आधुनिक सीता - ३५ (शेवटचा भाग)

Submitted by वेल on 21 October, 2015 - 13:13

http://www.maayboli.com/node/55743

फातिमा माझ्या हातात तिकिट आणि पासपोर्ट ठेवून गेली आणि मला हर्षोल्हासाने नाचावसं वाटू लागलं. ओरडून सगळ्या जगाला सांगावसं वाटू लागलं की मी परत जाणार. मी माझ्या देशात परत जाणार. माझ्या सागरबरोबरच्या लग्नाचं भविष्य काय असेल मला माहित नव्हतं तरी मला माझ्या माणसात परत जायला मिळणार ह्याचा आनंद खूप जास्त होता. आज मी तो आनंद शब्दात मांडूच शकत नाही. अति आनंदाने मी ओक्साबोक्शी रडू लागले. जेनी तिथे आहे तिला काही सांगावं हे माझ्या लक्षातच नाही आलं.

माझ्या चेहर्‍यावरचे भाव जेनीने पाहिले आणि ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिने मला खूणेनेच विचारलं विमान प्रवास का? मी आनंदातिरेकाने तिला मिठीच मारली. आणि तसच रडत रडत मी तिला सांगायला सुरुवात केली की मी परत जाणार आहे. पण माझ्या तोंडून दोन शब्द बाहेर पडले असतील नसतील तिने मला तोंडावर हात ठेवून गप्प केले. आणि खूणेनेच माईकची आठवण करून दिली. मी तिला हातातला पासपोर्ट आणि तिकिट दाखवलं. खरंतर मीही ते पूर्ण वाचलं नव्हतं. मी माझा पासपोर्ट उघडून पाहिला. 'सरीता सागर साने' हे नाव वाचून मला धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. तिकिटही ह्याच नावाने होतं. हे नाव लिहिलेला पासपोर्ट आणि तिकिट हातात मिळणं हीच मुळी माझ्या स्वातंत्र्याची खात्री होती.

रात्री फातिमा स्वतः माझी बॅग घेऊन आली. सोबत रफिकची बहिण सलमा आणि बडी अम्मी होती. फातिमाने बॅग जेनीच्या हातात दिली आणि थोड्या वेळासाठी त्या खोलीतून बाहेर जाण्यास सुचवले.

बडी अम्मी माझ्या बाजूला बसली आणि माझे हात तिने हातात घेतले. आणि ती माझ्याबरोबर बोलू लागली. फातिमा तिच्या बोलण्याचे भाषांतर करून मला सांगू लागली. तिने मला बेटी म्हणून माझी माफी मागितली. रफिकच्या हट्टापुढे कोणाचच काही चालत नाही आणि त्यामुळेच मला पळवून आणून त्या घरात असे डांबून ठेवावे लागले असे तिने सांगितले. आणि ह्याबद्दल एक बाई म्हणून आता तिला स्वतःलाच लाज वाटत होती. मला कळेचना मी माझ्या आजी किंवा आई बरोबर बोलत होते की सौदी मधल्या कट्टर अरब बाईबरोबर. पण तिच्या पुढच्या वाक्याने सारा खुलासा झाला. मी स्वप्नात सुद्धा तिला अथवा तिच्या कुटुंबाला दोष देऊ नये अथवा त्यांच्यासाठी बददुवा मागू नये म्हणून ती मला विनंती करत होती. फातिमाला मी सांगितलं की जे झालं त्याबद्दल मी बडी अम्मीला किंवा तिच्या मुलाला माफ करेन किंवा नाही हे माझं मलाच माहित नव्हतं पण मी बददुवा मात्र नक्कीच देणार नाही.

एवढं बोलून झाल्यावर बडी अम्मी निघून गेली. आणि सलमाने मला गच्च मिठी मारली आणि आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजी मध्ये ती मला मिस करेल, तिला माझी आठवण येईल, मी स्वतःची काळजी घ्यावी आणि तिला कधीच विसरू नये म्हणून मला सांगू लागली. फातिमाने थोड्या वेळाने तिलाही परत पाठवले.

आणि फातिमाने मला विचारले की मला तिच्याकडून काही हवे आहे का. जे झाले ते माझ्या आयुष्यातून ती पुसून तर टाकू शकत नव्हती पण त्याबदल्यात मी मागितलेली आणि ती देऊ शकत असलेली कोणतीही वस्तू कितीही महाग असली तरी किंवा कितीही पैसे ती मला द्यायला तयार होती. मला हसूच आले. मी काय मागणार होते तिच्याकडे. मी तिला मला काहीच नको असल्याचे सांगितले. तरीही ती हेका सोडेनाच. मी तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात अजीजी होती. सिग्नलवरच्या वस्तू विकणार्‍यांच्या नजरेत असते ना. अगदी तशीच. काहीतरी घे. काहीतरी घे आणि आम्हाला ह्यातून मुक्त कर.

"फातिमा मला खरच काही नको आणि खरच मी तुला किंवा तुझ्या कुटुंबातील कोणालाच कधीच आठवणार नाही. बददुवा तर कधीच देणार नाही. त्यासाठी सुद्धा मला इथल्या कोणाचीच आठवण ठेवायची नाही. आणि तुला मला काही द्यायचच असेल तर मला सोबत म्हणून इथून जेनीला पाठव. माझ्याबरोबर तिच्याही तिकिटाची व्यवस्था कर. मला इथून एकटं परतायची भीती वाटते आहे आणि तुझ्या घरच्यांखेरीज मी फक्त तिलाच ओळखते. गेल्या तीन चार दिवसात तिने माझी खूप काळजी घेतली आहे. मी मुंबईत माझ्या कुटुंबियांना भेटेपर्यंत मला तिची सोबत होईल आधार मिळेल असं मला वाटतं. येऊ देशील का तिला."

"मी करू शकेन तिच्याही तिकिटाची व्यवस्था. पण ती इथली ह्या हॉस्पिटलची एम्प्लॉयी आहे. तिला भारताचा व्हिसा मिळणार नाही. खरेतर मी इथे येता येता मला फोन आला होता की तुला आज रात्रीच इथून हलवून भारतीय वकिलातीमध्येच ठेवायचे आहे. ही आपली शेवटची भेट. खरंतर आपल्या भेटीचे शेवटचे काही मिनिट्स."

फातिमा आणि मी बोलत होतो तितक्यात हॉस्पिटलच्या स्टाफने भारतीय वकिलातीचे अधिकारी मला नेण्यासाठी आले असल्याची बातमी दिली. हॉस्पिटलच्या स्टाफपैकीच एकाने माझी बॅग भारतीय वकिलातीच्या गाडीत नेऊन ठेवली. अधिकार्‍यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवून मला सुरक्षितपणे भारतात पोहोचवण्याची हमी घेतली. शिवाय सौदी अरेबियाचे पोलिससुद्धा माझ्या सुरक्षेसाठी असणार होते. जेनी आणि फातिमाला एकदा घट्ट मिठी मारून मी भारतीय वकिलातीच्या काळ्या काचांच्या गाडीत जाऊन बसले.

आणि इथून सुरू झाला माझा माझ्या कुटुंबियांपर्यंत पोहोचायचा प्रवास. पोलिस, वकिलातीचे अधिकारी, विमान कंपनीचे अधिकारी ह्यांच्या नजरेखालचा सुरक्षित प्रवास.

***************************** The End of Saudi Nightmare****************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल आता इथुन खरी गोष्ट सुरुवात होइल पण तुला आधुनिक सीता, अग्निदिव्य!
आधुनिक सीता, वनवास! असा दुसरा, तिसरा भाग काढावा लागेल. आजकल का इष्टाइल है!
हलकेच घे:;-)

`आधुनिक सीता` आत्ताच वाचून संपवली आणि खांदे दुखायला लागले की राव! हां, म्हणजे मी काही त्या सीतेचा हनुमान इत्यादी नव्हतो. पण पस्तीस भाग मागे-पुढे करून वाचले. संगणकाच्या कळा दाबून आधी हाताला आणि मग पर्यायाने खांद्याला कळा आल्या.

सुरुवातीचे दोन-तीन भाग सोडले, तर एक खट्टी सगळे भाग वाचले. शेवटच्या सात-आठ भागावरच्या प्रतिक्रियाही वाचल्या. मधला चर्चेचा धागाही वाचला.

कादंबरीचं नाव काही आवडलं नाही. अगदीच लेबल हेडिंग आहे. मालिकेप्रमाणेच क्रमशः भागात बरेच काही मुद्दे येतात आणि पुढे क्रमशः ते हवेत विरून जातात. त्या हॉस्पिटलमधल्या यंत्रांमध्ये बदल कुणी केले? जेनीने का? पण कॅमेऱ्यात तर कुणीच अडकलेलं नाही ना? आणि भारतीय महिलेला मूल होऊ नये म्हणून ही तजवीज? म्हणजे काय?

गायनॉकॉलॉजिस्ट असलेली फातिमा नवऱ्याच्या प्रेमपात्रासाठी सहा-आठ महिने सरिताजवळ राहते, इंग्रजी येत असूनही येत नसल्याचं सोंग वठवते... हे सगळं का? तर नवऱ्याच्या प्रेमासाठी! म्हणजे खरं सांगायचं तर तीच खरी `पतिव्रता.` आधुनिक सती-सावित्री. अरबस्तानातील अत्याधुनिक सीतामाउली!

फातिमा आणि सागर यांचं बोलणं झालेलं असतानाही त्यानं सरिताला ती डॉक्टर असल्याबद्दलची कल्पना कशी दिली नाही? फातिमा म्हणते - सागर तेवढा वाईट नाही... म्हणजे केवढा वाईट आहे किंवा होता?

आणखी एक म्हणजे - एखादा माणूस सहा महिने सूर्यप्रकाश न घेताही टुणटुणीत (किंवा ठणठणीत) कसा काय राहतो? आणि ते कॅल्शियम सी किंवा डी यांच्या सप्लीमेंट्सनी वजन वाढतं का खरंच? कपडे अल्टर करायला लावण्याएवढं? हे आक्षेप नाहीत, तर सामान्य वकुबाच्या वाचकाच्या शंका आहेत.

या सगळ्यात सागरची भूमिका कुठेच कळत नाही. त्याला तुरुंगात का टाकतात, हेही तेवढं नेमकेपणानं स्पष्ट होत नाही. म्हणजे सौदीत त्यानं बायकोचा घातपात केला, या संशयावरून भारतात अटक करता येते का? असो. (वाचणाऱ्याची) आकलनशक्ती कमी असल्याचाही परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही इथे.

एवढे तीस-एक भाग सलग वाचायचे म्हणजे अवघडच. पण पस्तीस भाग लिहिणंही काही खायचं काम नाही राव! एकूण कादंबरीला दहापैकी सहा मार्क देईन.

कादंबरीची सांगता `जिथे सागरा सरिता मिळते..` अशा तेवढ्याच सांकेतिक गाण्याने व्हायला हवी होती!

ईति साता उत्तरी कहाणी, पाचा उत्तरी सुफळ(?) संपूर्ण...
शेवट अचानक बजेट संपलेल्या शिणेमा सारखा झाला.

शेवट अचानक बजेट संपलेल्या शिणेमा सारखा झाला. ++++++++++१००००

कथावीज चांगले असतांनाही कादंबरी :
- बांधून ठेवत नाही
- शेवट तर अगदीच कादंबरी संपवायचीच अश्या हेतूने गुंडाळण्यात आलाय.

तसाही गॅप मुळे कुतुहल संपलेच होते.

पण लेखनाची हातोटी चांगली आहे हे मात्र नक्की...

शेवट अचानक बजेट संपलेल्या शिणेमा सारखा झाला.> +१११११११११११११११११

शेवट खूपच उरका पाडल्यासारखा झाला. या कथेचे पहिले काही भाग खरंच खूप छान, उत्कंठावर्धक होते, शेवटचे भागही त्यात तोलाचे झाले असते तर कथा वेगळ्याच उंचीवर गेली असती. शेवटचे भाग म्हणजे कथा पटकन संपवून टाकू म्हणून गुंडाळल्यासारखे वाटले Sad

शेवट हाच होणार हे शीर्षकावरून स्पष्ट झाले होते. लोकांनी उगीच आधुनिक सीता म्हणजे त्या सितेसरखि वर्षभर अशोकवनात बसून न राहता आपलया सुटकेचे आपणच प्रयत्न करेल अशी समजूत करून घेतलेली.

संपवल्याबद्दल आभार. एकाच भागात संपण्याजोगी कथा उगीच ३५ भाग लाम्बवली. असो.

लोकांनी उगीच आधुनिक सीता म्हणजे त्या सितेसरखि वर्षभर अशोकवनात बसून न राहता आपलया सुटकेचे आपणच प्रयत्न करेल अशी समजूत करून घेतलेली. >>>> +१.

घ्या संपली?
अरे ती भारतात आल्यावर तीचे नातेवाईक कसे accept करतात ते नाही दाखवल?
की सीते सारखच तीला पण कोणा परक्याचा आधार घ्यावा लागतोय.
शेवट खरच नाही पटला.

शेवट मला आवडला कि नाही.. कथा चांगली होती कि वाईट.. याआधी, ३५ भागांची हि भलीमोठी कथा पुर्ण केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन !!!

माझ्यासारख्या आरंभशूर मुलीने हि कथा लिहायला घेतली असती तर काही भागातच सोडून दिली असती. (आणि माझ्या लिखाणाची Quality बघता माझ्यामागे कथा पुर्ण करा असा धोसरा एकाही वाचकाने लावला नसता.) Biggrin

तर सांगायचा मुद्दा असा कि तुझ्या लिहिण्याची शैली मस्त आहे. त्यामुळेच वाचक पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात असत आणि काही ना काही कारणाने तुझ्याकडूनही खुप उशीर होत गेला. तरी सर्व अडथळ्यांमधुन तू हि कथा पुर्ण करत आलीस आणि केलीस.

तुझ्याकडून अजुन छान कादंबर्‍यांची वाट पाहात आहोत. फक्त पुढच्या वेळी आधी कथा पुर्ण होईपर्यंत अप्रकाशित ठेव आणि मस्त तुझ्या मनाप्रमाणे खुलवुन-फुलवुन झाली कि इथे पोस्ट कर. म्हणजे तुझ्या कथेवर आणि कथाबीजावर, सादरीकरणावर इतर कोणत्याही दबावाचा प्रभाव पडणार नाही आणि ती तुझ्या मनासारखी पूर्ण होईल. (आताही काही लोक शेवट गुंडाळल्यासारखा वाटतोय म्हणतात. कथा घाईघाईत पूर्ण करण्याच्या दबावाखाली असं झालं असावं कदाचित).

तुझ्या पुढच्या कादंबरीच्या प्रति़क्षेत Happy

तुझ्याकडून अजुन छान कादंबर्‍यांची वाट पाहात आहोत. फक्त पुढच्या वेळी आधी कथा पुर्ण होईपर्यंत अप्रकाशित ठेव आणि मस्त तुझ्या मनाप्रमाणे खुलवुन-फुलवुन झाली कि इथे पोस्ट कर. म्हणजे तुझ्या कथेवर आणि कथाबीजावर, सादरीकरणावर इतर कोणत्याही दबावाचा प्रभाव पडणार नाही आणि ती तुझ्या मनासारखी पूर्ण होईल. (आताही काही लोक शेवट गुंडाळल्यासारखा वाटतोय म्हणतात. कथा घाईघाईत पूर्ण करण्याच्या दबावाखाली असं झालं असावं कदाचित).>>+१
सरिता इथे आल्यावर काय होते हे वाचायला निश्चित आवडले असते. कारण ती भारतात येईलच हे कुठेतरी माहित होते. ३५ व्या भागात फक्त तेवढेच कळले. तिचे आई बाबा, आजी, सागर या सगळ्यांचेच view पाहायला आवडले असते. या कथेचा हा शेवट नाही. सुरवात असली पाहिजे. अस आपल माझ मत.
वेल ताई. बाकी आवडली कथा Happy बाकीच्याही पूर्ण करा. यावरच्या प्रतिक्रियांचा त्या कथांवर प्रभाव पडू देऊ नका

वेल.. तुमची लिखाणाची शैली खूप छान आहे.. नावामुळे कथेबद्दल खूप उत्सुकता होती.. पण पहिले काही भाग सोडले तर नंतरचे भाग टाकायला तुम्ही खूपच वेळ लावलात, सुसूत्रता नव्हती ( तुमच्याही काही अडचणी होत्या.. सो त्या बद्दल बोलू शकत नाही) पण त्यामुळे कथेतील सर्व रसच निघून गेला माझा.. आणि हा शेवटचा भाग तर अतिशय गुंडाळलेला आहे असं वाटलं मला.. म्हणजे ती भारतात तर जाणारच होती, पण त्यातच तिची इतिकर्तव्यता आहे का? घरी गेल्यावर तिच्यासोबत पुढे काय झालं, तिला घरच्यांनी कसं स्वीकारलं, सागरचा काय स्टँड आहे? याबद्दल काहीच कळतं नाही, की सर्व चित्रपटांप्रमाणे कथा Happy Note वर संपून 'ते सुखाने नांदू लागले' असं काहीतरी तुम्हाला अभिप्रेत आहे आणि ते आमचं आम्हीच समजून घ्यायचं आहे?
या शेवटातून कथेचे जे नाव आहे ' आधुनिक सीता' ते कसं जस्टीफाय होतं, त्याची काय लिंक आहे तेही कळत नाही. plz या सर्व मुद्यांवर जरा प्रकाश टाका..
पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा...!

नाही आवडला हा भाग. उरकते बार वाटले. आधुनिक सीता नाव का ठेवले? सीताच का नाव ठेवले? राम उर्फ सागरने तिला सोडवायला काय कष्ट घेतले? जाउ द्या सम्पली ना.

सरिताच्या नजरेतून ही कथा असल्यामुळे अनेक प्रश्नान्ची उत्तरे मिळत नाही ..
असो ... कथा छान झाली ..
अभिनन्दन वेल !!

वेल कथेची सुरवात खूप छान झाली होती. काहीतरी छान वाचायला मिळणार असे वाटत होते कारण सुरवातीला खूप छान फुलवलेलीस कथा. पण शेवटचा भाग गुंडाळल्या सारखा वाटला. अर्थात तुझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आणि हेल्थ ईशुज असल्यामुळे तसे करावे लागले असेल. पण वेळ मिळाल्यास तुला जशी कथा अभिप्रेत होती तशी लिहून काढ. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

कथा आवडली फार पण भारतात गेल्यावर सरीतच नक्की काय झालं हे कळलेलं हवं होत सागर तिला पुन्हा भेटला का घरातले तिच्याशी कसे वागले वैगेरे कथा अगदी सुरेख झाली एकाच बैठकीत वाचून काढली धन्यवाद अजून असे खिळवून ठेवणारे लिखाण असेल तर वाचायला आवडेल

लोकांनी उगीच आधुनिक सीता म्हणजे त्या सितेसरखि वर्षभर अशोकवनात बसून न राहता आपलया सुटकेचे आपणच प्रयत्न करेल अशी समजूत करून घेतलेली. - मला सुद्धा अगदी असंच वाटलं होतं आणि म्हणूनच ती आधुनिक सीता ठरेल असं वाटलेलं Sad मगच शीर्षक समर्पक झालं असतं कदाचित

पुर्ण कथा सलग वाचली...

ईतरांसारखी मलाही ईतकीशि नाही आवडली.

बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्यातील एक .... तीने धर्मांतर केलेले असते आणी निकाह सुद्धा मग ती रफीकची पण बायको झाली ना
मग असे कसे तीला जायला परवानगी मिळाली त्याच्या कडुन तलाक न घेता ?