ठेवणीतील ऐवज.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 November, 2015 - 02:10

दिवाळी म्हणजे झगमगाट, चमचमाट. प्रत्येक घरात नवीन रंग, आकाशकंदील, लाइटची तोरणे ह्या बाह्य रोषणाई सोबत अंतर्गत सजावटीतही चमक आलेली असते. त्यात जास्त मेहनत केली जाते ती म्हणजे गृहीणीच्या लाडक्या स्वयंपाकघरावर. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकघरात भिंतीलाच फळी ठोकलेली असायची व फळीवर तांब्या-पितळेची भांडी हौशेने रचलेली असायची.ह्या तांब्या पितळेच्या भांड्यांवरून त्या घरच्या गरीबी वा श्रीमंतीचा दर्जा ठरला जायचा.

पण आता बदल हा काळाचा नियम असल्याने चिंच लावून तांब्या-पितळेची भांडी घासणे हे वेळखाऊ काम असल्याने तांब्या-पितळेची भांडी ९०% घरातील किचनमधून रिटायर्ड झाली आहेत.

परंतू अशाच काही आमच्या सासूबाईंच्या ठेवणीतल्या जुन्या वस्तू/भांडी अजूनही आमच्या घरी दिवाळीत तोर्‍यात मिरवतात. मी लग्न होऊन सासरी आले आणि येथील दिवाळी पारंपरिक वस्तूंसोबत साजरी करताना एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला येऊ लागली.

दिवाळी जवळ आली की सासूबाईची लगबग चालू होते ती ठेवणीतील लोखंडी खलबत्ता, अंघोळीचे तांब्याचे घंगाळ आणि पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाला कामवाली कडून चिंच लावून, घासून-पुसून दिवाळी सणाला सज्ज राहण्यासाठी. नरक चतुर्दशी म्हणजेच पहिल्या अंघोळीच्या आदल्या दिवशी सासूबाई लोखंडी खलबत्त्यामध्ये गवळा-काचरी आणि खोबरं कुटतात. ही जिन्नस कुटण्यात त्यांना दिवाळीच्या तयारीचा आनंद येत असल्याने हे कुटण्याचे काम ते आम्हा कोणाकडेच देत नाहीत. ही गवळा काचरी कुटत असताना खलबत्याच्या ठणक्यासोबत गवळा काचरीचा सुगंध घरभर पसरतो. त्यामुळे दिवाळीचे क्षण सुगंधी होऊ लागतात. आम्ही दोन सुना सासूबाईंच्या सुचनेनुसार कुटलेले खोबरे मिक्सरमध्ये अजून बारीक करतो. दुसर्‍या दिवशीच्या अभ्यंग स्नानासाठी वाटलेले खोबरे व गवळा काचरी रात्रीच पाण्यात भिजवऊन ठेवली जाते. अभ्यंगस्नानाच्या दिवशी सूर्य उजाडायच्या आत घरातील पुरुष मंडळी म्हणजे माझे मिस्टर व दीर बंब पेटवून दिवाळी स्पेशल गरम पाणी तापवतात. अभ्यंग स्नानासाठी तांब्याचे लखलखते अंघोळीचे घंगाळ त्याच्या स्थानी मानात ठेवले जाते. घरातील प्रत्येकानी घंगाळ घेतले की नाही हयावर सासूबाई जातीने लक्ष देतात. पूर्वी लहान असताना पुतण्या अभिषेक व आता माझ्या छोट्या असलेल्या मुली तर ह्या घंगाळात बसुनच अभ्यंगस्नानाची मजा लुटण्याची परंपरा चालू ठेवत आहेत.

अभ्यंग स्नान उरकले की आम्ही ह्याच घंगाळात पाणी ठेऊन त्यात फुले ठेऊन तरंगणार्‍या पणत्या रात्री लावतो. खलबत्ताही मला कधी कुटलेली चटणी करण्याची लहर आली की मी त्याचा ठणठणाट करते. उन्हाळ्यात हळद कुटण्यासाठीही आम्ही खलबट्याचा वापर करतो. मी माहेरी चुलीचा अनुभव घेतला होता पण सासरी येऊन घेतलेला बंबाचा अनुभवही माझ्यासाठी आनंददायी होता. गिझर च्या झटपट गरम पाण्यामुळे मात्र बंबाला आराम मिळून तो थंड झाला आहे.

वरीत प्रत्येक वस्तूवर सासूबाई माया करतात. दर दिवाळीला खलबत्ता कुठून आणला होता, बंब किती पैशात मिळाला होता, घंघाळ आणताना धोधो पाऊस आणि विजा चमकत होत्या ह्याचे वर्णन त्यांच्या तोंडून ऐकताना ह्या वस्तू आम्हालाही जीवलग झाल्या आहेत. दिवाळीचा सण पार पडला की ही ठेवणीतील ऐवज पुन्हा आपल्या ठेवणीच्या जागी ठेवण्यात येतात.

घंगाळ
ghangal.jpg

खलबत्ता
khalbatta.jpgलोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणी मध्ये शनीवार ७/११/२०१५ रोजी प्रकाशीत.
(दिवाळीत माबोवर नसल्याने व आजच माबोवर आल्याने आज हा लेख इथे शेअर करत आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु मस्तच लिहिलेय.

शेवटचा पॅरा वाचुन तुझ्या सासुबाई हे प्रसंग सांगत अस्तानाचे सिन्स डोळ्यासर्मोर आले.. Happy

मस्त लिहीलं आहेस जागू. या सगळ्या माझ्यापण जिव्हाळ्याच्या गोष्टी. त्यांच्यामुळं गावाकडच्या दिवाळीची, तिथल्या घराची, माणसांची आठवण येते. नॉस्टेल्जिक वाटतं. मी इथे येताना एक घंगाळ आणि एक घागर घेऊन आले आहे. घंगाळ प्लँटर म्हणून वापरते. घागर शोपीस म्हणून ठेवली आहे :). बंब आणायला मात्र नवर्‍यानं जोरदार विरोध केला होता म्हणून आणता आला नाही. बॅकयार्डात बंब पेटवून दिवाळीला अंघोळ घालेल कि काय अशी त्याला भिती वाटली Proud . हे माझं घंगाळ.

व्वाव्वा! जागू मस्त गं,...माझ्याकडे असला काळा खलबत्ता आहे. बाजारातून आण्लेला गूळ बत्त्याने फोड्ण्याव्यतिरिक्त त्याचा वापर नाही, तरीही नीट ठेवलाय. तसाच एक माझ्या आजोबांचा चौरंग आहे. शिसवी. सुंदर जाळी आहे त्याला चौफेर. दण्कट आणि मोठा आहे. मामेभाऊ नव्या घरात रहायला गेला तेव्हा हा चौरन्ग टाकायला निघालेला. तो त्याच्याकडेच होता आधीपासून.
मीच मागून घेतला. माझ्या मते निदान ४०/५० सालातला असावा. आजोबांची आठवण!

प्रज्ञा, सिंडरेला, ऋन्मेष, राधिका, वर्षूताइ, चैत्राली धन्यवाद.

सायो भांड्यांच्या दुकानात चौकशी कर.

प्रकु Lol आमचे बंबाचे झाकण चोरीला गेले.

स्वस्ति तो अजुन मिळतो. माझ्याकडे पण होता.

ऋन्मेष Lol पूर्वी सुर्‍या नसाव्यात म्हणुन विळ्यांचा खाली बसुन सराव होता. मी मासे कापते विळीवर. ते सुरीवर नाही कापता येत.

पेरू वेळ असेल तर कधीतरी काढून पहा. एक वेगळच चैतन्य येत.

साधना तुलाच सांगताहेत अस वाटल असेल ना तुला. Lol

अंजली बंब Lol घंगाळात झाड सुंदर दिसत आहे.

मानुषीताई फोटो टाक ना चौरंगाचा.

जागु, हे सगळं आईकडे आहे, माझ्याकडे नाही. नाहीतर काढुन बघितले असते.

घंगाळे आणि बंब अजुनही भांड्यांच्या दुकानात विकायला असतात. गावाकडे राहणरी बरीचशी मंडळी घेतातही.

पेरू ओके ग.

माझ्याकडे एक दगडी उखळ आणि काही पाण्याची दगडी भांडीही आहेत. त्यात आता आम्ही झाडे लावलीत.

Pages