काहूर

Submitted by जव्हेरगंज on 21 October, 2015 - 12:11

" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.

छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली.
ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आयशी कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली.
कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ.

माझा बा तालुक्याला गेलता. कोर्ट कचेरीच्या कामात त्येला यायला उशीर व्हायचा. कदीकदी तिकडचं मुक्काम टाकायचा. तवा मला त्येजा राग यायचा.
"आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली,

भगुणं जसं भरलं तसं म्या पाणी भाईर टाकुन दिलं. कावदान जोरात सुटलं व्हतं. कवाडाच्या आत बी पाणी याय लागलं. म्या कडी घालुन पुना भगुणं जाग्यावर ठिवलं.चुलीम्होरं जाऊन आयशीपशी बसलु. कितीतरी येळ. आयशी कायच बुलली नाय. मग म्या तिथचं मटकुळं करुन झोपुन गीलू. भाकऱ्याचा आवाज माज्या कानात घुमत राहीला. रातभर.

सकाळी जवा मी जागा झालू तवा आयशी घरी नव्हती. घराबारात पसरलेली भांडीकुंडी तुडुंब भरून वाहिली व्हती. जिकडं तिकडं सारवानाचे पोपाडं ऊपडलं हुतं. ऊनाचं कवुडसं छपराच्या आत झिरपलं व्हतं. सकाळच्या पारी आमचं घर मला उदास वाटलं. वट्यावर जाऊन म्या आयशीला हाका मारल्या. कितीतरी येळ. आयशीनं कुठुनं बी वव दिली न्हाय. शेजारची जिजाकाकू मला म्हणली "कशाला हाका मारतुय रं पोरा, बाप न्हाय का आजुन तुजा आला?".

आज मला आंघुळ घालाय बी कुणी न्हवतं. हापश्यावरनं दोन कळश्या आणुन म्या आंघुळ किली. मग डोक्यावर तेल थापुन म्या कापडं घातली. वायरीची पिशवी घीऊन मी उपाशीच शाळेत गीलू.

संध्याकाळी जवा म्या घरी आलू तवा आण्णा जरशीची धार काढत हुता.
"राती जेवला का न्हाय रं?, टोपल्यात काय आसलं तर खाऊन घी" धार काढत आण्णा बोलला.
आल्या आल्या म्या दुरडी ऊघडली. त्यात दोन भाकरी व्हत्या. कालवण नव्हतचं. घरातली भांडीकुंडी आवरुन ठिवलेली. आर्धी भाकर म्या कुरडीच खाल्ली. पाणी पिऊन म्या खेळाय गीलू. लौपाट खीळुन घामाघुम हुन म्या परत घरी आलू.
आण्णा सायकलवर किटली ठिवुन दुध घालाय चाल्लं हुतं.

"सोन्या, आरं आयशीला जाऊन आता वरीस व्हत आलं, सकाळपारी तिला कशाला हाका मारत हुता, म्या गावातनं भाकऱ्या करुन आणल्यात. दुधाबर खाऊन आभ्यास करत बस. आलुच मी डिरीवरनं." आण्णा माज्या खांद्यावर हात ठिवुन काळजीनं बोललं.

मी गप घरात जाऊन गुरजीनं दिल्याली गणितं पाटीवर सोडवत बसलु. पण भाईर आजपण कावदान सुटलं. छपरातनं पाणी आजपण टिपकाय लागलं. येवढ्या कावदानात आण्णा आज ऊशीराच येणार. मग घराबारात भांडीकुडी पसरवून चुलीम्होरं मी उपाशीच झुपी गीलू. भाकऱ्यांचे आवाज माज्या कानात घुमत ऱ्हायले. रातभर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीचीच चांगली होती. फक्त मध्ये थोडे एडिट केले असते तर जमले असते. आता यात तो अनुभव येत नाही.>>+१

आधीची चांगली होती हृदयस्पर्शी.

Sad

अप्रतिम...
मनाला भिडले..
तुमची लेखनशैली खरच खूप सुन्दर आहे...

Pages