फुसके बार – १५ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:27

फुसके बार – १५ नोव्हेंबर २०१५
.

१) चला हवा येऊ द्या वाले निलेश साबळे यांच्याशी काही बोलणेच अवघड झाले आहे असे म्हणतात. त्यांच्याशी काहीही बोलले तर ते एकतर ‘क्या बात है सर’ किंवा ‘वा सर वा’ असे म्हणतात म्हणे. त्यामुळे त्यांच्याशी पुढे बोलताच येत नाही.

२) टीव्हीवर लागलेल्या रेगे सिनेमाचा शेवट पाहताना प्रत्येक वेळी आता तरी रेगेला मारणार नाहीत अशी आशा वाटते.

३) एबीपी माझावरील ‘१०च्या बातम्या’ या कार्यक्रमाच्या जाहिरातीत तरूण नवरा-बायको १०च्या बातम्या पाहण्यासाठी सगळी कामे सोडून हातावर (आपापल्या) हात ठेवून शेजारी बसलेले पाहून फार मौज वाटते.

४) ‘गांधींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण चुकीचे, नथुराम गोडसे खुनीचं’ असे संघाचे नेते मा. गो. वैद्य म्हणाले, तरी त्यांच्यावर विश्वास का ठेवावा असे विचारणारे भेटतील. कारण का, तर वैद्य हे संघाचे माजी नेते आहेत.

५) नागपूरमध्ये काही भागांमध्ये स्त्रियांना रस्त्यावरून चालणेही अशक्य झाले आहे. पुण्यातले गुंड दुचाकीवरून जाताना केवळ मंगळसुत्र वा सोन्याची साखळी चोरण्याइतपत सभ्य आहेत. नागपुरातले गुंड दुचाकीवरून महिलांच्या छातीला हात घालण्याचे शौर्य दाखवत आहेत असे एबीपीमाझावर दाखवत आहेत.

६) गायक-गायिकेच्या नावाने असलेले पुरस्कार संगीतकारांना प्रदान करणे हा संगीतकाराचा अपमान होत नाही का? अखेर चाल लावणे, गायक/गायिकेच्या आवाजाचा कौशल्याने वापर करून घेणे हे संगीतकारच करत असतो. तेव्हा हे थोडे मुलाच्या नावाचा पुरस्कार आई-बापांना देण्यासारखे नाही वाटत?

७) पंजाबात केस रंगवण्याच्या डायचा खप अचानक वाढला. कंपन्यांकडे नेहमीपेक्षा कितीतरी पट अधिक मागणी नोंदवली गेली. या मागणीच्या मुळाशी गेले असता कंपनीच्या अधिका-यांना धक्का बसला. हा डाय म्हशी रंगवण्यासाठी वापरला जात असल्याचे त्यांना आढळले. कारण म्हशी विकण्याच्या बाजारात काळ्या-कुळकुळीत म्हशीला जास्त भाव मिळतो. बाकी त्याचा म्हशीच्या व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम गेला तेल, नव्हे डाय लावत.

८) चित्रपटसंगीतकार अवधुत गुप्ते कट्यार पाहिल्यावर इतके भारावले की त्याचे कौतुक करताना ते म्हणाले की हे फक्त भावे व पुणेकरच करू शकतात. आणखी पुढे जाऊन त्यांनी लिहिले, की जात न मानणा-यांनी या चित्रपटाचा केवळ रिमेक करून दाखवावा. टिळक किंवा कट्यार करायला केवळ भावेच लागतात. आता यात जातीचा कोठे संबंध आला हे गुप्तेसाहेबांनाच माहित. यावरून वाद उद्भवल्यानंतर मात्र गुप्ते यांनी जातीसंबंधीचा परिच्छेद बदलला. एकूण गुप्ते कट्यारीवरून घसरले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy