कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटाने मनाचे प्रचंड समाधान झाले. मुळात कथानक अतिशय सकस असल्याने चित्रपट सरस होणारच होता. ह्या कथानकावर आजच्या काळात चित्रपट काढणे हे एक धाडस म्हणता येईल.
स्वस्तपणाला किंवा सवंगपणाला कणभरही जागा दिली गेली नाही. चित्रपटाचा वेग प्रेक्षकाच्या जवळपास नकळतच अगदी अचूक ठेवला गेल्यासारखे झाले. रटाळही होत नाही आणि समजण्यासाठी अधिक काळ हवा होता असेही वाटले नाही.
ह्या चित्रपटात बहितांशी गोष्टी जमेच्याच आहेत हे नक्की! काही किरकोळ गोष्टी वैगुण्यांसारख्या जाणवल्या. त्याही नसत्या तर हा चित्रपट सर्वश्रेष्ठ गणला गेला असता बहुधा!
ह्या चित्रपटाने चित्रपट क्षेत्रासाठी, ह्या चित्रपटाच्या निर्मीतीशी निगडीत असलेल्या सर्व पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या कलाकारांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि आजच्या समाजासाठी खूप काही केले आहे असे चित्रपट पाहताना मला सतत जाणवत राहिले. आधीच ह्या चित्रपटावर सर्व माध्यमांमधून व येथेही तुडुंब चर्चा झालेली आहे तरीही (आणि येथील चर्चा वाचण्याचा कंटाळा केलेला असल्याने) मला स्वतःला येथे वेगळा धागा काढून काहीतरी लिहावेसे वाटले हे प्रामाणिकपणे नोंदवतो.
गुरू शिष्य परंपरा - कलेचा वारसा पुढील पिढीकडे जाताना त्यातील अचूकतेबाबत, शिष्य प्रतिभाशाली असण्याबाबत, निष्ठावान असण्याबाबत, गुरू-शिष्यांमध्ये प्रेमयुक्त आदराचे नाते असण्याबाबत ज्या अपेक्षा प्राचीन कलापरंपरेत आढळायच्या त्यांचे अस्सल चित्रण ह्या चित्रपटात झालेले आहे. केवळ कला असे नव्हे तर शिक्षण किंवा इतर क्षेत्रांमध्येही आजकाल वरिष्ठ किंवा गुरूस्थानी असलेल्यांबाबत जी एक सार्वत्रीक 'कूल मेन्टॅलिटी' दिसून येते तिच्यातील फोलपणावर मार्मिक बोट ठेवले गेले आहे. गुरूने गुरूपदाची शोभा सांभाळावी आणि शिष्याने शिष्यपदाची, तरच काहीतरी उल्लेखनीय निर्मीती होऊ शकते ही झिरप कोवळ्या वयाच्या आणि तंत्रज्ञानाचा विळखा बसलेल्या तरुणाईच्या मनात झाली तर ते एक नकळत मिळालेले यश म्हणता येईल. पंडितजींच्या कश्याबश्या जतन झालेल्या रेकॉर्ड्स खाँसाहेबांनी पावलांखाली चुरडल्यानंतर ते तुकडे छातीशी धरून आक्रंदणारा सदाशिव मनाला थिजवून गेला. व्यक्तीपूजेसारख्या थिल्लरतेने बरबटलेल्या आजच्या पिढ्यांना व्यक्तीमधील प्रतिभेच्या पूजनावरील भक्ती समजली तर उत्तम होईल. मुलीने दिलेल्या धमकीने अस्वस्थ होऊन खाँसाहेबांनी सदाशिवचा गहाण ठेवून घेतलेला आवाज त्याला परत देताना पंडितजींचा चुरगाळलेला गंडाही परत देणे हे एका महान गुरूपदावरील गायकाने दुसर्या घराण्यातील गुरूशिष्य परंपरेचा सन्मान करणारे दृश्य होते. मला तर हा चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' ह्या कथानकापेक्षा तो 'आजच्या काळात प्रदर्शीत केला' म्हणून सामाजिकच अधिक वाटत आहे.
घराण्याचा अभिमान - स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, घराण्याची अस्मिता आणि मिळणारी शान-ओ-शौकत ह्यातून निर्माण झालेला दुराभिमान किंवा अहंकार हा नकारात्मक असला तरी त्यातूनही एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे. तो संदेश देणारे दृश्य पाहताना अंगावर काटा आला आणि डोळे घळाघळा वाहिले. 'माझे गायन चोरून ऐकून माझ्या घराण्याची नक्कल करणार्या ह्या शिष्याला मारायची मला परवानगी आहे' असे राजासमोर भर दरबारात आवेशाने जाहीर करणारे खाँसाहेब जेव्हा त्याच शिष्याचे गायन ऐकतात तेव्हा पाणी पाणी होतात. उद्ध्वस्त होऊन पुन्हा निर्माण होऊन पुन्हा द्रवू लागतात. अहंकाराची जागा विनम्रता घेते. कारण एकच, त्यांच्यातही अस्सल कलाकार असतो ज्याला स्वतःच्या प्रतिभेतूनच निर्माण झालेली स्वतःची अभिरुची घराण्याचा दुराभिमान त्यागायला प्रवृत्त करते. जेव्हा त्यांना कळते की हा एकलव्य आपल्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांच्यातला कलाकार जागा होतो आणि त्यांच्यातल्या अहंकारी माणसाला मारतो. संदेश हाच की 'जवळ कला होती म्हणून त्यांना अभिमान शोभत होता हे त्यांचे त्यांना समजले' आणि ते मान्य करून त्यांनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ कलाकारासमोर नमणे 'पसंद' केले. आपापल्या घराण्यांचा अभिमान गर्वापर्यंत पोचू नये हा तो संदेश, जो सुरुवातीला पंडितजींनी भर दरबारात भावुक होऊन खाँसाहेबांना दिलेल्या मनमुराद वाहवामधूनही दिसतो.
कलोपासना - आजकाल अनेक नट्या, आमीर खानसारखे अभिनेते हे भूमिकांनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. असे ऐकले आहे की सोहराब मोदींनी म्हणे म्हातार्याची भूमिका करण्यासाठी स्वतःचे सगळे दात मुद्दाम काढलेले होते. गायन क्षेत्रात इतकी घराणी, इतके राजाश्रय आणि इतकी जीवघेणी स्पर्धा असताना कलोपासना कशी परमोच्च पातळीवर असे ह्याचे उदाहरण ह्या चित्रपटात दिसते. सदाशिवने गुलामगिरी स्वीकारणे, पंडितजींच्य अमुलीने स्वतःची सर्व विद्या त्याला देऊ करणे, खाँसाहेबांनी आरंभीच्या काळात बायकोच्या शिव्या खाऊनही कलोपासना सुरूच ठेवणे ही काही उदाहरणे! पण शेवटच्या जुगलबंदीत खाँसाहेबांनी थक्क होऊन सदाशिवला मारण्यासाठी घेतलेली कट्यार हातात तशीच ठेवून थिजून उभे राहणे हा कलाकार कसे कलेला सबकुछ मानत हे दाखवते. झरीनाने 'आवाज गहाण टाकला आहेस तर बासरी घे' म्हणताच सदाशिवने 'स्वरही शब्द असतात, बासरी वाजवली तर संगीत माझ्यावर रुसेल' असे म्हणणे हा कळस होता. एकेक प्रसंग, एकेक वाक्य असे खिळवून ठेवणारे!
कला आणि आवेश - कला व प्रतिभेतून आलेला आवेश ह्यांचे प्रभावी चित्रण ह्या चित्रपटात आहे. योग्य ती पात्रता नसताना सदाशिवने खाँसाहेबांना थेट आव्हान देणे आणि पैज हरणे हा त्याचाच एक भाग! दुसरा भाग म्हणजे 'एक खून करायला परवानगी' ही राजांनी फार पूर्वी दिलेली परवानगी ऐनवेळी सदाशिवला मारण्यासाठी वापरण्याचा आवेश सदाशिवचे गायन ऐकताच खाँसाहेबांच्या चेहर्यावरून गळून पडणे! अशी लाखात एक माणसे जगात असली तर जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर होईल.
भर दरबार आणि भावनिकता - असा उल्लेख आहे की बादशहाने दाद दिल्याशिवाय मुशायर्यातील इतर कवींनी दुसर्या कवीने ऐकवलेल्या शेरावर दाद द्यायची नाही असा प्रघात होता. मात्र एकदा मोमीनने ऐकवलेल्या 'तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नही होता' ह्या शेरावर बादशहा जफरची वाट न पाहता गालिबने उत्स्फुर्त आणि भरभरून दाद दिली. सगळे थबकले. पण बादशहाला गालिबमुळे शेराची महती जाणवली व त्याने हसून मान डोलावली. ह्या चित्रपटात 'आपल्या घराण्याची गायकी चोरली' असा आरोप भर दरबारात आणि राजासमोर करताना खाँसाहेबांना राजाच्या उपस्थितीची जाणीवही राहत नाही. ही कलेवरची भक्ती आणि घराण्याची अस्मिता! अशीच जाणीव त्यांना ते जेव्हा सलग चौदा वर्षे पराजित ठरल्यानंतर विजेते ठरतात तेव्हाही राहत नाही. जेथे साध्या साध्या गुस्ताखीसाठी मुंडके उडवण्याच्या शिक्षा होऊ शकत असत तेथे कलेबाबत इतकी भावनिकता केवळ जबरदस्त साधनेमुळेच उफाळून येऊ शकत असणार!
श्रेष्ठ कोण - प्रश्न पंडितजी श्रेष्ठ की खाँसाहेब हा कुठेच नव्हता. दोघेही पूर्ण भिन्न! पण सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये एक सामान्य प्रेक्षक इतके नक्की समजू शकतो की खाँसाहेबांची गायकी अधिक भावणारी दाखवण्यात आली आहे. त्यांचा सलग चौदा वर्षे पराभव होणे हे एका डोळस प्रेक्षकाला पटणार नाही. पण हे मूळ कथानक आहे.
आजची तरुण पिढी आणि हा चित्रपट -
ह्या चित्रपटात तत्त्व, उसूल ह्यांचे महत्त्व सतत दाखवण्यात आले आहे. फितुरी, साधनेतील उथळपणा, योग्य ते बोलून दाखवण्याची हिम्मत, आदर, दिल्या शब्दाचे महत्त्व अश्या कित्येक तत्त्वांबाबत कथानक बोलते. आजच्या पिढीला हनी सिंग आणि तत्सम अनेकांनी बहकवलेले आहे. हे नुसतेच गायनाबाबत नव्हे तर सर्वच पातळ्यांवर पिढ्या बहकतच आहेत. राजकीय पोस्ट्स, अश्लील पोस्ट्स, थिल्लर 'पीजे' हे अमाप प्रमाणात फॉर्वर्ड होत आहेत. 'काहीतरी मी पहिल्यांदा इतरांना सांगितले व वाहवा मिळवली' हे नगण्य समाधान मिळवण्यासाठी धावपळ होत आहे. साधना, तपस्या वगैरे शब्दांना जागा उरलेली नाही. दिल्या शब्दाला अर्थ राहिलेला नाही. कोणतीही अत्यंत सुमार गोष्टही आता 'ऑस्सम' असा प्रतिसाद मिळवते. सगळेच स्वस्त झालेले आहे, सहज उपलब्ध झालेले आहे. कट्यारची गाणी लावलेला मोबाईल टेबलवर ठेवून पोरे बीअरच्या बाटल्यांची बुचे उचकटत आहेत आणि म्हणत आहेत 'ऑस्सम मूव्ही आहे'! चित्रपटात भडक दृश्ये तर नाहीतच पण उगाच प्रेमकथेलाही फार वाव नाही. अनावश्यक असे एकही दृश्य नाही. स्वस्तपणा नाही. वेग आहे. रेंगाळणे नाही. मूर्ख हिंसा नाही. आणि आणखीन काय महाराज, तर हा चित्रपट चक्क २०१५ साली प्रदर्शीत करून दाखवलेला आहे. एका डोळ्याने चित्रपट पाहावा आणि एका डोळ्याने स्वतःच्या आणि आजच्या तरुण पिढीच्या तत्त्वहीन, दिशाहीन जीवनशैलीवर अश्रू ढाळावेत अशी अवस्था आहे. हा चित्रपट पाहताना आपण स्वतः माणूस म्हणून किती क्षुल्लक आहोत हे समजत राहते. हिंदी भाषेत प्रेम रतन आणि तत्सम चित्रपट येत असताना, साध्या दृश्यातही अर्धे अंग उघडे टाकणार्या नायिका असताना, इन्डियन आयडॉलचे जजेस लाथा घालण्याच्य अलायकीचे असताना आणि ते सगळे आम्ही चवीने बघत असताना 'कट्यार काळजात घुसली' येतो आणि आरपार घुसतो.
स्त्रीरूप -
चित्रपटात तीन प्रमुख स्त्री भूमिका आहेत. तशी एक राणीची भूमिकाही आहे पण ती नगण्य म्हणता येईल. बेगमसाहेबांना खलनायिका दाखवण्यात आले आहे. ते कथानकासाठी ठीक! पण उमा आणि झरीना ह्या अनुक्रमे पंडितजी आणि खाँसाहेबांच्या मुली ह्या स्त्रीची अशी रुपे आहेत जी पाहून खरंच भरून येते. उमा सदाशिववर मूक प्रेम करते. त्याला पंडितजींची तिच्याकडे असलेली सगळी विद्या देते. हवेलीतून बाहेर पडताना खाँसाहेबांना चार शब्द सुनावते. सदाशिवच्या पाठीशी उभी राहते. आणि झरीना? झरीना भर हवेलीत खाँसाहेबांच्या मुलांसमोर त्यांचा भयानक जहरी अपमान करते. बेगम साहेबांना तलाक देणे आणि सदाशिवचा आवाज गहाण ठेवून घेणे हा स्वार्थ असल्याचे थेट सांगते. वर धमकी देते की बेगमसाहेबांनी पंडितजींमधील गायक संपवला हे गुपीत अवघ्या जगाला सांगेन! खाँसाहेबांसारखे खाँसाहेब उभे थरथरतात, डळमळतात आणि मान झुकवतात. स्त्रीचे हे रूप दाखवून कथानकाने आणि चित्रपटातील सर्वांनी ह्या जगावर उपकार केलेले आहेत.
कमीजास्त -
खाँसाहेबांबरोबर जी दोन मुले असतात ती त्यांचीच मुले दाखवलेली असतात असे मी समजत आहे. ते चूक असल्यास माहीत नाही. पण ती अगदीच बालिश गोष्टी करताना दाखवलेली आहेत. शंकर महादेवनला डोळ्यांमध्ये अधिक बोलकेपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे वाटते. राजा फारच स्ट्रेट फेस ठेवताना दिसतो. कवीराज म्हणून पुष्कर श्रोत्री ठीकठाक! मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुबोध भावे आणि सचिन! सुबोध भावेने शक्य तितका उत्तम अभिनयही केला आहे आणि भूमिकेचे सार्थकही! पण तिथे एक कोवळा आणि अननुभवी दिसणारा तरुण हवासा वाटत होता. (हे सापेक्ष असू शकेल). मात्र सचिनने भूमिकेचे सोनेही केले आहे आणि गचकेही दिलेले आहेत. अनेक उर्दू उच्चार अधिक सहजपणे केल्यासारखे यायला हवे होते. तान घेतानाचे हातवारे अधिक व काहीवेळा कृत्रिम वाटतात. त्याला पाहताना क्षणाक्षणाला येथे नसिर उद्दिन हवा, येथे नसिर उद्दिन हवा असे वाटत राहिले. भावनिक विस्फोट आणि एकुण वावर उत्तम असला तरी त्याचे 'सचिनपण' नाहीच लपत! केवळ मराठीतील एक जुना-जाणता कलाकार म्हणून ही भूमिका सचिनकडे गेली असे (निदान मला तरी) वाटले. मात्र सचिनच्या आजवरच्या कारकीर्दीतील ही सर्वश्रेष्ठ भूमिका ठरेल. आवेग, उद्वेग, त्रागा, मत्सर, सर्वच काही उत्तम दर्शवले आहे त्याने!
बाकी 'कट्यार' खरोखरच काळजात घुसते ह्यात शंकाच नाही. ह्या चित्रपटाला शक्य ते सर्व पुरस्कार मिळावेत अशी प्रार्थना करावीशी वाटत आहे.
-'बेफिकीर'!
>>>तरुण पिढी आणि माझ्या
>>>तरुण पिढी आणि माझ्या मुलीच्या वयाची ( १४) मुलेही सिनेमा पाहुन भारावुन जात आहेत. <<<
हे फार महान यश आहे ह्या चित्रपटाचं!
>>सगळ काही क्लासिक पण
>>सगळ काही क्लासिक पण वगळलेल्या 'या भवनातील गीत पुराणे ' साठी चुटपूट लागून राह्यलीय<<
अहो चुटपूट तर "तेजोनिधी लोहगोल..." आणि "मुरलीधर शाम..." यांसाठि सुद्धा लागली होती, पण तक्रार नाहि...
सुंदर परीक्षण.
सुंदर परीक्षण.
कट्यार पाहिला! मानवी
कट्यार पाहिला! मानवी भावनांची स्वरातीत गुंतागुंत असलेली कलाकृती! पडद्यावर नाट्यगीते, बंदिशीचे सूर सोडवत असतानाच हि कट्यार मानवी मनाच्या कित्ती तरी वेगवेगळ्या कांगोऱ्यांना उलगडवत जाते.
पंडितजी, खांसाहेब, सदाशिव यांच्या माध्यमातून असूया, स्पर्धा, ईर्षा, सुड, माणसाच्या विविध भावनांचा आपापसातील व स्वतःशी चालणारा संघर्ष अशा अनेक वळनांवरून स्वरांची आणि सुरांची हि मैफल शेवटी या मानवी राग लोभांच्या पलीकडील निखळ आत्म्याचा साक्षात्कार प्रकट करते.
पंडितजी...
राजदराबारातील राजगायक! चित्रपटातील सर्वात मुक्त व्यक्तिमत्व! यांनी संगीताच्या साधनेद्वारे स्वतःला कधीच मुक्त केले आहे. राग, द्वेष, असूया या भावनांच्या खूप पलीकडे हा माणूस पोहचला आहे. या आत्मिक निखळतेच्या व त्यामागून येणाऱ्या आत्मबळाच्या जोरावर हा माणूस खांसाहेबांच्या स्पर्धेपोटी सूर संपल्यावरही या भावनांपासून स्वतःला दूर ठेऊ शकला. शेवटी दरबारात सुद्धा सदाशिवकडून खांसाहेबांची शिकस्त पाहण्यासाठी पंडितजी आलेत असे कुठेही जाणवत नाही. हा माणूस या सगळ्या पलीकडे गेलेला आहे हे जाणवत राहते.
सदाशिव..
लहानपणी पंडिताजींचे शिष्यत्व स्वीकारलेला तरुण! याचा संघर्ष अनेकपदरी आहे... स्वतःच्या आतील सुरांच्या लागलेल्या तहानेशी आहे; गुरू पंडितजींवरील अन्यायाच्या बदल्याचा आहे; अप्रत्यक्ष गुरू झालेल्या खांसाहेबांसमोर उभा राहण्याचा आहे. सुरांमधून, स्वरांमधून याला स्वतःचा आत्मा शोधायचा आहे. शेवटी खांसाहेबांचे शिष्यत्व मागताना हीच भावना सूक्ष्म कुठेतरी आहे असे जाणवते. गुरू पंडितजींच्या अन्यायाविरुद्ध संतापून खांसाहेबांशी स्पर्धा वगैरे या गोष्टी या त्याच्या दीर्घ प्रवासातील काही कड्या म्हणता येतील.
खांसाहेब....
घरची हालाखीची परिस्थिती, पंडितजींच्या मेहरबाणीवर अवलंबून असल्याची भावना, राजदरबारात पंडितजींकडून शिकस्त खाल्याने लोकांकडून होणारा उपहास यामुळे खांसाहेबांच्या स्वरांचा प्रवास त्यांच्या आत्म्याकडून असूया आणि सूड या रस्त्यांवरून एवढा टोकाला जातो कि पंडितजींच्या सुरांचा बळी घेऊन राजगायकीची कट्यार हे मिळवतात. कित्येक वर्ष वाट पाहिलेला राजगायकीबरोबर येणारा सन्मान, ऐश्वर्य हे उपभोगतात खरे पण निकोप स्पर्धेशिवाय मिळालेल्या या सन्मानाने भयाचे एक सावट हा माणूस सतत घेऊन फिरत असतो. सदाशिवचे स्वर ऐकल्यावर हे भय अधोरेखीत होते!
अखेरपर्यंत खांसाहेब या पांघरलेल्या शाली टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. मात्र शेवटी सदाशिवचे आत्मिक सूर खांसाहेबांना अहंकाराच्या, आत्मप्रौढीच्या पदराखालून ओढत आणून सत्याला सामोरे नेतात. इतक्या वर्षांची सन्मानाची पांघरलेली झुले खांसाहेब त्या सुरांसमोर फेकून देतात आणि संगीताच्या सुरांमधले एक यात्री होतात. त्याचवेळी सदाशिव ने त्यांचे शिष्यत्व मागणे हे माणसांच्या द्वेष, सूडाची भावना या पलीकडले संगीताच्या माध्यमातून होणारे निखळ आत्म्याचे प्रकटन अधोरेखीत करतात. हा चित्रपटाचा चरमबिंदू!
वास्तविक मला शास्त्रीय संगीतातले काही कळत नाही पण तरीही हि कट्यार काळजात घुसतेच!
श्रावण, फार सुंदर पोस्ट.
श्रावण, फार सुंदर पोस्ट.
(No subject)
श्रावण !
श्रावण !
चित्रपट पाहिला. तुफ्फान
चित्रपट पाहिला. तुफ्फान आवडला.
शोले आणि तत्सम चित्रपटांपैकी एक अशी गणती व्हावी (माझ्यामते) कारण त्या सिनेमात एकही पात्र किंवा एकही संवाद हा अस्थानी नाही तसंच या सिनेमात आहे. त्यातल्या त्यात राजा राणी यांना फारसे वजनदार संवाद्/काम नाही पण ते सुद्धा कुठे अस्थानी वाटत नाहीत. मूळ नाटकात खाँसाहेबांचे पुतणे गाणारे दाखवलेत तर चित्रपटात तसे नाही. ते ही यथातथाच मानले तरिही त्यांच्यामुळे चित्रपटाला थोडं का होईना मीठ लाभलं आहे.
बाकी सिनेमाबद्दल बोलण्यापेक्षा त्याचा अनुभव घेणं कधीही उत्तम. बोलण्यापेक्षा अनुभुती श्रेष्ठ कारण ती शब्दात प्रत्येकवेळी मांडता येईलच असे नाही.
चित्रपट बनवताना थोडी फार 'सिनेमॅटिक लिबर्टी' वापरली आहे. पण ती कथेला कुठेही तडा जाऊ देत नाही. मूळ नाटकात खाँसाहेबांच्या पत्नीचे पात्रच नाही पण चित्रपटात साक्षी तन्वरने कमाल केली आहे. छोटिशीच भूमिका पण ताकदीने उभी केली आहे.
मूळ नाटकातली गाणी नव्याने ऐकताना आवडलीच. राहूल देशपांडेचा आवाज सचिन ला दिला ते फार उत्तम झालं. महेश काळे यांच्या गायकीपेक्षा मला त्याची गायकी अफाट वाटली. शंकर महादेवन बद्दल काय बोलावे? तो माणूस कमाल आहे. वेगळा असा अभिनय करण्याची त्याला गरजच पडलेली दिसत नाही. तो जिथे जातो तिथला होऊन जातो तसा तो पंडीत म्हणून डोळ्यासमोर येतो. अतिशय सुंदर भूमिका.
गाणी - त्या भवनातील ... गाळले त्याचे अत्यंत वाईट वाटते. पण सचिनने (खाँसाहेबांचं) शास्त्रीजींविरूद्ध विडा उचलल्यावरचं पहिलं पद कमाल. मशिदीतली कव्वाली सुद्धा कमाल. सुरत पियाकी, घेई छंद, गणपती बाप्पा मोरया, तेजोनिधी या पदांनी सुद्धा बहार आणली आहे. काजवेभरल्या रात्रीच्या गाण्याचे बोल आठवत नाहीत पण ते ही उत्तम आहे. एकूण एक गाणी उत्तम याच कॅटेगरीतली आहेत. कित्येक वर्षांनी एखाद्या चित्रपटाच्या गाण्यांची सीडी खरेदी करावी वाटली. उपलब्ध असल्यास नक्की घेणार.
माझ्यामते चित्रपटात काहीही फसले नाही. काहि लोक सचिन मुळे हा चित्रपट पाहू की नको असे साशंक असलेले पाहिले. तो गेले कित्येक वर्ष महागुरू म्हणून लोकांना अतिशय त्रस्त करत होता पण या सिनेमात त्याने कमाल भूमिका केली आहे. उत्कृष्ट उर्दु उच्चार. सदाशिव चा सदासिव असा उच्चार खरोखरी लक्षात राहतो. त्या पात्राची प्रत्येक आणि प्रत्येक लकब खास उतरवली आहे त्याने भूमिकेत.
त्यामुळे सचिनबद्दलचा बायस थोडा बाजूला ठेवून पाहिला तर ते पात्र नक्की आवडेल.
गाणी - एकसे एक, कविराजांना अगदी छोटी भूमिका पण विद्या आणि कलेतला फरक समजावून सांगणारा प्रसंग खास आहे एकदम.
संवाद ही अतिशय उत्तम.
सर्वात महत्वाचे - या मराठी चित्रपटात स्वजो, मुब, सता, इ. तिच तिच इरिटेट करणारी मंडळी नाहीत त्यामुळे अधिक बरं वाटलं.
Thought provoking लेख आहे.
Thought provoking लेख आहे. अजून लिहीतो जमेल तसे.
अशोक सराफ चे एवढे नसेल कदाचित पण लक्ष्याचे झाले होते थोडे. सुरूवातीच्या भन्नाट रोल्स नंतर कायच्या काय चित्रपट आले होते, केवळ लक्ष्या आहे म्हणून चालतील या आशेवर काढल्यासारखे. सध्या विनोदी चित्रपटांची चलती आहे म्हणून काढू टाईप. लक्ष्या ला योग्य संवाद दिले, किंवा तो अॅडिशन करू शकेल अशी सिच्युएशन दिली तर तो काय धमाल उडवायचा हे आधी दिसले होते पण हे नंतरचे रोल्स बरेचसे पांचट टाईप लिहीलेले होते. मला आठवते भरत जाधव गाजतोय म्हंटल्यावर मागच्या दशकात त्याचेही असेच भंकस वाटणारे चित्रपट आले होते - तो एक बायको सवाशेर नवरा पावशेर टाईप काहीतरी नाव असलेला आठवतोय. एक पॅटर्न गाजतोय म्हंटल्यावर त्यात काहीही नवीन भर न घालता तीच उसाची कांडी चोथा होईपर्यंत चरकातून काढत राहणे ही मराठीवाल्यांची खोड आहे.
ह्या कथानकावर आजच्या काळात
ह्या कथानकावर आजच्या काळात चित्रपट काढणे हे एक धाडस म्हणता येईल. >>> सहमत आहे. या टीमने अनेक प्रकारे धाडस केलेले आहे-
- शास्त्रीय संगीत या विषयावर चित्रपट, वरती लिहील्याप्रमाणे
- साधा पण गहन टाईप मराठी चित्रपट न काढता फुल बिग बजेट काढणे, तो व्हिज्युअली देखणा होण्याकरता आवश्यक त्या गोष्टी करणे - सेट्स, टॉप चे कलाकार ई.
- प्रचंड प्रमाणावर मार्केटिंग
- सचिन बद्दल गेल्या काही वर्षांतील टीव्ही शोज मधे जे ऐकलेले आहे त्यावरून त्याचा 'महागुरू' पणा हा सोशल नेटवर्क्स वर चेष्टेचा विषय आहे. त्यात त्याला शास्त्रीय संगीताचा बेस नसावा (पण एक अॅक्टर म्हणून तो कायमच चांगला होता). अशा सध्या खूप चांगली (स्क्रीन) इमेज नसलेल्या कलाकाराला इतका प्रमुख रोल देणे
- आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीत मोठा हिन्दी रिलीज असतो हे गेली अनेक वर्षे माहीत असूनही दिवाळीतच लावायची डेअरिंग, आणि पब्लिकने ही तो चालवून दाखवणे. असे ऐकले की काही मल्टिप्लेक्स मधे याचे शोज दुसर्या आठवड्यात वाढवले.
मला वाटतं (कुठेतरी कधीतरी
मला वाटतं (कुठेतरी कधीतरी वाचल्यावरून) की सचिनला शास्त्रीय संगिताची जाण आहे. शिकलाय बहुतेक.
सचिन गाणं शिकलाय की नाही
सचिन गाणं शिकलाय की नाही माहित नाही, पण त्याला गायनाचं अंग आहे नक्कीच.
नवरी मिळे नवर्याला मध्ये एक गाणं त्यानं गायलंय बहुतेक.
सचिन चांगला गातोच. त्याचे
सचिन चांगला गातोच. त्याचे किस्ना संभाल रे आपुल्या गायी हे बोबडा नावाचे भारूड एका कार्यक्रमात ऐकले आहे.
चोरीचा मामला हेही सचिनचे
चोरीचा मामला हेही सचिनचे गणे आहे.
...
कटारमध्ये सचिनचा स्वतःचा आवाज आहे की डब अह?
क्लासिकल माहित नाही पण सचिन
क्लासिकल माहित नाही पण सचिन चांगला गातो !
मराठी सिनेमात गायलाच आहे शिवाय एक रिअॅलिटी शो होता झी वर गायक-अॅक्टर्स सगळे, त्यात मस्तं गायचा, इतर सगळे यंगस्टर्स पण प्रत्येक एपिसोड मधे चांगला गायला, सगळ्यांना पुरून उरला होता, त्यात मानसी पारेख जिंकली, सचिन रनर अप होता.
काल बघितला तृप्त झाले !!! परत
काल बघितला
तृप्त झाले !!!
परत परत बघावा असा चित्रपट.
मला गाणी अजून मोठी हवी अस वाटत होते. अरे इतक्यात संपल गाण अस वाटत होत.
पण ज्याला शास्त्रीय संगीत जमत नाही अशा व्यक्ती बरोबर बघायला गेले होते. त्याला सुद्धा चित्रपट प्रचंड आवडल !
त्यामुळे एक गोष्ट जाणवली कि चित्रपट जास्तीत जास्त लोकाना आवडावा ह्यासाठी गाण्यांची लांबी कमी ठेवली असावी.
हा सिनेमा बघतांना कधी
हा सिनेमा बघतांना कधी क्लासिकल आवडायला लागले हेच समजले नाही
शेवटचे गाणे तर निव्वळ अप्रतिम. संगीत चिंब भिजवून टाकते असे काहीशे ऐकले होते, त्याचाच प्रत्यवाय घेतला.
बाकी
एक पॅटर्न गाजतोय म्हंटल्यावर त्यात काहीही नवीन भर न घालता तीच उसाची कांडी चोथा होईपर्यंत चरकातून काढत राहणे ही मराठीवाल्यांची खोड आहे.
>>
ह्यास अनुमोदन! शाळकरी मुलांच्या भानगडींवरील सिनेमांनी वात आणलाय. आता परत सिंड्रेला काय म्हणून परत पाटी बघितली कुठेशिक.
बेफिजी, छान लेख/समिक्षा, पुढे
बेफिजी,
छान लेख/समिक्षा, पुढे मागे चित्रपट पाहाणार आहे.
मी चित्रपट पाहिला. संगित
मी चित्रपट पाहिला. संगित अतिशय सुरेख आहे. सचिनचा अभिनय आवडला. पंडितजींच्या "घेई छंद" संपल्यानंतर सगळे स्तब्ध झाले असताना मैफिलीचा अंदाज घेतानाचा त्याचा अभिनय तर आजवरच्या अभिनयातला सर्वोत्कृष्ट. चेह-यावर काय झराझरा भाव दाखवलेत त्याने.
कथेच्या दृष्टिकोनातुन निराशा झाली. अर्थात जसे नाटक आहे तसाच चित्रपट ही अपेक्षा नव्हतीच. पण कथा खुप विसविशीत वाटली. खुप काही ओढुन ताणुन चिकटवल्यासारखे वाटले. शेवटचा प्रसंग प्रसंग म्हणुन छान होता पण तो मुद्दाम तिथे आणल्यासारखा वाटला. त्यातल्या भावना अचानक आल्यासारखया वाटल्या, त्यांची व्यवस्थित जोपासना आधी झाल्यासारखई वाटली नाही. अर्थात हेमावैम. हे सगळॅ असले तरी चित्रपट संगितामुळॅ खुप सुरेख वाटला. घरातल्या ज्येनानी दोनदा पाहिला
चित्रपट आवडला. नवी गाणीसुद्धा
चित्रपट आवडला. नवी गाणीसुद्धा सुरेख आहेत. घेई छंद पंडितजी वर्झन फार पूर्वी कधीतरी ऐकलेली. नाटकात (राहुल देशपांड्यांच्या) पंडितजींची मुलगी गायलेली. कलाकाराचे नाव माहित नाही. पण नेहेमीच खांसाहेबांचे वर्झन आवडलेले. पण चित्रपटात शंकर महादेवन यांनी गायलेले खूप आवडले. अगदी राजदरबारातल्या श्रोत्यांसारखीच स्थिती झालेली.
मला फक्त दोन गोष्टी आवडल्या नाही. सदाशिव खांसाहेबांवर सूड उगवायचे ठरवतो. त्यामुळे त्याच्यातल्या शिष्याची संगीत शिकण्याची असोशी सिनेमात तितकी उठून आली नाही. तरीही झरिनाने संगीताने सूड उगवण्याचा दिलेला सल्ला तो सीन/एक विचार छान जमून आलाय.
दुसरे म्हणजे खांसाहेबाचे भर दरबारात झालेले गर्वहरण (मला अचूक शब्द सुचत नाहीय). नाटकातला तो एक खासगी क्षण मला जास्त भावला. खांसाहेब रागाच्या अत्त्युच्च क्षणी राजेसाहेबांकडून कट्यार वापरण्याची परवानगी मागतात वगैरे तितकेसे पटले नाही.
अतिशय छान वर्णन बेफिकीर...
अतिशय छान वर्णन बेफिकीर... चित्रपट बघण्याचा विचार पक्का... नेटफ्लिक्स वर आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीत मोठा हिन्दी रिलीज असतो हे गेली अनेक वर्षे माहीत असूनही दिवाळीतच लावायची डेअरिंग, आणि पब्लिकने ही तो चालवून दाखवणे. असे ऐकले की काही मल्टिप्लेक्स मधे याचे शोज दुसर्या आठवड्यात वाढवले.
>> येस्स.. हा आणि मुंबई पुणे मुंबई २ चे जवळपास सगळे शो धड्डाधड हाऊसफुल्ल झाले होते तेव्हा आतुन खुप काहीतरी छान (बहुतेक खुप अभिमान) वाटले होते. मला २ आठवडे तिकिटे मिळत नव्हती याचे एकिकडे दु:ख वाटत होते आणि एकिकडे आनंद.
अजुन एक म्हणजे चित्रपटगृहात कट्यार बघतांना सगळे गाणी संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट करुन दाद देत होते. एखाद्या मैफिलीला आल्याचा भास होत होता. अप्रतिम. चित्रपटगृहात आजुबाजुला आपल्यासारखेच रसिक प्रेक्षक असायलाही आजकाल भाग्य लागतं. (फँड्रीच्या वेळी आजुबाजुच्या क्राऊडचा अनुभव अतिशय वाईट आहे.)
आज मी न राहवून एकलीच बघुन
आज मी न राहवून एकलीच बघुन आली..
सहसा फिल्म बघण्यापूर्वी गाणी तितकिशी भावत नाही पण हा अपवाद ठरला..
चित्रपट बघण्यापूर्वीच अरुणी किरनि आणि यार इलाही कव्वाली खुप्पच आवडलेली त्यामूळे नेमक्या कुठल्या प्रसंगाला ते योजले आहे हे बघण्याचि उत्सुकता खुप होती.. दोन्ही वेळि सचिन प्रचंड आवडला..
बाकी महागुरु आणि कायम मी असा मी तसा या तोर्यामूळे जाम जीवावर येतो तो.. विशाल आणि दक्षी ला त्याच्याबद्दलच्या मताबद्दल अनुमोदन..
खुप मोठ काहीतरी हातातून सुटता सुटता राहीलं अस वाटलं चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर...
वाह वाह निघते फक्त...
मला तर टाळ्या वाजवायच सुद्धा भान राहीलं नै..
आणि पहिल्या घेई छंद ऐकल्यावर माझीपन अवस्था दरबारापेक्षा वेगळी नव्हती..
कितीही काही करा पण इतकी दमदार कलाकृती मोठ्या पडद्यावर डॉल्बी साऊंड च्या आवाजात ऐकण्याची जादूच निराळी...
अजुनही शो हाऊसफुल आहेत बर..अगदी आजच्या विकडेला सुद्धा..
एकही खुर्ची रिकामी नव्हती सिनेपोलीस ला.. मी तर अजुनही तरंगतेय त्या सुरांच्या मैफिलीत..
आजच्या मटा मधे आलेला पं.
आजच्या मटा मधे आलेला पं. चन्द्रकांत लिमये यांचा लेख.
http://www.maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/cinema-katyar-kal...
स्वतः काम केलेल्या नाटकाच्या कथेत केलेले बदल त्यांना न आवडणे स्वाभाविक आहे, पण तरिही त्यांचं मत पटत नाही.
नोकरीमुळे दुर्दैवाने मला हा सिनेमा बघता आलेला नाही. पण जर माझी १४ वर्षाची ईन्ग्रजी शाळेत जाणारी मुलगी तो दोन वेळा बघते, अजुनही फोन वर मझ्याशी त्यातल्या गाण्यांबद्दल चर्चा करते, "दिल की तपीश" मधे सम कशी कठीण आहे (ती गेली १० वर्षं कथक शिकते आहे) असं मला पटवत रहाते, तिच्या शाळेतली अमराठी मुलं त्या गाण्यांबद्दल बोलतात तर ते संगीत चांगलं कसं नसेल?
जुन्या पिढीने नवीन पिढीला नावच थेवायची त्यातला हा प्रकार आहे का?
कट्यार काळजात
कट्यार काळजात घुसली
ऑस्ट्रेलिया मधले खेळ
अडेलेड - ६ फेब्रुवारी - ट्रॅक सिनेमा
375 Greenhill Rd | Toorak Gardens
Ph: (08) 8332 8020
Catch Bus #147 | Stop 10
ब्रिस्बेन - ७ फेब्रुवारी - न्यु फार्म सिनेमा
701 Brunswick St, Brisbane
कॅनबेरा ७ फेब्रुवारी - न्यु फार्म सिनेमा
Fellows Rd, Acton ACT 2601 (बहुदा युनि कँपस मध्ये असावे)
पर्थ - २८ फेब्रुवारी - बॅकलॉट
21 Simpson St, West Perth WA 6005
>>जुन्या पिढीने नवीन पिढीला
>>जुन्या पिढीने नवीन पिढीला नावच थेवायची त्यातला हा प्रकार आहे का?<<
असं नाही वाटत. त्यांची मतं तशी असू शकतात.
काही चांगले प्रसंग कथेतून पूर्ण वगळले आहेत - नाटकात, पंडीतजींच्या हवेलीतील श्रीकृष्णाची मूर्ती चांद-उस्मान फोडणार असतात त्यावेळी खांसाहेब जे बोलतात त्यातून त्यांची जात-धर्म ओलांडून पुढे जाणारी कलेवरची निष्ठा दिसते. सदाशीवला गाणं न शिकवण्याच्या हट्टामागचं कारणही नाटकात अगदी पटून जातं तसं चित्रपटात होत नाही.
चित्रपटाच्या संगीताबद्दल प्रश्नच नाही, बाकी तांत्रिक बाबीही दाद देण्याजोग्या, पण कथा मात्र अनेक ठिकाणी पार गंडलेली आहे. काही काही ठिकाणीतर चित्रपट अगदी बाळबोध झाला आहे.
काल झी मराठीवर हा चित्रपट
काल झी मराठीवर हा चित्रपट (काही व्यत्ययांमुळे अधूनमधून) पाहिला आणि आवडला. मूळ कथा काय होती, कोण कोणते गाणे गातो, याचे सविस्तर तपशील माहीत नसल्याने माझ्यासाठी हा एक नवाच कथा/सिनेमा होता.
सीडी / डिव्हिडी वर उपलब्ध असेल तर पुन्हा निवांत बघायला नक्कीच आवडेल. सगळी गाणी जमवून नेहमीच्या ऐकायच्या यादीत भर घालावी असे आवर्जून वाटले.
लेख छान आहे. आम्ही सिनेमा
लेख छान आहे.
आम्ही सिनेमा थिएटरला पाहीला होताच. मुलगी ( ९ वर्षे) गाण्यांची फॅन झाली आहे त्यामुळे गाण्यांची सिडी आणुन अजुनही आठाव्ड्यातुन किमान एकदा ऐकत असते. कालही मधे कुठलाही व्यत्यय न घेता पुन्हा एकदा पाहीला दोघींनी.
महेश काळे आणि शंकर महादेवन हे सध्याचे 'हिरो' आहेत तीच्यासाठी. इतक्या लहान मुलांनाही वेड लावणारा सिनेमा खरच अप्रतिम आहे.
मीं देखील कालच टीव्हीवर
मीं देखील कालच टीव्हीवर पाहिला. सुबोध भावेंचं हा अप्रतिम सिनेमा काढल्याबद्दल, विशेषतः << स्वस्तपणाला किंवा सवंगपणाला कणभरही जागा दिली गेली नाही.>>, याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं ! बाकी तपशीलाबाबत वर चर्चा झालीच आहे.
बेफी, छान लिहिलंत.. कट्यार
बेफी, छान लिहिलंत.. कट्यार अतिशय आवडला होता. त्यामुळे ओरिजनल नाटक पाहिलं थोडावेळ. पण ते मात्र फारच कंटाळवाणं वाटलं. कट्यार मधली सुबोध भावे ची अॅक्टिंग अप्रतिम होती, महागुरुची अहंकारी, खलनायकी भूमिका अगदी शोभली त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणि शंकर महादेवन हा ही इतकं छान काम करु शकतो, यावर विश्वासच बसत नव्हता. मृण्मयी, अमृता यांचेही काम सुंदर झाले.. संगीत तर अहाहा! कित्येक दिवस मनात रेंगाळत राहीला हा चित्रपट मनात... अजूनही आहे. एक उत्तम कलाकृती पाहील्याची अनुभूती मिळाली कट्यार पाहिल्यावर..
Pages