मायबोली ऑनलाईन स्त्रीशक्ती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 October, 2015 - 02:02

खालील लिहिलेले नाटक कुणालाही दुखावण्याचा किंवा टिका करण्याचा हेतू नसून कृपया केवळ विनोदी नाटक म्हणून वाचावे.
-----------------------------------------------------------------------------

नमस्कार. आज आपल्या मायबोली वर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्यासाठी काही ऑनलाईन उत्पादन विक्रेत्यांना बोलाविले आहे. तर आपण आज त्यांची ओळखे करून घेऊया.

१) भाजीवाली :

भाजी घ्या भाजी.......... आरग्यान्यिक भाजी.

राम राम मंडळी. आव मी भाजीवाली गंगू. माज्या नवर्‍याच्या तोंडात दिसभर विडी नी तंबाखू. रातच्याला ढोसुन बी येतया. सगळा पैसा ढोसण्यातच उडवतीया. खिशात दमडी नी घरात करोडपत्याचा रुबाब आणतया. आव म्हणून मी आता पोराबाळांच्या शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी भाजी विकन्याचा बिजीनेश चालू केलाय. माज्याकड समद्या भाज्या आरग्यानीक बर का. गाईच्या शुद्ध शेणखत आणि गोमुत्र शिपंडून पिकवलेल्या. मी आनलाईन आर्डर भी घेतीया बर का फेसबुकवरून. आव फेसबुकावर आरगॅनिक गंगू भाजीवाली सर्च करा. तुमच्या मायबोलीवरच्या त्या रोज वर्षूनील ताईंची आर्डर असतीया बगा माझ्याकड.

२) मच्छीवाली :

म्हावरा घ्या गो.........

माझ नाव पारू. माझ्या नवर्‍याची लाडकी नुसती दारू. दिस-रात निसता झिंगत असतो. कधी मधी मला मारतो बी. मी तरी काय कमी हाय व्हय. लाऊन देते त्याच्या दोन ठोसे. नशेत मार खातो न नशा उतरली का पैशासाठी मला मारतो. पोरांना दोन घास मिळाव, शिकाची सोय व्हावी म्हणून्शान मी म्हावर्‍याचा धंदा करते. आव एकदम ताजे मासे हा माझ्याकडे. सुरमई, बांगडा एकदम चिकणा. माझी साईट बी हाय बर का इंटरनेटावर. पारूबाय ऑनलाईन म्हावरावाली डॉट. कॉम. आर्डर केलीत की लगेच जाळ टाकून ताजी मासळी आणून देईन बगा. आज तुमच्या मायबोलीवरच्या त्या दक्षिणा बाईंनी आर्डर केलीया बघा. त्यांच्यासाठीच घेऊन आले. तुम्ही बी करा बर का. चला म्हावरा घ्या गो....

३) बोहारीण

भांडीय्ये...........

रामराम ताई. माज नाव कमळा. माज्या नवर्‍याला जुगाराचा लळा. सोबत दारूचा नशा. जुगारापाई नवर्‍यानी माज्या चांगल्या साड्या बी विकल्या बगा. पोरांना पोटापाण्यासाठी हाल नग नी माझ बी हाल नग म्हणून डोकं चालवूनशान मिनी ह्यो उद्योग शोधून काढला बगा. आता मला साड्यांची कायबी कमी नाय बगा. लई दिसानी आले. बरंच कपड जमल असतील. पाच जरीच्या साड्यांवर एक बालदी देईन बगा. साडी ड्राय क्लिनिंग करून इस्त्री केलेली असेल तर सोबत एक लोटा फ्री. साडीला एक बी डाग न भोक नको बर का. अव तुमच्या मायबोलीवरच्या त्या साधना ताई हायेत ना त्यांनीच मला मेसेज टाकला व्हता. घरातली गाळणी तुटलेय. ४ शर्ट तयार हैत ये लवकर गाळणी घेऊन म्हणून. मुद्याच राह्यल. आता तुम्ही मला कधीबी बोलवू शकता कापड जुनी झाली की. नंबर घ्या माजा नी मेसेज टाका. २४०४०२०४२०. कमळा बोहारीन.

४) कासारीण

बांगडीय्ये...

रामराम ताई. माज नाव मंदा. माज्या नवर्‍याला नोकरी-धंद्याचा वांदा. आव दारू पिउन टाईट असतो म्हणून मालकान हेला काढून टाकल कामावरून. तुमास्नी सांगू ताई मला नट्टाफट्टा कराची जाम हौस. नटण्याचा नटायच्या वस्तु विकत कुठन घेणार? इथ आदी माजे नी पोरानचे जेवाचेच वांदे. म्हणून मिनी आयडीयानी यो इंपोर्टेड बिजीनेस चालू केलाय. समद्या इंपोर्टेड वस्तू हायेत बर का माझ्याकड. मी प्रत्यक्ष डेमो दाखवूनच आर्डर घेते बगा. हे गळ्यात घातल्य ना ते उद्या एका फॉरेन वाल्या मॅडमला देयाच हात म्हणून आज बघून घ्या. उद्या नाय दाखवता येणार. त्या फॉरेनीच्या गळ्यात दिसल उद्यापासून. ही पावडर मी लावलीया नव्ह ती तुमच्या मायबोलीवरच्या अश्विनी के ताईंनी आर्डर केलेय. पण त्या पुढच्या आठवड्यात येणार हायेत म्हणून अजून डेमो पाह्यला मिळतोय बर का तुम्हाला. मी वॉट्स अ‍ॅप वर ऑर्डर बी घेते बर का. नेलपेंटच्या शेड्स, गळ्यातली, बांगड्या, पिना सगळ्याचे फोटू टाकीन तुम्ही आर्डर केलीत तर आणि माझा वॉट्सअ‍ॅपवर ग्रुप बी हाय बर का. इंपोर्टेड नट्टाफट्टा ग्रुप.

५) भाजीपोळी केंद्र चालवणारी
रामराम मंडळी. माझ नाव आक्का, माझा नवरा बेवडा पक्का. पिण्यासोबत अजून हजारो नाद मग घरखर्च चालवाया मिच विचार केला पक्का आणि भाजीपोळी केंद्राच्या धंद्यावर मारला शिक्का. अव कोल्हापूरच्या ठेच्यावानी झणझणीत आपला झुणका आणि भाकरी तर अशा गोर्‍या की काय सांगू मायबोलीवर सगळी मंडळी माझ्याहातच्या भाकर्‍या खाऊनच गोरी झालीत. चला पटापटा ऑर्डर द्या. पायजे तर मायबोलीवर धागा काढते. त्यात किती साईझ ची भाकरी, झुणका कसा केला ते स्टेप बाय स्टेप बी दाखवीन. म्हंजे किती घरगूती पद्धतीत केलिया हे कळल तुम्हाला.
चला माझ्या धाग्याचा टिआरपी का काय ते वाढवा आणि ऑर्डर बी द्या.

सोशल वर्कर

नमस्कार माझे नाव भक्ती. अन्याया विरुध लढण्याची माझ्यात आहे शक्ती. मी ह्या बायकांचे बोलणे ऐकलेय. अरे किती अन्याय सहन करता ग तुम्ही. तुमचे नवरे रोज दारू पितात, कामधंदा करत नाहीत. घर चालवायसाठी तुम्ही रोज राबता. लाज कशी वाटत नाही त्या दारुड्यांना. ते काही नाही. भाजीवाली बाई, मासेवाली बाई, बोहारीण बाई आणि कासारीण बाई. तुम्ही माझ्या क्लब मध्ये नाव नोंदवा. मी तुमच्या नवर्‍याला बघा कशी दारू सोडायला लावते नी तुमच्या डोक्यावर पाय ठेवायला सांगते ते. सुतासारखे सरळ करते बघा. माझ्या क्लबचे नाव आहे. दारूड्यानवरा वाटलावे क्लब. आमच्या क्लब ची फी आहे फक्त २०,००० रु. पण दारूबंदीची गॅरेंटी. तुम्ही सगळ्या कमवायला लागल्या आहात तेव्हा आता जागरूक व्हा. सोडवून घ्या तुमच्या नवर्‍याचा जाच.

मासेवाली : : २००० महिना?? ओ क्लबवाल्या मेडम त्या पेक्शा आमचे नवरे पितात तेच बरे.

भाजीवाली : अव तुमच्या क्लबात पैस देण्यापेक्षा आम्हीच चौघी एकत्र येतो नी मंडळ काढतो नी स्त्री शक्ती दाखवतो की आमच्या नवर्‍याला. काय बायानो हाय कबुल ?

बोहारीण : हो हो चालेल आपण एकत्र येऊया नी ह्या नवर्‍याना अद्दल घडवून ह्यांची दारू कायमची अद्दल घडवून त्यांना पण कामधंद्याला लावूया. म्हणजे आपली कुटुंब सुखी होतील. पोर बाळ सुखान नांदून शिकुन मोठी होतील.

कासारीण : चला निघाल आपल मंडळ. आजच वॉट्स अ‍ॅपवर ग्रुप काढते आपला. भामाबोकापो दारूसोडवा ग्रुप. बोला कोणाला तुमच्यापैकी यायचय आमच्या ग्रुपमध्ये?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol जागु..मस्त लिवलंस.. ऐ ती फी २०,००० का २००० आहे???

वॉट्स अ‍ॅप च्या ग्रुप चं नावं मस्त सुचलंय तुला..

चला हवा येऊ द्या मायबोलीवर.
ही नवरे मंडळी व्येसनं करतात अन बायानला कामाला लावतात स्त्रीशक्ती अवताराच्या.बाकीच्या हौसवाइफच्या नवरोबांनी {त्यांच्या} बायांतली स्त्रीशक्ती जागृत करण्यासाठी एक व्यसन चालूकरा ग्रुप काढा.

मस्त लेख झालाय जागू.

Lol मस्त लिहिलं आहेत !

On a more serious note, दुर्दैवानी बेवड्या नवर्‍यांचं लोढणं कित्येक बायकांना जन्मभर ओढावं लागतं आणि हे पिढ्यान् पिढ्या चालत आलं आहे. मात्र गेल्या दहाबारा वर्षांत एक वेगळाच ट्रेंड शहरांमध्ये बघायला मिळत आहे. बायकोनी नोकरी / धंदा सुरू केला आणि तो चांगला चालायला लागला की कित्येक नवरे आपापलं काम सोडून घरी बसतात आणि आराम करतात.