मात

Submitted by कवठीचाफा on 6 November, 2015 - 06:24

" दिन्या पटकन सांग रे जेम्स बाँडचा लेखक कोण ? " शब्दकोडं सोडवता सोडवता कमलेशनं मागं वळून न पाहता विचारलं.

" मलाही नांव आठवत नाहीये रे ! पण एकच मिनिट, जय गूगल बाबा, घे इयान फ्लेमिंग " दिनेशनं मांडीवरच्या लॅपटॉपला डिवचलं.

" दिन्या लेका , कधीतरी डोकं चालव रे, उठसूठ गूगल काय ? " कमलेश वैतागून म्हणाला, या शब्दकोड्याचं वेड असलेल्या माणसांचं असंच असतं, स्व:तला उत्तर येत नसेल तर एकवेळ दुसर्‍याला विचारतील, पण गूगल करू , कुठे पुस्तकात पाहू म्हटलं की चिडतात ते.

" कशाला डोकं चालवायचं ? इथे टेक्नॉलॉजी हात जोडून उभी असताना आपण कष्ट करणं म्हणजे दरिद्रीपणाचं लक्षण आहे " दिनेशचं मुरब्बी उत्तर.

" उगीच विचारलं तुला.. " हात झटकत कमलेशनं म्हणाला

खोलीत काही काळ शांतता पसरली, अधेमधे नोटिफिकेशनचा थोडाफार आवाज येत राहिला तेवढाच.

दिनेश आणि कमलेश दोघेही दोन वेगवेगळ्या प्रांतातले, म्हणजे कामाच्या संदर्भातले प्रांत. दिनेश मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह तर कमलेश बँकेत ऑडिट डिपार्टमेंटला. रोटीसाठी माती सोडावी लागलेले दोघे या भाड्याच्या रूममुळे एकत्र आले आणि घट्ट मित्र झाले.

कमलेश तसा थोडा अबोल स्वभावाचा, सतत आकड्यांमध्ये बुडालेला असल्यानं थोडा अरसिक वगैरे वाटावा असा, पण काटेकोर कधीही बँकेतलं काम त्यानं घरी आणल्याचं दिनेशला आठवतं नव्हतं मोकळ्या वेळात शब्दकोडी सोडवणे हा त्याचा छंद .

दिनेश व्यवसायाला अनुरूप असा बोलका, नेटका अगदी समोरच्यावर छाप पडेल असा. कुठला विषय त्याला गप्पा मारायला वर्ज्य नसायचा सगळ्यातलीच माहिती असायची त्याच्याकडे, त्याचं साधं कारण म्हणजे तो पक्का नेटसॅव्ही होता थोडक्यात म्हणजे गूगलपंडीत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गूगलकडे असतं हे त्याचं ठाम मत, कमलेश वैतागायचा तो यालाच

या वरून दोघांचे वादही झाले होते.

" दिन्या अरे तुझ्यामाझ्यासारखंच कुणीतरी तिथे लिहितं अपलोड करतं म्हणून त्याच्याकडे माहिती असते, ती अचुकच असते असं नाही रे आणि जगात इतक्या गोष्टी आहेत सगळंच काही तिथे कुणी लिहीत नसतं काही "

" कॅम्स, कित्येक कोटी लोक आहेत रे जगात, प्रत्येकजण आपापल्या परीनं भर घालतोच की, लोकांसाठी म्हण स्व:त साठी म्हण, काहीना काही कारणानं माहिती येतेच रे इंटरनेटवर "

" पण समज तिकडे उत्तर धृवावर कुण्या एका जमातीकडे काही माहिती, सोड अगदी संजीवनी वनस्पती असली तरी त्यांच्याकडे आवश्यक शिक्षण आणि साधनंच नसल्यानं ती माहिती गूगलवर उपलब्ध होणारे का ? "

" पण तशी माहिती नाही मिळाली आपल्याला तर काही बिघडणार तरी आहे का ? सो, जे उपलब्ध आहे ते सगळे यात आहे, आणि जे नाही त्याबद्दल हू केअर्स ? " दिनेश लॅपटॉपवर टिचकी मारत म्हणायचा

बर्‍याच वेळा कमलेश निरुत्तर होऊन हा वाद संपायचा.

आजही असाच काहीसा वाद होण्याच्या बेतात होता पण त्या शांततेचा भंग मोबाइलच्या किणकिणीन झाला. कुणाचाही फोन वाजो सहज प्रतिक्रियेनं माणूस आपला फोन चाचपडतोच तसाच दिनेशनही फोनला हात लावला तोवर कमलेशनं त्याचा फोन कानाला लावलाही होता.

एकूणच संवादावरून कमलेशच्या बँकेतून फोन असल्याचं आणि त्यामुळे तो वैतागल्याचं स्पष्ट दिसत होतं.

" च्यायला व्यापच आहे " फोन जवळपास आदळतच कमलेश पुटपुटला

" का रे ? आज लवकर बोलावलं वाटतं ? "

" छे रे, तिकडे गडचिरोलीच्या कुठल्यातरी कोपर्‍यातल्या खेड्यात आमची एक नवीनच झालेली ब्रँच आहे म्हणे, तिकडे ऑडिट होणार आहे, त्यांची तयारी कितपत आहे हे पाहण्याचं काम आहे, मीच तिकडे जावं अश्या थेट ऑर्डर्स आल्यात "

" अरे मग जा की ! तेवढाच चेंज " दिनेश उगीचच बरळला

" अरे पण माझं इथलं कामही पूर्णं झालं नाहीये वर तिकडे कुठल्या आडगावी जाऊन महिनाभर राहणं म्हणजे वैताग नाही का ? "

" ते साहजिकच आहे की, तिकडे ऐष असती तर तुझ्याऐवजी दुसर्‍या कुणीतरी आपला नंबर लावला नसता का ? वर तुझ्यासारखा शिष्ट महिनाभर बँकेत नसल्याचाही आनंद लोकांना मिळू दे की " दिनेशनं दात विचकले

" हे बघ शिष्ट बिष्ट नाहीये मी, फक्त काटेकोर नियमात राहून काम करणं काही लोकांना जमत नाही म्हणून मला ही पदवी दिलेय त्यांनी "

" बरं कधी निघणारेस ? "

" उद्या सकाळीच जा म्हणतायत "

" ओके, मग जा की, टेक केअर " आपली निघायची वेळ झाल्याचं लक्षात आल्यानं दिनेश उठत म्हणाला.

*******

बेडवर पसार्‍यात बसूनच दिनेश लॅपटॉपमध्ये गर्क झालेला होता. आज रविवार असल्यानं तशीही काही गडबड नव्हती वर गेले पंधरा दिवस कमलेशही घरी नसल्यानं पसार्‍याबद्द्ल बोलणारंही कुणी नव्हतं त्यामुळे थोडा सुस्तावलेलाच होता. फोनच्या रिंगनं त्याची तंद्री भंगली. स्क्रीनवर कमलेशचं नाव पाहताच दिनेशनं उत्साहानं फोन कानाला लावला,

" कॅम्स, अरे इतका कसला बिझी रे तू ? एक रिंग तरी करायची ना ! "

" दिनेश, इथे मोठा प्रॉब्लेम झालाय फोनवर सांगता येणार नाही तू इकडे येतोस ? " कमलेशच्या खोल गेलेल्या आवाजानं दिनेशच्या काळजात धस्स झालं, आज पहिल्यांदाच त्यानं दिनेशचं नांव पूर्णं उच्चारलं होतं.

" काय झालं कमलेश ? एनीथींग सीरियस ? "

" खूपच, मलाच काही कळेनासं झालंय तू प्लीज इकडे ये, फोनवर नाहीच सांगता येणार "

" ओके निघतोच, मला जरा पत्ता नीट सांग " कमलेश कडून पत्ता घेऊन दिनेशनं फोन ठेवला आणि घाईघाईनं आपली बॅग भरली, निघता निघता काही क्षण विचार करून आपली मेडिसिन सँपलची बॅगही सोबत घेतली, न जाणो काही हेल्थ इश्यू असला तर ?

*******

" मला जरा नीट सांगतोस का पाहिल्यापासून ? " दिनेशनं समोर बसलेल्या आणि आता वर्षानुवर्ष आजारी असल्यासारखा दिसणार्‍या कमलेशला विचारलं.

कमलेशनं सांगितलेली माहिती त्याच्याच शब्दात सांगायची तर अशी ..

" या सगळ्याची सुरुवात मी आल्याच्या दुसर्‍याच दिवशी झाली, कागदपत्र तपासताना मला बँकेतले काही व्यवहार संशयास्पद वाटायला लागले, काही व्यक्तींना कसलेली तारण न ठेवता कर्जे दिली गेल्याचे स्पष्ट दिसत होतं. कर्मचार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनीही काही थातुरमातुर कारणं दिली त्यामुळे माझा संशय आणखी बळावला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होतं.

मी त्या प्रत्येक संशयास्पद कर्जधारकांना बँकेत उपस्थित करण्याची मागणी केली, वास्तविक हा माझ्या कामाचा भाग नाही पण या व्यक्ती खरंच अस्तित्वात आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची होती. त्याच दिवशी संध्याकाळी मला त्या ब्रँचचे मॅनेजर भेटले आणि त्यांनी मी हा हट्ट सोडावा म्हणून समजूत घालायचा प्रयत्न केला, पण मी तो धुडकावला आणि त्यांना कर्जदारांना हजर करण्याची सूचना दिली "

" दुसर्‍या दिवशी साधारणता बारा साडेबाराच्या आसपास माझ्या टेबलासमोर एक काळाकभिन्न माणूस येऊन उभा राहिला. मान वर करून मी त्याच्याकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. काळ्याभिन्न शरीरावर गुढघ्यापर्यंत असणारं मळकट धोतर सोडलं तर तो उघडाच होता, गळ्यात रंगीबेरंगी माळा, जागोजाग ओढलेले पांढरे राखेचे पट्टे यांनी तो आणखी भयानक वाटत होता. जोडीला त्याचे ते नशेत असल्यासारखे लालभडक डोळे.. अंगाला कंप सुटला माझ्या "

" तुमीच बोलावलं जनू ? " पत्र्यावर दगड घासावा तसा खरखरीत आवाज होता त्याचा. त्याची चौकशी केल्यावर कळलं की ज्या कळ्ळूर म्हणून इसमाला बँकेनं एक लाखाचं कर्ज दिलंय तो हाच. मी मॅनेजरना बोलावलं काही विचारायचं तर होतंच पण सोबत कुणीतरी असलं तर सुरक्षित वाटेल म्हणूनही

" सर, तुम्ही या व्यक्तीला कर्ज देताना याची परतफेड होईल अशी अपेक्षा तरी कशी ठेवली ? "

" जाऊ दे हो शिगवण परतफेड होईल "

" पण कशी ? तारण तर काही दिसत नाही आणि याच्याकडे पाहून वाटतंही नाही तसं वर मुदत संपून कित्येक दिवस होऊन गेलेयत " यावर मॅनेजर निःशब्द झाले

" माझं ऐका आणि आत्ताच्या आत्ता परतफेडीसाठी याला नोटीस पाठवा, जप्ती आणा, ही अशी केस ऑडीटरना सापडली तर काही खरं नाही " माझं सगळं बोलणं कळ्ळूर लक्षपूर्वक ऐकत होता

" साब, पैसा न्हाई माझ्याकडं " त्यानं उत्तर दिलं

" घ्या सर, आता काय करणार आहात ? " मी मॅनेजरना विचारलं

" कळ्ळूरला पैसा परत कदी कुनी इचारला न्हाय आजपर्यंत " तो गुर्मीतच म्हणाला

यावर कधी नव्हे तो माझा तोल गेला, कदाचित त्याच्या दिसण्यानं आधीच माझं मत वाईट झालं असल्यानं असेल पण खूप वाद झाले अगदी पराकोटीचे, मॅनेजरशी आणि कळ्ळूरशीही. शेवटी मॅनेजरनं त्याच्यावर नोटीस बजावण्याची तयारी दाखवली.

" याचा परिनाम बरा व्हनार नाय " माझ्याकडं जाळून टाकणार्‍या नजरेनं पहात कळ्ळूर म्हणाला आणि निघूनही गेला.

" माझं ऐका शिगवण, अजून वेळ नाही गेली तुम्ही त्याची माफी मागून टाका, ही माणसं धड नव्हेत " मॅनेजर समजावत होते, पण मी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतोच नाहीतर माझ्या हे ही लक्षात आलं असतं की कळ्ळूर बँकेत आल्या आल्या बँकेतले कर्मचारी एक एक करून बाहेर सटकले होते.

" सगळ्या प्रकरणाला सुरुवात तिथूनच झाली "

" एक दोन दिवस असेच तंग वातावरणात गेले, बँकेतला प्रत्येक माणूस माझ्याकडं विचित्र नजरेनं पहात होता, विनाकारण बँकेत येणार्‍यांची संख्याही वाढल्यासारखी झाली होती, आणि एका रात्री ते घडलं. "

" मी दिवसभराचा थकून शांत झोपलो होतो, कदाचित जास्तच गाढ. कुणीतरी हिसका दिल्यानं मला जाग आली. डोळे उघडताक्षणीच डोक्यावरचं काळकुट्ट आभाळ पाहून मी माझ्या बिछान्यात नसल्याची मला जाणीव झाली, दचकूनच मी उठून बसलो. समोर कुठेतरी एक पलिता पेटत होता आणि त्याच्या हालत्या उजेडात मला एक एक गोष्टीचा अंदाज यायला लागला.

मोकळं माळरान असावं ते, आजूबाजूला दाट झाडी असल्याचा अंदाज येत होता, मध्ये मध्ये पांढर्‍या रंगात रंगवलेल्या दगडांचे अभद्र आकार दिसत होते, नक्की कुठे होतो मी ?

बाजूला होणार्‍या आवाजानं माझं लक्ष तिकडे गेलं, एक काळी आकृती जमिनीवर वाकून काहीतरी करत होती, डोळ्यावर ताण देऊन पाहताच लक्षात आलं की तो कळ्ळूर होता. त्याच्या अंगावर लंगोटीखेरीज काहीही वस्त्र नव्हतं आणि तो जमिनीतून काहीतरी उकरून काढत होता, त्याच्याच अगम्य पुटपुटीच्य आवाजानं माझं तिकडे लक्ष गेलं होतं.

अखेरीस तो जे शोधत होता ते त्याला मिळालं असावं, हातात कसलीशी गुंडाळी घेऊन तो माझ्याच कडे येत होता. माझ्याकडे पहात आपले पांढरेशुभ्र दात विचकत तो हसला आणि हातातली गुंडाळी त्यानं पुढे केली. त्याच्याकडे पाहताच माझ्या मणक्यातून एक शिराशिरी गेली. कळ्ळूरच्या हातात एका कपड्यात गुंडाळलेलं एका नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाचं कलेवर होतं. निस्तेज पांढरा पडलेला चेहरा, अर्धवट उघडे असलेले डोळे, मी ते नीट पाहिलं असल्याची खात्री झाल्यावर तो ते कलेवर घेऊन माझ्या समोरच मांडी घालून बसला तोंडानं पुन्हा काहीसं अगम्य बडबडत त्यानं त्याच्यावर राखेचे पट्टे ओढायला सुरुवात केली, आधीच निर्जीव असल्यानं पांढुरकं दिसणारं ते आणखी भयावह दिसायला लागलं. बराच वेळ त्याचं हेच चालू होतं शेवटी त्यानं बाजूला ठेवलेल्या बाटलीतलं कसलंस द्रव त्याच्या ओठांना लावलं आणि माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते आठवून आजही माझा थरकाप उडतोय, त्या अर्भकानं डोळे उघडले, मघाशी अर्धवट उघड्या डोळ्यांतून दिसणारा बुबूळांचा काळेपणा पार नाहीसा झालेला होती, आणि त्याजागी दिसत होती शुभ्र पांढरी बुबूळं, त्यातच त्यानं तोंड उघडलं काहीच क्षण असेल, पण तेवढ्यात मला त्याच्या तोंडातले अणकुचीदार सुळे दिसले. त्याकडे पाहून कळ्ळूर समाधानानं हसला आणि त्यानं त्या कलेवराचं तोंड माझ्या जवळ आणलं, अगदी जवळ , त्याच्या नाकाचा मला स्पर्श होईल इतक्या जवळ, जणू एखाद्या शिकारी कुत्र्याला एखाद्याचा वास द्यावा त्या प्रकारे. मला ढवळून आलं आणि पुन्हा माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली.

डोळ्यावर प्रकाश पडल्यानं मला जाग आली, रात्रीचा प्रकार अजूनही विस्मरणात नव्हता, इतकं झाल्यावर मला झोप तरी कशी आली ?

घाबरत घाबरतंच डोळे उघडले आणि पाहतो तर मी माझ्याच खोलीत माझ्याच बिछान्यावर होतो, मग मी जे पाहिलं ते काय होतं ? स्वप्न ?

धडपडतच उठलो मी, अंगाला अजूनही काही मातीचे कण चिकटले होते, म्हणजे नक्कीच मी रात्री तिथे होतो. कुणी नेलं मला तिथे ? कळ्ळूर हेच एक उत्तर असू शकत होतं त्याचं. या जंगलातल्या माझ्यासाठी परक्या गावी हे असं करणं त्याला सहज शक्य झालं असावं.

कसं बस आवरून मी बँकेत गेलो, तिथला प्रत्येकजण माझ्याकडे घाबरल्या नजरेनं पहात होता. दुपारपर्यंत कसाबसा वेळ सरकला आणि न राहवून तिथल्या एका कारकुनाला मी विचारलं

" गोसावी, सगळे आज मला असे का टाळतायत ? "

" क.. काही नाही साहेब " तो चाचरला

" नक्कीच काहीतरी आहे, आता तुम्हीही दचकलात की "

" साहेब तुम्ही त्या कळ्ळूरशी वाद घालायला नको होतात " कळ्ळूरचं नांव घेताच पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवून मणक्यातून एक थंड लहर निघून गेली.

" का ? कळ्ळूरला घाबरण्यासारखं काय आहे ? " मी उसन्या अवसानांत म्हणालो

" तो मांत्रिक आहे साहेब, फार वाईट नांव आहे त्याचं इथे, जारण मारण हा त्याच्या डाव्या हातचा मळ आहे आणि स्वभावानं फार खुनशी आहे तो, एका विडीसाठी त्यानं एकाला रक्त ओकून मरायला लावल्याची आठवण सांगतात गाववाले " गोसावीच्या आवाजात कंप होता

" ह्म्म, पण त्यानं नियम मोडला "

" ते आम्हाला आधीपासून माहीत आहे साहेब, पण त्याच्या वाटेला जाण्याचं धाडस कुणाच्याही अंगात नाही, आज तुम्ही ते केलंत आणि अभद्राला आमंत्रण दिलंत "

" असं काही नसतं रे "

" साहेब, सकाळी उठल्यापासून तुम्ही आरशात पाहिलंत का ? "

" थोडा उशीरच झाला मला, त्यामुळे निरखून वगैरे नाही पाहिलं पण का ? "

" साहेब तुमच्या मानेवर एक वण आहे कापल्यासारखा, ही त्याची निशाणी आहे जिवाला जपा साहेब " इतकं बोलून तो जवळपास धावतंच तिथून निघून गेला.

तो गेल्यावर मी बाथरूममध्ये जाऊन आरशात निरखून पाहिलं, माझ्या मानेवर हा या कानापासून ते त्या कानापर्यंत कापल्यासारखा लाल व्रण उमटलेला आहे, इथल्या लोकांच्या मते ही कळ्ळूरच्या बळीची निशाणी आहे "

श्वास घेण्यासाठी कमलेश थांबला.

" अरे, ही अशी खेड्यातली लोकं भित्रीच असतात रे, असा खुणा बिणा करून कुणी बळी घेतं का ? " दिनेशनं समजूत काढायचा प्रयत्न केला.

" नाही, माझी कहाणी अजून संपली नाही " दिनेशला थांबवत कमलेश पुढे बोलता झाला

" दोनच दिवसांत मला एक भयानक अनुभव परत आला "

" त्या रात्री मी फार मुश्किलीनं झोपलो होतो, कसल्याश्या आवाजानं मला जाग आली, काळोखात कसल्याश्या चीत्कारांचा आवाज येत होता. मला आठवलं मी राहतो त्या घराच्या मोरीत घुशीनं उकीर काढलाय, तिथून तिचं घरात येणं जाणं चालू असतं, तीच आता घरात आली असावी असं समजून मी लाइट लावण्यासाठी धडपडून उठलो आणि समोरच्या कोपर्‍यात मला ते दिसलं.

क्षणभर एखादं गाठोडं पडलेलं असावं असं वाटलं पण अशी गाठोडी वगैरे बांधून कपडे ठेवायची सवय मला नाही. इतकं कळेस्तोवर ते हाललं आणि पुन्हा चीत्कारांचा आवाज तीव्र झाला. माझ्या हातपायातले त्राण जणू निघून गेले आणि मी तसाच मंत्रवाल्यासारखं तिथे बसून राहिलो.

थोड्यावेळात आवाज शांत झाले आणि समोर जे काही होतं ते ही दिसेनासं झालं. मी झटक्यात लाइट लावला आणि समोर जे पाहिलं त्यानं मला भोवळ आली, माझ्या खोलीच्या त्या कोपर्‍यात एक घूस अक्षरशः चिंध्या व्हाव्यात तशी मरून पडलेली, तिच्या अंगातल्या रक्तानं सगळी जमीन भरलेली होती, आणि आजूबाजूला कळपट रंगाची माती पसरलेली स्पष्ट दिसत होती त्यातून काहीतरी ओढत न्यावं अश्या खुणा... देवा रे ! मला एका झटक्यात त्या रात्रीचा प्रसंग आठवला. नक्की त्या कळ्ळूरनं काहीतरी जागवलं. मग आज रात्री ते माझा बळी घ्यायला आलेलं का ? आणि कुतूहल म्हणून त्याच्याकडे धावलेल्या त्या प्राण्याचा त्यात बळी गेला ?

सकाळ होई पर्यंत मी सुन्न बसून राहिलो.

तो व्रण उमटल्यापासून बँकेतही सगळे फार तुटक वागयला लागलेयत, त्यामुळे त्यांच्यातल्या कुणाकडून कसली मदत होईल अशी अपेक्षाच नव्हती. ज्या ठिकाणी खानावळ लावली होती त्यांनीही काहीही कारण न देता मला त्यांच्याकडे येऊ नये असं सांगून टाकलं, मी मग मिळेल तिथे चहा आणि बिस्किटांवर राहायला सुरुवात केली. माझ्या एकटेपणात सोबत म्हणून गावातलं एक मरतुकडं कुत्रं उरलेल्या बिस्किटांच्या आशेवर माझ्या पायात घुटमळायचं तेवढंच.

दोन दिवसांनंतरच्या रात्री ते ही तसंच चिंध्या झालेल्या अवस्थेत माझ्याच घरासमोर सापडलं, तश्याच मातीच्या खुणा त्याच्याही भोवती दिसत होत्या. माझ्यावरच्या संकटाला आपणहून समोर जाऊन त्यानं त्याचा जीव हकनाक घालवला असेल का ?

बस्स, आता येत्या आमावस्येला माझी पाळी, तसंच सांगून गेलाय तो " असं म्हणून कमलेश हुंदके देत रडायलाच लागला.

**

" कमल शांत हो, हे असं काही नसेल जारण मारण हा प्रकार आता अस्तित्वात तरी आहे का ? "

" मी अनुभव घेतलाय दिनेश "

" मान्य, पण ते कदाचित भास असतील "

" अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय हा सगळा प्रकार, आणि हा हा गळ्यावरचा व्रण ? की हा ही मनाचे खेळ अं ? " कमलेशच्या मानेवर तसा एक वण दिसत होता खरा.

" बरं ठीक आहे, आपण यातून काहीतरी मार्ग काढू, तू आधी काहीतरी खाऊन घे " असं म्हणत दिनेशनं बॅग उघडली त्यातून प्रवासात असावं म्हणून घेतलेली दोन सफरचंद आणि वेफर्सचं पाकीट काढून त्याला दिलं. हताश अवस्थेत कमलेशनं खायला सुरुवात केली.

" कमल, आपण एक काम करू इथून ताबडतोब मुंबईला जाऊ जर तू म्हणतोस तसं जरी असेल तरी त्यातले जाणकार तिथे मिळतीलच की "

" तुला वाटतंय मी असं केलं नसेल ? दोन वेळा मी मुंबईला जाण्यासाठी निघालो होतो, एकदा तर एस.टी.तही बसलो होतो पण प्रत्येक वेळी मला `ते' दिसलं एस.टी.त अगदी माझ्या शेजारच्या सीटवर पडून ते माझ्याकडं आपल्या पांढर्‍याशुभ्र डोळ्यानं पाहतं होतं " आठवणीनंही कमलेशच्या अंगाला कंप सुटला

" मग ? "

" जीव घेऊन मी खाली उतरलो तर समोर कळ्ळूर माझ्याकडे पहात अघोरी हसत होता, नाही रे ! या गावच्या बाहेरही मी पडू शकत नाहीये आता "

एव्हाना बाहेर सूर्यही अस्ताला निघालेला. वाढत्या अंधारासोबत कमलेशची तगमगही वाढतच चाललेली. कशीबशी त्याची समजूत काढून दिनेशनं आपल्या मेडिकल बॅगमधून एक सिडेटिव्ह काढून त्याला दिली. कमीतकमी झोप तरी चांगली लागू दे. गोळीनं आपला परिणाम लगेचच दाखवला, कमलेशला शांत झोप लागली. दिनेशनंही त्या घरात सापडतील ती पांघरुणं गोळा करून कमलेशच्या बाजेशेजारी खाली जमिनीवरच त्यानं आपल्यासाठी बिछाना तयार केला. प्रवासाची ताण येतो, शरीर थकतंच माणसाचं दिनेशला कधी झोप लागली ते त्यालाही कळलं नाही.

किती वेळ गेला कुणास ठाऊक ? कसल्यातरी आवाजानं दिनेशला जाग आली. बाजेवरून आलेली कमलेशची दबक्या आवाजातली किंचाळी होती ती. धडपडून दिनेश उठला, आणि त्याच्याकडे पाहायला लागला, कमलेशचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं, तो पांढर्‍याफटक चेहर्‍यानं खोलीच्या एका कोपर्‍याकडे पहात होता जणू काही तिथे काहीतरी भयानक चाललं असावं. दिनेशनं त्याच्या नजरेच्या रोखानं उगीचच डोळे ताणून पाहिलं, खरंतर त्याची गरजच नव्हती कारण खोलीतले लाइट चालूच असल्यानं खोली लख्ख प्रकाशानं उजळलेली होती. त्या दोघांशिवाय तिथे कुणीच नव्हतं, साफ रिकामी होती ती खोली.

" कमल काय झालं ? असा का थंड पडलायस ? " त्याचा खांदा धरून हालवत दिनेशनं विचारलं

" त.. `ते' ते बघ त्या कोपर्‍यात, ते पांढर्‍याशुभ्र डोळ्यांनी माझ्याकडेच
पाहतंय "
" कमल, अरे काही नाहीये तिथे "

" तुला.. तुला दिसत नाहीये ते ? ते बघ दात विचकून दाखवतंय मला, देवा रे त्या इवल्याश्या चेहर्‍यावर ते सुळे.... "

" कमल शांत हो, जाईल ते आपोआप माझ्याकडं बघ पाहू " त्यानं बळजबरीनंच कमलेशचा चेहरा फिरवला.

थोड्याच वेळात तो शांत झाला खरा, पण आता दिनेशची झोप उडाली होती. कमलची अवस्था पाहून तो ही काळजीत पडला होता. यावर इलाज एकच होता ज्यानं हे सगळं घडवून आणलं त्या कळ्ळूरची भेट घेणे.

उजाडताच दिनेश त्याच कामासाठी बाहेर पडला. गाव तसं लहानच होतं त्यामुळे खरं तर कळ्ळूर सापडणं कठीण जायला नको होतं पण त्याच्यासारख्या कुख्यात व्यक्तीचा धाकच इतका होता की कुणीच दिनेशशी त्याच्याबद्दल बोलेना, दुपार उलटली तरी हाताला काहीच लागलं नाही. शेवटी थकून मिळेल त्या दुकानातून दोन तीन दिवस पुरतील असे काही खाद्यपदार्थ आणि थोडीफार फळं घेऊन तो घरी परतला. कमलेश त्याचीच वाट पहात होता

" कुठे गेला होतास ? काही मार्ग सापडतोय का ? की मी असाच.. " हुंदका फुटला त्याचा

" रिलॅक्स कमल, मी या सगळ्याच्या मागे असलेल्या माणसाला, त्या कळ्ळूरला शोधत होतो, पण साला.. त्याची इतकी वचक आहे लोकांवर की कुणी त्याचा पत्ता सांगेना "

" तू त्याला कशाला शोधत होतास ? फार भयानक माणूस आहे तो "

" हे बघ, साधी गोष्ट आहे, जर त्यानं हे सुरू केलं असेल तर हे थांबवायचं कसं हेही त्याला नक्कीच ठाऊक असणार, आपण त्याची माफी मागू, वाटल्यास पैसेही ऑफर करू आणि हे प्रकरण थांबवायची विनंती करू "

" फार उलट्या काळजाचा माणूस आहे रे तो ! अजिबात ऐकणार नाही "

" प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे ? एनी वे, तू जरा फ्रेश हो आणि थोडं खाऊन घे म्हणजे जरा तरतरी येईल"

शहाण्या मुलासारखं कमलेशनं सगळं ऐकलं

**

" दिनेश, तू म्हणत होतास की यातले आणखीही जाणकार असतील अगदी मुंबईतही, तुझ्या खूप ओळखी आहेत तू एखाद्याला इकडे बोलावून घे ना ! " काकुळतीला येत कमलेश म्हणाला खाऊन झाल्यावर तासभर राहिलेली शांतता त्यानं अशी भंग केली.

" ओळखी आहेत रे माझ्या, पण ही अशी माणसं काही व्हिजिटिंग कार्ड देत फिरत नसतात, आणि आता कुणाला फोन करून जारण मारण करणार्‍याची चौकशी कशी करणार ना ? "

" ते ही खरंच, म्हणजे आता आपल्याला काहीच करता येणार नाही का ? "

" कदाचित येईल रे ! फक्त तो कळ्ळूर सापडायला हवा " कळ्ळूरच्या नावानं पुन्हा घरात शांतता पसरली.

बराच वेळ या अश्या अस्वस्थ शांततेत गेला, साध्या चिमणीनं जरी पंख फडफडवले तरी कमलेश दचकत होता, अखेरीस पुन्हा काही प्रयत्न करावा म्हणून दिनेशनं पुन्हा बाहेर जाण्याची तयारी केली.

घराचा दरवाजा उघडताच त्याची नजर लालभडक डोळ्यांच्या जोडीवर पडली आणि तो शहारला, त्या डोळ्यांचा मालकही तसाच भयावह दिसत होता. काळाकभिन्न रंग डोक्यावरच्या वाढलेल्या जटा दाढीत मिसळून त्याचा चेहर्‍याच्या भयानकतेत आणखी भर घालत होत्या, जाड जाड भुवया, गळ्यात बैलाच्या गळ्यात असलेल्या माळांसारख्या रंगीबेरंगी माळा, अंगावर ओढलेले पांढरे पट्टे, नक्कीच राखेचे असावेत, चिताभस्म ? कदाचित त्याचेच असतील. ऐकूनच करकरीत तिन्ही सांजेला त्याचं दिसणं फारच अमंगळ वाटत होतं. ऐकूनच अवतारावरून हाच तो कळ्ळूर हे ओळखायला दिनेशला कष्ट पडले नाहीत. त्यानं मुकाट्यानं आत येण्याचा रस्ता सोडला, पण कळ्ळूर घरात शिरलाच नाही दिनेशचं निरीक्षण करत तिथेच दारात थांबला.

" तुम्हीच कळ्ळूर ना ? "

" हं " खरखरत्या आवाजात हुंकार फुटला

" माझ्या मित्राची चूक झाली, हवं तर तो तुमची माफी मागेल पण त्याला यातून बाहेर काढा "

" हा इचार आदी कराया हवा व्हता त्यानं " विकट हसत कळ्ळूर उत्तरला

" शहरातला माणूस तो, त्याच्या लक्षात नाही आल्या काही गोष्टी, माफ करा त्याला "

" न्हाय, कळ्ळूरच्या अपराद्याला शासन ह्ये व्हनारच, येती आमोश्या ही त्याची शेवटली "

" असं बोलू नका, काही मधला मार्ग निघतो का ते पाहूया "

" हितं दुसरा कुटलाच रास्ता नसतुया, त्यो मरनार, आणि आसा झिजत झिजत मरनार "

" वाटल्यास आम्ही तुमची किंमत चुकती करतो ,बोला किती देऊ ? वीस हजार ? पन्नास हजार की एक लाख ? "

" कळ्ळूरची किंमत करतो व्हय रं तू ? श्याना असशील तर हितून निगून जा, जो कोनी याची किंव करलं, याच्या संपर्कात राहील त्यो बी मरनार, म्या तान्हं पोरं जागवलया, त्येला बाकी काय बी कळत नाय फकस्त बळी घ्येनं कळतंय "

" आहो पण.. "

" बस, कळ्ळूर कदी फुकटात मान्साचा जीव घ्येत नाय म्हनून तुला सांगाय आलोय, जे जागलंय त्ये आता परत जानार नाय, तू निगून जा हितून " कळ्ळूर काहीही ऐकायला तयार नव्हता.

" दोन लाख ? " दिनेशनं घोडं पुढे रेटायचा प्रयत्न केला.

" कळ्ळूरचा आपमान करून कुनीबी जित्ता र्‍हात नाय, त्यो मरनारच " असं बोलून तो निघूनही गेला.

शेवटची आशा आता संपली होती. हताशपणे दिनेश मागे वळला आणि समोर उभ्या असलेल्या कमलेशकडे पाहून दचकला, त्याचा पांढरा फटफटीत पडलेला चेहरा पाहूनच कळत होतं की त्यानं सगळं काही ऐकलेलं आहे. आपल्या मरणाचं इतकं ओंगळवाणं स्वरूप पाहून कोण घाबरणार नाही ?

" संपलं सगळं दिन्या, आपण काहीही करू शकत नाही आता " हताशपणे कमलेश म्हणाला.

" निघेल काहीतरी मार्ग निघेल नक्कीच "

" शक्य नाही ते, ही बघ पाचच दिवसांनी अमावस्या आहे, त्या रात्री ते नक्कीच.. "

" धीर सोडू नकोस रे कमल "

" हं.. "

संध्याकाळ याच तगमगीत गेली की रात्री काय होणार, नशिबानं खाद्यपदार्थांचा साठा असल्यानं त्यासाठी दिनेशला बाहेर जावं लागणार नव्हतं नाहीतर तेवढ्या मोकळ्या वेळातही कमलेशचं काही खरं वाटत नव्हतं इतका तो खचला होता तो.

गेल्या दोन दिवसांत न जाणवलेली एक गोष्ट आज दिनेशला जाणवली ती म्हणजे या घरात ते दोघं सोडले तर कसल्याच जिवंतपणाची काही खूण दिसत नव्हती, आता जुनं घर म्हटलं की उंदीर, पाली यांचा सुळसुळाट असायला हवा होता, पण इथे तर त्यांचा मागमूसही नव्हता कसं काय शक्य होतं ते ? की खरंच ते जे काही अभद्र इथे येत होतं त्यानंच ...?

****

रात्र आणखी त्रासदायक ठरली, आजही रात्री सिडेटीव्ह देऊनही मध्यरात्री केव्हातरी कमलेश जागा झाला तोच धडपडत, कुणाच्यातरी अदृश्य बंधनातून स्वतःला मोकळे करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. झोपेत नक्की नसावा, दिनेश त्याच्याकडे धावला तेव्हा त्याचे डोळे सताड उघडे होते आणि त्यात आत्यंतिक भिती दाटलेली दिसत होती.

" कमल, अरे सावर स्वतःला, काही नाहीये तिथे "

" ते.. ते बघ त्याच्या त्या लहान लहान हातांनी मला स्पर्श करत होतं, फार थंडगार हात आहेत रे ते " हातांनी काहीतरी दूर ढकलत किंचाळतच कमलेश म्हणाला

" अरे खरंच तिथे कुणीच नाहीये कमल "

" ते बघ, ते दिसत नाहीये का तुला ? सरपटत, खुरडत जाताना ? "

" अरे खरंच नाही रे "

" आई आई गं, जिथे जिथे मला त्याचा स्पर्श झाला तिथे आग होतेय " कमलेशनं आपले हात पुढे करत म्हटलं. खरंच त्याच्या हातावर आणि मानेवर एखाद्या तान्ह्या मुलाच्या हाताच्या पंज्यासारखे लालभडक रंगाचे चट्टे उठले होते

" कमल शांत हो, आपण त्याला घालवण्याचा प्रयत्न करू " माणूस एखाद्या अनाकलनीय संकटात सापडला की जे आपसूकच करतो तेच आत्ताही दिनेशनं केलं, आठवतील ते श्लोक, आरत्या म्हणायला सुरुवात केली. बराच वेळ तो आठवून आठवून म्हणत होता

देवाच्या नावाचा मनावर काहीतरी दिलासादायक परिणाम होतोच ना ! कमलेश शांत होऊन पुन्हा सिडेटीव्हच्या अमलाखाली गेला.

त्याच्या त्या शांत झोपलेल्या क्षीण, दुर्बल शरीराकडे दिनेश बराच वेळ पहात होता. ' काय प्रकार असेल हा ? खरंच काही अमानवी ? की कुठल्यातरी दबावामुळे कमलच्या मनावर काही.... ? शक्य नाही, तसा तो कमजोर मनाचा नक्कीच नाही, मग काय झालं असेल ? हिप्नॉटीझम ? येस.. ही शक्यता नक्कीच नाकारता येणार नव्हती. ऐकूनच प्रकार त्याच शक्यतेकडे बोट दाखवत होता, पण हे असं जीवघेणं हिप्नॉसीस करता येऊ शकतं ? चित्रपटात दाखवत असले तरी प्रत्यक्षात तसंकाही शक्य नसतं हे दिनेशला नक्की ठाऊक होतं, मग ? उत्तर शोधून काढावंच लागणार होतं, इथे एक आयुष्य पणाला लागलंय.

दिनेशनं बॅगेतून लॅपटॉप काढून सुरू केला, मोडेम कनेक्ट केलं, नशिबानं इथे नेटवर्कचा काही प्रॉब्लेम दिसत नव्हता. भराभर त्यानं की दाबायला सुरुवात केली. सकाळ झाली तरी दिनेश लॅपटॉपमध्येच गढलेला होता, पण त्याच्या चेहर्‍यावर काहीतरी सापडल्याचं समाधान होतं. एकदा घड्याळात पाहून त्यानं लॅपटॉप बंद केला तेव्हा सकाळचे सव्वासात वाजलेले होते, कमलेश अजूनही गाढ झोपेत होता. सिडेटीव्हचा अंमल इतक्यात उतरणारही नव्हता. एक आळस देऊन दिनेश उठला आता त्याला एका सिगारेटची फार गरज होती.

****

" कमल अरे, खरंच तुला वाटतं तसं यात कुठलंही भूत-प्रेत नाहीये, सरळ सरळ सायंटिफिक कारण आहे त्याला " दिनेश जवळपास गेले तीन-चार तास कमलेशची समजूत घालायचा प्रयत्न करत होता.

" जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यावरही मी विश्वास ठेवू नको ? ते खोटं आहे असं कसं म्हणू शकतोस तू ? "

" कारण डोळेही फसू शकतात मित्रा "

" तू पुन्हा तुझ्या भास च्या थियरीवर येतोयस का ? " कमल कळवळून विचारत होता

" नाही रे, त्या पुढचं काहीतरी "

" म्हणजे काय ? "

" वेट, मी समजवायचा प्रयत्न करतो, परवा आणि काल दोन्ही रात्री तू काहीतरी पाहिलंस ? "

" ह.. हो " शहारत कमलेश म्हणाला

" पण त्याच ठिकाणी असूनही मला ते दिसलं नाही "

" म्हणजेच मला भास होतायत असं म्हणायचंय का तुला ? "

" नाही रे, एखादी गोष्ट तुला दिसते पण मला दिसत नाही याचा दुसरा अर्थ काय ? "

" मला.. मला वेड लागलेय ? "

" नाही, कदाचित तू कसल्यातरी अमलाखाली आहेस "

" कसल्या ? "

" हिप्नॉटीझम, संमोहन "

" कसं शक्य आहे ते ? "

" तूच बघ की, तुला `ते' दिसतंय, पण आतापर्यंत तुला त्यानं काही फिजिकल दुखापत केली का ? ह्या अंगावरच्या पंज्यांच्या खुणा सोडून ? "

" मला नसेल रे, पण तो कुत्रा ? ती घूस ? " कल्पनेनंही कमलेशच्या अंगावर सरसरून काटा आला

" तू ते घडताना प्रत्यक्ष पाहिलंस का ? "

" नाही, पण हे असं भयानक.. शरीराच्या बारीक बारीक चिंध्या .. "

" म्हणजे ते कुणीतरी एखाद्या धारदार शस्त्रानं सहज करू शकतं की, मला तरी खात्रीपूर्वक वाटतंय की ते तसंच असावं आणि तुझ्या बाबतीतला प्रकार हा नक्कीच हिपप्नॉटीझमचा आहे "

" अरे पण कसा ? "

" म्हणजे बघ, तुझा तो कळ्ळूर नक्कीच यातला जाणकार आहे "

" पण मी खात्रीपूर्वक सांगतो की त्याला माझ्यावर संमोहनाचा प्रयोग करण्याची संधी नक्कीच मिळाली नव्हती "

" म्हणजे अ‍ॅटलीस्ट तू जागा असताना "

" अं ? "

" हे बघ, हिप्नॉसीस म्हणजे तुझ्या बाह्यमनावर ताबा मिळवून तुझ्याकडून हवे ते करवून घेणे, ढोबळमानानं.. अर्थात त्यासाठी तुला आधी संमोहनिद्रेत न्यावे लागेल, यासाठी कधी लोलकाचा वापर करतात, कधी फिरणार्‍या आकृतिबंधाचा किंवा डोळ्यात नजर खिळवून ठेवून हे करता येतं पण यामुळे केवळ बाह्यमनावर ताबा मिळवता येतो. हा झाला सर्वश्रुत प्रकार"

" बरं .. "

" आणखी एक प्रकार म्हणजे तुझे अंतर्मन ताब्यात घेणे, यासाठी सगळ्यात योग्य वेळ म्हणजे तू गाढ झोपलेला असताना कारण माणूस झोपलेला असतानाच त्याच अंतर्मन जास्त कार्यक्षम असतं "

" हे ही अशक्यच, तुलाही माहिताय माझी झोप किती सावध असायची ते "

" हो पण ती एरव्ही, समजा तुला एखादं गुंगीचं औषध दिलं तर ? हे गाव कळ्ळूरचं आहे इथे असं काही करणं त्याला सहजच शक्य आहे की

" कदाचित.. "

" कदाचित नव्हे त्यानं हेच केलं, तुला कुठल्या ना कुठल्या प्रकारे एखादं गुंगीच औषध दिलं, कदाचित त्यासोबतच तुझ्या अंतर्मनाला जास्त जागृत करणारं एखादं औषधही."

" मग ? " कमललाही आता त्यात तथ्य वाटायला लागलं

" तू गाढ झोपलेला असताना त्यानं तुझ्या खोलीत प्रवेश केला आणि तुझ्या अंतर्मनाला ताब्यात घेऊन तुला ते तसं स्वप्न पाडलं, तुझ्या आजूबाजूला ती काळी माती पसरवली आणि निघून गेला, तुला ज्या रात्री तो विधी दिसला तीच ही रात्र "

" पण असं असतं तर प्रत्येकवेळी मी गाव सोडून जाताना तो माझ्या समोर कसा आला ? तो तर कधीच गावात दिसलेला नाहीये मला "

" एक्झॅक्टली, मी तुला हेच सांगणार होतो, त्याने त्या रात्री नुसताच तुझ्या अंतर्मनावर ताबा मिळवला नाही तर त्याच्याशी आपला एक दुवाही जोडून घेतला ज्यामुळे तुझ्या प्रत्येक हालचालीची बातमी त्याला सहज लागत होती "

" पण जर सगळं असंच असेल तर मी गाव सोडून गेल्यावरही त्याला हे सगळं घडवणं शक्य होतंच की, मग मी गावतच राहावं यासाठी त्यानं का प्रयत्न केले ? "

" त्याचंही फार सोपं स्पष्टीकरण आहे, एकतर तुझं जे काही होतंय ते गावकर्‍यांनी पाहावं म्हणजे त्याच्याबद्दलची भीती आणखी वाढेल आणि दुसरं म्हणजे तू जर गाव सोडून गेला असतास तर त्याला त्याचा दुवा सांभाळण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले असते, अखेरीस तुझ्याबाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट त्यानेच तुला कमांड देऊन घडवलेली आहे नाहीतर दोन्ही दिवस तू सिडेटीव्हच्या इफेक्टखाली असताना तुला जाग आलीच नसती. "

" तुझं म्हणणं आता थोडंफार पटायला लागलंय " कमलेशच्या आवाजात जीव आला होता

" पण हे शोधून काढल्यावरही आपल्या मर्यादांवर बंधन येतंय, काय झालं असावं हे समजू शकलो तरी यातून बाहेर कसं पडावं याची आपल्याला काहीच माहिती नाहीये "

" पण मग यावर एखादा डॉक्टर आपली मदत करू शकतो ना ! एखादा संमोहनतज्ज्ञ ? "

" नक्कीच, पण त्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये, तुला तर तो बाहेर पडू देणार नाहीये, आणि आपण बळजबरीनं त्याच्या क्षेत्राबाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर तो वेळेआधीच तुझं काहीतरी बरंवाईट करेल. हो, त्याला ते शक्य आहे, माझ्या मानेवरचा हा व्रण आणि काल रात्रीच्या त्या जळजळत्या खुणा विसरू नकोस "

" त्या पाहूनही तू हा संमोहनाचा परिणाम आहे असं कसं म्हणू शकतोस, दिनेश ? " रात्रीची आठवण येऊन कमलेशचा धीर पुन्हा सुटला

" तो ही संमोहनाचाच परिणाम, त्याच्या ताब्यात तुझं अंतर्मन आहे, त्याला आदेश देऊन तो तुझ्या शरीरावर इजा करू शकतो इनफॅक्ट त्याच्या आदेशानं तुझं शरीरच तशी इजा करून घेतं, लोकांच्या सांगण्यावरून खात्री पटल्यानं कावीळ होऊन मेलेल्या माणसाची गोष्ट आठव "

" म्हणजे यातून माझी सुटका नाहीच तर.. " कमलेश पुन्हा निराशेच्या गर्तेत गेला.

" सध्यातरी नाही, पण आपण प्रयत्न करू त्या कळ्ळूरला विनवण्या करून यातून सुटका करून घेऊ "

" त्याचा काही उपयोग होणार नाही, माझ्या आयुष्याचे आता हे शेवटचेच चार दिवस " कमलेशला हुंदका फुटला

यावर काहीही न बोलता दिनेश परत विचारात गुरफटून गेला.

****

" कमल, माझं ऐक तू हे इंजेक्शन घे, फार स्ट्राँग सिडेटीव्ह आहे हे, तुला अजिबात जाग येणार नाही " संपूर्ण संध्याकाळ विचारात घालवल्यावर रात्री पर्यंत दिनेश कसल्याश्या निर्णयावर आला होता.

" शक्यच नाही, मला माहिताय सगळं शांत झाल्यावर `ते' आज पुन्हा येणार कालच्यापेक्षा कदाचित जास्तच जवळ, तुझ्या औषधांचा काहीही परिणाम होणार नाही "

" प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे ? " त्याचं काहीही ऐकायला तयार नव्हता, अखेरीस त्यानं त्याच्या मेडिकल बॅगमधलं ते इंजेक्शन कमलला घ्यायला भाग पाडलं. फारच स्ट्राँग असावं ते, कमलेशच्या हालचाली पाचच मिनिटांत मंदावल्या आणि पाहता पाहता तो गाढ झोपी गेला.

****

दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली ती दिनेशच्या आक्रोशानंच. त्याचा तो आक्रोश ऐकून काही धाडसी गावकरी घराच्या आसपास रेंगाळले पण आत जाऊन नक्की काय झालंय ते पाहण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. एकूण अंदाज असा येत होता की काहीतरी भयानक प्रकार घडून काल रात्रीच कमलेशचा मृत्यू झाला असावा.

दिनेश वेड्यासारखा मदतीची याचना करत होता, पण कुणाचंच मन द्रवलं नाही, अगदी ज्यांच्यासाठी कमलेश इथे या आडगावी आला त्या बँकेतल्या कर्मचार्‍यांनी मदत करण्यासाठी नकार दिला. कळ्ळूरचा चांगलाच वचक बसलेला होता त्यांच्यावरही.

कित्येक तास असा मदतीच्या अपेक्षेत भटकल्यावर अखेरीस दिनेशनं स्वतःच कमलेशचा अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला. तसंही त्याचं शव मुंबईला नेण्यात काहीही अर्थ नव्हताच, कारण कमलेशचं स्वतःचं असं कुणीच नव्हत.

काहीतरी करून ही बला एकदाची टळू दे, म्हणून लाकडे देण्याची दयावृत्ती मात्र गावकर्‍यांनी दाखवली. घराच्या मागच्या बाजूलाच दिनेशनं कमलेशची चिता रचली, तसंही आता ते घर झपाटलेलं म्हणून कायमचं वाळीत टाकलं जाणार होतं हे नक्की, मग इथे एखादा अंतविधी झाला तर तसाही काय फरक पडणार होता ? भरल्या डोळ्यांनी दिनेशने पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेला कमलेशचा देह चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला.

कमलेशच्या धडधडत्या चितेसमोर उभा राहून अश्रू ढाळत असतानाच काळीज चिरत जाईल असं भयानक हास्य दिनेशच्या कानावर पडलं. कळ्ळूर जवळपास आहे हे समजण्यासाठी त्याला वळूनही पाहण्याची आवश्यकता पडली नाही.

" लई कमजोर दिलाचं निगालं बेनं " कळ्ळूर पुन्हा ते अमंगळ हसत म्हणाला,

" तू.. तू जीव घेतलास त्याचा, एका अपमानाचा बदला हा असा घ्यायचा ? "

" कळ्ळूरचा अपमान केला त्यानं, ज्याला भुतंही वचकत्यात त्या कळ्ळूरचा " त्याच्या आवाजात गुर्मी होती.

" एखाद्या दुर्बळ माणसावर वापरण्यासाठी तू तुझी शक्ती मिळवलीस काय ? "

" माझी शक्ती मी कुनाचं भलं कराया नाय कमावली, माज्यासाटी कमावावलीय "

" आता तुझ्या मनाचं समाधान झालं असेल ना ? "

" जोवर ह्येच्या चितेचं भस्म मी अंगाला लावत नाय तंवर माजा प्रन पुर्न व्हत नाय "

" देव याचा नक्कीच जाब विचारेल तुला "

" द्येव ? हा हा हा हा " कळ्ळूर हसतंच सुटला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून दिनेश मागे वळला, कळ्ळूरसारखा अघोरी चितेजवळ असताना कमलेशच्या आत्म्याच्या शांतीची अपेक्षा करणंही चुकीचंच होतं. रात्र झाली तरी कळ्ळूरचं हसणं कानात उकळत्या तेलासारखं शिरत होतं

त्याच रात्री केव्हातरी दिनेशही आपल्या सामानासहित गाव सोडून निघून गेला. कुणालाही त्याच्या जाण्याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. गावासाठी ते दोघं म्हणजे लवकरात लवकर विसरण्याची गोष्ट झाली होती आणि ते घर आता कायमचं ओस पडण्यासाठी मागे राहिलेलं होतं

****

दुपार उलटून चालली होती आणि भर थंडीचे दिवस असूनही मुंबईतल्या हवेत चांगलाच उकाडा होता. मुंबईतल्या आपल्या खोलीत दिनेश रायटिंग टेबलावर लॅपटॉप ठेवून त्यात गर्क झालेला होता. पाठीमागे काही हालचाल जाणवली म्हणून त्यानं मागे वळून बेड कडे पाहिलं आणि हसला.

" उठलास ? या मुंबापुरीत तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रा " नाटकीपणे कमरेत झुकून दिनेश म्हणाला

" अं.. मी आत्ता मुंबईत आहे ? "

" करेक्ट, आपण मुंबईतच आहात मिस्टर कमलेश, मुंबईत आणि सुखरूप "

" आणि ते गाव.. ? आणि कळ्ळूर ? "

" ते राहिले तिकडेच, डोन्ट वरी माय फ़्रेंड, आता तू ऊठ फार वेळ झोपेत होतास, जरा फ्रेश हो मी कॉफीचं पाहतो मग बोलू " दिनेशनं त्याला हात देऊन उठवलं आणि फ्रेश होण्यासाठी पिटाळलं.

**

" नक्की काय प्रकार आहे हा ? आपण मुंबईत कधी आलो ? " हातातल्या कॉफीचा घुटका घेत कमलेशनं विचारलं

" मुंबईत आपण काल सकाळीच आलोय पण घरी मात्र काल रात्री आलायस तू "

" मला सगळं नीट सांगशील का दिन्या ? "

" नक्कीच, आपली हिप्नॉसीसवर चर्चा झालेली आठवतेय तुला ? "

" अं.. हो " थोडे कष्टच पडले कमलेशला

" त्यावेळी मी तुला जे सांगितलेली माहिती अर्धवट होती, म्हणजे खरंतर तो सगळा प्रकार काय असू शकेल हे मला कळलंच होतं पण मी मुद्दामच तुझ्यापासून ते लपवून ठेवलेलं, माझ्या वाचनात आफ्रिकेत गेलेल्या एका डॉक्टरचा अनुभव आला होता. तिथे असताना त्याने एका वाहू डू ची करणी झालेल्या पेशंटवर एक अनोखा उपचार करून त्याचा जीव वाचवला होता " दिनेश कॉफीचा घोट घ्यायला थांबला

" या पेशंटवर तिथल्या एका मांत्रीकां वाहू डू करणी केलेली होती त्यामुळे तो हळू हळू मरणपंथाला लागला होता, डॉक्टरच्या असं लक्षात आलं की हा त्या मांत्रिकाच्या कुप्रसिध्दीचा प्लासिबो इफेक्ट आहे म्हणून त्यानं एक विचित्र पद्धतीनं उपचार केला. त्यानं त्या पेशंटला चक्क अनेक लोकांसमोर ठार केलं आणि त्यानंतर त्याला पुन्हा जिवंत केलं, पुनर्जन्म झालेल्या त्या पेशंटमधली सगळी आजाराची लक्षणं गायब झालेली होती "

" मारून पुन्हा जिवंत ? "

" अरे मारलं म्हणजे ते त्याच्यासाठी आणि तिथल्या लोकांसाठी रे, खरं तर त्यानं त्याला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केलं होतं पण त्याच्या या प्रयोगाचा फायदाच झाला, मी एक्झॅक्टली तोच प्रयोग तुझ्यावर केला, मित्रा तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझ्या त्या कळ्ळूरसाठी आणि तिथल्या गावकर्‍यांसाठी तू आता मेलेला आहेस. "

" म्हणजे नेमकं काय ? "

" तुला मी दिलेलं ते इंजेक्शन आठवतं ? ते खरंतर नवीनच मार्केटमध्ये येऊ घातलेलं एक अतिशय स्ट्राँग सिडेटीव्ह आहे फारच व्हायोलंट झालेल्या स्किझोफ्रोनीक पेशंटवर करण्यासाठी त्याचा वापर करता यावा म्हणून ते विकसीत केलेलं आहे, त्यानं नुसती झोप येत नाही तर मेंदूही बर्‍याच काळासाठी रिलॅक्स्ड कंडिशनमध्ये जातो. त्याचा परिणामही अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ टिकतो "

" म्हणजे मी दोन दिवस झोपेत आहे ?" चकित होऊन कमलेशनं विचारलं

" येस, तुझ्या याच अवस्थेचा फायदा घेऊन मी तुला चक्क मृत घोषित केलं, मला खात्री होती की कळ्ळूरच्या भीतीनं कुठलाही गावकरी आपल्या आसपासही फिरकणार नाही " दिनेशनं गावातली सगळी घटना त्याला सांगितली.

" बाप रे, इतकं मोठं नाटक ? अरे पण मला का अंधारात ठेवलंस ? "

" कारण सोपं आहे, जर मी तुला याची कल्पना दिली असती तर तुझ्याशी लिंक जोडलेली असल्यानं ती माहिती आपोआपच कळ्ळूरला मिळाली असती आणि माझा प्लान फसला असता, आता गोष्ट वेगळी आहे तूच मेलायस याची खात्री असल्यानं त्या कळ्ळूरनं तुझ्याशी असलेला संपर्क तोडून टाकला असणार "

" अरे पण तू सगळं नाटक जमवलंस कसं ? "

" " तू झोपल्यावर रात्री मी गुपचूप बाहेर पडलो आणि गावातल्या सलूनच्या कचरापेटीतले केस, आणि कुठून ते नाही सांगत पण नुकत्याच कापलेल्या बोकडाचं शिल्लक राहिलेलं कातडं मिळवलं, मी बिछाना बनवण्यासाठी घेतलेल्या सगळ्या पांघरुणांची गुंडाळी करून त्यांना मानवी आकार दिला आणि त्यातच त्या दोन्ही वस्तू गुंडाळून टाकल्या, चिता पेटल्यावर त्यांच्यामुळेच प्रेत जळत असल्यासारखा वास आल्यानं कुणालाच शंका आली नाही अगदी त्या कळ्ळूरला ही "

" तू खरंच ग्रेट आहेस यार, पण मला त्या गावातून कुणाच्या नकळत बाहेर
कसं काढलंस ? "
"अरे ते सगळ्यात ईझी होतं, त्याच रात्री मी तुला खांद्यावर टाकलं आणि दोन मैल चालत मुख्य रस्त्यावर आलो, मिळेल ती एस.टी. पकडून गडचिरोली आणि तिथून अँब्युलन्सनं मुंबईत एका ओळखीच्या डॉक्टरकडे, तिथे तुला आय. व्ही. वगैरे देऊन नंतर तू स्टेबल असल्याची खात्री पटल्यावर घरी आणलं, गावातल्या लोकांना आपली ब्यादच वाटत असल्यानं कुणीही आपल्या आयमीन माझ्या जाण्याबद्दल कसलीही शंका घेतली नसेल याची खात्री आहे "

" खरंच महान आहेस यार तू, तू नसतास तर आत्ता मी जिवंत नसतो "

" नुसत्या बोलाची कढी नको, आज पार्टी पाहिजे ती पण ओली "

" दिली, चल आवर पटकन साडेसात झालेयत बसेरामध्ये अजूनही जागा मिळेल"

**

" यार मला एक सांग, साला जगातली इतकी सगळी भुतं सोडून त्या कळ्ळूरनं एखाद्या अभ्रकाचंच भूत का निवडलं असेल ? " टॅक्सीनं परत घरी येताना कमलेशनं विचारलं, डोक्यातल्या हलक्याश्या किक मुळे कमलेशला प्रश्न सुचायला लागले

" अरे अ‍ॅक्चुअली तो एक बहुचर्चित असलेला काळ्या जादूतला विधी आहे, एखाद्या नुकत्याच गेलेल्या अर्भकाचं शव पुन्हा उकरून काढून मांत्रिक काही खास पद्धतीनं मंत्रावलेलं दूध त्याला पाजतात आणि त्याच दुधाचं आमिष दाखवून त्याच्याकडून हवी ती कामं करून घेतात, तुला हेच दाखवण्याचं कारण म्हणजे एकतर तू कुठे विचारण्याचा प्रयत्न केला असतास तरी तुला ते खरेच आहे हे कळलं असतं आणि दुसरं म्हणजे माणूस सर्वात निरुपद्रवी वाटणार्‍या गोष्टीनं उपद्रवी रूप दाखवलं तर जास्त घाबरतो, साला तो कळ्ळूर चलाख होता"

" कसली भारी लॉजिक लावतोस यार "

" जय गुगलबाबा, चल आता घर आलं तू कुलूप काढ तोवर मी टॅक्सीचं भाडं देऊन आलोच " दिनेश दात काढत म्हणाला

टॅक्सीचं बिल पेड करून दाराकडं वळताच दिनेश जागेवरच थबकला. उघड्या दारासमोर कमलेश विस्फारल्या डोळ्यांनी आत पहात होता, त्याच्या चेहर्‍यावर दाटून आलेली भीती स्पष्ट दिसत होती.

" कमल, काय झालं ? काप पाहतोयस ? " त्याचा खांदा धरून हालवत दिनेश म्हणाला

" ते.. ते .. " कमलेशच्या आवाजाला कंप सुटलेला,

" काय आहे ? कुठे आहे ? " दिनेशच्याही मणक्यातून शिराशिरी गेली

" ते.. ते.. सिगारेटचं पाकीट रे, रिकामं आहे, आता रात्री काय करायचं ? " खिदळत कमलेश म्हणाला

" च्यायला, कॅम्स.. " त्याच्या पोटात एक गुद्द्दा मारत दिनेश म्हणाला

" मी ही थोडी अ‍ॅक्टींग करून पाहिली रे "

" फार झाली अ‍ॅक्टींग, आता तू झोप, गेला आठवडाभर मी ऑफिसला गेलेलो नाहीये, थोडे अपडेट्स घेऊ दे तिथलेही"

त्यानंतर पंधराच मिनिटात डोक्यातल्या हलक्या किकच्या अमलाखाली कमलेश गाढ झोपी गेला, आणि दिनेश पुन्हा अनियमित काळासाठी लॅपटॉपमध्ये बुडून गेला, आजूबाजूच्या वातावरणाचा विसर पडून.

.

.

.

बाहेर अमावास्येची रात्र ऐन मध्यावर आलेली आणि त्या खोलीतल्या एकमेव खिडकीच्या काचेवर इवलेसे पंजे टेकवून दोन डोळे आपल्या पांढर्‍याशुभ्र बुबूळांनी आतमध्ये पहात होते, आणि दूर कुठेतरी गडचिरोलीच्या जंगलात कळ्ळूर आपल्या खरखरत्या आवाजात भयावह हसत होता.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच कथा, मांडणी याबद्दल आम्ही पामर कै बोलणार! Proud फुल्ल टू चाफ्फा इश्टाईल!

पण अभ्यास आणि कल्पनाशक्तीला __________/\_________ !!!

सही

Pages