कट्यारीबाबत काळजातले

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2015 - 09:26

कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटाने मनाचे प्रचंड समाधान झाले. मुळात कथानक अतिशय सकस असल्याने चित्रपट सरस होणारच होता. ह्या कथानकावर आजच्या काळात चित्रपट काढणे हे एक धाडस म्हणता येईल.

स्वस्तपणाला किंवा सवंगपणाला कणभरही जागा दिली गेली नाही. चित्रपटाचा वेग प्रेक्षकाच्या जवळपास नकळतच अगदी अचूक ठेवला गेल्यासारखे झाले. रटाळही होत नाही आणि समजण्यासाठी अधिक काळ हवा होता असेही वाटले नाही.

ह्या चित्रपटात बहितांशी गोष्टी जमेच्याच आहेत हे नक्की! काही किरकोळ गोष्टी वैगुण्यांसारख्या जाणवल्या. त्याही नसत्या तर हा चित्रपट सर्वश्रेष्ठ गणला गेला असता बहुधा!

ह्या चित्रपटाने चित्रपट क्षेत्रासाठी, ह्या चित्रपटाच्या निर्मीतीशी निगडीत असलेल्या सर्व पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या कलाकारांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि आजच्या समाजासाठी खूप काही केले आहे असे चित्रपट पाहताना मला सतत जाणवत राहिले. आधीच ह्या चित्रपटावर सर्व माध्यमांमधून व येथेही तुडुंब चर्चा झालेली आहे तरीही (आणि येथील चर्चा वाचण्याचा कंटाळा केलेला असल्याने) मला स्वतःला येथे वेगळा धागा काढून काहीतरी लिहावेसे वाटले हे प्रामाणिकपणे नोंदवतो.

गुरू शिष्य परंपरा - कलेचा वारसा पुढील पिढीकडे जाताना त्यातील अचूकतेबाबत, शिष्य प्रतिभाशाली असण्याबाबत, निष्ठावान असण्याबाबत, गुरू-शिष्यांमध्ये प्रेमयुक्त आदराचे नाते असण्याबाबत ज्या अपेक्षा प्राचीन कलापरंपरेत आढळायच्या त्यांचे अस्सल चित्रण ह्या चित्रपटात झालेले आहे. केवळ कला असे नव्हे तर शिक्षण किंवा इतर क्षेत्रांमध्येही आजकाल वरिष्ठ किंवा गुरूस्थानी असलेल्यांबाबत जी एक सार्वत्रीक 'कूल मेन्टॅलिटी' दिसून येते तिच्यातील फोलपणावर मार्मिक बोट ठेवले गेले आहे. गुरूने गुरूपदाची शोभा सांभाळावी आणि शिष्याने शिष्यपदाची, तरच काहीतरी उल्लेखनीय निर्मीती होऊ शकते ही झिरप कोवळ्या वयाच्या आणि तंत्रज्ञानाचा विळखा बसलेल्या तरुणाईच्या मनात झाली तर ते एक नकळत मिळालेले यश म्हणता येईल. पंडितजींच्या कश्याबश्या जतन झालेल्या रेकॉर्ड्स खाँसाहेबांनी पावलांखाली चुरडल्यानंतर ते तुकडे छातीशी धरून आक्रंदणारा सदाशिव मनाला थिजवून गेला. व्यक्तीपूजेसारख्या थिल्लरतेने बरबटलेल्या आजच्या पिढ्यांना व्यक्तीमधील प्रतिभेच्या पूजनावरील भक्ती समजली तर उत्तम होईल. मुलीने दिलेल्या धमकीने अस्वस्थ होऊन खाँसाहेबांनी सदाशिवचा गहाण ठेवून घेतलेला आवाज त्याला परत देताना पंडितजींचा चुरगाळलेला गंडाही परत देणे हे एका महान गुरूपदावरील गायकाने दुसर्‍या घराण्यातील गुरूशिष्य परंपरेचा सन्मान करणारे दृश्य होते. मला तर हा चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' ह्या कथानकापेक्षा तो 'आजच्या काळात प्रदर्शीत केला' म्हणून सामाजिकच अधिक वाटत आहे.

घराण्याचा अभिमान - स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, घराण्याची अस्मिता आणि मिळणारी शान-ओ-शौकत ह्यातून निर्माण झालेला दुराभिमान किंवा अहंकार हा नकारात्मक असला तरी त्यातूनही एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे. तो संदेश देणारे दृश्य पाहताना अंगावर काटा आला आणि डोळे घळाघळा वाहिले. 'माझे गायन चोरून ऐकून माझ्या घराण्याची नक्कल करणार्‍या ह्या शिष्याला मारायची मला परवानगी आहे' असे राजासमोर भर दरबारात आवेशाने जाहीर करणारे खाँसाहेब जेव्हा त्याच शिष्याचे गायन ऐकतात तेव्हा पाणी पाणी होतात. उद्ध्वस्त होऊन पुन्हा निर्माण होऊन पुन्हा द्रवू लागतात. अहंकाराची जागा विनम्रता घेते. कारण एकच, त्यांच्यातही अस्सल कलाकार असतो ज्याला स्वतःच्या प्रतिभेतूनच निर्माण झालेली स्वतःची अभिरुची घराण्याचा दुराभिमान त्यागायला प्रवृत्त करते. जेव्हा त्यांना कळते की हा एकलव्य आपल्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांच्यातला कलाकार जागा होतो आणि त्यांच्यातल्या अहंकारी माणसाला मारतो. संदेश हाच की 'जवळ कला होती म्हणून त्यांना अभिमान शोभत होता हे त्यांचे त्यांना समजले' आणि ते मान्य करून त्यांनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ कलाकारासमोर नमणे 'पसंद' केले. आपापल्या घराण्यांचा अभिमान गर्वापर्यंत पोचू नये हा तो संदेश, जो सुरुवातीला पंडितजींनी भर दरबारात भावुक होऊन खाँसाहेबांना दिलेल्या मनमुराद वाहवामधूनही दिसतो.

कलोपासना - आजकाल अनेक नट्या, आमीर खानसारखे अभिनेते हे भूमिकांनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. असे ऐकले आहे की सोहराब मोदींनी म्हणे म्हातार्‍याची भूमिका करण्यासाठी स्वतःचे सगळे दात मुद्दाम काढलेले होते. गायन क्षेत्रात इतकी घराणी, इतके राजाश्रय आणि इतकी जीवघेणी स्पर्धा असताना कलोपासना कशी परमोच्च पातळीवर असे ह्याचे उदाहरण ह्या चित्रपटात दिसते. सदाशिवने गुलामगिरी स्वीकारणे, पंडितजींच्य अमुलीने स्वतःची सर्व विद्या त्याला देऊ करणे, खाँसाहेबांनी आरंभीच्या काळात बायकोच्या शिव्या खाऊनही कलोपासना सुरूच ठेवणे ही काही उदाहरणे! पण शेवटच्या जुगलबंदीत खाँसाहेबांनी थक्क होऊन सदाशिवला मारण्यासाठी घेतलेली कट्यार हातात तशीच ठेवून थिजून उभे राहणे हा कलाकार कसे कलेला सबकुछ मानत हे दाखवते. झरीनाने 'आवाज गहाण टाकला आहेस तर बासरी घे' म्हणताच सदाशिवने 'स्वरही शब्द असतात, बासरी वाजवली तर संगीत माझ्यावर रुसेल' असे म्हणणे हा कळस होता. एकेक प्रसंग, एकेक वाक्य असे खिळवून ठेवणारे!

कला आणि आवेश - कला व प्रतिभेतून आलेला आवेश ह्यांचे प्रभावी चित्रण ह्या चित्रपटात आहे. योग्य ती पात्रता नसताना सदाशिवने खाँसाहेबांना थेट आव्हान देणे आणि पैज हरणे हा त्याचाच एक भाग! दुसरा भाग म्हणजे 'एक खून करायला परवानगी' ही राजांनी फार पूर्वी दिलेली परवानगी ऐनवेळी सदाशिवला मारण्यासाठी वापरण्याचा आवेश सदाशिवचे गायन ऐकताच खाँसाहेबांच्या चेहर्‍यावरून गळून पडणे! अशी लाखात एक माणसे जगात असली तर जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर होईल.

भर दरबार आणि भावनिकता - असा उल्लेख आहे की बादशहाने दाद दिल्याशिवाय मुशायर्‍यातील इतर कवींनी दुसर्‍या कवीने ऐकवलेल्या शेरावर दाद द्यायची नाही असा प्रघात होता. मात्र एकदा मोमीनने ऐकवलेल्या 'तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नही होता' ह्या शेरावर बादशहा जफरची वाट न पाहता गालिबने उत्स्फुर्त आणि भरभरून दाद दिली. सगळे थबकले. पण बादशहाला गालिबमुळे शेराची महती जाणवली व त्याने हसून मान डोलावली. ह्या चित्रपटात 'आपल्या घराण्याची गायकी चोरली' असा आरोप भर दरबारात आणि राजासमोर करताना खाँसाहेबांना राजाच्या उपस्थितीची जाणीवही राहत नाही. ही कलेवरची भक्ती आणि घराण्याची अस्मिता! अशीच जाणीव त्यांना ते जेव्हा सलग चौदा वर्षे पराजित ठरल्यानंतर विजेते ठरतात तेव्हाही राहत नाही. जेथे साध्या साध्या गुस्ताखीसाठी मुंडके उडवण्याच्या शिक्षा होऊ शकत असत तेथे कलेबाबत इतकी भावनिकता केवळ जबरदस्त साधनेमुळेच उफाळून येऊ शकत असणार!

श्रेष्ठ कोण - प्रश्न पंडितजी श्रेष्ठ की खाँसाहेब हा कुठेच नव्हता. दोघेही पूर्ण भिन्न! पण सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये एक सामान्य प्रेक्षक इतके नक्की समजू शकतो की खाँसाहेबांची गायकी अधिक भावणारी दाखवण्यात आली आहे. त्यांचा सलग चौदा वर्षे पराभव होणे हे एका डोळस प्रेक्षकाला पटणार नाही. पण हे मूळ कथानक आहे.

आजची तरुण पिढी आणि हा चित्रपट -

ह्या चित्रपटात तत्त्व, उसूल ह्यांचे महत्त्व सतत दाखवण्यात आले आहे. फितुरी, साधनेतील उथळपणा, योग्य ते बोलून दाखवण्याची हिम्मत, आदर, दिल्या शब्दाचे महत्त्व अश्या कित्येक तत्त्वांबाबत कथानक बोलते. आजच्या पिढीला हनी सिंग आणि तत्सम अनेकांनी बहकवलेले आहे. हे नुसतेच गायनाबाबत नव्हे तर सर्वच पातळ्यांवर पिढ्या बहकतच आहेत. राजकीय पोस्ट्स, अश्लील पोस्ट्स, थिल्लर 'पीजे' हे अमाप प्रमाणात फॉर्वर्ड होत आहेत. 'काहीतरी मी पहिल्यांदा इतरांना सांगितले व वाहवा मिळवली' हे नगण्य समाधान मिळवण्यासाठी धावपळ होत आहे. साधना, तपस्या वगैरे शब्दांना जागा उरलेली नाही. दिल्या शब्दाला अर्थ राहिलेला नाही. कोणतीही अत्यंत सुमार गोष्टही आता 'ऑस्सम' असा प्रतिसाद मिळवते. सगळेच स्वस्त झालेले आहे, सहज उपलब्ध झालेले आहे. कट्यारची गाणी लावलेला मोबाईल टेबलवर ठेवून पोरे बीअरच्या बाटल्यांची बुचे उचकटत आहेत आणि म्हणत आहेत 'ऑस्सम मूव्ही आहे'! चित्रपटात भडक दृश्ये तर नाहीतच पण उगाच प्रेमकथेलाही फार वाव नाही. अनावश्यक असे एकही दृश्य नाही. स्वस्तपणा नाही. वेग आहे. रेंगाळणे नाही. मूर्ख हिंसा नाही. आणि आणखीन काय महाराज, तर हा चित्रपट चक्क २०१५ साली प्रदर्शीत करून दाखवलेला आहे. एका डोळ्याने चित्रपट पाहावा आणि एका डोळ्याने स्वतःच्या आणि आजच्या तरुण पिढीच्या तत्त्वहीन, दिशाहीन जीवनशैलीवर अश्रू ढाळावेत अशी अवस्था आहे. हा चित्रपट पाहताना आपण स्वतः माणूस म्हणून किती क्षुल्लक आहोत हे समजत राहते. हिंदी भाषेत प्रेम रतन आणि तत्सम चित्रपट येत असताना, साध्या दृश्यातही अर्धे अंग उघडे टाकणार्‍या नायिका असताना, इन्डियन आयडॉलचे जजेस लाथा घालण्याच्य अलायकीचे असताना आणि ते सगळे आम्ही चवीने बघत असताना 'कट्यार काळजात घुसली' येतो आणि आरपार घुसतो.

स्त्रीरूप -

चित्रपटात तीन प्रमुख स्त्री भूमिका आहेत. तशी एक राणीची भूमिकाही आहे पण ती नगण्य म्हणता येईल. बेगमसाहेबांना खलनायिका दाखवण्यात आले आहे. ते कथानकासाठी ठीक! पण उमा आणि झरीना ह्या अनुक्रमे पंडितजी आणि खाँसाहेबांच्या मुली ह्या स्त्रीची अशी रुपे आहेत जी पाहून खरंच भरून येते. उमा सदाशिववर मूक प्रेम करते. त्याला पंडितजींची तिच्याकडे असलेली सगळी विद्या देते. हवेलीतून बाहेर पडताना खाँसाहेबांना चार शब्द सुनावते. सदाशिवच्या पाठीशी उभी राहते. आणि झरीना? झरीना भर हवेलीत खाँसाहेबांच्या मुलांसमोर त्यांचा भयानक जहरी अपमान करते. बेगम साहेबांना तलाक देणे आणि सदाशिवचा आवाज गहाण ठेवून घेणे हा स्वार्थ असल्याचे थेट सांगते. वर धमकी देते की बेगमसाहेबांनी पंडितजींमधील गायक संपवला हे गुपीत अवघ्या जगाला सांगेन! खाँसाहेबांसारखे खाँसाहेब उभे थरथरतात, डळमळतात आणि मान झुकवतात. स्त्रीचे हे रूप दाखवून कथानकाने आणि चित्रपटातील सर्वांनी ह्या जगावर उपकार केलेले आहेत.

कमीजास्त -

खाँसाहेबांबरोबर जी दोन मुले असतात ती त्यांचीच मुले दाखवलेली असतात असे मी समजत आहे. ते चूक असल्यास माहीत नाही. पण ती अगदीच बालिश गोष्टी करताना दाखवलेली आहेत. शंकर महादेवनला डोळ्यांमध्ये अधिक बोलकेपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे वाटते. राजा फारच स्ट्रेट फेस ठेवताना दिसतो. कवीराज म्हणून पुष्कर श्रोत्री ठीकठाक! मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुबोध भावे आणि सचिन! सुबोध भावेने शक्य तितका उत्तम अभिनयही केला आहे आणि भूमिकेचे सार्थकही! पण तिथे एक कोवळा आणि अननुभवी दिसणारा तरुण हवासा वाटत होता. (हे सापेक्ष असू शकेल). मात्र सचिनने भूमिकेचे सोनेही केले आहे आणि गचकेही दिलेले आहेत. अनेक उर्दू उच्चार अधिक सहजपणे केल्यासारखे यायला हवे होते. तान घेतानाचे हातवारे अधिक व काहीवेळा कृत्रिम वाटतात. त्याला पाहताना क्षणाक्षणाला येथे नसिर उद्दिन हवा, येथे नसिर उद्दिन हवा असे वाटत राहिले. भावनिक विस्फोट आणि एकुण वावर उत्तम असला तरी त्याचे 'सचिनपण' नाहीच लपत! केवळ मराठीतील एक जुना-जाणता कलाकार म्हणून ही भूमिका सचिनकडे गेली असे (निदान मला तरी) वाटले. मात्र सचिनच्या आजवरच्या कारकीर्दीतील ही सर्वश्रेष्ठ भूमिका ठरेल. आवेग, उद्वेग, त्रागा, मत्सर, सर्वच काही उत्तम दर्शवले आहे त्याने!

बाकी 'कट्यार' खरोखरच काळजात घुसते ह्यात शंकाच नाही. ह्या चित्रपटाला शक्य ते सर्व पुरस्कार मिळावेत अशी प्रार्थना करावीशी वाटत आहे.

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदून गेले मन. बर्‍याच वर्षानंतर एखाद्या मराठी चित्रपटाला सर्वांनीच असे डोक्यावर घेणे पाहणे किती आनंदाचे असू शकते हे प्रत्येक ओळीतून जाणवत गेले. असतील काही वैगुण्याचे बिंदू....पण असू देत... गोर्‍या गालावरील तीट समजू आपण त्या बिंदूना आणि त्यासह बाहुली आपली म्हटली की मग ती तयार करायला हातभार लागलेल्या सर्वच घटकांचे मनःपूर्वक कौतुक कसे करायला हवे, तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेफिकीर यांची ही कट्यार कविताच होय.

मोबाईल...व्हॉट्स अप...आयपॅड...इंटरनेट आदीनी आजचीच नव्हे तर कालच्याही पिढीला अक्षरशः वेढून टाकलेल्या या दिवसात संगीत आणि कलोपासनेवर अभिजात परंपरेच्या अंगणात आणलेला चित्रपट निर्माण करून दोन गायकांच्या जीवनातील चढौतार....तेही शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून....दाखविणे हे नक्कीच आव्हानात्मक. अशा चित्रपटाचा पुरस्कार झी मराठीने अत्यंत समर्थपणे केल्याचे पडद्यावरील श्रीमंतीतून ठळकपणे जाणवतेही. त्याला मिळालेली दिग्दर्शक आणि कलाकारांची यथोचित साथ सारेच काही सुवर्णकण वेचल्यागत झाले आहे. त्याबद्दल असल्या काही कमतरता तरीही पूर्ण पोषक परिणाम किती साधला गेला आहे ते थिएटरमधून बाहेर पडत असलेल्या प्रेक्षकांच्या बोलक्या चेहर्‍यावरून स्पष्टपणे जाणवतेच.

सचिनच्या अदाकारीबद्दल जितके कौतुक होत आहे, ते वाचूनही मन खरोखरी भरून आले आहे. सुबोध भावे यांचेही असेच कौतुक करावे....आणि केलेही जात आहे.

मस्तयं बेफि.
अपेक्षेपेक्षा खूपच छान आहे. परत बघायचा आहे.
माझी एक गुजराथी मैत्रिण आहे , ती मराठी कथा, लेख वगैरे सुचवले तर वाचते आवडीने .
ती ही गेल्या आठवड्यात म्हणत होती " मैने बहोत सुना है इसके बारेमे , मुझे भि देखना है अभी"

खाँसाहेबांबरोबर जी दोन मुले असतात ती त्यांचीच मुले दाखवलेली असतात असे मी समजत आहे. ते चूक असल्यास माहीत नाही. पण ती अगदीच बालिश गोष्टी करताना दाखवलेली आहेत. शंकर महादेवनला डोळ्यांमध्ये अधिक बोलकेपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे वाटते. >>>>>>

ती मुले त्यान्चे पुतणे असतात .

शंकर महादेवनला डोळ्यांमध्ये अधिक बोलकेपणा आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे वाटते. >>> हो पन्डीतजी फारच निरागस वाटतात .

राजा फारच स्ट्रेट फेस ठेवताना दिसतो.>> अनुमोदन . मला बर्याच दा तो पोशाखामुळे फार हालचाल करत नसावा असही वाटत.

मस्त बेफीजी.

अशोकमामांचा प्रतिसाद खुप छान!

आत्ताच दुसर्‍यांदा कट्यार पाहून आलो. चित्रपटाचे संगीत आणि गाणी ही अत्यंत श्रवणीय आहेत. चित्रपट पाहताना आपण कधी संगितमय होऊन जातो ते आपल्याला सुध्दा कळत नाही.

घराण्याचा अभिमान ही कल्पना नाही तर वास्तव आहे.

पं ह्रदयनाथ मंगेशकरांनी एक दुरदर्शनवर सांगीतलेली गाण्याच्या जन्माची गोष्ट आठवते. " गणराज रंगी नाचतो" हे लतादिदींनी गायलेले, ह्रदयनाथांनी संगीतबध्द केलेले तसेच कै. शांता शेळके यांनी रचलेले हे प्रसिध्द गीत.

एका दुसर्‍या घरण्याच्या प्रसिध्द गायकाकडे ह्र्दयनाथ गेले असताना त्यांचा रियाज सुरु होता " सावन की रुतु भोर " असे काहीसे स्वरचित पद ते म्हणत होते. ह्र्दयनाथ मनात नोटेशन घेत आहेत हे पाहुन त्यांनी रियाज बंद केला. हे माझ्या घराण्याचे पद/ गायकी आहे हे सांगुन हे गीत त्यांना ऐकण्यास मनाई केली.

थोड्याश्या नोटेशनच्या आधारे पं ह्र्दयनांथांनी ते पद शांता शेळके यांज कडुन लिहुन घेतले आणि पुढे ते प्रसिध्द झाले.

बेफिकीर, छान परिक्शण. सिनेमा अतिशय सुंदर, नाटक आधी विविध संचात बघितलेलं असल्याने सिनेमाच्या बाबतीत थोडा स्केप्टिकल होतो पण आता एक उत्तम कलाक्रुती बघायला मिळाल्याचं समाधान आहे.

सुबोध भावे आणि टिमचं अभिनंदन. मुळ नाटकाच्या संहितेत बरेच बदल केलेले आहेत पण ते अजिबात खटकले नाहित. बाकि सचिन विषयी काय बोलणार? हि लिटरली लीव्ड द रोल वुड बी ॲन अंडरस्टेटमेंट...

शास्त्रीय संगीताची पीछेहाट होण्याचे घराण्याचा दुराभिमान म्हणून शिकविण्याबाबत सिलेक्टीवनेस हीही एक बाब आहेच. घराण्याचे संगीत शुद्ध स्वरूपात जतन व्हावे हाही उद्देश त्यात असू शकेल. परंतु आर्कितेक्चर , साहित्य यात जी वेगवेगळ्य्य पद्धतींचे फ्युजन झाले त्यामुळे उलट त्या कला बहरल्या . आधुनिक शास्त्रीय संगीत गायकांनी या भिन्ती तोडल्याने संगीताची प्रगतीच झाली.

चित्रपट आवडला. जमेच्या बाजू पुष्कळच आहे, पण काही गोष्टी मात्र खटकल्या.
सदाशीवला संगीताचे ज्ञान हवे आहे. पंडितजी ते देऊ शकत नाहीत. त्याला ते खांसाहेबांकडून मिळवण्याची तळमळ आहे. पण चित्रपटात त्याला खांसाहेबांवर सूडही घ्यायचा आहे असं दाखवलं आहे. ज्ञानार्जनाची तळमळ, सूडभावना आणि अपमान अशा सगळ्याच गोष्टी एकत्र केल्याने ती तळमळ पोचली नाही असे वाटले.
सदाशीवच्या गळ्यावर कित्येक वर्षांपासुन पंडितजींच्या गायकीचे संस्कार आहेत. आता त्याच्या गळ्यावर आपल्या गायकीचा साज चढवता येणार नाही आणि त्याला आपण शिष्यत्व बहाल केलं तरी त्याच्या गळ्यातून उमटणारं गाणं पंडितजींचंच असेल, यासाठी खांसाहेब सदाशीवला शिकवायला तयार नाहीत. हा घराण्याचा पीळ प्रभावीपणे पुढे येत नाही.
कट्यारीचं मनोगत अप्रस्तुत वाटतं. सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून संदेश देण्याचा अट्टहास रसभंग करतो. शेवटच्या प्रसंगात तर फारच.

सगळेच भुमिकांत चपखल बसले आहेत. मला तर शंकर महादेवनचे पंडित भानुशंकर शास्त्री परफेक्ट वाटतात. ते स्वभावानं मवाळच आहेत ते छान दाखवलंय. भावनांचा अतिरेक नाही. पंडितजी आणि खांसाहेब यांच्या व्यक्तिमत्त्वातला फरक दाखवण्यासाठी पंडितजी तसेच रंगवणे भाग पडले असेल. चक्क सचिनही मस्त!

साक्षी तन्वर, अमृता खानविलकर आणि पुष्कर श्रोत्री यांचा विशेष उल्लेख हवा. फार सहजतेनं वावरलेत हे लोकं.

कपडे आणि दागिने अत्यंत सुयोग्य निवडले आहेत. राणीचे कपडे, दागिने मला फारच आवडले. त्या काळाला अगदी योग्य आहेत. अति भडकपणा कुठेही नाही. राजा आणि राणी चे कलाकार कोण आहेत?

मराठी सिनेमातली डायलॉग डिलिव्हरी मात्र मला कधीकधी कृत्रिम वाटते. तशी इथेही अधूनमधून वाटली. असं का होतं देव जाणे.

विश्रामपूरचा तो टेकडीवरून घेतलेला शॉट - अर्थात कॉम्प्युटर जनरेटेड आहे - जरा जास्तच वेळा दाखवलाय. तो दिसतो सुंदरच त्यात प्रश्न नाही पण त्यामुळेच दिग्दर्शक बहुधा त्या शॉटच्या प्रेमात पडला असणार. तक्रार नाही पण फक्त एक निरीक्षण.

>>>>>> कट्यारीचं मनोगत अप्रस्तुत वाटतं. सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून संदेश देण्याचा अट्टहास रसभंग करतो. शेवटच्या प्रसंगात तर फारच. >>> अगदि अगदि. ते कॉम्युटर ग्राफिक्स अगदी बोगस वाटतात.

नेटवर या चित्रपटाबद्दल किती कमी माहिती उपलब्ध आहे. लोकांपर्यंत पोहोचणारं इतकं सहजसोपं माध्यम हाताशी असताना त्याचा उपयोग का करून घेतला नाही?

तसंच, मूळ नाटकात शेवटचा प्रसंग खांसाहेब आणि सदाशीव यांच्यात आहे. बहुदा कविराजही आहेत त्यात. चित्रपटात तो प्रसंग भर दरबारात घडतो आणि राजा खांसाहेबांना थंडपणे एका खुनाची परवानगी देतो. हे अतार्किक वाटतं.

विश्रामपूरचा तो टेकडीवरून घेतलेला शॉट - अर्थात कॉम्प्युटर जनरेटेड आहे >>
तो टेकडीवरचाशॉट भोरजवळील नेकलेस पॉईंटचा आहे. हा बघा.

तो टेकडीवरचाशॉट भोरजवळील नेकलेस पॉईंटचा आहे. >>> तरीच पाहिल्यासारखा वाटत होता.

सिनेमा खूप आवडला. ३ तास प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्यासारखे बसले होते. एरव्ही सिनेमात दिसणारी कव्वाली मला खूप बोअर होते. पण ह्या सिनेमातली कव्वाली अप्रतिम होती. ती कव्वाली एक नुसताच एव्हेंट न राहता महत्वाची भूमिका निभावते. सचिनचे हातवारे मधूनच कृत्रिम वाटले पण ते दुर्लक्ष करण्याजोगे आहे. त्याने खानसाहेब खूप छान उभा केला. शेवटच्या प्रसंगात तर कमाल केली त्याने. अमृता खानविलकरही आवडली. ह्या दोघांनी आपली प्रतिमा ह्या सिनेमाद्वारे उंचावर नेवून ठेवली आहे.

राजा मख्ख वाटला. तो नट जुना अभिनेता राजशेखरचा मुलगा आहे का? त्या गोर्‍या अधिकार्‍याच्या म्हणण्यापुढे त्याने मान तुकवताच लक्षात आलं की इंग्रजांचा अंमल असल्याने इंग्रज अधिकार्‍याच्या उपस्थितीत त्याला दबकूनच रहावे लागत असावे (मांडलिक प्रकरण असावे). इंग्रजांची फोडा आणि झोडा वृत्ती तो इंग्रज खानसाहेबाला रुग्णशय्येवर भेटायला येतो तेव्हा प्रातिनिधिक रुपाने दिसली. तेव्हाच जाणवलं की मिठाचा खडा पडला.

काजव्यांच्या प्रसंगानंतर उमा खाली येवून सदाशिवशी बोलते तेव्हा दिग्दर्शक सुबोध भावेंचा संयम दिसून येतो. भावोत्कटता केवळ चेहर्‍यावर सुंदररित्या दाखवली आहे. लगेच गळ्यात पडणं तर सोडाच, हातही हातात घेताना दाखवलं नाही तरीही भाव पोहोचतो.

साक्षी तन्वरने छोट्याश्या भूमिकेतही उल्लेखनीय काम केलं आहे.

खिद्रापूर मंदिरातील शूटिंग व शिव बोला भंडारी गाणंही सुरेख. सूर निरागस हो, घेई छंद..., सुरत पिया की... वगैरे झकास घेतली आहेत.

कट्यारीबद्दल काळजातले : झरीना आणि सदाशिव यांचा मेणबत्तीने दिवे उजळवतानाचा सीन अत्यंत सुरेख! प्रचंड आवडला तो सीन मला! आणि दुसरा म्हणजे उमाला सदाशिवची खात्री पटून ती खाली भेटायला येते तो सीन..काजव्यांचा स्पेशल इफेक्ट एक नंबर!

सर्वांचे सुंदर सुंदर प्रतिसाद! धागा अधिकच श्रीमंत होत असल्याचे प्रामाणिक समाधान! आभार!

बेफि अतिशय सुंदर लिहिलंयत मनातलं. चित्रपट पहायचा आहे, तुमचं लिखाण वाचून अगदी आत्ताच जावे वाटतेय.

लग्गेच जा दक्षे. डोण्ट मिस इट.

घराण्याचा अभिमान - स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, घराण्याची अस्मिता आणि मिळणारी शान-ओ-शौकत ह्यातून निर्माण झालेला दुराभिमान किंवा अहंकार हा नकारात्मक असला तरी त्यातूनही एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे. तो संदेश देणारे दृश्य पाहताना अंगावर काटा आला आणि डोळे घळाघळा वाहिले. 'माझे गायन चोरून ऐकून माझ्या घराण्याची नक्कल करणार्‍या ह्या शिष्याला मारायची मला परवानगी आहे' असे राजासमोर भर दरबारात आवेशाने जाहीर करणारे खाँसाहेब जेव्हा त्याच शिष्याचे गायन ऐकतात तेव्हा पाणी पाणी होतात. उद्ध्वस्त होऊन पुन्हा निर्माण होऊन पुन्हा द्रवू लागतात. अहंकाराची जागा विनम्रता घेते. कारण एकच, त्यांच्यातही अस्सल कलाकार असतो ज्याला स्वतःच्या प्रतिभेतूनच निर्माण झालेली स्वतःची अभिरुची घराण्याचा दुराभिमान त्यागायला प्रवृत्त करते. जेव्हा त्यांना कळते की हा एकलव्य आपल्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा त्यांच्यातला कलाकार जागा होतो आणि त्यांच्यातल्या अहंकारी माणसाला मारतो. >>>>> हा प्रसंग सचिनने फार छान मांडलाय.

तो टेकडीवरचाशॉट भोरजवळील नेकलेस पॉईंटचा आहे. हा बघा. >>> अरे वा! असा खराच आहे का पॉइंट. मग मस्तच. इतका सुरेख स्पॉट आहे की असं खरंच असेल असं वाटलंच नाही. धन्यवाद, कांदेपोहे.

खूप छान लिहिले आहे!! चित्रपट पहायची खूप खूप इच्छा आहे. इतर भारतीय प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपट परदेशातील चित्रपटगृहांमध्ये पहायला मिळत नाहीत हे खूप सलते.

बेफी, सुंदर परीक्षण! प्रतिसादही आवडले. अमेरीकेतील मोठ्या शहरात हाउस फुल शो झाले/होत आहेत. आमच्या इथे काही बघातला मिळणार नाहीये. त्यामुळे फार हळहळ आहे. वसंतरावांचे कट्यार हे मी बघितलेले पहिले संगीत नाटक त्यामुळे एकंदरीतच कट्यार बद्दल वेगळाच जिव्हाळा आहे.

हो गं दक्षिणा! पण तेव्हा हे समजायची कुवत नव्हती. बालनाट्य विभागातून तात्पुरती मिळालेली बढती हेच इतके आनंदाचे होते! पण ती गाणी मनात रुजली, गुंजत राहिली. माझ्या बाबतीत शास्त्रीय संगीताची गोडी लागण्यात कट्यारचा, वसंतरावांचा आणि अभिषेकीबुवांचा फार मोठा वाटा आहे. Happy

'कट्यार...' बघताना मुळ नाटकाशी तुलना होणे साहजिकच आहे. माझ्यामते मुळात खाँसाहेब हे पात्र खलनायक नाहीये, चित्रपटात त्याला शेवटपर्यंत खलनायकी टच दिलाय खरा.

पण नाटकातले खाँसाहेब हे एक गुणी आणि तेवढेच हट्टी मुल आहे. अमुक एक गोष्ट पाहिजे म्हटले की त्यासाठी वाट्टेल तो आटापीटा करणारं. गाणं हां त्यांचा प्राण आहे. आपल्या घराण्याबद्दल प्रचंड अभिमान. त्यांचा अहंकार स्वत:बद्दलचा नाही तर आपल्या गाण्याबद्दल, आपल्या घराण्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल आहे.

कट्यार हे निव्वळ एक रूपक आहे मानवी स्वभावाचं, परस्परातल्या नात्याचं, विश्वासाचं. कारण कट्यार ही मनाप्रमाणेच दुधारी असते, संरक्षण आणि हल्ला दोन्हीसाठी वापरता येते. नाटकातल्या कट्यारीचा उद्देशच मुळी कलाकाराच्या मनातला अहंकार नष्ट करणे हां आहे, कलाकार नष्ट करणे नव्हे. पंडितजी, उमा, झरीना, सदा, कविराज ही जर "कट्यारची..." अत्यावश्यक अंगे असतील, तर खाँसाहेब हां 'कट्यार....'चा आत्मा आहे, प्राण आहे. त्याचा अंत म्हणजे कलेचा अंत, मनस्वीतेचा अंत.

मला कधीही न आवडलेला सचिन इथे प्रचंड आवडून गेला कारण खाँसाहेबांच्या अंतरंगात दडलेलं हे लहान मुल सचिनने अगदी कसोशीने जपलय. हतबलता, अहंकार, मुजोरी, असहायता, खुनशीपणा, हट्टीपणा, मनस्वीपणा, गाण्यावरच प्रेम सगळे गुणदोष अगदी समर्थपणे दाखवलेत .

स्वर-कट्यार अक्षरश: काळजात घुसली राव....
अविस्मरणीय अनुभव !

पिळगावकरांना आजपर्यंतचे सगळे गुन्हे माझ्यापुरते तरी माफ़ (अर्थात यापुढचे माफ़ होतील असे नाही, पण आतापर्यंतचे माफ़) थोडाफार हातवाऱ्यांचा अतिरेक सोडला तर सचिनची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका !

विशाल कुलकर्णी यांच्या "कट्यार" चित्रपटाबाबतचा प्रतिसाद मला साहजिकच अपेक्षित होता आणि तो का होता ते अतिशय सुंदर अशा स्वतंत्र वाटू शकणार्‍या त्यांच्या वरील प्रतिसादात स्वच्छ उमटले आहे.

सचिनने या चित्रपटाद्वारे आपली प्रतिमा झगझगीत केली आहे असे अगदी सर्वत्रच जे मानले गेले आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे.....असेल "कट्यार" पण त्यातून प्रेमच मिळाले आहे सर्वांना.

थॅन्क्स विशाल.....

अप्रतीम, कित्येक प्रेक्षक परत पाहावा असे म्हणत आहे, ताकदीचे सन्गीत, उत्तम अभिनय, बेफिजीना +१०० अनुमोदन.

सगळ काही क्लासिक पण वगळलेल्या 'या भवनातील गीत पुराणे ' साठी चुटपूट लागून राह्यलीय .

काजव्यांच्या प्रसंगानंतर उमा खाली येवून सदाशिवशी बोलते तेव्हा दिग्दर्शक सुबोध भावेंचा संयम दिसून येतो. भावोत्कटता केवळ चेहर्‍यावर सुंदररित्या दाखवली आहे. लगेच गळ्यात पडणं तर सोडाच, हातही हातात घेताना दाखवलं नाही तरीही भाव पोहोचतो...... अश्विनी +१

खरेच हेच ह्या सिनेमाचे यश आहे... परत परत बघवा असा सिनेमा... चित्रपट गृहामधुन बाहेर पडले की एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहर्‍यावर दिसतं...

बेफी, अतिशय सुंदर लेख ...

मला माहितीये कि इथे "कट्यार.." विषयी निगेटिव्ह बोललेलं कोणालाच आवडणार नाही. तरीही सर्वांची आगाऊ माफी मागून एक शंका:

मला समहाऊ कट्यार बनवतांनाचं राजाचं स्पष्टीकरण पटलं नाही. राजाने राजगायकाच्या स्वसंरक्षणासाठी ती कट्यार बनवुन घेतली इतपर्यंत ठिक आहे. पण राजगायकाच्या/ कलाकाराच्या अहंकारावर उतारा म्हणून ती काम करेल हे राजाला आधीपासुनच माहित असणे मला तरी सरप्राईजिंग वाटले. म्हणजे नॉर्मली मला तरी इतका फार फेच्ड विचार झेपला नाही.

बाकी चित्रपट खुप आवडलेला असल्याने त्याच्याकडून खुप अपेक्षा आहेत. हाच 'प्रेम रतन धन पायो' चा धागा असता तर अशी काही शंका मनाला सुद्धा शिवली नसती. Happy

बेफि

सुरेख आणि मनातलं लिहिलं आहे..... चित्रपट अतिषय सुरेख आणि तांत्रिक द्रुष्ट्या चकचकित आहे. गाण्यांचे ध्वनी मुद्रण खुपच उजवे आहे.... अप्रतिम अनुभव. दोन वेळा पहिला.

तरुण पिढी आणि माझ्या मुलीच्या वयाची ( १४) मुलेही सिनेमा पाहुन भारावुन जात आहेत. आता सिनेमा पाहुन १० दिवस झाले तरी मुलगी त्यातलीच गाणे पहाते/ऐकते/म्हणते आहे. (परवा फोन वर तिच्या मैत्रि णीला "सुर निरागस हो" गाउन दाखवत होती ) मला वाटते की हा जो प्रयत्न झाला आहे नाटक सिनेमा स्वरुपात आजच्या पिढी पर्यन्त पोहोचवण्याचा तो १००% सफल आहे.

सिनेमा माध्यमाची ताकद जागोजागी जाणवते. राहुल देशपाण्डे, शंकर महादेवन व महेश काळे हे ह्या सिनेमाचे खरे हीरो आहेत. काय आवाज लागलाय शंकरचा "घेई छंद" म्हणताना !!!! डोळ्यात अश्रु आले घळाघळा!!!! आणि राहुल व महेश चा कव्वाली मधे!!! बापरे!!!!

गाण्याच्या चित्रिकरणात मात्र शंकर मधला खरा शास्त्रिय गायक व सचिन चा पडद्या वरचा गायक ह्यातला फरक ढळढळीत समजुन येतो. तरीही सचिन चे काम सुरेख. त्याच्या येवढी चांगली उर्दु बोलणारा मराठी नट आज तरी नाही. त्याची वेश्भुषा आणि शंकरची वेशभुषा फारच चपखल......

ता.क. : ह्या सिनेमात "नटसम्राट" चा ट्रेलर दाखवला...... नाना चा खतरा लुक आहे !!!! सिनेमा पहाणारच!!!!

Pages