलेमध्ये ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत ठाण मांडून बसलेल्या बर्फाइतकाच पांढराशुभ्र होता. डेटाबेस सर्विसेस मधे एक काम येणार्‍या माहितीला योग्य स्वरूपात बदलून रिपोर्टसाठी पाठवणे हे असते. विविध स्त्रोतांकडून येणार्‍या माहितीचे स्वरूपांची (Data formats) नोंद ठेवण्याचे काम ख्रिसला देण्यात आले होते.

ख्रिसबरोबर १-२ वेळा बोलतानाच काही unusual गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे त्याची confidence level खूपच कमी होती. आपण बोलतोय ते योग्य की अयोग्य, बोलावे की बोलू नये अशा द्विधा मनस्थितीत तो अनेकदा असे. सुरुवातीला तर मिटींग्समध्ये भागसुद्धा घेत नसे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे technical knowledge जवळपास शून्य होते. मोठमोठ्या ETL packages मधील काही गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती पण ख्रिसला ETL मधील काहीच माहिती नव्हते. मी डिसेंबर मध्ये कामाला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये ख्रिस कामाला लागला. माझ्याच विभागात आणि त्याहूनही माझ्याच शेजारच्या क्युबिकलमध्ये त्याने कामाला सुरूवात केली. कशामुळे कोणास ठाऊक, पण मला पाहिल्याक्षणीच 'हाच आपल्याला मदत करणार' असे काहीसे त्याने ठरवले असावे. कारण त्याला कसलीही मदत हवी असली, कोणतीही गोष्ट समजत नसली की तो सरळ मला गाठत असे. मीदेखील माझ्या माहितीनुसार त्याला समजावून सांगत असे आणि मग १-२ दिवसात त्याची मला इमेल येई.
"
प्रिय निखिल,
कालच्या तुझ्या सांगण्यानुसार मी packages install केली. कसलाच problem आला नाही. पुन्हा एकदा धन्यवाद.
-ख्रिस
"
मी केलेल्या प्रत्येक मदतीबद्दल तो मला अशी इमेल करत असे. एकदा त्याच्याबरोबर ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये लंच घेताना अशा इमेल्स का पाठवू नकोस हे मी त्याला समजावून सांगितले तेव्हा त्याने इमेल्स पाठवणे बंद केले. पुढच्या १-२ महिन्यात माझ्याबरोबर knowledge transfer sessions घेताना आम्ही इतरही अनेक गप्पा मारत असू. त्यातही मला त्याच्या मनातली अनामिक भिती जाणवत असे. त्याचे एखाद्या बाबतीत ठाम मत असेल तरी तो ते माझ्यापासून बर्‍याचदा लपवून ठेवत असे. बोलण्याबाबत बिनधास्त असणार्‍या अमेरिकन्सच्या माझ्या अनेक अनुभवांनंतर ख्रिस माझ्यासाठी एक कोडेच ठरला होता.

हे कोडे कंपनीच्या एका कार्यक्रमात सुटले.

कंपनीतर्फे आम्ही बोलिंगसाठी गेलो होतो. कंपनी sponsor असल्याने दारूची कमी नव्हती. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता Stike करणार्‍यांना रात्री नऊ वाजता आपली bowling alley सुद्धा नीट सापडत नव्हती. आमचा गेम आधीच संपल्याने आम्ही couch वर गप्पा मारत बसलो होतो. हळूहळू पांगापांग होता होता शेवटी मी आणि ख्रिस उरलो.
"ख्रिस, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का?" दारूच्या मदतीने मी ख्रिसला थोडे बोलते करायचे ठरवले.
"Of course. विचार की".
"दोन प्रश्नः तू इतरांभोवती असताना इतका गप्प का असतोस? माझ्या पाहण्यानुसार तरी तू फक्त माझ्याशीच चांगला interact होतोस. इतर कोणाशीही जास्त बोलत नाहीस. Jared(आमचा मॅनेजर) तर तू माझ्याबरोबर बोलतोस हेदेखील मान्य करत नाही. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तू आधी या फील्ड मधे काम केले आहेस का?" दुसरा प्रश्नामागचा सुप्त प्रश्न खरे तर "तू इतका unexperienced असून इथे कसा कामाला लागलास?" असा होता पण खोचक प्रश्न ख्रिसला समजतील असे मला आत्तापर्यंत कधीच वाटले नव्हते.

ख्रिस थोडा अस्वस्थ झाला. कोचाला जरासा रेलून त्याने नेहेमीप्रमाणेच काही विचार केला आणि तो बोलू लागला.
"मला या जॉबबद्दल काहीच माहिती नाही निखिल. पण तुला ते आत्तापर्यंत समजले असेलच. Jaredने मला कामावर घेतले तेव्हाच सांगितले होते की शक्यतो कामापुरते बघ; ऑफिसच्या internal politicस मध्ये जास्त पडू नकोस. मी इतर कोणाकडेच मदत मागत नाही ते याचसाठी!"
आम्ही दोघेही शांत होतो. ख्रिस माझ्याकडे पाहत नव्हता. त्याला अजूनही बोलायचे होते.

"हे माझे फील्ड नाही. मी middle school ला शिकवायचो. खूप खुश होतो. माझी बायकोसुद्धा शाळेत शिकवायची. तीन वर्षांपूर्वी तिला कॅन्सर झाला. Chemo आणि radiation मध्ये प्रचंड पैसा गेला, घरही गेले. परिस्थिती इतकी वाईट झाली की शेवटी मी bankruptcy साठी apply केले. माझ्या account मधे त्यादिवशी २८ डॉलर होते. Bankruptcy ने बहुतेक बिलांची काळजी घेतली. पण नातेवाईक आणि मित्रांचे पैसे कसे द्यायचे याचाच विचार मी रात्रंदिवस करीत असे."

ख्रिसचे डोळे पाण्याने भरले होते.
"तेव्हढ्यात बायकोचा आजार उलटला. सहा महिन्यापूर्वी पुन्हा cancer ने dignose झाली. तत्क्षणीच मी माझी नोकरी सोडली. Jared माझा लहानपणापासूनचा मित्र. त्यानेच मला इथे यायला सांगितले. आता बायकोवर उपचार चालू आहेत पण मला तिच्याकडे बघायला वेळ नाही. इथून घरी गेल्यावर मी रोज चार तास 'Subway'मध्ये काम करतो आणि वीकांताला तिथेच जास्तीचे तास करतो. तिचे उपचार हेच माझ्यासाठी आता सर्वस्व आहे."

त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो.
"I am very sorry Chris. मला खरंच कळत नाही तुला काय सांगू. Keep fighting आणि तुला कसलीही मदत लागली तर नि:संकोचपणे सांग. "
डोळे पुसत माझा हात हातात घेऊन ख्रिस म्हणाला,
"अरे तू काही नको बरं का विचार करुस. अरे मी गेले चार महिने एका support group ला जातोय. त्यांनी मला एखाद्या विश्वासू माणसाला सर्व सांगण्याबद्दल सुचवले होते. मीदेखील तुझ्याशी बोलणारच होतो पण आज विषयच निघाला म्हणून बोललो. छातीवरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटले."

सुमारे तासाभरानंतर आम्ही निघालो. दुसर्‍या दिवसापासून आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. ख्रिस ऑफिसमधेही जर मोकळेपणाने वागू लागला. अधूनमधून दुपारी एकत्र जेवताना पामेला(त्याची बायको)बद्दल, तिच्या उपचारांबद्दल तो मला सांगत असे तर कधी एकंदर त्याच्या आर्थिक स्थितीबद्दलही बोलत असे.
ऑक्टोबरच्या अखेरीस मी कंपनी सोडायचा निर्णय घेतला. ख्रिसला खूपच वाईट वाटले. "यावेळचा ख्रिसमस तुझ्याबरोबरच साजरा करायचा होता" असेही तो म्हणाला. नंतर काही महिने ख्रिसबरोबर नित्यनियमाने इमेल्स, फोनवर बोलणे होत असे. कामाच्याच गप्पा अधिक होत असत. कदाचित सतत बायकोच्या आजारपणाबद्दल बोलत असल्यामुळेच असेल, पण माझ्याशी बोलताना पामेलाबद्दल बोलणे तो टाळत असे.

काही महिन्यांनंतर अचानक त्याच्याशी संपर्क तुटला. कंपनीत विचारले असता त्याने नोकरी सोडल्याचे कळाले. कदाचित नवीन जागी गडबडीत असेल म्हणून मीदेखील फारसे लक्ष दिले नाही. काही महिन्यांनंतर त्याची इमेल आली.

"
प्रिय निखिल,
सुमारे तीन महिन्यांपूर्वी पामेलाचे निधन झाले. Cancer शरीराच्या इतर भागात पसरला आणि तिची तब्बेत वेगाने ढासळत गेली. अखेरीस तिने उपचारालाही नकार दिला.
गेले काही महिने मी विचित्र मनस्थितीतच होतो. तिच्या जाण्याने झालेली पोकळी कधी भरून निघेल असे वाटत नाही. जे काही करत होतो ते तिच्यासाठीच. आता इथे मन रमत नाही. कुठेतरी दुसरीकडे जाऊन उरलेल्या आयुष्याची तिच्या आठवणींबरोबर नवी सुरुवात करेन.
तुला अनेक धन्यवाद. फक्त कामाच्याच बाबतीत नाही तर इतरही अनेक गोष्टीत तू दाखवलेल्या supportबद्दल. God bless you.
-ख्रिस
"
मी त्याला उत्तर लिहिले पण नंतर ख्रिसचा कसलाच इमेल आला नाही. काही काळानंतर मीही त्याच्याशी संपर्क ठेवला नाही.

त्याच्या पूर्वायुष्यापैकी केवळ पामेलाच्या आठवणींनीच त्याला नवी सुरुवात करायची होती आणि त्याच्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा होता. त्याच्या नव्या आयुष्याला, माझ्या त्यातील अनुपस्थितीने हातभार लागणार असला, तर मी ते करण्यासाठी आनंदाने तयार होतो.
मात्र आजही कधीतरी ख्रिसची आठवण येते. त्याचे नवीन आयुष्य सुरु झाले असेल का? कसे चालू असेल ते? त्याला इतक्या वर्षांनंतर थोडेतरी closure मिळाले असेल का? असे अनेक प्रश्न मनात येतात. आजतरी ख्रिस माझ्यासाठी अज्ञातच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले

लिखाण आवडले.
मथळ्यातील अज्ञात शब्द जरा सुयोग्य वाटत नाहीये, सध्या कुठे आहेत ते माहीत नाही अशा अर्थासाठी अज्ञातवासी जास्त समर्पक वाटेल का

सुरेख, व्यक्तिरेखा अगदी डोळ्यासमोर उभ्या केल्यास निखिल.
लिहीत रहा रे, तुझे विषय मस्त असतात..

फारच प्रभावी लिखाण. मनाचा तळ ढवळून निघाला आणि विस्मृतीत गेलेले कित्येक लोक अचानक डोळ्यांसमोर तरळून गेले.

आवडले. अश्या काही आठवणी मधूनच रुंजी घालत असतात. त्यांना शब्दरुप दिल्यावर तुम्हालाही हलके वाटले असेल ना?

एकदम छान.... मनाला खूपच भावले... काही आठवणी अश्याच असतात त्या आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर त्या भेटल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.....

छान लिहीलं आहे. सगळेच किस्से विचार करायला लावणारे. शेवटचा अधिक अस्वस्थ करुन गेला. काही गोष्टींची उत्तरंही सापडली.

सर्वांना मनापासून धन्यवाद.
हर्पेन, यामध्ये 'अज्ञात' हा शब्द दुहेरी अर्थाने वापरला आहे. आयुष्याच्या एका टप्प्यानंतर हे लोक माझ्यासाठी अज्ञात ठरले तसेच त्यांना कमीजास्त प्रमाणात ओळखून व काही वेळा त्यांच्याबाबत अंदाज बांधूनही त्यांच्या स्वभावातील, आयुष्यातील काही कप्पे, जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते, तेदेखील मला अज्ञातच राहिले.
आश्विनी, अर्थातच. अशा काही लोकांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात सतत असतातच. शब्दरुपात उतरवल्यावर मनाला जरा शांतता मिळते.