फुसके बार – २० नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 12:41

फुसके बार – २० नोव्हेंबर २०१५

१) सुब्रमण्यम स्वामी नेहमीच राहूल आणि सोनिया गांधींवर बेछूट आरोप करतात. त्यातलाच अगदी ताजा म्हणजे या दोघाकंडे अडीच लाख कोटी (अडीच लाख की कोटी नव्हे) आहेत. याआधीही १) सोनिया त्यांचे जे शिक्षण झाल्याचे सांगतात ते कसे तद्दन खोटे आहे, २) राहुलच्या कोलंबियन गर्लफ्रेडचे वडील कसे ड्रग्जच्या व्यापारात आहेत व त्यांचे केजीबीशी असे संबंध आहेत, ३) याच ड्रग्जच्या व्यवहारातील लाखो डॉलर्ससह राहूलला अमेरिकेच्या विमानतळावर कसे पकडले होते व वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी त्याला कसे वाचवले, ४) सोनियांनी भारतातून स्मगल केलेल्या वस्तु त्यांची इटलीतील बहिण तिच्या छोट्याशा दुकानात विकते, असे नेक आरोप ते नेहमी करत असतात. आता गंमत अशी आहे की अशा आरोपांबद्दल राहूल वा सोनिया हे कधीही स्वामींवर बदनामीबद्दल किंवा तत्सम काहीही कारवाई करत नाहीत, ना स्वत: स्वामी या आरोपांची आणखी शहानिशा करून या जोडगोळीला गजाआड पाठवायचे मनावर घेत नाहीत. याचे गौडबंगाल काय असावे?

२) कास्ट अवे या सिनेमात विमानअपघातानंतर एका निर्जन बेटावर पोहोचलेल्या टॉम हॅंक्सची कथा किती कौशल्याने फुलवलेली आहे. एखादी कथा सिनेमाच्या अंगाने कशी फुलवायची याबाबतच्या केस-स्टडी असलेली पुस्तके आहेत का?
टॉम हॅंक्स कधी भेटला तर त्याला त्या बेटावरचे अनुभव विचारावेसे वाटेल, त्याने चेकमध्ये हेराफेरी करणा-या लिओनार्दोला कसे पकडले त्याची कथा ऐकाविशी वाटेल. खरोखरच भूमिका जगलेले आहेत असे वाटावे असे लोक आहेत हे.

३) एका राजीवने (साने) दुस-या राजीवच्या (दीक्षित) दुष्प्रचाराचा भेद करणे ही बाब लक्षणीय. उठसुट विज्ञानाचे नाव घेत पाश्चिमात्यांवर टीका करणे आणि आपल्या दैदीप्यमान संस्कृतीचे (यात पुराणातली विमानेही आलीच) दळण दळत बसणे, हाच राजीव दीक्षित यांचा निरंतर उद्योग होता. गंमत म्हणून ऐकावे म्हटले तरी वीट येतो थोड्या वेळाने. अनेक वेळा तर ते तद्दन खोटे बोलून लोकांची दिशाभूल करतात. राजीव दीक्षितांच्या या दुष्प्रचाराचा त्यावेळीच कोणी प्रभावीपणे प्रतिवाद न केल्यामुळे खूप लोक त्यांच्या या प्रचाराला बळी पडले. हे आपलेच अपयश मानले पाहिजे.

४) कोणास ठाऊक, थ्री इडियट्स सारखे काही संदेश देऊ पाहणारे, पण सवंगपणा न करणारे सिनेमेही लोकप्रिय होऊ शकतात, तर परिवर्तनवादी कविताही बटबटीत न राहता चांगल्या होऊ शकतील. तेव्हा परिवर्तनवादी कविता जर बटबटीत वाटत असतील, तर आम्ही इतकी शतके काय भोगले आहे हे तुम्हाला कसे कळणार, असे न म्हणता तो त्या कवीचा दोष समजला पाहिजे. किंबहुना दोष म्हणण्यापेक्षा त्याच्या मर्यादा समजल्या पाहिजेत. अनेकदा अशा कविता प्रचारात्मकही असतात. तेही त्यांच्या रूक्षपणाचे कारण असावे.

५) सार्वजनिक स्वच्छतेच्या नावाने सेवा करात केंद्र सरकारने ०.५ टक्क्याची वाढ केलेली अहे. कर लावूनही प्रत्यक्ष काही फरक पडत नाही, या अनुभवामुळे अशा करवाढीला विरोध होतो. मागे रेल्वेतील सुरक्षाव्यवस्था देण्यासाठी व सुधारण्यासाठी काहीवेळा दरवाढ केली. पण रेल्वेप्रवासाच्या बाबतीत काहीही सुधारणा झालेली दिसत नाही. याव्यतिरिक्त कितीतरी क्षेत्रांमध्ये अशी बेशिस्त दिसत आहे. वाहतुक व्यवस्था हे एक असे उदाहरण. स्वच्छता ठेवणे - कमीत कमी अस्वच्छता न करणे, वाहतुक नियमांचे पालन या गोष्टी तुम्ही-आम्ही करतोच. पण या नियमांची पर्वा न करणा-यांना, जे आज बहुसंख्येने आहेत, गुलाबाचे फूल देऊन सुधारण्याची अपेक्षा ठेवण्याचे दिवस गेले. नियम न पाळणा-यांच्यावर कारवाई करण्याची कोणतेच सरकार हिंमत करत नाही. कारण मग लोकप्रियता घसरण्याची धास्ती. त्यामुळे नवे कर लावूनही प्रत्यक्षात काही फरक पडत नाही.

६) आपल्याकडील एकूणच घोळ लक्षात घेता सीएफएल बल्बसारखे तंत्रज्ञान आपल्याकडे का येऊ दिले हे कोडेच आहे. वीजबचत होते हे मान्य असले तरी त्यात असलेल्या पा-यामुळे पर्यावरणावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे कोणाच्या लक्षात येत कसे नाही? आपल्याकडे निकामी झालेले असे दिवे व्यवस्थित गोळा करण्याची वेगळी यंत्रणा नसल्याने त्यातील पारा कोठे पोहोचत असेल याची काही माहिती आहे का कोणाकडे? देशाचे पर्यावरण खाते व राज्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना याबाबतीत काही माहिती आहे काय? आता १०० रूपयांना एलइडी बल्ब देत आहेत खरे, पण ही सबसिडाइझ्ड किंमत आहे. सगळीकडे या कमी किंमतीने एलइडी बल्ब विकणे शक्य नाही. त्यामुळे एलइडी दिव्यांची किंमत तातडीने सीएफएल दिव्याच्या बरोबरीने आणणे हाच त्यावरचा उपाय दिसतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिताय.
पण 'कित्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्ती' लिहिताय!
Wink