फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:37

फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५
.
१) चेन्नई व परिसरात मुसळधार पावसामुळे ७०एक बळी गेलेले आहेत. पण देशाचे तिकडे म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. मागे ओडिशामध्ये येणा-या वादळासाठी जय्यत पूर्वतयारी केल्यामुळे जवळजवळ शून्य प्राणहानी झाली होती. यावेळी तेवढी काळजी का घेण्यात आली नाही की वादळ व त्यामुळे होणा-या पावसाचा अंदाज चुकला?

२) साळीच्या लाह्या खाताना किंवा पोहे खाताना दाताखाली तांदळाचे टरफल येते तेव्हा जे अंगावर काटा आणणारे सेंसेशन येते, त्याला कोणत्या भाषेत काही नाव आहे काय?

३) माझ्या पाहण्यात ज्योतिष सांगणा-या एक आजी आहेत. त्यांना काही कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा तेथेही एक मिनिटही स्वस्थ न बसता त्यांनी तिथल्या पेशंट्सना भविष्य सांगण्यास सुरूवात केली. तेवढ्या कालावधीत त्या तेथे एवढ्या लोकप्रिय झाल्या होत्य की वाचारू नका. तिथल्या काही पेशंट्सनातरी तुम्ही येथून घरी परत जाण्याऐवजी इतरत्र जाल हे ‘सत्य’ त्यांनी सांगितले की नाही कोणास ठाउक.

४) दोन दिवसांपूर्वी कट्यारवरून अवधूत गुप्ते घसरले, त्यावरुन वाद झाल्यावर त्यांनी त्यांच्या पोस्टमधील जातीचा उल्लेख असलेला भाग काढून टाकला. तेथेच थांबावे की नाही? पण सेलिब्रिटी असल्यामुळे म्हणा किंवा झालेली चूक मोठी आहे या जाणीवेपोटी म्हणा, त्यांनी लंबेचौडे स्पष्टीकरण दिले. तेही फार हास्यास्पद झाले. “किंबहुना आडनावावरुन जात ओळखण्याच्या कलेत मला शून्य मार्क मिळतील. एकंदरित ह्या जतिपातीच्या बाबतीत मी जनरेशन नेक्स्ट आहे म्हणा हवं तर. म्हणूनच कदाचीत मला ह्या लोप पावत असल्या जातिंचं अप्रूप वाटतं. ह्यापुढे जाऊन, आंतर जातीय विवाहांमुळे आता तर विविध जातिंच्या विविध आणि गोड संस्कृतिही लोप पावू लागल्या आहेत ज्याचं मला दु:खच वाटतं.” हा त्यांच्या स्पष्टीकरणातला काही भाग जसाच्या तसा दिला आहे. लोप पावणा-या जातींचं अप्रूप वाटतं?

५) फॅनचा बिघडलेला रेग्युलेटर बदलण्यासाठी इलेक्ट्रिशियनला फोन केला. पण चालढकल करत आठवडा गेला. मग मात्र स्वत:च बदलायचे ठरवले. इलेक्ट्रिशियन लोक ब-याचदा विद्युतप्रवाह चालू असतानाच काम करतात. मला हिरोगिरी करायची नसल्यामुळे मेन्स आणि इनव्हर्टर दोन्ही बंद केले. बदलून झाल्यावर हायसे वाटले. ते करताना अंकल पॉजरच्या गोष्टीची आठवण (बाकीच्यांना) आली. माझे ध्येय निश्चित असल्यामुळे मी त्या टोमण्यांकडे लक्ष दिले नाही. कोणतेही काम प्रथम करेपर्यंत आपल्या आवाक्यातले नसते असे वाटते. काम झाल्यावर गरज नसतानाही पाच मिनिटे फॅन चालू ठेवला. प्रयत्नांचे फळ नव्हे, तरी वारे घेण्यासाठी.

६) मागे एकदा हार्डवेअरच्या दुकानात गेलो असता एकजण तणतणत आला. अहो, दोन दिवस झाले इलेक्ट्रिशियनला पाठवले नाहीत. लगेच पाठवतो, असे आश्वासन देऊन दुकानदाराने त्याची बोळवण केली. त्याची पाठ फिरली तसे मला म्हणाला, काय लोक असतात हे आयटीवाले, घरातला बल्ब गेला तर तो बदलायला इलेक्ट्रिशियनला बोलवतात.

७) पुणे मुंबई महामार्गावर या पावसाळ्यात एका गाडीवर दरड पडून काहीजण मरण पावले होते. नुकतेच पुण्याजवळच्या डुक्करखिंडीत एका बसने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे समोरून येणा-या दोन दुचाकींवरील लोकांना उडवले. हे सगळे गुन्हे या रस्त्यांची देखभाल करणा-यांच्या नावावर नोंदवले हवेत. या अपघातांमध्ये मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना याची कल्पना नसल्यामुळे हे गुन्हेगार नामानिराळे राहतात आणि पुन:पुन्हा असे गुन्हे घडतात.

८) परळी वैजनाथला गोपालकृष्ण नावाचे नवीन नाट्यगृह चालू झाले तेव्हा कितीतरी आठवडे समोरच्या रांगांसाठी तिकिटाचे दर कमी तर मागच्या रांगांना दर अधिक असा प्रकार चालू होता. कारण त्या मालकाचे पूर्वी सिनेमाचे थिएटर होत म्हणे. या कारणामुळे नव्हे, पण पुढे ते नाट्यगृह नंतर बंद पडल्याचे ऐकले.

९) आणि आता एका धन्य सिनेमाचा व्हॉट्सअपवर आलेला फॉरवर्डेड मेसेज
प्रेम रतन धन पायो
बहुत सारा धन पायो
हद से ज्यादा धन पायो
पर आप इतना धन नही पायो
इस लिये देखने मत जायो
सलमान खान को एक रोल में सह नहीं पायो
इस में तो वो डबल रोल मे आयो
सोनम कपूर को राजकुमारी के रूप मे दिखायो
राज घराने में iPhone/iPad चलायो
खूब सारी लग्जरी कारे दिखायो
फालतू की सजावट करवायो
हर किसी से इंग्लिश बुलवायो
देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो
अनुपम खेर एक्टिंग के बारा बजायो
थर्ड क्लास म्युझिक बजवायो
फालतू डायलॉग्स बुलवायो
हम तो गलती से देख आयो
कह रहे हैं मत जायो
कह रहे हैं मत जायो।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Lol

आठवड्याला एक फुसका बार हे प्रमाण चालेल __/\__

जास्तच मसालेदार खुसखुशीत तेलकट रोज खाल्लं की अजीर्ण होतं Wink

मी इतर व्यासपीठांवर फुसके बार हे सदर गेल्या आठवड्यापासून दररोज लिहायला सुरूवात केली आहे. ते सारे एकत्र करून आठवड्यातून एकदाच येथे टाकायचे म्हटले तर ते फार मोठे होईल. त्यामुळे तूर्त तरी ते रोज टाकेन.
धन्यवाद.