अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

Submitted by मार्गी on 22 October, 2015 - 20:03

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ८ ऋषीकेश दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

२२ डिसेंबरला अहमदाबादवरून पुढची ट्रेन घेतली. आता प्रवास संपत येतो आहे. लवकरच घरी पोहचेन. पण जीवनाचा प्रवास तर सतत सुरू राहतो. न थांबता. लवकरच हे वर्षही संपेल. हे वर्ष खूप वेगळं राहिलं. ह्या वर्षी ट्रेकिंगच्या पहिलीत प्रवेश घेतला! पहिल्यांदा गोरखगडाचा ट्रेक केला आणि आता हिमालयात! खरोखर जे बघितलं ते अविश्वसनीय आहे. हिमालयमध्ये जेव्हा जेव्हा फिरलो, त्या वेळेस अवाक् झालो. . .

आपण जेव्हा हिमालयाच्या चरणांशी असलेल्या गावांमधून पुढे जातो, तेव्हा हळु हळु त्याचं विशाल स्वरूप दिसत जातं. एका मागोमाग एक पर्वतरांगा दिसत जातात. निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर तिथली शुद्धता आणि शांती मिळते. . परत आलो तरी हिमालय बोलवतच राहतो. परतताना एका ठिकाणी दूरवर दिसलेले ते हिमशिखर अजूनही साद देत आहेत. हिमालयाचं संमोहन असं आहे की एकदा जो अडकला, तो फसला. . .

आता परत शहरातलं ते रोजचं आयुष्य. . . तेच ते रूटीन. जेव्हा सर्व प्रवास संपवून घरी पोहचलो, तेव्हा आधी आराम केला. २३ डिसेंबरचा दिवस आहे. सहज बातम्या बघितल्या. एका बातमीने प्रचंड अस्वस्थ केलं. एका झटक्यात आयुष्य खूप काही बदललं, असं जाणवलं. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची ती बातमी! अनपेक्षित अजिबात नाही, पण तरी‌ अस्वस्थ करणारी. माझ्यासारखे कित्येक कोटी लोक असतील ज्यांना त्यांचं बालपण ख-या अर्थाने संपलं, असं वाटून गेलं असेल. हाच क्षण ह्या सर्व प्रवासाचं भरतवाक्य आहे.

जवळ जवळ पावणेतीन वर्षांपूर्वी केलेल्या ह्या प्रवासाचं आणखी एक महत्त्व म्हणजे डिसेंबर २०१२ मध्ये प्रवास केल्यानंतर सहा महिन्यांनी उत्तराखंडमध्ये प्रलयंकारी पूर आला. ज्या ज्या जागी मी गेलो होतो, तिथे मोठं नुकसान झालं. पिथौरागढ़ जिल्ह्यापासून कर्णप्रयाग, पिपलकोटि, जोशीमठ, विष्णूप्रयाग, बद्रिनाथ रोड आणि इकडे टिहरी- ऋषीकेश अशा प्रदेशात मोठी हानी झाली. अगदी भितीदायक चित्र समोर आलं. मी जो भाग जवळून बघितला होता, त्याला पूराचा मोठा फटका बसला. जोशीमठच्या जवळचं‌ जलविद्युत केंद्र किंवा ऋषीकेशमधलं‌ गंगा रेसॉर्ट- हे तर जवळजवळ नदीमध्येच होते. . .

पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बंस) एक निमित्त झालं आणि दशकांपासून मानवाने पर्वतामध्ये केलेल्या अतिक्रमणाची किंमत चुकवावी लागली. मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्यामुळे पर्वतामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाली; माती निसटायला लागली. डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामामुळे पहाडाचे काही भाग नाजुक झाले होते. क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळेही पर्यावरण अस्थिर झालं आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे मोठा पूर आला. एका अर्थाने मानवाला थांबवण्याचा हा निसर्गाचा मार्ग आहे. ज्या लोकांनी ते प्रत्यक्ष भोगलं, त्यांनाच चुकवावी लागलेली किंमत किती असणार हे कळालं असेल.

ह्या संदर्भात आता आपल्याकडे फार थोडे पर्याय आहेत. एक तर ह्यामधून काही बोध घेऊन स्वत:ला नियंत्रणात ठेवणं आणि निसर्गामध्ये काहीही हस्तक्षेप न करणं- आपली तथा कथित विकासाची परिभाषा बदलून यु- टर्न घेणं. . . किंवा ह्याहून मोठी किंमत चुकवायला तयार राहणं. . पण जे लोक अशा आपत्तीला दैवी आपत्ती म्हणत असतील, ते स्वत:च्या चुका कशा मान्य करणार? त्यामुळे आता इथून दोनच प्रकारचे रस्ते पुढे जातात. पण चुकांमधून शिकणे हा मानवी स्वभाव नाहीय. असो.

व्यक्तिगत पातळीवर ह्या प्रवासाने माझ्यासाठीही नवीन रस्ते शोधले. जीवनाविषयी नवीन दृष्टीकोन दिला. ट्रेकिंग किंवा सायकलिंगमध्ये एक गोष्ट विशेष अशी असते की, गती कमी होऊन जाते. आणि आपण सामान्य जीवनामध्ये प्रचंड वेगात जाताना ज्या गोष्टींपासून वंचित राहतो, त्या ट्रेकिंगमध्ये जवळून बघता येतात. किंबहुना त्यांना पहिल्यांदा बघू शकतो. कोणत्याही रस्त्यावर जर आपण कार किंवा बाईकने जात असू तर एका क्षणात निघून जातो. पण जेव्हा त्याच मार्गावर रमत गमत जातो, तेव्हा दृष्टी वेगळी असते. आपण खोलवर बघू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. एकाच छोट्या रस्त्यावर अशा गोष्टीसुद्धा आहेत तर हे आपल्याला तेव्हा कळतं. शिवाय आपलं लक्षही गंतव्याच्या ऐवजी दृष्टीकडे जातं. .

सर्व वाचकांना खूप खूप धन्यवाद देऊन नमन करतो आणि आता ह्या लेखनाला तात्पुरता विराम देतो. पुढच्या पडावाच्या वेळेस भेटेपर्यंत कळावे लोभ असावा, राम राम घ्यावा! खूप खूप धन्यवाद!

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर तिथली शुद्धता आणि शांती मिळते. . >>>> हे सारे तुमच्या लिखाणात प्रकट झाले आहे ...

अशी हिमालय यात्रेची संधी तुम्हाला वारंवार प्राप्त होवो .... Happy

तुम्हालाही नमन आणि राम राम!
अथपासून इतिपर्यंत संपुर्ण मालिक छान झाली.

ट्रेकिंग किंवा सायकलिंगमध्ये एक गोष्ट विशेष अशी असते की, गती कमी होऊन जाते. आणि आपण सामान्य जीवनामध्ये प्रचंड वेगात जाताना ज्या गोष्टींपासून वंचित राहतो, त्या ट्रेकिंगमध्ये जवळून बघता येतात.>> अगदी बरोबर. आणि चालत कुठे गेलो तर अजूनच आनंद मिळतो.