विचारांचं मनाशी नातं

Submitted by स्वीटर टॉकर on 20 October, 2015 - 05:57

विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर
मन मोकाट मोकाट, त्याला ठाई ठाई वाटा
जश्या वार्‍याने चालल्या, पान्याव्हरल्यारे लाटा
मन पाखरू पाखरू, त्याची सांगू काय मात,
आता हुतं भुईवर, गेलं गेलं आकाशात
मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा, त्याला उतारे मंतर!

हा सगळा आपला विचारांशीच चाललेला आपला संवादच नाही का?

हाच संवाद आपल्याला घडवत असतो आणि बिघडवतसुद्धा असतो.

हा संवाद जेव्हां आपल्याला बिघडवत आहे असं वाटतं तेव्हां आपण देवाचं नाव घेतो किंवा दीर्घ ॐ म्हणतो की जेणेकरून विचारांचा मनाशी चाललेला हा (वि)संवाद आपण दुसरीकडे वळवू पहातो.

हल्ली एकटेपणा वाढत चालला आहे हे आपण सतत ऐकत असतो. काळाप्रमाणे आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे हे होणारच आहे असं मानलं तर आपल्या मनाशी मैत्री आपणच वाढवली पाहिजे. आपल्या मनाशी संवाद आपण वाढवला पाहिजे. आणि हे मनाशी नातं जपलं पाहिजे. हा एक स्व-अनुभव, स्व-राज्य, स्व-सोहळा साजरा करायला शिकलं पाहिजे.

आता सोबतीचंच बघा ना, एकाची सोबत असली की असं वाटतं, अजून एकाची सोबत हवी. मग आणखी एकाची. आणि ही सोबत सतत मिळेलच अशी खात्री नाही. मग मिळाली नाही म्हणून वाटणारं दुःख. त्यापेक्षा, सोबत मिळाली तर छानच. पण नाही मिळाली तर स्व-सोबत आहेच की! ती शाश्वत आहे. नेहमीच आपल्याजवळ आहे. आपण जा म्हटलं तरी न जाणारी आहे. ही स्व-सोबत म्हणजेच स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं.

संसारात राहून अनेक नाती निभावताना असं वाटतंच ना,
असे एखादे तरी नाते असावे, की ज्याला कोणतेही बंधन नसावे
जन्माने ते जोडलेले नसावे, जातीने ते बांधलेले नसावे,
कर्तव्याचे बंधन नसावे, मानापमानाचे विचार नसावेत,
देण्याघेण्याचे हिशेब नसावेत, फक्त प्रेम मनात असावे,
सोयी गैरसोयीचे हिशेब नसावेत, पोटी आणि ओठी एकच असावे,
शब्दांशब्दांशिवाय सूर जुळावेत,
असे एक तरी नाते असावे, असे एक तरी नाते असावे ।

मनाच्या श्लोकांमध्ये तर मनाला कसं वाग आणि कसं वागू नकोस याविषयी सारखा संवाद साधला आहे. अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत रामदास स्वामींनी तो मांडला आहे.

आपण जन्माला आल्यापासून सतत कुणाच्यातरी सहवासात असतो. त्यामुळे मनाशी बोलत जरी असलो, तरी त्याच्याशी खरी मैत्री एकांतातच होते.

एकदा आमच्या नात्यातल्या, कॅनडात राहणार्‍या एका गृहस्थांना मी विचारलं, “आम्हाला पाण्याचे, गॅसचे, रस्त्यावरील घाणीचे असे अनेक प्रश्न सतत भेडसावत असतात. तुमच्याकडे हे प्रश्न अजिबात नाहीत. पाकिस्तानसारखा शेजारी देखील तुमच्याजवळ नाही. मग तुमच्याकडे कोणते प्रश्न असतात?”

एका क्षणाचाही वेळ न घेता ते म्हणाले, “आमच्याकडे एकाकीपणा – सोबत नसणे – हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.”

पश्चिमेकडील हा प्रश्न आज ना उद्या आपल्याकडे येणार आहेच. त्यामुळे आत्तापासूनच आपल्या जवळंच असणार्‍या या मनाशी आपण मैत्रीचं नातं जुळवू या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला आपला सोबती करण्याचा विचार आवडला.
एकलकोंडेपणाची समस्या काही जणांना भेडसावत असणारच.सध्या एकटेपणा वाढतोयच. अगदी भरगच्च गर्दीत पण सोबती नसल्याने कित्येकजण आतून एकटेच आहेत.

पण मनाशी संवाद साधताना आत्ममग्न होण्याची शक्यता निर्माण होईल का?

खूप छान लेख.
तुमची लेखनशैली खूपच सुंदर आहे.. अगदी सहजच तुम्ही विचार मांडता आणि ते ही छान, ओघवत्या भाषेत..