शंभर मिनारांचं शहर - प्राग - चेक रिपब्लिक

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

युरोपमधे आल्यापासूनच प्राग बघायचे आहे हे ठरवलं होतं पण प्लॅन बनत नव्हता. यावर्षी शेवटी प्लॅन जमून आला.

प्राग (चेकमधे प्राहा Praha) ही चेक रिपब्लिकची राजधानी, वाल्टावा (Vlatava) नदीच्या दोन्ही किनार्‍यावर वसली आहे. प्रागला जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. जवळजवळ ११०० वर्षापूर्वी हे शहर वसवलं गेलं आणि तेव्हापासून हे मध्य युरोपातले सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले. २ रोमन सम्राटांनी इथूनच राज्य केलं होतं. चेकोस्लोवाकियाची राजधानीसुध्दा प्रागच होती आणि त्याच्या विघटनानंतर चेक रिपब्लिकची राजधानी बनली.

तर अशा या ऐतिहासिक आणि सुंदर शहराची काही प्रकाशचित्रं...

ओल्ड टाउन स्क्वेअर - या चौकातल्या ओल्ड टाउन हॉलच्या टॉवरवरून -

टॉवरवरून दिसणारे प्राग -

याच ओल्ड टाउन हॉलच्या दक्षिणेकडच्या भिंतीवर हे प्रसिध्द खगोलशास्त्रीय घड्याळ (Astronomical Clock) आहे

ओल्ड टाउन चौकातले हे यान हुसच्या स्मरणार्थ निर्मिलेले शिल्प (Jan Hus Memorial) -

ओल्ड टाउनमधूनच आम्ही एका सिटी टूर बसमधून नदीपलीकडच्या प्राग किल्यावर गेलो. तिथून दिसणारं प्राग - प्रागला "शंभर मिनारांचं शहर" (The City of a Hundred Spires) का म्हटलं जातं हे इथून दिसणार्‍या नजार्‍यावरून कळून येतं

संध्याकाळ बरीच झाली होती आणि किल्ला बघायची वेळ संपत आली होती. पूर्ण किल्ला बघायला जवळजवळ ३ तास लागतात. शिवाय टूर बस १ तासातच परत निघणार होती त्यामुळं किल्ल्यात जे काही थोडंफार फिरता येइल तेव्हढं फिरून परत निघालो. किल्ल्यात आतमधे एक सुंदर सेंट व्हायटस कॅथेड्रल आहे.

कॅथेड्रलचा फोटो. मोबाइल मधला सेल्फी मोड वापरून काढला आहे.. (केपीच्या आग्रहावरून Wink )

किल्ल्यावरून परत आम्ही ओल्ड टाउन स्क्वेअरमधे परत आलो. नदीकाठच्या एका कॅफेमधे बसून कॉफी घेतली आणि तिथून प्रसिध्द चार्ल्स ब्रिजकडे निघालो. नदीकाठाहून नदी आणि मागं दिसणारा किल्ला

चार्ल्स ब्रिज आणि मागं दिसणारा किल्ला

चार्ल्स ब्रिजचे प्रवेशद्वार

हा प्रागमधला सगळ्यात प्रसिध्द पूल. १३५७ साली सहाव्या चार्ल्सनं याचं काम चालू केलं जे १४०२ साली पूर्ण झालं. या पुलावर बरोक शैलीतले ३० पुतळे आहेत. त्यापैकी हा एक

पुलावरूनच काढलेला हा अजून एक फोटो

प्रकाशात उजळलेला चार्ल्स ब्रिज

वाल्टावा नदी, चार्ल्स ब्रिज आणि मागे प्राग किल्ला

प्रागमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच मस्त आहे.. तिथलं एक मेट्रो स्थानक

ओल्ड टाउन आणि न्यू टाउन (जे चौदाव्या शतकात वसवलं गेलं होतं) यांच्या सीमेवर असलेलं पावडर गेट. या टॉवरमधे सतराव्या शतकात गन पावडर साठवली जायची त्यामुळं हे नाव पडलंय

नॅशनल थियेटर ऑफ चेक रिपब्लिक.. प्रागचं स्टेट ओपेरा हाउस याच इमारतीत आहे. बर्‍याच हॉलिवूडपटांचं चित्रीकरण इथं झालंय (मिशन इंपॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉल, XXX, इ.)

पेट्रीन (Petřín) टेकडीच्या पायथ्याला असलेलं कम्युनिझमचं स्मारक

चार्ल्स ब्रिजचं दिवसाचं रूप

पारंपारिक स्लोवाक केक ट्रेडल्निक (Trdelník)

वेन्सेस्लास चौकातील (Wenceslas Square) चेक नॅशनल म्युझियम

सेंट वेन्सेस्लासचा पुतळा

नॅशनल म्युझियमच्या पायर्‍यांवरून वेन्सेस्लास चौक - ७५० मी लांब आणि ६० मी रूंद अशा या भव्य चौकात एका वेळी ४ लाख लोक मावू शकतात

काही प्रॅक्टिकल माहिती -

चेक रिपब्लिक युरोपियन महासंघाचा सदस्य आहे शिवाय शेंगेन विभागाचाही सदस्य आहे पण युरो झोनचा सदस्य नाही. कोरूना (Czech koruna) हे इथलं चलन. युरो सगळीकडं घेतात पण सुट्टे परत द्यायचे असतील तर ते कोरूनामधेच दिले जातात. चेक ही इथली अधिकृत भाषा पण बहुतेक ठिकाणी इंग्रजी चालते

धन्यवाद लोक्स.. Happy

केपी.. ते कॅथेड्रल बरंच उंच आहे आणि आजूबाजूला रिकामी जागा फारशी नाही त्यामुळं त्या कॅथेड्रलचा चांगला फोटो काढता नाही आला. मोबाइलमधून एक काढला आहे तो टाकतो नंतर Happy

इथ भेळ, पाणिपुरीची एकपण गाडी नाही दिसली >> Lol

वॉव मनीष एवढ्या सुंदर कॅथेड्रलचा फोटो तू मिस केला होतास. अप्रतिम आणी टोलेजंग आहे ते कॅथेड्रल. त्या कमानीतुन जो भाग दिसला त्यातुनच अंदाज येत होता. अमेझींग आलाय तो फोटो. जबरी!! Happy

वा! काय सुरेख फोटो आहेत. इस्पे झिरपणार्‍या सोनेरी प्रकाशातले!!
तो कॅथेड्रलचा फोटो अतिशयच जबरी आलाय. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तर आणखीणच मस्त दिसेल .

मस्त आहेत फोटो .. Happy

चार्ल्स ब्रिज वरून हम दिल दे चुके सनम मधल्या ब्रिजची आठवण झाली .. पण ते हंगेरीतलं होतं बहुतेक ..

अरे हम दिल दे चुके सनम मधला तो शॉट चेन ब्रिजवर आहे हे माहितीच नव्हते.
http://www.fanpop.com/clubs/hum-dil-de-chuke-sanam/images/8615496/title/...

आमच्या बायकोचे हापिस चेनब्रिज ओलांडला की पलिकडे पेश्ट साइडला दोन गल्ल्या टाकून होते. मी कधी कधी बुडापेश्ट डेलीला उतरून चेन ब्रिजच्या बुडा साइडला बसस्टॉपवर उभा राहयचो. पण ती मात्र कधी अशी पळत नाही आली (ऐश्वर्यासारखी) Happy

Pages