फुसके बार – २३ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 22 November, 2015 - 11:59

फुसके बार – २३ नोव्हेंबर २०१५
.

१) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल.

२) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते?

३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे.

४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा.

५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही.

तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता.

६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी?

शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?

तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.

अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे.

७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे.

८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो?

आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का?

“काय पांडबा कसला इचार करतुयास?”
“आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.”
“अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?”
“आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी."
"आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू."

दहा सेकंदांनी......

“काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?”
“इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.”
“हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही.
“आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?”
“अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. आम्हाला बारावीला स्थूल वाचनाला एकांकिका होत्या. त्यात दारव्हेकरांची 'अबोल झाली सतार' होती.
बाकीच्या सगळ्या एकांकिकांबद्दल छान छान बोलणार्‍या आमच्या प्राध्यापिकाबाईंनी अबोल झाली सतार बद्दल चांगले उद्गार काढले नव्हते. नेमके काय शब्द होते ते आता आठवत नाही, पण टिपिकल, टिपिकल प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून लिहिलेली एकांकिका असं काहीतरी होतं.

फेसबुकवर अशोक राजवाडे या नाटक- सिनेमांबद्दल म्हणताहेत :
"मुदलात ३०-३५ वर्षांपूर्वी त्या नावाचं नाटक पाहिलं तेव्हाही पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या नाटकाच्या प्लॉटमधल्या मर्यादा उघड्या पडत होत्या. मुळात जो संघर्ष म्हणून रंगवलाय तोच कचकड्याचा आहे. सिनेमा पाहून त्यातलं नाट्य अधिकच बटबटीत, कृत्रिम, ठोकळेबाज आणि छद्मनाट्यमय जाणवायला लागलं."

२ प्राध्यापकांना, त्यांनी विशिष्ट अर्हता सिद्ध केल्यावर केंद्र सरकारच्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो असं ऐकलंय. शालेय शिक्षक, अधिव्याख्याते यांच्याबद्दल माहीत नाही.

मुळात पंखेही दोन प्रकारचे असावेत असे दिसते.
साइनवेव्ह इन्व्हरटरवरही आवाज करणारा पंखा, हॅवेल्स कंपनीचा, स्पेशल 'इन्व्हर्टरसाठी' बनवलेला म्हणून मी विकत आणला अन आवाज ऐकत पस्तावलो आहे.

मी तुम्ही वर दिलेल्या अभंगातील चरण "भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी|" असेच नेहमी वाचले आहे. खर्‍या अभंगातील चरण कोणते?

इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? > कॉन्स्टन्ट स्पीडने चालणार्‍या पंख्याची अँग्युलर व्हेलॉसिटी प्रपोर्शनल टू साईन थीटा असते म्हणून असेल असा एक उगाच तर्क.

तुम्ही कशाचा कशाला मेळ नसलेल्या अनेक गोष्टी पतंगाच्या शेपटीप्रमाणे चिकटवून उगाचच तुमचे हे बार का वाढवत आहात ? असाच एक भा.नि.प्र. Uhoh

महेश, प्रत्येक स्फुट वेगळे करून पोस्ट केले तर उगाचच पसारा वाढेल.
पण तुमच्याप्रमाणेच इतरांनाही तसे वाटू सकते याची मला कल्पना आहे.
काही नवीन स्विकारण्याची तयारी हवी. कधीकधी सुरूवातीला हे काय वेगळे असे आश्चर्य वाटले तरी नंतर रूळले जाते.

इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो? > इन्व्हर्टरने एसी करंट तयार करणे अपेक्षित असते. एसी स्वतः साईनुसॉईडल वेव्ह असते, स्क्वेअर वेव्ह आऊटपुट इज बॅड फिट! ते जुने तंत्रज्ञान आहे. त्यामुळे जर अशा बॅड फिट करंटला वापरून पंखा चालवला तर तो झटके खात फिरणार आणि आवाज येणार. इन्व्हर्टर जितका साईन वेव्हला चांगला फिट करेल तितका आवाज कमी!

राकु.. तुमचे हे फुसके बार (सगळे भाग) विचारात पाडत आहेत. चांगले आहेत.
सगळ्या शंका लिहुन काढुन मग विषयानुरुप सॉर्ट करण्यापेक्षा जसं मनात येतंय तसं रँडम पोस्टिंगही छान आहे.
मुख्य म्हणजे बर्‍यापैकी तटस्थ आणि मुद्देसुद आहे हे आवडले.