जपान, जपानी आणि मी !....भाग ३

Submitted by पद्मावति on 23 November, 2015 - 09:19

http://www.maayboli.com/node/55981

http://www.maayboli.com/node/56035

पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची...

अशाच काही सुखी पुरुषांची घरं आमच्या आसपास होती. या जपानी पुरूष मंडळींचा थंडीतला सकाळी कामावर जाण्याचा सोहळा थोडाफार असा होता. ओहायोच्या उणे १२ डिग्री सेल्शीयस तापमान आणि बर्फाच्या चार फुटी ढीग जमलेला ड्राइववे साफ करण्यासाठी बायको भल्या पहाटे बाहेर पडणार. त्या हाडे गोठून जातील अशा थंडीत अर्धा पाऊण तास खपून साफसफाई केली की मग ही बाई गराज मधून रेफ्रिजिरेटर झालेली गाडी बाहेर काढणार. पंधरा वीस मिनिटे इग्निशन ऑन करून हीटर लावून ती गाडी छानपैकी गरम करणार. त्यानंतर तिचा नवरा थाटात बाहेर येणार आणि गाडीत बसून मठ्ठपणे निघून जाणार. असे हे सर्व सुखी नवरे....त्यांना बघून माझा नवरा फार फार दु:खी व्हायचा कारण त्याची बायको वरीलपैकी एकही गोष्ट करत नसे.

सर्वसाधारण जपानी पुरूष हा अबोल असतो, गंभीर असतो. जरासा तुसडा आणि अतिशय अंतर्मुखी असतो. त्यांच्या या अंतर्मुखी आणि लाजाळू स्वभावामुळे हे लोक पटकन कोणाशी बोलायला, ओळख वाढवायला पाहत नाहीत. शिष्ठ वगैरे अजिबात नाही पण स्वत:च्या कोषात राहण्याच्या सवयीमुळे त्यांची प्रतिमा मात्र शिष्ठ, अकडू अशी होते.
पुरूष पटकन कोणाशी आपण होऊन संभाषण करत नाहीत. एखाद्या स्त्रीशी तर नाहीच नाही. आपण ज्याला स्मॉल टॉक म्हणतो ते त्यांना अजिबात जमत नाही. त्यातून समोरची स्त्री परदेशी आणि इंग्रजी बोलणारी असेल तर अजुनच अवघडल्यासारखे वागतात. अजुन एक गोष्ट म्हणजे जपानी स्त्री असो वा पुरूष आय कॉंटॅक्ट कधीच करणार नाही. त्यांच्याशी बोलतांना किंवा सहज जरी यांच्याकडे आपण बघितलं कीं पटकन नजर झुकवतात.

जपानमधे आम्ही राहात होतो तेव्हा आमच्या सोसायटीमधील पुरूष मंडळी मला पाहून फारच बीचकुन जायची.. मी समोरून येतांना दिसले रे दिसले की हे लोक अगदी अचानक एखादं प्रचंड महत्वाचं काम आठवल्यासारखा चेहरा करायचे, जेमतेम 'कोन्नीचिवा' असे पुटपुटायचे आणि मग अत्यंत घाई गडबडीत असल्याचा अभिनय करीत माझ्यासमोरून सुसाट वेगाने नाहीसे व्हायचे.
पुढे अमेरिकेत आल्यावर मात्र या सर्वांशी छान ओळख झाली, त्यांनाही इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव झाला आणि जपान मधे बुलेट ट्रेनच्या गतीने माझ्यासमोरून गायब होणार्या या लोकांची मग " पमिचान, प्रीज मेक स्पिनिच पाकोरा फोर मी...." असे मला सांगण्याइतपत प्रगती झाली.

जपान मधले जपानी लोक आणि अमेरीकेत आलेले जपानी लोक या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मूळ स्वभाव, विचारधारा तीच असली तरीही देशांतरामुळे त्यांच्या विचारांना, वागण्याला इथे नवीन पैलू पडायला लागायचे. अतीकाम, जागेची टंचाई, महागाई, ट्रॅफिक या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय पण जपान मधे सर्व लोकांच्या चेहृयावर एक प्रकारचा ताण मला सतत जाणवायचा. अमेरिकेत आल्यावर चांगले आर्थिक स्थैर्य, मोकळी ऐसपैस जागा, अघळपगळ गप्पा मारणारे आमच्या गावातले स्थानिक लोक आणि घरापासून मोजून पाच मिनिटावर असलेला कारखाना या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून या लोकांमधे काही सुखद बदल व्हायला लागायचे. तोंडावर तणावाच्या ऐवजी हास्य, बोलण्यवागण्यात आलेला एक प्रकारचा मोकळेपणा पण त्याचबरोबर शरीराचं वाढलेलं वजनही.....

कामात असतांना हे लोक जेवणाच्या सुट्टीत आपलं जेवण तीन ते चार मिनिटात आटपु शकतात. त्यांच्या जेवणाचा असा चपटा, चार पाच खण असलेला बेन्तो बॉक्स असतो. एका खणात भात, दुसर्यात फिश, तीसर्यात सलाड, मग एखादा अजुन मीटचा तुकडा, भाताचे गोळे, मुळा, काकडी यांचे वेनिगार मधे मुरलेले लोणचे..असे प्रकार आलटून पालटून असतात. मग चॉप्स्टीक्स वापरुन हे सगळे प्रकार पटापट उचलून तोंडात गडप होतात. बाकी सगळे प्रकार चॉप्स्टिक ने खाणे ठीक आहे पण भात सुद्धा त्या काड्यांनी हे लोक इतके मस्तं टपाटप खातात की पाहात राहावे. तो भात सुद्धा अगदी चिकट असतो. त्याचा पार गच्च गोळा होतो.

आपले भारतीय पदार्थ त्यांना फार आवडायचे. खासकरून भजी, पकोडे, वडे असे तळलेले पदार्थ. माझ्याकडे हे लोक जेवायला येणार असतील तर स्वयपाकात तीखट मात्र अजिबात मी टाकत नसे. तीखट यांना झेपतच नाही तसेच गोड पदार्थांचीसुद्धा आवड कमीच. दुधाचे पदार्थ, खीरी वगैरे नाही. बाकी पोळी, भाजी, राजमा, पनीर ग्रेवी, वेजी पुलाव असे पदार्थ मात्र फार आवडायचे.. पोळी तर काही मित्रांना इतकी आवडायची की जेवण झाल्यावर सुद्धा गप्पा मारता मारता अधून मधून एखादी पोळी गुंडाळून खात बसायचे.
मी वरती म्हटल्याप्रमाणे हे लोक आपले जेवण चार मिनिटात संपवतात पण हेच लोक आरामशीर मूड मधे असले किंवा कुठे एकत्र डिनरला भेटले की मग पाच सहा तासांची निश्चिंती!

सहाला या मंडळींना तुम्ही घरी बोलावलंत आणि दारावरची बेल वाजली की खुशाल समजावं की सहा वाजले. एक मिनिट लवकर नाही की उशीर नाही. लवकर आलेत तर घराबाहेर कारमधे बसून राहतील पण दारात उभे राहाणार सहाच्या ठोक्यालाच. मग मात्र निवांत. आधी आपेटाइज़र्स, हळूहळू जेवण, डिज़र्ट, मग परत एकदा भजींचा राउंड आणि या सगळ्याच्या साथीला सतत बियर किंवा वाइन. मद्य पीण्याची आत्यंतिक आवड असते या लोकांना.

या लोकांची पिण्याची एक पध्ध्त सांगते. कुठे बाहेर गेलं की हे लोक स्वत:च्या हातांनी स्वत:चं ड्रिंक ओतून घेणार नाहीत. त्याच्या ग्लासमधे त्याचा एखादा मित्र ड्रिंक भरून देईल आणि हा त्या मित्राचा ग्लास भरून देईल. ग्लास थोडासा रिकामा झाला की समोरचा माणूस लगेच टॉप अप करणार की हा लगेच रेसिप्रोकेट करणार.

पण एक गोष्ट आवर्जून सांगते. इतक्या वर्षांच्या सहवासात माझ्या आठवणीत एकदाही, एखाद्याने मद्य पीउन कधीही कोणाशीही दु:वर्तन केलेय, वेडेवाकडे बोललेय इतकंच काय पण कोणाचा आवाजही चढलेला मी कधी ऐकला नाही. एक स्त्री म्हणून मला किंवा आमच्या ग्रूप मधल्या कुठल्याही स्त्रीला त्यांच्याबरोबर अवघडल्यासारखं होईल असे कोणी कधीही वागलं नाही.

जपान या देशात श्रेणी पद्धती ज्याला आपण hierarchy म्हणतो त्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा. इतका पगडा की तिथे कार्यालयीन कामकाजासाठी टॅक्सीने कुठे बाहेर जावं लागलं तर कोण कुठे बसणार याचाही नियम असतो. तो असा की रॅंकनी सगळ्यात जो कमी तो पुढे ड्रायवरच्या शेजारच्या सीट वर. नंतर त्याच्या वरती ज्याची श्रेणी असेल तो बसणार ड्रायवरच्या मागच्या सीट वर आणि तिसरा जो यांचा बॉस असेल तो मागच्या सीटवर ड्रायवरच्या diagonally opposite.. तसेच स्टाफपैकी कोणाच्या लग्नकार्यात जायचे असल्यास आहेर करायलाही कंपनीतील पदानुसार नुसार चढती भाजणी. जरा सीनियर लेवलच्या माणसाला कमीतकमी चारशे/ पाचशे डॉलर्स चा फटका बसलाच म्हणून समजा. त्यामुळे तिकडे लग्नाचं आमंत्रण स्वीकारावं का नाही याच्यावर फार विचार करावा लागतो.

श्रेणीमहात्म्य कसोशीने पाळणारे हे लोक कधी कधी मात्र अतिशय सुखद धक्का देतात. जपानमधे माझ्या मिस्टरांच्या कंपनीत एक फार छान पद्धत होती. ती अशी की कारखान्यात कोणीही मग तो साधा शॉप फ्लोरवर काम करणारा मशीन ऑपरेटर का असेना, तो सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी त्या प्लान्टचा मॅनेजिंग डिरेक्टर त्या माणसाला गाडीत बसवून स्वत: ड्राइव करीत पूर्ण प्लँट ची चक्कर मारायचा. ज्या कंपनीत उभं आयुष्य घालवलं त्या कंपनीची एक संपूर्ण फेरी मारायला, तिथल्या लोकांशी भेटायला, बोलायला या माणसाला कंपनीचा बिग बॉस स्वत: मोठ्या सन्मानाने घेऊन जायचा. मग एक छानशी भेटवस्तू देऊन त्या माणसाला निरोप देण्यात यायचा.

ऑफिस मधे बॉस हा आपल्या पेक्षा वरच्या श्रेणीचा तर घरी बायको ही आपल्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीची असा या लोकांचा अगदी प्रमाणीक विश्वास असतो. स्त्री पुरूष समानता वर निदान पोलिटिकली करेक्ट बोलावं की नाही? पण तेही नाही. मुळात त्यांना आपण काही चुकीचे करतोय असे वाटतच नाही. पण याचा अर्थ हे लोक दुष्ट असतात, बायकोचा छळ करतात असा अजिबात नाही. फक्त पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यानुसार आपल्या संसारात जबाबदारींची विभागणी कशी असावी याचा त्यांचा साधा स्वच्छ हिशोब असतो...' आय ब्रिंग दा मनी, शी टेक्स केआर ऑफ दा हाउस '....

पण कधी कधी या पारंपरिक समीकरणांना जबरदस्त धक्का देणारेही लोक मला भेटले. अशा लोकांपैकी एक म्हणजे माझी खूप जिवाभावाची मैत्रीण हानोका मात्सुदा. ही मुलगी म्हणजे टिपिकल जपानी गृहिणिंचं आरशातलं प्रतिबिंब....त्यांच्या अगदी उलट स्वभाव!!
खळखळून मोकळं हास्य, चेहृयावर असलेली रसरशीत तकाकी, लहान मुलाची उत्सुकता भरलेले लुकलुकते मिस्कील डोळे. तीचे डार्क, चटकदार इत्यादी जपानी मंडळींना घाबरेघुबरे करणारे रंगांचे कपडे याचबरोबर सुगरणपणा आणि ग्रुहक्रुत्यदक्षपणा अशा गोष्टींपासून तीने ठेवलेले सुरक्षित अंतर...अशी मस्तं मजेदार हानोका!

जपानमधे आपली आर्थिक मालमत्ता, जमीनजुमला फक्त आपल्या पुरूष वारसदारांच्याच नावे करता येतो कारण त्यांचे आडनाव एकच. मुलींचे आडनाव अर्थातच लग्नानंतर बदलते. त्यामुळे ते एकदा बदलले की मुलीचा हक्क संपला. हानोका ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक. मात्सुदा हे खरंतर त्यांचं आडनाव. आपल्या लग्नानंतर सर्व मालमत्ता सरकारच्या हाती जाण्यापेक्षा या बहाद्दर पोरीने आपल्या नवर्यालाच तीच्या माहेरचं आडनाव घ्यायला लावलं. तीचा नवरा फुमिओ हाशीराचा फुमिओ मात्सुदा झाला.

जपानी लोकांना चारचौघांमधे उठून दिसायला किंवा काहीतरी हटके करायला मुळीच आवडत नाही. बरेच लोकं तर सनग्लासेस लावणं सुद्धा टाळतात ते यांच कारणामुळे. इतकंच काय पण हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार मांडायला, काहीतरी वेगळं बोलायलाही काचकूच करतात.
पण 'आय दोन्त लिसन टू माय हाजबंद, ही लिसन्स टू मी, बीकोझ ही ईज़ अनडर माय फॅमिरी नेम '....अशी सनसनाटी विधानं करून उपस्थीत लोकांना दचकवून टाकणे हा हानोका मॅडमचा आवडीचा टाइमपास होता.
मग बाकी जपानी काकू लोकांचे तीच्या पाठीमागे ' बघा..बघा..कसल्या मेल्या या टोकियोच्या मुली..न रितभात, न बोलण्याचं वळण. फॅशनेबल बाहुल्या नुसत्या! आमच्या क्युशुकडच्या मुली बघा. किती बाई सोज्वळ,सुगरण, कामाला वाघ... वगैरे वगैरे असले टोमणे सुरू व्हायचे....

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे मस्त मस्त हा भाग ही... खूप इंटरेस्टिंग आहे.. कसं ना प्रगत प्रगत म्हणवणार्‍या देशाला ही प्राचीन संस्कृती कशी जखडून ठेवते .. हानोका चा उपाय भार्रीच आवडला.. नशीब तिच्या नवर्‍याने त्याचा ईगो जरा वेळ बाजूला ठेवला.. इस्टेट घालवण्यापेक्षा नांव बदलणं बरं असं वाटलं असेल त्याला Happy

किती सुंदर शैली आहे. कुठेही हेटाळणीचा सूर नाही.
जपानमधलेच स्नो मंकीज पण अशी हायराकी पाळतात. त्यांच्यातल्या कमी दर्ज्याच्या माकडांना कितीही कुडकुडले तरी गरम पाण्यात डुंबायची मुभा नसते, असे नॅट जिओ वर बघितले.

किती सुंदर शैली आहे. कुठेही हेटाळणीचा सूर नाही. >>>> अग्दी अग्दी ....

खरोखर, जपानी संस्कृतीची खूप सुंदर ओळख करुन देताय ..... Happy मस्तच ....

हा भागही मस्त. हे सगळे अनुभवलेले असल्याने मजा येत आहे वाचायला.

याच लेखमालेत पुढे जपानी अंत्यसंस्काराबद्दल पण लिहावे. खूपच वेगळेपण आहे त्यातही. त्यात अंत्यविधी व नंतरची अस्थी गोळा करुन ठेवण्याची पध्दत व त्या साठी खास कंपन्या पण आहेत. स्वतः मेल्यावर अस्थींची सोय करुन जायला लागते असे काही कलिग्स कडुन ऐकुन आहे.

मस्त लिहिलंय.

जपानमधे आपली आर्थिक मालमत्ता, जमीनजुमला फक्त आपल्या फक्त पुरूष वारसदारांच्याच नावे करता येतो कारण त्यांचे आडनाव एकच. मुलींचे आडनाव अर्थातच लग्नानंतर बदलते. त्यामुळे ते एकदा बदलले की मुलीचा हक्क संपला. >>> बापरे, हे खरंच आत्ताच्या काळातही लागू आहे ? विल करण्याची तरतूद तर असेलच ना ?

सर्व प्रातिसादांचे खूप मनापासून आभार...

जिज्ञासा, आम्ही तिथे साधारण ९८/९९ मधे होतो मग अमेरिकेत पण कंपनी तीच.

अगो, मला नीट कल्पना नाही याबदद्ल. हानोकाचे लग्न झालं ९८ मधे ( नंतर ती अमेरिकेत गेली). तेव्हा तरी हा कायदा होता. तेव्हा माझ्या मिस्टरांच्या संपूर्ण कंपनीत हे लग्न भयंकर गाजलं होतं ते फुमिओच्या त्या आडनाव बदलामुळे Happy नंतर कायदा बदललाही असेल किंवा वील ची तरतूद असेलही मला खरंच काही कल्पना नाही.

खतरा सुरेख लिहितेस ग
<< तीचे डार्क, चटकदार इत्यादी जपानी मंडळींना घाबरेघुबरे करणारे रंगांचे कपडे>> Happy

सही चालूय लेखमाला.. सुंदर शैलीतले लिखाण, शिरले की झरझर वाचून होते..
जपानी लोकांबद्दल एक आपुलकी एक आत्मियता वाटू लागलीय..

खूप छान चाललीये ही मालिका. हाही भाग छानच. जपान्यांची अगदी वेगळी ओळख आणि बारकावेही छान सांगितलेत.

Pages