अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान

Submitted by मार्गी on 16 October, 2015 - 00:44

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण

हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान

१९ डिसेंबरची सर्द पहाट! साडेपाच वाजता डॉर्मिटरीमधून बाहेर पडून स्टँडकडे निघालो. बसवाले मोठ्या आवाजात पुकारा करत आहेत. बस निघायला अजून दोन मिनिटं आहेत, त्यामुळे जाऊन चहा पिऊ शकतो. जागा धरण्याची काहीच गरज नाही, कारण अगदी थोडे प्रवासी गाडीत आहेत. पण थंडी. . . आज हिमालयातून बाहेर पडण्याचा दिवस आलाच तर. आता पहाट झाली असली तरी अजून रात्रच आहे. अजून किमान एक तास धुप्प अंधार असेल आणि तितका नजारा बघता येणार नाही. पण उजेडापेक्षा उन्हाची खरी गरज आहे.

थंडीमध्ये थरथरत्या हातांनी चहा घेतला आणि बस निघाली. सुंदर नजारा अंधाराच्या अवगुंठनात आहे. खूप वेळाने उजेड झाला आणि चांगलं ऊन पडेपर्यंत बस पिपलकोटीला पोहचली. आता थोडं बरं वाटतंय! सकाळचं‌ कोवळं ऊन आणि अलकनंदा! बुद्धीने कितीही‌ नाकारलं तरी पर्वतांमध्ये फिरताना मनामध्ये एक भिती सतत असतेच. रस्ता इतका दुर्गम असतो की, मनामध्ये खोलवर कुठे तरी असुरक्षित असल्याची भावना असतेच की, कधी एकदा इथून बाहेर पडून सपाट जमिनीवर पोहचेन. . . कारण रस्ता इतका भीषण आहे. . वस्तुत: मानव पंचमहाभूतांनी बनलेला असतो आणि जेव्हा आपण उच्च पर्वतांमध्ये जातो, तेव्हा जागृत पातळीवर नाही, पण अर्धजागृत मनामध्ये नक्कीच जमिनीची- पृथ्वीची आठवण येत असते. किंबहुना जमिनीपासून दुरावल्याची अस्पष्ट अंधुक जाणीवही होत असते. कारण आपण ह्या पाच तत्त्वांनी बनलेलो आहोत आणि त्यामुळे जर आपण अशा जागी गेलो जिथे हवा, पृथ्वी, अग्नी, पाणी आणि आकाशासोबत असलेला आपला संपर्क खंडित झाला, तर तिथे आपण अस्वस्थ होतो. समुद्राच्या खाली, एखाद्या बंद टनेलमध्ये, एखाद्या रोप वेवर बसलो असताना वेगवेगळ्या प्रमाणात हीच अस्वस्थता जाणवते. कदाचित ह्याच कारणामुळे घरात रडणारं बाळ मोकळ्या हवेत नेल्यावर लगेचच शांत होतं. असो.

जोशीमठ सोडल्यानंतर उंची लगेच कमी होत जाते. वाटेत कोणतंही अधिक उंचीचं ठिकाण नाही. पण रस्ता उतरत आणि चढत राहतो. एक डोंगर पार केल्यावर परत दुसरा. उतरण्यासाठीसुद्धा चढावं लागतं. . . त्यामुळेच तर अशा हिमालयाला नगाधिराज म्हणतात. जोशीमठवरून ऋषीकेश फक्त २५३ किलोमीटर आहे. पण पहाड़ी रस्त्यामुळे पूर्ण दिवस लागतो. मध्ये मध्ये रस्ता जास्त दुर्गम वाटतो. नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग! एका जागी अप्रतिम दृश्य दिसलं. हिमालयाच्या शिखरांची रेषा दूरवर दिसत होती! जणू उत्तुंग पर्वत शिखर पुन: एकदा आशीर्वाद देऊन निरोप देत आहेत! आणि त्या दृश्यामध्ये जवळच्या दरीतून वाहणारी गंगा नदीही आहे! जेव्हा पहिल्यांदा हिमालयात आलो होतो आणि जेव्हा पहिल्यांदा हरिद्वारजवळ गंगा नदी बघितली होती, तेव्हा इतकं शांत वाटलं होतं. खरोखर पहाडाची हवा वेगळीच आहे. म्हणतात ना की पर्वत हे सामान्य वस्तीचं ठिकाण नसून ध्यान किंवा साधनेची भूमी आहे. म्हणूनच तिला देवभूमी म्हणतात किंवा कश्यप ऋषींचं स्थान असलेल्या भुमीला कश्मीर म्हणतात!


दूरवर हिमालयाचे हिमाच्छादित शिखर आणि जवळ वाहणारी गंगा

आता ऋषीकेशमध्ये एक- दोन दिवस थांबेन. इथे गंगेच्या किना-यावर आणि एका आश्रमात जाईन. ऋषीकेशमध्ये हिमालयाला चरणस्पर्श होतो! इथे हिमालयाची सीमा आहे. ऋषीकेशमध्ये पोहचेपर्यंत दुपारचे चार वाजले. अर्थात् ह्या प्रवासाला नऊ- दहा तास लागले. खूप थकलो आहे. आणि किंचित उदासही वाटत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जाताना त्याच्या कृपेमुळे प्रसन्न वाटतं आणि कदाचित त्यामुळेच तिथून दूर जाताना अस्वस्थता वाटणारच. ऋषीकेशमध्ये पोहचल्यावर एकदम शहरात आल्यासारखं वाटत आहे.

इथेही सरकारी डॉर्मिटरी‌ शोधली. एक जागा आवडली नाही तर दुस-या डॉर्मिटरीत गेलो. हे अगदी गंगेच्या काठावर आहे. ही सरकारी डॉर्मिटरी एका रिसॉर्टमध्ये आहे. त्यामुळे इथे रेट थोडा जास्त आहे. एका बेडसाठी २५० रूपये. पण सुविधा उत्तम आहेत. हॉटेल गंगेच्या काठावरच आहे. अगदी रमणीय जागा आहे. जेव्हा नदी उच्च पर्वतरांगांमधून कोसळणा-या झ-यांच्या आणि प्रपातांच्या प्रवाहाच्या स्वरूपात रोरावत असते, तेव्हा तिचं रूप वेगळं असतं. इथे गंगेच्या रुपामध्ये अगणित पर्वतीय धारा शांत वाहत आहेत. हा जीवनाचा एक संकेत तर नाही? जेव्हा आपण उथळ असतो; जेव्हा पडत आणि उभे राहात असतो, तेव्हा खूप आवाज करत जातो- संघर्ष करतो. पण जेव्हा प्रगाढता मिळते आणि स्थिरता येते, तेव्हा अगदी शांत होतो.

ऋषीकेशमध्ये राहण्याची सोय तर झाली. पण मन अशांत आहे. एक तर इथे मोबाईल इंटरनेट मिळाल्यामुळे परत जगाचा गोंगाट सुरू झाला. आणि परत शहराचा गलबला. काही लोकांना पर्वतामध्ये जाताना अक्लमटाईझ व्हावं लागतं. उंची- थंडीसाठी अनुकूलन व्हावं लागतं. कदाचित मला परत शहरात येताना थोडं अक्लमटाईझ व्हावं लागेल. ही संध्याकाळ नदीच्या किनारी व्यतित झाली. इथे थंडी एकदम कमी आहे. गंगा नदी थोडा धीर देते आहे, सांगते आहे की, तू अजूनही पर्वताच्या जवळच आहेस. . . आज ऋषीकेशमध्ये फिरायला जाणं जमणार नाही. कसंबसं एका हॉटेलात जाऊन थोडं जेवून आलो. रात्र पडल्या पडल्या डोंगरात अनेक जागा प्रकाशाने उजळून गेल्या. डोंगरामध्ये- शब्दश: खबदाडात- किती लोक राहतात! मधून मधून वाहनांचा प्रकाश दिसतो.

अनेकदा हे जाणवलं आहे की, पहाडामध्ये जाण्याच्या किती दिवस आधीपासून आपण त्याची सारखी वाट बघत असतो. किंवा खरं तर कोणताही प्रवास. अगदी पिकनिकसुद्धा. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रवासात असतो, जेव्हा 'गंतव्य' स्थानी असतो, तेव्हा परत मन भटकतं. परत मागे येतं. पहाडात फिरतानाही आपल्याला शहराची आणि नेहमीच्या रुटीनची अनिवार्य प्रकारे आठवण येतेच. आणि आता पहाडापासून दूर जाताना पहाडाची प्रकर्षाने जाणीव होते आहे. असो. पर्वताच्या जवळ असल्याचा अनुभव देणारे एक- दोन दिवस अजून बाकी आहेत. . .


SHIVALIK THE JEWEL OF BRO!!


इथेच पहाडी मार्ग संपतो आणि सुरू होतो

पुढील भाग: ऋषीकेश दर्शन

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्वताच्या जवळ असल्याचा अनुभव देणारे एक- दोन दिवस अजून बाकी आहेत. . . >>>>> अजून काही अनुभवकथन होणार तर - येऊदेत .... Happy

हा भागही छानच .... Happy