एक होती म्हातारी

Submitted by जव्हेरगंज on 16 October, 2015 - 11:41

रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला.
"उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली.
आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला. तोंडात राहिलेल्या पाण्याची चुळ भरत पिचकारी मारत म्हणाला " म्हातारे, लग्नाला का आली न्हाय?, वंदीनं तुझ्या नावाचा धोसरा काढला हुता"
"मला एकतर दिसायचं कमी आलयं बाबा, डोळ्याचं आप्रिशन झाल्यापस्न मी लयशी कुटं जातबी न्हाय, त्यात वंदीच्या बापानं पत्रिकाबी दिली न्हाय, तुच सांग बाबा कसं जायचं आता?" म्हातारी त्याच्यापुढं गार्हाणं मांडायला लागली.
"आगं त्यो पेताड माणुस, त्येझं काय यवढं मनावर घीती?, तुझ्या लीकीच्या डोळ्यात पाणी थांबत न्हवतं, पुरीच्या लग्नात आजी न्हाय मनुन कधीची त्वांड पाडुन बसलीय" आबा वट्यावर येत तिच्या शेजारीच मांडी घालुन बसला.
"आबा, कायतरी बसायला घी कीरं, थांब मीच आणती आतनं कायतरी" म्हातारी उठायला लागली.
" नगं नगं, आगं आमी मातीतली माणसं, बस जरा आशीच, भरलेल्या पंगतीतनं ऊठुन फकस्त तुझी गाठ घ्यायला आलुय, मनलं म्हातारीचं काय बिनसलयं बघावतरी" आबा भिताडाला टेकुन पाय पसरत हासतचं म्हणाला.
"तसं काय न्हाय रं बाबा, आता समदं घरबार गेलयचकी, पण मला न्हाय पटलं, पावण्यानं आपल्याला हाडंतुडं करायचं आण आपुन मागतकऱ्यावनी त्येज्या दारात जायचं, मी आपली घरीच बरी, तेवढचं घराला राखान हुतयं" म्हातारी डोळ्याला पदर लावत बोलली.
आबा नुसताच 'हु..' करत तिथचं पसरला.
खरं म्हणजे म्हातारीचे लय ऊन्हाळे-पावसाळे आबानं बघितले होते. वंदीच्या बापानचं म्हातारीचा कायतरी मानापमान केला असणार, तवाच म्हातारी येवढी बिनसलीय. चिमीच्या लग्नाला चाळीस मैलांवरनं म्हातारी ईकटीच रातचं इंधारचं चार दिस आगुदरचं आलती. तिच्या बाळंतपणाला तर महिनाभर तळ ठोकुन होती. पण दोन मैलांवर असणारं वंदीचं लगीन म्हातारीनं चुकवलं होतं. आबाच्या जिवाला घोर लागुन राहिला. ह्यो आबा म्हणजे म्हातारीचा जिव्हाळा. म्हटलं तर पावना, म्हटलं तर ओळखीचा. म्हातारीचा जसा नातवंडावर जीव होता तसा या आबावरही होता.

विचार करत करत बदामाच्या झाडाखाली न्हाय मनलं तरी आबाला गारगार झोप लागली. ऊन्हं ऊतरायला आली तसा म्हातारीनं त्याला कपभर चहा करुन दिला. पुन्हा एकदा आबानं तांब्याभर पाणी घटाघटा पिऊन पिचकाऱ्या उडवल्या. तोंड धुवून तो वट्यावरच चहा पित बसला. दुरवरून फुफाटा ऊडवत येणारं जीपडं त्याला दिसलं. हालगी वाजवत त्याच्या टपावर बसलेले चारजण सुरांचा धुमाकुळ घालत होते. म्हातारी लगबगीनं बाहेर आली. जीपडं दारात आलं तसं म्होरल्या शीटावरची नवरा नवरी खाली ऊतरली. शालूतल्या वंदीला बघुन म्हातारी गहिवरुन गेली.
"म्हातारे पाचशेची ववाळणी पायजेल बरका!" वंदीचा बापानं मागल्या शीटावरुन उतरत मस्करीलाच सुरुवात केली.
ऊतरणाऱ्यांची गर्दी वाढतच गेली. आणि आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जव्हेरगंज, लिखाण छान आहे.नावाचा जोसरा काढला >>> यातील जोसरा हा शब्द खटकतोय .तिथ्रे '' धोसरा ' हा शब्द हवा.

अनेक धन्यवाद मित्रांनो,
जोसरा च्या ऐवजी धोसरा असा बदल केला आहे.

कथेचा शेवट:- म्हातारी लग्नाला आली नाही म्हणुन नवरा नवरी स्वत: तिचा आशिर्वाद घ्यायला तिच्या घरी आले आहेत. लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं थोरामोठ्यांच्या पाया पडतं. तेव्हा पायापडणी (किंवा ओवाळणी) म्हणुन जेष्ठ लोकं त्यांना पाच-पन्नास रुपये देतात. अशी पद्धत आहे.

आणि आबाच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं.>>> जव्हेरगंज ह्या वाक्याचा अर्थ नाही कळला , म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित होता तो नाही कळला.

@ श्री, खास म्हातारीसाठी नवीन जोडपं आणि पै पाव्हुणे तिच्या घरी आले होते. म्हणजे ताणलेलं नातं पुन्हा जोडलं जात होतं. हे पाहुन आबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. म्हणुन त्याच्या डोळ्यांपुढचं चित्र हळुहळु अस्पष्ट व्हायला लागलं.

खूप सुंदर लिहीता तुम्ही! तुमचे सर्व लेख अगदी आल्या आल्या वाचतो आम्ही ( म्हणजे माझ्यासारखे सगळेच)

आवडली कथा. म्हातारी डोळ्यासमोर उभी राहिली. जव्हेरगन्ज मस्त लिहीता तुम्ही. खास् टच आहे तुमच्या लिखाणाला.

मस्त लिहिलयत.

मी तर तुमच्या लेखनशैलीची फॅन झालेय...
वाचतानाच सगळे प्रसंग, माणसे अगदी झाडेपण डोळ्यासमोर दिसायला लागतात.

Pages