कबुतर जा जा जा …।

Submitted by कविता क्षीरसागर on 22 October, 2015 - 09:17

कबुतर जा जा जा …।

अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका ह . मी काही या कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाहीये की कसला संदेसा . अन संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की ' बाबा जा , जा . माझ्या आयुष्यातून , माझ्या नजरेसमोरून दूर कुठेतरी निघून जा "
आता तुम्ही म्हणाल की " का गं बाई, या छान , गोंडस पक्षाबद्दल तुला एवढा राग का ? किती निरुपद्रवी अन गोजिरवाणा दिसतो तो . "
पण हेच तुम्ही आमच्या बिल्डींग मध्ये वा आजूबाजूच्या मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा निरुपद्रवी वाटणारा पक्षीही किती ना ना प्रकारे उपद्रव देऊ शकतो ते . अहो इथे राहणे मुश्किल केलय यांनी .!

पूर्वी मलाही कबुतर आवडायचं . त्याचं ते माना वेळावून इकडे तिकडे पाहणं , त्याच्या मानेवरच्या , गळ्यावरच्या निळसर जांभळट छटा हे सारं कसं लक्ष वेधून घ्यायचं . तसं फार जवळून कबुतर पाहण्याचा योग काही आला नव्हता . "दुरून डोंगर साजरे " या उक्तीप्रमाणे लांबूनच पाहिलेलं आणि साजरं वाटलेलं .

पण इथे राहायला आल्यापासून कबुतरांनी आमच्याशी जास्तच जवळीक साधलेली आहे . भर वस्तीत दुसर्या मजल्यावर आम्ही राहतो . हे घर घेताना आजूबाजूची माणसं , चांगले शेजारी , शाळा , ऑफिस , बाजार सारं काही जवळ या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि मनासारखं मिळालं म्हणून हरखून गेलो . पण ज्या दिवशी आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा या मोकळ्या घरात आमचं पहिलं स्वागत केलं ते या कबुतर महाशयांनीच .

बहुधा घराची खिडकी उघडीच राहिली होती . त्यातून हे महाशय सरळ आत आले पण बाहेर जायचा रस्ता काही त्यांना सापडेना . मग घरभर नुसती फडफड फडफड . त्यातून मी झुरळ , उंदीर , पाल अशा प्राण्यानाही घाबरून किंचाळणार्या जातीतली असल्याने माझा तर घासाच कोरडा पडला . तरीही शुक शुक करून त्याला हाकलण्याचा बराच निष्फळ प्रयत्न मी केला . त्याला बाल्कनीचे दार उघडून दिलं , सगळ्या खिडक्या उघडून दिल्या . म्हटलं बाबा जा आता , तुला सगळी दारं मोकळी करून दिलीयत . (बहुतेक त्यालाही आमच्या घरात आजच्याच मुहूर्तावर शिफ्ट व्हायचं होतं )

पण त्याचा हा बेत हाणून पाडायचा आम्ही चंगच बांधला . आमचं शिफ्टिंगचं काम राहिलं बाजूला आणि सगळे लागलो त्याच्या पाठीमागे , तसं ते जास्तच गोंधळून गेलं . कधी माळ्यावर तर कधी धुणं वळत घालायच्या दांडीवर , कधी ओट्यावर तर कधी बाहेरच्या खोलीत असा त्याचा मुक्त संचार सुरु झाला . शेवटी माझ्या "शूर " भावाने झडप घालून त्याला टोवेलमध्ये पकडलं आणि उचलून बाल्कनीत नेले तेव्हा कुठे आमची या समर प्रसंगातून सुटका झाली आणि आम्ही शिफ्टिंगचे काम करू शकलो . अशा तऱ्हेने या नव्या घरात सलामीलाच इथल्या कबुतरांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली .

त्या नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा तर त्यांनी मस्तपैकी कबुतरखानाच करून टाकला . बघावं तेव्हा कबुतरांच्या जोड्या बसल्यात आपल्या गुटर्गु ss गुटर्गु ss करत . असला वैताग येतो या त्यांच्या सततच्या आवाजाने की काही विचारू नका . जे लोकं आवडीने कबुतरं किंवा तत्सम पक्षी पाळतात न त्यांच्या बद्दल मला अतिशय नवल वाटतं . त्याचं सगळं काही ही लोकं कसं काय करत असतील आणि ते ही आवडीनं , त्याचं तेच जाणोत . पण मला तरी ही अशी पक्ष्यांची फालतू जवळीक अजिबात आवडली नाही . त्यातच भर म्हणून आमच्या बाल्च्कानीत सगळीकडे त्यांनी घाण केलेली . सगळीकडे त्यांच्या शिटच्या पांढऱ्या शुभ्र रांगोळ्यांच्या ठिपक्या पुसता पुसता माझा जीव जायचा . शिवाय काड्या , कापूस, पीसं , पान असं त्यांच्या घरट्याचं "बांधकाम साहित्य" इथे रोज येउन पडलेलं असायचं , ते वेगळंच . नंतर नंतर आमच्या बाल्कनीच्या माळ्याचा त्यांना इतका लळा लागला की सहकुटुंब सहपरिवार तर ते यायचेच , शिवाय चिमण्या , कावळे अशा आपल्या पक्षी मित्रांसकट कलकलाट करण्यात त्यांना धन्य वाटू लागले .
पहाटे कुठे आपण साखरझोपेत छान स्वप्न पहात असावं तेव्हा त्यांच्या फडफडाटानं झोपेचं चांगलं खोबरं व्हायचं. तेही एकवेळ ठीक होतं पण मी एवढ्या आवडीनं लावलेली तुळशीची रोपं भूईसपाट होऊ लागली . पालक , कोथिम्बिरिने मातीतून डोकं वर काढले रे काढले कि त्यांच्यावर हल्ला होऊ लागला . एकदा तर माझी तुळशीची कुंडी कठड्यावरून सरळ खाली पडून टाकली . बरं तर बरं खाली कुंच्या डोक्यावर पडली नाही.

मग मात्र माझं डोकंच सणकलं . म्हटलं आता बस झालं . यांचा कायमचाच बंदोबस्त केला पाहिजे .
त्याचदिवशी मग मी जाळी बसवणार्या माणसाला बोलावलं आणि मग काही दिवसातच आमची बाल्कनी जाळी लावून पुर्णपणे बंद करून घेतली . वरती पत्रा पण बसवून एक छोटी खोलीच केली . आता बाल्कनीच्या कठड्यावर बिनदिक्कत पणे कुंड्या ठेवता येतात . गुलाब, जुई , जास्वंद , तुळस, मोगरा अशी मस्त झाडं लावली.

पण तरीही कबुतरं आमच्या बाल्कनीच्या पत्र्यावर सारखी नाचत राहतात , पत्रा तडतडू लागतो , जणू ताशे वाजवल्यासारखा आवाज होतो . कधी कधी त्या जाळीवर कबुतरं क्षणभरासाठी टेकतात आणि माझ्याकडे आपल्या लालसर डोळ्यांनी मला खिजवल्यासारखे टकमक पाहतात आणि मी पुन्हा पुन्हा त्यांना म्हणत राहते " कबुतर जा जा जा …!!"

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसाने प्राण्या-पक्ष्यांचा विचार न करता झाडे तोडून सगळीकडे बिल्डिंगा बांधून ठेवल्या तर बिचाऱ्या प्राण्या-पक्ष्यांनी कुठे जायचे?

कबुतरांची वाढलेली संख्या ही निश्चितच एक गंभीर समस्या आहे. या संदर्भातले काही लेखः-

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/articleshow/215...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/42912912.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/asthma/article...

http://www.loksatta.com/chaturang-news/pigeon-allergy-1009785/

हा अनुभव मुंबई मध्ये अगदी सामान्य झालाय!! उच्छाद मांडतात कबूतरं! त्यांना दाणे घालणार्‍या "पक्षी मित्रां" चीच धन्य आहे!

कबुतरांसारखे निरुपद्रवी पक्षी सुद्धा एवढे उपद्रवी असतात हे खरंच अनुभव घेतल्याशिवाय कुणाला कळणारच नाही …
होय ना !!

तुमच्या अनुभवाबद्दल वाचून वाईट वाटले

पण

पांढरे कबूतर शांततेचे प्रतीक आहे.
करडे कबूतर प्रेमाचे प्रतीक आहे.
आपण माणसे मात्र कबूतरांशी नेहमी दुजाभाव करतो. कावळ्यांना आपले पूर्वज समजून खाऊ पिऊ घालतो, मात्र तेच खाणे खायला कबूतर आले की हाकलून लावतो.
कबूतर शीट करतात पण नेहमी जमिनीवर करतात. कावळे मात्र झाडावर बसून झाडाखाली उभे असलेल्यांवरही करतात.
कावळ्यांचा काव काव कर्कश्य असतो, पण कबूतरांच्या गूटर गूटर गूटर गूटर मध्ये संगीत असते.

सुमुक्ता आणि रून्मेश …. आपल्या मताशी सहमत …

पण जो या पक्षांमुळे मला त्रास झाला तो अनुभव " ललित" रुपात मांडायचा मी
प्रयत्न केलाय . यात कोणाच्या भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही

कृपया हे समजून घ्यावे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

कविता, अहो ते अशीच दुसर्या बाजुने कबूतरावर चार वाक्यांचा निबंध लिहिला ईतकेच. विरोधाला म्हणून नाही.
बाकी आपल्या अनुभवाशी सहमत आहेच. कबूतरांची घाण खूप असते. जिथे खातात तिथेच शिटतात, पिसांचा कचरा, एकूणच दर्प. त्रास होतोच. म्हणून वरही म्हणालोय की अनुभवाबद्दल वाईट वाटले.
पण सुमुक्ता यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची हक्काची जागा, झाडांवरही आपणच तर अतिक्रमण केलेय.

कबुतरांसारखे निरुपद्रवी पक्षी सुद्धा एवढे उपद्रवी असतात हे खरंच अनुभव घेतल्याशिवाय कुणाला कळणारच नाही >>>>>>> +१११११

ज्याला येथे कबूतर म्हंटले जात आहे तो पक्षी म्हणजे पारवा आहे. करडे कबूतर! ह्या पक्ष्याबाबत पक्षीतज्ञ किरण पुरंदरेंनी मागे एक मोठा लेख लिहिला होता. हा पक्षी बेसुमारपणे वाढत चालला आहे. त्याला आवर्जून दाणे टाकणारेही तसेच बेसुमार वाढत चालले आहेत. ह्या पक्ष्याची विष्ठा इन्फेक्शन्सना कारणीभूत ठरते असे त्यात म्हंटले गेले होते. आजकाल एरवी भयावह वाटणारे कावळे ह्या पारव्यांना घाबरू लागले आहेत. हा पक्षी दिसायला गोंडस असतो हा एक भाग सोडला तर तो खरा उपद्रवी पक्षी ठरतो. त्याची संख्या अमाप वाढत असल्याने असंतुलन होऊ लागले आहे असे लेखात म्हंटलेले होते. वर ऋन्मेष ह्यांनी त्याच्या गुटर्र गु ध्वनीत संगीत आढळते असे लिहिले आहे तर पुरंदरेंच्या लेखामध्ये त्या ध्वनीला खिन्न करणारा आवाज असे म्हंटलेले होते. वर जो खोट्या घुबडाचा उपाय सांगितला आहे तो खरोखरच प्रभावी आहे. घुबडच नव्हे तर विचित्र दिसणारे एखादे जुनाट बाहुले जरी टांगून ठेवले आणि ते वार्‍याने हालत राहिले तरी हे पारवे तिथे फिरकत नाहीत. बाहुले मात्र पराकोटीचे विद्रूप करून मगच टांगावे. टांगले की ते हालते आणि बुजगावण्यापेक्षा सरस परफॉर्मन्स देते. घरात मांजर पाळण्याची इच्छा अनेकांना नसते. पण मांजर ह्या पारव्यांचा जीव घ्यायला टपलेले असते. सोसायटीत एक दोन मांजरे ठेवून द्यावीत. त्यांना आठवड्यातून एक पारवा मिळाला तरी पारवे घाबरून राहतात. कावळ्यासाठी आत्मीयतेने ठेवलेले अन्नपदार्थ हे पारवे लंपास करतात हे अगदी खरे आहे. मध्यंतरी घरातील उंदराला बाहेर काढण्यासाठी कोल्ह्याचे मूत्र वापरावे असा एक उपाय सुचवण्यात आला होता मायबोलीवर! सध्याची पारव्यांची संख्या पाहिली तर एखादा कोल्हा घाबरूनच मुतेल अशी अवस्था आहे.

एक नंबरचा भित्रट पण तितकाच उपद्रवी असा हा पक्षी आहे. एक दिवस असा येईल की पारवे म्हणू लागतील की हल्ली माणसे फार झाली आहेत जगात!

-'बेफिकीर'!

आपण माणसे मात्र कबूतरांशी नेहमी दुजाभाव करतो. कावळ्यांना आपले पूर्वज समजून खाऊ पिऊ घालतो, मात्र तेच खाणे खायला कबूतर आले की हाकलून लावतो.
कबूतर शीट करतात पण नेहमी जमिनीवर करतात. कावळे मात्र झाडावर बसून झाडाखाली उभे असलेल्यांवरही करतात.
कावळ्यांचा काव काव कर्कश्य असतो, पण कबूतरांच्या गूटर गूटर गूटर गूटर मध्ये संगीत असते. >>>
बापरे, केवढे गैरसमज !!!

बेफिकीर, आमच्या सोसायटीत भटक्या कुत्र्यांना ( अजूनतरी ) मज्जाव असल्याने भरपूर मांजरं झाली आहेत पण तरी कबुतरांचा उपद्रव प्रचंड आहे. अतिशय लोचट पक्षी आहे. कितीही उडवलं तरी दाद देत नाहीत.

माझा मुलगा मला एकदा म्हणाला,"Pigeons are so weird ...जेव्हा बघावं तेव्हा एकमेकांशी फाईटच करत असतात." Wink
खरोखरच सतत पिल्लांची फॅक्टरी घालून प्रजा वाढवण्याव्यतिरिक्त ह्यांना दुसरे काम नाही ! Angry

ज्याला येथे कबूतर म्हंटले जात आहे तो पक्षी म्हणजे पारवा आहे. करडे कबूतर!
>>>>
येस्स अ‍ॅक्चुअली .. पारवा .. आमच्या ऑफिसमध्ये एका लंचब्रेक चर्चेत मला हे ज्ञान नुकतेच मिळाले अन्यथा मी सरसकट कबूतरच समजायचो.

वर ऋन्मेष ह्यांनी त्याच्या गुटर्र गु ध्वनीत संगीत आढळते असे लिहिले आहे तर पुरंदरेंच्या लेखामध्ये त्या ध्वनीला खिन्न करणारा आवाज असे म्हंटलेले होते.
>>>>>
असू शकते. मुळात कुठल्याश्या ध्वनीने मी खिन्न व्हावे असा माझा स्वभाव नसल्याने नो कॉमेंटस.
पण माझ्यापुरते बोलायचे तर मला एक सवय आहे. कधीतरी एकांतात घशातील पडजीभ एका विशिष्ट पद्धतीने हलवत मी हा गुटुर्र गर्रर आवाज काढत राहतो. एंजॉय करतो.
तर माझे वरचे विधान "गुटर्र गु ध्वनीत संगीत आढळते" हे सर्वांना लागू नसल्याने मागे घेतो Happy

घुबडाचा उपाय करुन पाहायला हवा. मी मध्ये तिखटाची पूड त्यांच्या बसण्याच्या जागेवर घालून पाहिली आणि चमकत्या टेप्स लावून पाहिले ( अजय ह्यांच्या धाग्यावरुन प्रेरणा घेऊन ). दोन्ही उपाय सपशेल फेल गेले !

घराच्या बाल्कनी आणि सगळ्याच डक्ट्समध्ये कबुतरांचा भयंकर उपद्रव आहे ( डक्टसना जाळ्या लावल्या तरी कबुतरे आत घुसतात. कशी ते कळत नाही ! ह्यापुढे काही करता येणार नाही असे सोसायटी म्हणते )
बेडरुमच्या छोट्या खिडकीबाहेर असलेल्या डक्टमध्ये तर उच्छाद मांडलाय. सतत अंडी, पिल्लं ही सायकल आणि इतकी घाण करतात तिथे फडफड करुन की ती खिडकी उघडताच येत नाही !

अगो,

म्हणूनच मी मागे एक शेर केला होता. (तर रिया म्हणाली हा शेर सोडून बाकीची गझल आवडली)

सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी?
सध्या कबूतरांचा सीझन असेल बहुधा

गझलेत उपहासही असतो हेच तत्त्व अजून मराठी गझलेत स्थिरावलेले नाहीये.

अतिशय लोचट पक्षी आहे. कितीही उडवलं तरी दाद देत नाहीत.
>>>
कदाचित तो पक्षी माणूसघाणा नसून माणूसप्रेमी असेन Happy

थोडेसे अवांतर - मुंबईत कबुतरखाना म्हणून जो भाग आहे तिथे दाणे खायला जमणारे पक्षी पारवे असतात की कबुतरे?

बेफिकीर, सॉरी, पण मला शेर कळलाच नाही नीट.

मुलगा त्यांच्यातल्या रांगड्या प्रेमालाच फाईट समजला हो Lol

तेच खाणे खायला कबूतर आले की हाकलून लावतो. >>> आँ? अन् रस्तोरस्ती दुकानदार आणि अनेक लोकं या पारव्यांना दाणे घालतात त्याचं काय?
अतिक्रमणाचा मुद्दा बरोबर आहे पण मग कावळ्यांसोबत दुजाभाव का म्हणे? किंबहुना सगळ्याच पशुपक्ष्यांना हे लागू होईल. मग येऊदे की बिबटे बिन्धास शहरात आणि फिरूदे. त्यांच्या हक्कांच्या जागांवर पण माणसाने अतिक्रमण केलं आहेच.

घराच्या बाल्कनी आणि सगळ्याच डक्ट्समध्ये कबुतरांचा भयंकर उपद्रव आहे ( डक्टसना जाळ्या लावल्या तरी कबुतरे आत घुसतात. कशी ते कळत नाही ! ह्यापुढे काही करता येणार नाही असे सोसायटी म्हणते )

अगो , तुमच्यासारखाच प्रश्न मलाही पडतो . आमच्या इथेही सर्व डक्टस पूर्ण बंद केलेत तरीही हे कबुतर … सॉरी …. हे
पारवा महाशय कुठून येतात कुणास ठाऊक … " तेरा साथ कभी ना छोडेंगे " म्हणत म्हणत … Lol

लेखतील भावनेशी सहमत . ह्या कबूतरांनी उच्छाद मांडलाय आमच्याकडे सुद्धा . सगळ्या फूलझाडांची वाट लावून टाकलिये. कितीही हाकलल तरी येतात परत . प्लस त्यांची पिस , विष्ठा यांचा उपद्रव निराळाच् . आणि हो ते अंडी घालण प्रकरणही आहेच . पूर्ण बाल्कनीची वाट Angry

वर सांगितलेला घुबडाचा उपाय करुन पाहायला हवा

कबूतर हेट क्लबचे बरेच सभासद आहेत तर !
मुंबईतील अनुभवांबद्दल थोडे लिहायला हवे. कबुतर आता दिसतात तेवढी पुर्वी दिसत नसत. दादरला कबुतर खाना पुर्वीपासूनच होता, तिथे ती दिसत. गेटवे जवळही ती नंतर आली. परिंदा सारख्या सिनेमातून ही ठिकाणे नंतर जास्त लोकप्रिय झाली आणि तिथली संख्या अतोनात वाढली.

पुर्वी ती अशी थेट घरात येत नसत, पण जूनी देवळे आणि इमारती यावर मात्र दिसत असत.

नंतर अचानकपणे मुसलमान लोकांनी ती जास्त प्रमाणात पाळायला सुरवात केली. नंतर जैन धर्मीयांनी पण त्यांना ज्वारीचे दाणे घालणे हे पुण्याचे मानून घेतले ( थेट उल्लेख करतोय, त्याबद्दल त्या धर्मात काही असेल तर वाचायला मिळावे, या हेतूने ) आणि मग त्यांची संख्या अतोनात वाढली. तसेच माणसांपासून धोका नाही, असा काहीतरी विचित्र समज त्या पक्ष्यांनी करून घेतलाय. मला भिती वाटतेय कि काही वर्षांतच ती माणसांवर हल्ला करण्याइतकी धीट होतील.

तसा हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. तो घरटे वगैरे करत नाही. त्यांच्या विणीचा खास मोसम नसतो, वर्षभर ते चालूच असते. हा पक्षी पिल्लाना दूधसदृष्य एक स्त्राव भरवतो. हा पक्षी मान खाली ठेवूनच पाणी पिऊ शकतो.

दुबईमधील अनेक उंच इमारतीत वापरलेल्या कांचावर त्यांची विष्ठा साठत जात असे. तसेच त्यांच्या विष्ठेतील रसायनांमूळे त्या इमारतीत वापरलेल्या धातूंवर पण वाईट परीणाम होत असे, म्हणून त्यांना हाकलवण्यासाठी प्रशिक्षित ससाणे वापरले जातात.

कबूतरांच्या विष्ठेतील रसायनांचा वापर, मोरोक्को मधे कातडी कमावण्याच्या उद्योगात केला जातो.

कबूतर सहसा झाडावर बसलेले दिसत नाही, वीजेच्या तारेवरही ते क्वचितच असते. त्याला इमारतीच्या आश्रयानेच राहणे आवडते. त्यांना बसण्यासाठी सपाट जागा हल्ली इमारतीत नसते म्हणून ती घरात घुसू पाहतात.

जसे मनेका गांधींच्या धोरणांमूळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय तसाच धार्मिक कारणांसाठी या पक्ष्यांचा. त्यांच्या बंदोबस्त आता मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे.

जैन धर्मीयांनी पण त्यांना ज्वारीचे दाणे घालणे हे पुण्याचे मानून घेतले >>> जैनच नव्हेत हो, पटेल वगैरे गुजराती समाजातील बरेच जण सकाळी उठल की कबुतरांना दाणा, सुर्याला पाणी अन मुंग्याना साखर, गाईला पोळी, कुत्र्यांना पारले जी इ.इ. गोष्टी रोजच करताना पहाते.

भावाकडे खूप त्रास होता. त्यांनी खरे दिसणारे एक कुत्रे सॉफ्ट टॉय विकत आणून बाल्कनीत ठेवलेय. त्याची पोझीशन अधून मधून बदलावी लागते.

त्या समाजात या सर्व गोष्टी करुन धंद्यात बरकत आणि शत्रू दूर राहतात असा समज आहे. (मला फक्त एका दुकानत टांगलेलं पोस्टर होतं त्यावरुन माहित आहे.मुंग्याना साखर आणि कबुतरांना दाणा सोडून बाकी गोष्टींशी सहमत.)

कविता, मस्त लिहिलयस.. Happy
कबुतर हा एक बिनडोक पक्षी आहे. माझ्यासारख्या शांत आणि शांतताप्रेमी माणसालाही या पक्ष्याने प्रचंड चीड आणली. बंदूक घेऊन मारण्याची भाषा बोलू लागलो होतो मी. Angry Proud
आता आतापर्यंत बाहेरच असणारी ही कबुतरं हल्ली तर चांगली चार पाचाच्या संख्येने सरळ घरात यायला लागली फडफडाट करत. मग आमची धावाधाव त्यांना उडवण्याकरता..
आमच्या flower bed मध्ये त्यांची अंडी तर दर दोन आठवड्यांना.. मग ते काढायचं आणि बाहेर ठेवायचं. कावळेमहाराज घेऊन जायला टपलेले असायचे.. Proud अंड्यांची मेजवानी कावळेमहाराजांना देण्याचा कार्यक्रम बाळ गोपाळांमध्ये चांगलाच प्रिय आहे. अंड दिसलं रे दिसलं की आमची छोटी आर्या तिच्या तशाच छोट्या मित्रमंडळींना उत्साहाने वर्दी देते. आणि मग या कार्यक्रमाकरता सगळी बच्चेमंडळी आमच्याकडे. मग अंड उचलून कावळ्याकरता कोण ठेवणार याकरता भांडणं. नंतर तर या मंडळींनी आपापले नंबर ठरवले. आज कोण, next time कोण, असे.
शनिवारी जाळी लावायची ठरवलं, घेऊनही आलो. त्याच दिवशी बाहेरून आल्यावर खिडकीचे sliding Door उघडायला लागलो तर ते दुसर्‍या टोकाला कशाला तरी अडकले. म्हटलं जात का नाहीये पलीकडे म्हणून जरा जोर लावला. दोन तीनदा सणसणीत धक्के दिले. म्हटलं एखादा कपडा अडकला असेल. पडद्यामुळे दिसत नव्हते. जे काही अडकले ते काढण्याकरता हात घातला तर हाताला काहीतरी वेगळाच स्पर्श झाला. बघतो तर कबुतर अडकले होते. च्यामारी.. Angry Angry
खरतर तसच दाबावसं वाटलं होतं sliding door.. पण म्हटलं शेवटी शेवटी हत्या नको. Proud
हळूच त्याला सोडवले तर ते माझ्या पुढ्यात(??? :राग:) हॉलमध्ये उतरले आणि तुरू तुरू चालत या टोकातून रुबाबात उडून गेले.
लगेचच कामाला लागलो आणि हॉलमध्ये मी स्वतः जाळी बसवली. (अथक ४/५ तासांच्या मेहनतीने)
आता येत्या शनिवारी बेडरूमच्या खिडकीला बसवायची आहे जाळी..

आम्ही हुश्श् केलं पणं आता कावळ्याला अंड देता येणार नाही म्हणून आमची आर्या आणि तिची मित्रमंडळी मात्र खूपच नाराज आहेत.. Proud

संपत्तीत वाढ होते असा समज असल्याने बरेच लोक दाणे टाकुन ठेवतात पक्ष्याकरींता ,फक्त कबुतर पक्षी करीता नव्हे.

मी तर एकदा हौसेने घरट करु दिल त्यांना खिडकी मधे,मग ती त्यांनी बहुधा पर्मनंट जागा मिळाली अस समजुन रतीब च सुरु केला अंड्याचा Sad मग मात्र ते सगळ साफ आनि स्वच्छ करुन घेतल आनि पुन्हा त्यांना घरट करु दिल नाही.जागा शोधात त्यांनी एकदा गुलाबाच्या कुंडीत ही घातल होत अंडं.नंतर मात्र २ दिवसांनी अंड आपोआप गायब.काय झाल नक्की काय माहित.फुटले असेल तर आजुबाजुला काहीच नव्ह्त.त्यांच्या शी चा आनि पिसांची प्रचंड घाण पसरत जाते.यक्क्क....
उपद्रवी पक्षी आहे हे निश्चित .

Pages