मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख

Submitted by संदिप एस on 23 November, 2015 - 05:52

http://www.loksatta.com/vishesh-news/heavy-rain-in-chennai-1162504/

मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख.. नंदिनी पत्रकारिते मध्ये कार्यरत आहेत हे माहिती आहेच पण तरीही आपल्या सगळ्यांच्या माहिती साठी हा धागा... अनावश्यक वाट्ल्यास उडवला तरी चालेल
काल हा लेख मी घरी आईला आणी सौ. ला दाखवला एक मायबोलीकर म्हणून छान वाटते वेगवेगळ्या क्षेत्रातील मायबोलीकरांबद्दल असे काही वाचले की.. अभिनंदन नंदिनी!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे नंदिनी काय भयानक अनुभव आहे ग Sad काळजी घ्या. आता साथीचे रोग येण्याची पण भीती आहे Sad

लेख चांगला आहेच. तो इथे दिल्याबद्दल संदिप एस ह्यांचे आभार. नाहीतर वाचायला मिळाला नसता Happy

बाकी पियू + १

मी पण वाचला होता, तेंव्हाच वाटले ही ह्या माबो वरच्या नंदिनी असणार.

भारीच अनुभव. मद्रास ची पाणीटंचाई तरी सुटेल का ह्या वर्षासाठी?

बापरे नंदिनी.

मी टीव्हीवर वगैरे वाचलं चेन्नईचं त्यावेळी पहिली तुमचीच आठवण आली की तुम्ही तिथे राहता. टेक केअर. सर्व सुरळीत झालं वाचून बरं वाटलं.

माझी बटालियन (४ मद्रास रेजिमेन्ट (वालाजाबाद लाईट इंफन्ट्री)) सध्या चेन्नईमध्ये आहे. लेफ्ट्नंट कर्नल रवी रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली सगळी बटालियन मदतकार्यात गुंतली आहे. त्यांच्याकडून फोटो व समाचार मिळाल्यावर पोस्ट करतो.

पाऊस अजून थांबलेला नाहीये. अधून मधून पडतोच आहे. मदतीसाठी पोलिस, फायरब्रिगेड आणि आर्मी प्रयत्न करत आहेत. (शरद, व्यक्तीश: माझयतर्फे सर्वांना धन्यवाद!) आपल्या पोस्टची वाट पहात आहोत.

आमच्या भागामध्ये आर्मीची आवश्यकता भासली नाहीकारण इथं प्रचंड वॉटर लॉगिंग होत नाही. आमच्याकडे धरणाचं एक्स्ट्रा पाणी येऊन त्यानं इतका गोंधळ माजवला. यामध्ये शासकीय अनास्था, शासनाकडून कम्युनिकेशनचा पूर्ण अभाव वगैरे बरीच कारणे देता येतील.

कालपासून एक मेसेज व्हॉट्स ऍप वर फिरतोय, मी चेन्नईमध्ये राहणारा अमुक आहे, मला इतका पगार आहे, माझ्याजवळ इतके पैसे आहेत, माझ्याकडे अमुक अमुक वस्तू आहेत, पण आज मला या सर्वांचा काहीही उपयोग नाही, गेले तीन दिवस मी घरात अन्नपाण्यासाठी तडफडतो आहे, आणि कुणीतरी मला खायला अन्न आणि प्यायला पाणी देईल का याची वाट बघत बाल्कनीमध्ये उभा आहे. नेचर इज अवर बेस्ट टीचर.

किती खरं आहे हे? आमच्याकडे चेन्नईमध्ये गेले दहा पंधरा दिवस पावसाचा कहर चालू आहे. हा महिना इथला पावसाळी महिना. पण एरवी चेन्नईमध्ये पाऊस पडतो म्हणजे एखाददुसरा तास सणकून मग लगेच आकाश मोकळं. पण यावर्षी संततधार पाऊस पडत राहिला आणि चेन्नई पाण्यात बुडाली. पाऊस नेहमीपेक्षा जास्त झाला का? तर हो. निसर्गाच्या या लहरीसमोर कुणांचंही काही चालत नाही, पण अशा पावसाला सामोरं जाण्यासाठी यंत्रणा विकसित नसणं हे मात्र मानवनिर्मित कर्म. शहरी नियोजनाचा पूर्ण अभाव, आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी अकार्यक्षम असणारी यंत्रणा अशी बरीच कारणे सांगता येतील. पण इथल्या सामान्य जनजीवनाला जो त्रास भोगावा लागला आहे, त्याचं काय?

यंदा ऑक्टोबरची सुरूवातच पावसानं झाली. कोकणात लहानाची मोठी झाल्यानं मला पावसाळ्याचं एरवी काहीच वाटत नाही. उलट गेली तीन वर्षं चेन्नईचा पावसाळा म्हणजे एक विनोद वाटत राहिला आहे. यावर्षी मात्र, दिवाळीभर पाऊस पडतच राहिला.. गेल्या दहा वर्षांत पडला नव्हता इतका पाऊस या आठवड्यामधेय पडला, आणि चेन्नई पाण्यात बुडाली. आम्हाला अतिवृष्टीची वॉर्निंग आली होती, त्यानुसार आम्ही बरीच तयारी देखील केली होती. यात प्रामुख्यानं पिण्याचे पाणी आणि लाईट गेले तर काय करायचं यावर भर होता. आमच्या भागात पावसाचं पाणी जरी साचत असलं तरी खाडी जवळच असल्यानं निचरा लवकर होतो, त्यामुळे वॉटर लॉगिंग ही समस्या भेडसावत नाही. पण मंगळवारी हे सर्व आडाखे चुकीचे ठरले.

चेन्नईमध्ये तुफान पाऊस झाला तो सोमवारी. हा गेल्या दहावर्षांतला सर्वात जास्त पाऊस. केव्ळ चोवीस तासात जवळपास अडीशचशे मीमी इतक्या पावसाची नोंद झाली.. घरामध्ये ट्युबलाईट लावल्याशिवाय गत्यंतर नाही इतका अंधार. बाहेर मुसळधार बदाबदा पाऊसमहाराज कोसळतच होते. मंगळवारी पहाटे मात्र सुखद धक्का बसला. खरंतर वॉर्निंग अजून दोन दिवसांची दिली होती. पण चक्क पाऊस थांबला होता. आभाळ पूर्ण कोरडं नव्हतं,पण किमान पाऊस तरी नव्हता. स्काळी नऊवाजता मात्र लाईट गेला. मेंटेनन्ससाठी वगैरे काढला असेल म्हणून त्याचं काही वाटलंसुद्धा नाही. जोरदार पावसाची वॉर्निगं असल्यामुळे मी प्यायचे पाणी भरपूर साठवून ठेवले होते. मोबाईल पूर्णपणे चार्ज होता, मला पुढच्या आठवड्यांत रत्नअगिरीला जायचं असल्यानं मी पॅकिंगसाठी बरीच उपशाउपशी करून बॅगा पुसून घेणे वगैरे कामं करत होते. कालच्या पावसामुळे घरासमोर ऑलरेडी एक रस्ताभर तळं साचलं होतं. इतक्यात शेजारणी पाजारणी बाहेर येऊ लागल्या. “क्या कर रहे हो? गंगामैय्या आ गयी देखो” समोरच्या मारवाडी भाभींनी मला हाक मारली. बाहेर वाकून पाहिलं तर तळ्यातलं पाणी वाहू लागलं होतं, म्हटलं. “गंगामैया नव्हे, साचलेलं पाणी उपसत असतील.”

कसचं काय.. पाणी जोरातच वाहू लाग्लं आणि मागोमाग बातमी आली, धरण फुटलं आहे. या बातमीनं जे काय धाबं दणाणलं. लाईट गेलेले असल्यानं न्युज चॅनलवरून बातमी कन्फर्म करणं शक्यच नव्हतं. मोबाईलच्या इंटरनेटवरून प्रयत्न केला तर तशी काहीच बातमी दिसेना. धरणातून जास्तीचं पाणी सोडलं असावं तर तीही बातमी सापडेना. धरण आमच्या भागापासून वीसेक किमी तरी नक्की लांब होतं. पाणी इतक्या दूर कसं येईल? एकंदरीत पाण्याचा जोर प्रचंड होता. लोंढाच्या लोंढा वाहू लागला होता, रस्त्यावरून वाहणारं पाणी आता इतस्तत: पसरत आमच्या कंपाऊंडमध्ये आलं होतं. अवघ्या अर्ध्यातासात पाणी इतकं वाढलेलं पाहून मलाही भिती वाटली, घरात मी आणि सहा वर्षांची मुलगी अशा दोघीच. नवरा सिटीमध्ये गेलेला. त्याचा फोन सेमिनारमध्ये असल्यामुळे सायलेंट वर असणार, तरी त्याला मेसेज टाकला. रत्नागिरीला आईवडलांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. आमच्या भागाच्या पोलिसस्टेशनला फोन करून नक्की काय घडलंय ते विचारलं. तमिळ भाषा नीट येत नसल्यामुळे माझं म्हणणं त्यंना समजलं नसावं पण दहा पंधरा मिनीटांत दोन हवालदार माझ्या घरी आले. पाणी भरत असलेलं आणि नक्की काय घडलं हे विचारल्यावर ते म्हणाल की धरणातून एक्स्ट्रा पाणी सोडलं आहे. (पण पुढे तो हेही म्हणाला की ते काय खरं नाही..) म्हणजे परत धाकधूक सुरू झाली. इतक्यावेळांत आमच्या पुढच्या अंगणात पाणी भरून ते पहिल्या पायरीपर्यंत टेकलं होतं. आता निवांत बसून चालण्यासारखं नव्हतं.. घरात पाणी आल्यावर नक्की कितपत भरेल आणि काय होइल याची काहीच कल्पना नव्हती. त्यातून “धरण फुटल्याच्या” आणि “धरणाचे उघडलेले दरवाजे बंद होत नाहीत” अशा दोन बातम्या लागोपाठ येत होत्या. अख्खी गल्ली रस्त्यावर जमा झाली होती.

इतके दिवस इकडेतिकडे वाचलेल्या सर्व “पुरासंबंधीच्या” टिप्स मनातल्या मनात उजळून काढल्या. मुंबई २००५ ला पत्रकार म्हणून कार्यरत असल्यानं बरेच दिवस हाच विषय घेऊन रीपोर्टींग करत होते, त्यातलं काहीबाही आठवलं. घरात फिरून जमीनीवर काय सामान आहे ते उचलून वर ठेवायला सुरूवात केली, सर्वात आधी भांडी वगैरे उचलून ठेवली. कपाटामध्ये महागातल्या साड्या एकदम खालच्या कप्प्यात होत्या, त्या काढून वर ठेवल्या. सर्व महत्त्वाची डॉक्युमेंट्स आधीच एका फाईलमध्ये लावली होती, ती काढून बबलपेपरमध्ये रॅप केली, सेलोटेपने चिकटवली आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून माळ्यावर टाकली. तिथवर पाणी पोचणार नाही असं वाटलं त्यामुळे बरंचसं सामान उचलून वर ठेवायला सुरूवात झाली, एव्हाना पाणी अंगणातल्या दुसर्या पायरीपर्यंत पोचलं होतं. पाण्याचा स्पीड वाढतच होता, पाणी केवळ अंगणातच भरत होतं असं नाहे तर कंपाऊंडमध्ये इतरत्र पसरत होतं. पाठच्या अंगणात पाणी पोचल्यानंतर पाण्याची पातळी झराझरा वाढताना दिसत होती. घरामध्ये येऊन जीवनावश्यक वस्तूंची बॅग तयार करून घेतली. त्यामध्ये आम्हा दोघींच्या कपड्यांचे सेट, प्यायचं पाणी, थोडा कोरडा खाऊ, लंच, ड्रायफ्रूट्स बिस्कीटं आणि क्रेडीट डेबिट कार्ड्स, पैसे असं सर्व घेतलं. लॅपटॉपची वेगळी बॅग करून ती सर्वात आधी शेजारणीकडे नेऊन ठेवली. तिचं घर तीन माळ्याचं असल्यानं पाणी चढलं तरी किमान पहिल्या माळ्यावर जाऊन वस्तू ठेवता येईल असा विचार केला, एव्हाना पाणी दाराच्या उंबर्या ला टेकलं होतं. इतकावेळ पाणी ओसरेल, कमी होइल वगैरे अंधुकशा आशा होत्या, पण आता नाईलाज होता.. व्याह्याचं धाडलेल्या घोड्यासारख्या मीच सकाळी माळ्यावरच्या बॅगा खाली काढून ठेवल्या होत्या, त्या परत वर चढवण्याचं दिव्य काम करावं लागलं. दिवाळीच्या फराळ काढून गवेगळ्या डब्यांत थोडा खाऊ भरला आणि एकेका खोलीच्या माळ्यावर ते डबे ठेवून दिले. जेणेकरून खालचं सामान खराब झालं तर खाण्यासाठी थोडातरी खाऊ शिल्लक राहील. दुपारचे चार वाजत आले होते, बाहेर रात्रीचे सात-आठ वाजल्यासारखा काळोख झाला होता. रस्त्यावरचं पाणी माझ्या कमरेइतकं पोचलं होतं. उंबर्यासवरचं पाणी येऊ की नको करत तिथच हिंदकळत होतं. नवर्या ला घरात पाणी चढत असल्याचा निरोप पोचला होता, आणि तो इकडे यायला निघाला होता, तरी त्याला पोचण्यासाठी रात्र झाली असती. वडलांनी ओळखीच्या काही लोकांना फोन करून इथली माहिती घेण्याचा प्रयत्न चालू होता. माझ्या मोबाईलची बॅटरी जास्त वेळ वाचवण्यसाठी मी इंटर्नेट बंद केलं होतं.

आता घर बंद करून शेजारणीकडे जायचंच हे पक्कं केलं. घरात पाणी येणारच होतं. समोरच्या भाभी पाणी चढू लागलं तेव्हा बाजारपेठेमधल्या त्यांच्या दुकानात गेल्या, तिथं लोकांच्या नाकापर्यंत पाणी आलं, तिथून लोकांना बाहेर काढत होते. बाप रे! शेजारणीचं घर एरवी चालत गेलं तर शंभरेक पावलांवर पण आता रस्ता पार करायचा नव्हता, एक अख्खी नदी पार करायची होती. पाण्याला प्रचंड जोर होता, लेकीचा उचलून पाठुंगळी घेतलं, गेटमधून बाहेर आले आणि जाणवलं मघाशी जे पाणी कमरेपर्यंत होतं ते अजून वाढलंय. पांण्याच्या करंटच्या विरूद्ध दिशेनं जायचं असल्यानं मला चालताच येईना. एक एक पाऊल कसंबसं उचलत पोचले. लेकीला उतरवलं आणि घरी तशीच पाण्यातून परत आले, घरामध्ये येऊन मघाशी रेडी केलेली बॅग आणि भ्जवलेली कणिक, दुपारची भाजी वगैरे सर्व सामान एका टोपलीत भरून नेलं. तिसर्याा फेरीला परत येऊन घर लॉक केलं. या दोन तीन फेर्यांाच्या दरम्यान पाणी परत चढलं होतं. घरात घोटाबह्र आलेलं पाणी दिसत होतंच. सुदैवानं पुन्हा एकदा सर्वत्र बॅटरी मारून चेक केलं तेव्हा लक्षात आलं की घरातले देव थोड्यावेळात तरंगले असते. त्यांना तसंच ताटलीत उचललं आणि वर माळ्यावर ठेवलं. म्हटलं “बावांनो, घरवर लक्ष ठेवा, अन्यथा तुमचंच काही खरं नाही”

हे इतकं करत असताना मेंदूचा एक कोपरा सतत नवर्यावच्या येण्याची चिंता करत होता. अख्खं शहरभर साचलेलं पाणी, पब्लिक ट्रान्सपोर्टचा उडालेला बोजवारा, त्यानंच फोन करून मी सेंट्रलपर्यंत आलोय पुढं बसने येतोय, बसचा एक एक भाग गेला की मी तुला मिस कॉल देईन असं सांगितलं. नवर्याुच्या मिसकॉलची आयुष्यात इतकी वाट कधीच पाहिली नसेल जितकी त्या दिवशी पाहिली.

शेजारणीनं सर्वांसाठी चहा केला, पाणी चढतच होतं. पण आता जीवाची चिंता नव्हती. घराचं जे काय होइल ते होवो. या दरम्यान आईवडलांनी रनागिरीवरून चेन्नईमधल्या ओळखीच्या लोकांना फोन करायला सुरूवात केली, त्यापैकी एकांनी माझा पत्ता रेस्क्यु टीमला दिला. त्यांनी ताबडतोब मला फोन केला, म्हटलं घरात पाणी तर आलेलं आहे, पण मी आणि लेक सुरक्षित आहोत, तरी त्यांनी मी कुठं आहे ते विचारून घेतलं. अर्ध्या तासात त्यांची टीम पोचली, रीलोकेशन म्हणून शाळेच्या बिल्डींगमध्ये नेऊ का म्हणून विचारू लागले. त्याची गरज नाही असं सांगितलं, पण गल्लीमधल्या अजूनही कित्येक घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यापैकी काही जणांना नातेवाईकांकडे अथवा इतर सुरक्षित ठिकाणी जायचं होतं. रेस्क्यु टीमच्या वाहनांमधून त्यांची सोय झाली. आमच्याकडे खाण्याची चिंता नव्हती, पण मुख्य प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता, मी घरात चिकार पाणी भरून ठेवलं होतं पण ते इकडे आनणार कसं? रेस्क्यु टीमने बिस्कीटांचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या.. हे सर्व होईपर्यंत नवर्याटचा फोन आला, मी पोचलोय, पण पाण्यामुळे येता येत नाहीये. एकीकडे हुश्श झालं. जे अंतर तो एरवी पाच सहा मिनीटांत कापू शकतो ते कापायला त्याला जवळजवळ अर्धा तास लागला, इतका पाण्याला जोर होता. तो आल्यावर आम्ही आमच्या घरी येऊन दार उघडलं तेव्हा समजलं की पाणी चांगलं गुडघाभर शिरलंय. घरामध्ये सगळीकडे बॅटरी मारत नजर फिरवली. सर्व इलेक्ट्रीकल अप्लायन्सेस्चे प्लग काढून मी दुपारीच ठेवले होते, तरी पुन्हा एकदा चेक केलं. घर पाण्यात बुडालेलं पाहून मी नवर्याचा हात घट्ट धरला.
“आता काय करायचं?” मी विचारलं.
“आजची रात्र ! उद्याला सर्व ठिक होइल.” तो नेहमीच्या शांतपणे उद्गारला. काळजाचं पाणी पाणी होणं म्हणजे नक्की काय ते त्याक्षणी अनुभवलं. एरवी घरात ओली फरशी असेल तर त्यावर कुणी पाय ठेवला की मला राग येतो, घर साफ ठेवणं घरात घाण येऊ नये म्हणून दररोज किती काळजी घेतली जाते, आज मात्र रस्त्यावरचं पाणी बिनदिक्कत घरात घुसलं होतं.

घराच्या सामानापेक्षा, साफसफाईपेक्षाही आम्ही तिघंही सुरक्षित आहोत ही भावना त्याक्षणी फार महत्त्वाची ठरली होती. शेजारणीकडे गावातलेच अजून चारपाच जण नातेवाईक ओळखीचे वगैरे आमच्यासारखेच पुरामुळे आले होते, इतक्या सर्वांचं काम तिला करावं लागलं असतं. म्हणून मी ओले कपडे बदलले, आणि मिणमिणत्या कंदीलाच्या उजेडामध्ये दोघींनी मिळून थोडे डोसे, थोड्या पोळ्या, सांबार असं काहीबाही बनवून घेतल. जेवणं झाल्यावर तिनं आमची सोय दुसर्याथ मजल्यावरच्या खोलीमध्ये केली. रात्रभर झोप येणं शक्यच नव्हतं. लाईट नव्हते शिवाय मच्छरांचा उपद्रव. रस्त्यावरून खळाळत जाणार्या् पाण्याचा आवाज अजून ऐकू येत होता. अंधारात बॅटरी मारली तर आमच्या घराचं अंगण दिसत होतं. लेक दिवसभर खेळून दमली होती, ती लगेच झोपी गेली. आम्ही मात्र निरर्थकपणे पाणी ओसरतंये की अजून वाढतंय याची वाट बघत होतो. मात्र, आता पाणी चढत नव्हतं, त्याच पातळीवर राहिलं होतं. मध्यरात्रीनंतर कधीतरी डोळा लागला.

पहाडे अडीचच्या सुमाराला जाग आल्यावर बॅटरी मारून पाहिलं. पाणी चक्क कमी झालेलं दिसत होतं. कसंबसं उजाडेपर्यंत तिथं राहिलो. झुंजुमुंजु झाल्यावर लगेच घरी आलो. रस्त्यावर पाणी आता गुडघ्यापर्यंत उतरलं होतं. कुलूप उघडून आत गेलो तर घरामधलं पाणी पूर्णपणे ओसरलं होतं. माळ्यावर ठेवलेल्या देवांना हात जोडले. माला वाटलं की घरामध्ये पूर्ण चिखल वगैरे झालेला असणार. पण तसं काहीच झालं नव्हतं. घरामध्ये ओल होती, पण माती घाण चिखल काहीह्च नव्हतं. खरंच गंगामैय्या आल्यासारखं घर केवळ पाण्यानं धुवून गेल्यासारखं स्वच्छ दिसत होतं. अद्याप लाईटचा पत्ता नव्हता आणि घरात काळोख होता, तरी बॅटरी मारत घर डेटॉल फिनाईल घालून झाडून पुसून घेतलं. एव्हाना पाणी ओसरत चाललं होतं. कंपाऊंडमधलं पाणी मात्र अजून रिकामं झालं नव्हतं. चढताना पाण्याला जोर होता, तो ओसरताना नव्हता. मोबाईलची बॅटरी अगदीच नाममात्र शिल्लक होती, त्यामुळे काही आवश्यक लोकांना मेसेज करून सर्व काही सुखरूप असल्याचं कळवलं. घरी आईवडलांचा जीव भांड्यात पडला.

मात्र दिवसभर केवळ “अजून धरण फुटलेलंच आहे” आत बारा वाजता कालच्यासारखंच पाणी सोडतील. आता पाणी दुप्पट वेगानं येणार आहे, त्यात लोकं वाहून जातील वगैरे अफवा येतच राहिल्या. सुरूवातीला या अफवांनी नाही म्हटलं तरी जीव घाबरा झाला, शेवटी मी ओळखीह्च्या दोन-तीन पत्रकारांना फोन करून माहिती काढायला सांगितली. त्यामध्ये असं काहीही होणार नसलयचं समजलं आणि जीवाला जरा बरं वाटलं. घर साफ करणं, फ्रीज साफ करणं, पुढची पाठची अंगणं साफ करणं यामध्ये अख्खा दिवस गेला, सुदैव इतकंच की इतका पूर आलेला असताना काल आणि आज पाऊसमहाराज मात्र विश्रांतीमोडमध्ये होते. काल सकाळी गेलेला लाईट आजही आलाच नाही,त्यामुळे वरच्या टाकीमधलं पाणी जपून वापरणे आवश्यक होतं, काही घरामधल्या टाकींचं पाणी संपल्यावर त्यांनी येऊन आमच्या घरून कळशी दोन कळशी पाणी नेलं. आमच्या गल्लीमध्ये कुणाचं जास्त नुकसान झालं नाही, पण बाजारपेठेमध्ये आणि त्याहून दूरच्या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये मात्र प्रचंड नुकसान झालं होतं. माझी कामवालीचं पत्र्याची झोपडीच पूर्ण मोडून पडली होती, घरतल्या बरंच सामानाचं नुकसान झालंच. अगदे पीठामिठाचे सुद्धा वांदे झाले होते. सुदैवानं काही एन जी ओज नी मिळून या भागामध्ये अन्नाची पाकिटं वाटायला एव्हाना सुरूवात केली होती. मंगळवारी स्काळी गेलेला लाईट तब्बल पन्नास तासानंतर गुरूवारी सकाळी परत आला. तोपर्यंत हळूहळू जीवनमान सुरळीत व्हायला सुरूवात झाली होती. रस्त्यावरचं पूर्ण पाणी वाहून जायला मात्र गुरूवारची रात्र झाली.

आमच्याकडे पाणी भरलं ते धरणातून पाणी सोडल्यामुळे. हे प्रीप्लान्ड होते तर तशा सूचना नागरिकांना का दिल्या नाहीत? इतकं पंधरावीस किलोमीटर दूर पाणी येणार होतं तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना दुसरीकडे का हलवलं नाही? लहान मुलं, वृद्ध, अपंग या सर्वांना किती त्रास झाला असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकते.
संपूर्ण चेन्नईमध्ये पावसानं हाहाकार उडवलेला असताना शासनानं प्रत्येक गोष्टीमध्ये ही अशी दिरंगाई कायमच केलेली दिसून येत राहिली. आजही परिस्थिती शहरभर सामान्य नाही. अजूनही कित्येक भागांत पाणी साठलेलं आहे, त्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणाच नाही. फायारब्रिगेड, पोलिस, एन जीओ आणि इतर सामान्यजन त्रस्त लोकांना मदत करण्यासाठी तत्पर आहेत, अशा अनेक ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज सध्या सोशलमीडीयामधून फिरत आहेत, पण त्याहून जास्त गरज आहे ती लॉंगटर्म उपायांची. त्यावर विचार करताना कुणीही दिसत नाही.

आम्ही या सर्वांमध्ये सुखरूप राहिलो यासाठी देवाचे आभार नक्कीच मानू. पण या पावसाच्या तमाश्यामध्ये शंभाअहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, त्यांचं काय? पाऊस आहे, तो जोरात पडेल कमी पडेल, पण बजबजणारं शहरीकरण करताना या अशा निसर्गाच्या रौद्र कोपांची शक्यतादेखील विचारात घेतली जात नाही हे अनाकलनीय आहे. मग हे मुंबई असो, वा चेन्नई. तारखा बदलतात, बळींची संख्या बदलते पण मुळातली समस्या मात्र तीच राहते.

विस्तृत प्रतिसादासाठी आभार.
मी म्हट्लंच होतं, लोकसत्तेने संपादित केलेला लेख आहे. माबोवर पूर्ण डीटेल येईल असे वाटते.
मुळातून इथे देता येईल का? की कॉपीराईट भानगड आहे काही?

मी वाचून घेतला तेवढ्यात. Proud लोकसत्तेमध्ये खूपच त्रोटक वाटला. इथे जास्त माहिती वाटते आहे. सगळे सुरळीत झाले हे वाचून 'हुश्श्श' झाले.

ओह!

पुन्हा टाकल्याबद्दल धन्यवाद! झालं वाचून.

लोकसत्तेच्या कुणा दुय्यम संपादकाने अक्षरशः खून केलाय तुमच्या लेखाचा..

बाप रे नंदिनी, अंगावर काटा आला. आता सांगायला कसेतरी वाटतेय पण काही दिवस जास्त बातम्या वाचणे झालेच नव्हते. त्रोटक कल्पना असली तरी इतकी गंभीर परिस्थिती आहे हे आताच कळले.
पण फार धीराने नियोजन करत केलेत सगळे, keeping wits like this takes a lot of courage.

छान लेख, आणि अश्या परिस्थितिला धिरानी सामोरे गेला त्याचे कौतुक वाटते.

फायारब्रिगेड, पोलिस, एन जीओ याचे पण कौतुक आहे.

निसर्गाच्या रौद्र रुपापुढे आपण काही करु शकत नाही पण वॉर्निंग सिस्टम ,लोकाचे वेळीच स्थलातंर ह्या वर नक्कीच विचार झाला पाहिजे.

लोकसत्तेतला लेख वाचला होता. त्रोटक असला तरी परिस्थितीची कल्पना देणारा होता. प्रत्यक्ष पावसाच्या पाण्यापेक्षा धरणाच्या पाण्यामुळे अधिक नुकसान झाले. ही हलगर्जी अक्षम्य आहे.
पावसाचे तांडव मुंबईत २६ जुलाय २००५ या दिवशी चांगलेच अनुभवले आहे. म्हणून कुठेही ढगफुटी किंवा पूर म्हटले की थरकाप होतो.
आता तरी सर्व स्थिरस्थावर झाले आहे का? काळजी घेणे.

बापरे नंदिनी किती भितिदायक परिस्थितीतुन गेलीस तरीही खुप धैर्याने निभावलस.
मला तर वाचतानाही काही सुचत नव्हते आणि तू त्याही परिस्थितीत सारासार विचार करत होतीस ग्रेट !
काळजी घे सगळ्यांसोबत स्वतःचीही

बाप रे! भयंकरच परिस्थिती. इतक्या वाहत्या पाण्यातून मुलीला घेऊन जाणे केवढं रिस्की!!
घरात काहीच चिखल कसा झाला नाही ?!

बापरे भयंकर आहे.तुम्ही सगळे सुखरूप आहात हे वाचून जीव भांड्यात पडला.तरी एकंदर पुरात कमी नुकसान व्हावं यासाठी तू सामानाचं चांगलं नियोजन केलंस.

नंदिनी आता जरा लेख सुसंगत वाटला. लोकसत्तेत काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत होते. भयंकरच होते सगळे !!

खरंच अजुन जास्ती नियोजन आणि पूर आराखडे बनवायला पाहिजेत.

Pages