ग्लोबल वॉर्मिंग: भारताची बदलती भूमिका

Submitted by निकीत on 8 October, 2015 - 10:41

ग्लोबल वॉर्मिंग: भारताची बदलती भूमिका आणि पॅरिस परिषद

डिसेंबर २०१५ मध्ये पॅरिस येथे अतिशय महत्वाची अशी संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद होणार आहे. जगभरातील सर्व देशांचे नेते २०१६ आणि २०२० नंतर हरितगृह-वायूंचे उत्सर्जन कमी कसे करायचे आणि त्याबाबत काय उपाययोजना करायच्या याबाबत चर्चा करणार आहेत. आणि १९९२ च्या क्योटो करारासारखा एक नवा अंतरराष्ट्रीय करार आस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या नवीन करारामध्यॆ काही महत्वपूर्ण दूरगामी बदल घडून येणे अपेक्षित आहे. यातील पहिला म्हणजे - अमेरिकेची बंधनकारक हरितगृह उत्सर्जन-कपात करण्यास (किमान तत्वतः) मान्यता; बंधनकारक उत्सर्जन कपात म्हणजे binding commitment for emissions reduction.
आणि दुसरा बदल म्हणजे प्रमुख विकसनशील देशांची (मुख्यतः चीन) नजीकच्या भविष्यात (१५-२० वर्षांत) उत्सर्जन कमी करण्यास मान्यता. उदा. चीनने २०३० सालानंतर आपले उत्सर्जन वाढू न देण्याचे ठरविले आहे. तर भारताने २०३० सालापर्यंत आपली उत्सर्जन घनता (emissions intensity किंवा उत्सर्जन प्रति जीडीपी) २००५ सालापेक्षा सुमारे ३०-३५% ने कमी करण्याचे ठरविले आहे. याची आर्थिक आणि राजकीय कारणे, परिणाम, आणि गणिते नेमकी काय आहेत याचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे.

पृथ्वीच्या वातावरणामध्ये (ट्रोपोस्फिअर) हरितगृहवायूंचा (जसे की कार्बन-डाय-ऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ ई. चा) एक थर असतो. पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता हे वायू शोषून घेतात आणि पृथ्वीचे तापमान उबदार राखण्याचे कार्य करतात. यालाच हरितगृह परिणाम असे म्हटले जाते. एका मर्यादेपर्यंत हरितगृह परिणाम हा चांगलाच असतो; किंबहुना त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी बहरू शकली.

नैसर्गिकरीत्या उत्सर्जित होणारे कार्बन-डाय-ऑक्साईड व इतर हरितगृह वायू हे समुद्र आणि जंगलांवाटे शोषून घेतले जातात आणि त्यामुळे त्यांचा समतोल कायम राहतो. परंतू, मानवनिर्मित उत्सर्जनामुळे हा समतोल बिघडत चालला आहे आणि पृथ्वीच्या शोषण्याच्या क्षमतेपलीकडील कार्बन-डाय-ऑक्साईड व इतर वायू वातावरणामध्ये साठून राहत आहेत. मानवनिर्मित उत्सर्जन म्हणजे anthropogenic emissions. खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे (उदा. कोळसा वापरून केलेली वीज निर्मिती किंवा पेट्रोल - डीझेल वर चालणाऱ्या गाड्या ) आपण कार्बन डाय ऑक्साईड सारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन करतो. औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे गेल्या साधारण २०० वर्षांमध्ये, प्रामुख्याने विकसित देशांमुळे मानवनिर्मित हरितगृहवायूंच्या उत्सर्जनामध्ये प्रचंड वाढ झाली. याच काळात वातावरणात साठलेला कार्बन-डाय-ऑक्साईड सुमारे ३५% ने वाढला आहे. अशा प्रमाणाबाहेर साठलेल्या वायूंमुळे हरीतगृह परिणामाची तीव्रता वाढते व पर्यायाने पृथ्वीचे तापमान वाढू लागते. या तापमान वृद्धीमुळेच वातावरणामध्ये बदल घडून येतात.

गेल्या ३०-३५ वर्षात वितळलेले आर्क्टिक आइस कव्हर:
Polar-Sea-Ice-Melt-NRDC.jpg
स्त्रोतः नासा.

एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, तापमानवाढीचा संबंध कार्बन-डाय-ऑक्साइडच्या वा इतर हरितगृहवायूंच्या उत्सर्जनाशी नसून वातावरणात त्यांच्या असलेल्या साठ्याशी असतो. आतापर्यंत त्यांच्या वाढलेल्या साठ्यामुळे, सुमारे ०.७५ डिग्री सें तापमानवाढ (सरासरी) आधीच झालेली आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात वातावरणबदल आजही घडून येत आहेतच आणि भविष्यात ते आणखी तीव्र होणार आहेत. उदा. दुष्काळ, पावसाचा लहरीपणा, वादळांचे वाढलेले प्रमाण, अधिक कडाक्याचे ऋतू इ. सध्या तरी सर्व आंतरराष्ट्रीय प्रयत्न हे सरासरी तापमानवाढ २ डिग्री सें. पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी चालू आहेत; ही वाढ जर २ डिग्री सें. च्या वर गेली तर अतिशय गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जायला लागण्याची दाट शक्यता आहे. वातावरणबदलाच्या बाबतीत आज केलेल्या उपायांमुळे भविष्यातील हरितगृहवायूंचा साठा आणि पर्यायाने तापमानवाढ आपण मर्यादित ठेवू शकतो.

वातावरणबदलासाठी दोन प्रकारच्या उपाययोजना आहेत:
उत्सर्जन-कपात: यामध्ये उर्जेची निर्मिती आणि उर्जावापरातील कार्यक्षमता सुधारणे, किंवा अक्षय उर्जास्त्रोतांचा अवलंब करणे अभिप्रेत आहे. या उपाययोजनांमध्ये तान्त्रिक-वैज्ञानिक पैलू अधिक महत्वाचे आहेत. उदा. वीजनिर्मिती आणि वीज वापरातील कार्यक्षमता सुधारणा, कमी कार्बनयुक्त इंधनाचा वापर (जसे की नैसर्गिक वायू, पवनउर्जा, सौरउर्जा, आण्विक उर्जा, लघु-जलविद्युत प्रकल्प इत्यादि). परंतु यातील अनेक उपाय हे खर्चिक आहेत, जसे सौरउर्जा. त्याचप्रमाणे काही उपायाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम हे संवेदनशील आहेत जसे, आण्विक उर्जा.
कार्बन-शोषण वृद्धी (Carbon Sequestration): यामध्ये पृथ्वीवरील कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषण वाढविणे अभिप्रेत आहे. या उपायांमध्ये तंत्रज्ञानापेक्षा व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला जातो. उदा. वृक्षारोपण, जंगलतोड-कपात, शेतजमिनीचे कार्यक्षम व्यवस्थापन इ.
या व्यतिरिक्त सागर-लोह-बीजीकरण (ocean-iron-fertilization) आणि भू-अभियांत्रिकी (geo-engineering) हे देखील उपाय आहेत, परंतु त्यामध्ये अनेक अनिश्चितता आणि धोके आहेत.

२०३० सालामधील सरासरी तापमानवाढ २ डिग्री सें. पर्यंत मर्यादित ठेवण्याकरिता, जागतिक हरितगृहवायू उत्सर्जन २००० सालापेक्षा ५०-८५% ने कमी करणे आवश्यक आहे (एकूण १६-२७ अब्ज टन कार्बन-डाय-ऑक्साईड). यासाठी लागणारी किंमत ही २०३० सालाच्या जागतिक उत्पन्नाच्या केवळ १% असेल! तरीदेखील, असे उपाय योजिले जात नाहीत. याला दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, पर्यावरणीय बाह्यता. आपण उर्जेसाठी जी किंमत भरतो त्यात पर्यावरणाच्या हानीची (उदा. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आटत जाणाऱ्या हिमनद्या) किंमत अंतर्भूत नसते. याला अर्थशास्त्रीय भाषेत बाह्यता (externality) असे म्हणतात. त्याच्या दुरुस्तीकरिता सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असते. हा हस्तक्षेप सरकार विविध धोरणे आखून किंवा सबसिडी अथवा कर लावून करू शकते. परंतु सरकारने असा हस्तक्षेप करावा याकरिता जनमताचा पुरेसा रेटा आढळून येत नाही.

दुसरे आणि अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे, वातावरणबदल ही एक जागतिक समस्या आहे; त्यामुळे कोण्या एका देशाने त्याबाबतीत उपाय योजून ती सुटणार नाही. यासाठीचे प्रयत्न हे जागतिकच असावे लागतील. परंतु, वेगवेगळ्या देशांच्या आपापल्या हितसंबंधांमुळे जागतिक प्रयत्नांबाबत एकमत घडविण्यात संयुक्त राष्ट्रसंघाला आतापर्यंत यश आलेले नाही. भारताबरोबरच चीन, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका इ. प्रमुख विकसनशील देशांचा आतापर्यंत असा दावा होता की उर्जेसाठी आम्ही मुख्यत्वे खनिज इंधने (fossil fuels) जसे की, कोळसा, पेट्रोलीयम, नैसर्गिक वायू इ. चा वापर करत असल्याने, सध्या तरी, हरितगृह वायू उत्सर्जनावरील बंधने ही विकासाला आणि आर्थिक वाढीला मारक ठरू शकतात. म्हणूनच, त्यांनी बंधनकारक उत्सर्जन-कपात नको, अशीच भूमिका घेतली होती – आणि ती रास्तही होती. कारण विकसनशील देशांमधील प्रती माणशी हरितगृहवायू उत्सर्जन (per capita emissions) हे विकसित देशांपेक्षा अनेक पटीने कमी आहे. उदा. अमेरिकेतील प्रती माणशी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन दरवर्षी सुमारे १७ टन आहे; चीन ६ टन; जपान आणि जर्मनी ९ टन तर भारत केवळ १.६ टन. यात देशांतर्गतही तफावत प्रचंडच आहे. भारतामधील शहरी श्रीमंत हे ग्रामिण भागातील लोकांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात उत्सर्जनास जबाबदार आहेत.

त्याचबरोबर, वातावरणामध्ये आतापर्यंत साठून राहिलेल्या हरितगृहवायूना आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या वातावरणबदलाला विकसित देशच जबाबदार आहेत. त्यामुळे विकसित देशांनीच त्याबाबतीत प्रथम उपाय योजणे आवश्यक आहे. विकसित देशाना मात्र (मुख्यतः अमेरिकेला) उत्सर्जनाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील असा भेद मान्य नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अनेक मोठ्या विकसनशील देशांचे एकूण हरितगृहवायू उत्सर्जन हे विकसित देशांपेक्षा अधिक आहे त्यामुळे सर्व प्रमुख देशांनी मिळून याबाबतीत उपाय योजना कराव्यात. जसे की, जगातील सर्वाधिक हरितगृह वायूचे एकूण उत्सर्जन चीन कडून होते तर भारताचा त्याबाबतीत चौथा क्रमांक लागतो तर अमेरिका आणि रशिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हे जरी खरे असले तरी आधी म्हटल्याप्रमाणे, जर प्रति माणशी उत्सर्जन पाहिले तर हे सर्वच गणित बदलते. आजमितीला विकसनशील देशांचे एकूण उत्सर्जन हे जागतिक उत्सर्जनाच्या ५०% हून अधिक आहे आणि भविष्यात ते वाढणारच आहे. त्यामुळे, भविष्यातील वातावरणबदलाच्या दृष्टीकोनामधून विकसनशील देशांचा उत्सर्जन-कपातीमधील सहभाग काही प्रमाणात आवश्यक आहे. परंतु, अशा उपाययोजना करणे हे बऱ्याचदा खर्चिक असते – मग प्रश्न असा येतो की विकसनशील देशांनी असा वाढीव अधिभार कसा आणि का द्यायचा? यासाठी असे सुचविले जाते की हा अधिभार विकसित देशांनी उचलावा.

मुख्यत्वे अपूर्ण पायाभूत सुविधांमुळे, विकसनशील देशांमध्ये उत्सर्जन-कपात करणे हे विकसित देशांपेक्षा स्वस्त ठरते. म्हणूनच असा अधिभार जर विकसित देशांनी उचलला तर उत्सर्जन-कपातीवरील एकूण जागतिक खर्च कमी होईल. याच विचारांनी संयुक्त राष्ट्रसंघाने (१९९२ साली संमत केलेला) क्योटो करार २००५ साली अंमलात आणला. या कराराअन्वये, २०१२ सालापर्यंत सर्व विकसित देशांनी आपापले उत्सर्जन १९९० च्या पातळीपर्यंत खाली आणण्याचे कबूल केले होते - जे अर्थातच झाले नाही. अमेरिका जागातील २०% उत्सर्जनाला कारणीभूत आहे; मात्र क्योटो करार त्यांनी संमतच केला नसल्याने, ही कपात त्याना बंधनकारक नव्हती! क्योटो करार पुढील वर्षी म्हणजे २०१६ ला संपुष्टात येत आहे. २०१६ नंतर जागतिक उत्सर्जन-नियंत्रण कसे असावे याबाबत अजून एकमत झालेले नाही. पॅरिस परिषद त्याकरिताच अत्यंत महत्वाची आहे.

आयझेक कोर्डोल या कलाकाराचे "राजकारणी ग्लोबल वार्मिंग वर चर्चा करताना" (Politicians discussing global warming) नावाचे बर्लिन मधील शिल्प:
Follow-the-leaders-berlin (2).jpg
स्त्रोतः http://cementeclipses.com/wp-content/uploads/2013/11/Follow-the-leaders-...

उत्सर्जनाबाबतची आर्थिक-राजकीय गणिते मात्र गेल्या २-३ वर्षात झपाट्याने बदललेली आहेत. बराक ओबामांनी अमेरिकेच्या आतापर्यंतच्या भूमिकेला छेद देत, उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी पावले उचललेली आहेत. उदा. क्लीन पॉवर प्लान अंतर्गत २०३० सालापर्यंत वीजनिर्मिती मुळे होणारे हरितगृह वायू उत्सर्जन सुमारे ३२% टक्याने कमी करण्यात येणार आहे (२००५ सालापेक्षा). कॅलिफोर्निया सारखी राज्ये तर त्याच्याही पुढे गेली आहेत. कॅलिफोर्नियाने राज्याचे हरितगृह वायू उत्सर्जन २०३० सालापर्यंत ५०% ने, तर २०५० सालापर्यंत ८०% ने कमी करण्याचे ठरविले आहे (१९९० सालापेक्षा). ह्या पार्श्वभूमीवर चीनसारख्या विकसनशील देशाने देखील आपले उत्सर्जन २०३० सालाच्या पुढे वाढू न देण्याचे आश्वासन दिले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे भारतावरही आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. भारताने नुकतेच २०२२ सालापर्यंत १,७५,००० मेगावॉट वीज अक्षय उर्जेद्वारे (renewable energy - मुख्यतः सौर आणि पावन उर्जा) निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१२ नंतर या उर्जास्त्रोतांची किंमत हि अनेक पटीने कमी झालेली आहे आणि आज त्यांचा अधिभार जवळजवळ नगण्य आहे. उदा. या १,७५,००० मेगावॉट वीजनिर्मितीचा खर्च हा कोळशा पासून वीज निर्मितीच्या खर्चापेक्षा केवळ ~२ ते ३% ने अधिक आहे.

भारताकडे विकास प्रक्रियेतील चुका सुधारून उत्सर्जन-कपात करण्यासाठी प्रचंड वाव आहे. उदा. २०३० सालामध्ये भारतात जेवढ्या पायाभूत सुविधा लागतील त्याच्या ६०% अजून बांधून व्हायच्या आहेत किंवा अजून ४०% भारतीयांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. याबाबतीत जर आपण उर्जा वापरातील तांत्रिक कार्यक्षमता सुधारली तर कोणताही जादा खर्च न येता आपण आपले उत्सर्जन कमी करू शकतो जसे की - एल ई डी दिवे, ५-स्टार उपकरणे, बिल्डिंग चे कार्यक्षम डिझाईन इत्यादि. याबाबतीत कॅलिफोर्नियाचे उदाहरण बोलके आहे. कॅलीफोर्नियामधील वीज कंपन्या दरवर्षी वीजेची ५०% वाढीव मागणी ही केवळ कार्यक्षमता सुधारून पूर्ण करतात. भारतामध्ये काय शक्य आहे आणि त्याचे स्केल काय आहे याचे उदाहरण द्यायचे झाल्यास एसी चे (वातानुकूलन) देता येईल. वाढत्या उत्पन्नामुळे आणि शहरीकरणामुळे भारतात एसीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते आहे हे आपण आपल्या आजूबाजूला पहात आहोतच. या वाढीचा वेग इतका प्रचंड आहे की २०३० सालापर्यंत घरात आणि दुकाने/मॉल येथे वापरल्या जाणाऱ्या एसी ची संख्या १० ते १५ पटीने वाढण्याची शक्यता आहे. केवळ एसी साठीची विजेची मागणी २०३० साली १,५०,००० मेगावॉट इतकी प्रचंड असेल - यामुळे विजक्षेत्राचे कंबरडे मोडणार हे निश्चित आहे. (भारताची एकूण विजेची मागणी २०१५ साली १,६०,००० मेगावॉट होती). ही विजेची मागणी एसी ची कार्यक्षमता सुधारून अतिशय नगण्य किमतीत २०३० सालापर्यंत सुमारे ४०-५०% ने कमी करणे शक्य आहे. यातून कोळशावर चालणारे सुमारे १०० वीज निर्मिती प्रकल्प वाचू शकतात. उत्सर्जन कपातीबरोबरच यात, “शहरातील श्रीमंत लोक अकार्यक्षम उपकरणे वापरून ग्रामीण भागातील लोड-शेडिंग वाढवत आहेत”, असे समन्यायी विकासाचे (equitable development) आणि इतर पर्यावरणीय समस्यांचे अनेक कंगोरे आहेत. याचबरोबर, अधिक कार्यक्षम पवन-उर्जा निर्मिती, प्रचंड शेतकी-कचऱ्यापासून उर्जानिर्मिती, लघु-जलविद्युत, बायोगॅस, उष्णता-आणि-वीज यांची एकत्र निर्मिती (Combined Heat and Power) इ. उपाय देखील भारतामध्ये फायद्याचे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, ह्या सर्व उपायांवरील खर्च हा सध्याच्या वीजनिर्मिती खर्चापेक्षा कमी आहे – म्हणजेच या उपायांचा अधिभार ऋण आहे. अशा उपाययोजनांमुळे उत्सर्जन कपात तर होईलच पण विकास प्रक्रियेला खीळ देखील बसणार नाही. त्याहूनही महत्वाचे म्हणजे या उपायाचे इतर फायदे (को-बेनेफिट्स) ही प्रचंड आहेत. उदा. कार्यक्षमता सुधारल्यामुळे खनिज-खाणी आणि वीज प्रकल्पांची गरज कमी होऊन त्यांची पर्यावरणीय आणि सामाजिक किंमत मोजावी लागणार नाही, किंवा पार्टिक्युलेट प्रदूषण वाचू शकेल इत्यादी.

थोडक्यात, पॅरिस परिषदेत भारताने बंधनकारक उत्सर्जन कपात स्वीकारू नये पण उत्सर्जन वाढीचा वेग कमी करणे किंवा अर्थव्यवस्थेची “उर्जा-घनता” (energy intensity - उत्सर्जन प्रती जीडीपी) मोठ्या प्रमाणात कमी करणे यासारखी उद्दिष्टे स्वागतार्हच आहेत.

अर्थात तंत्रज्ञानामधील सुधारणा म्हणजे फक्त तात्पुरत्या मलमपट्ट्यांसारखेच उपाय आहेत. त्यांची आवश्यकता तर आहेच पण खरी गरज ही आपले सर्व नैसर्गिक संसाधनांना ओरबाडणारे आणि आकाशाचा वापर हा केवळ प्रदूषण सोडण्यासाठीची अंतरराष्ट्रीय कचरापेटी म्हणून वापरणारे विकासाचे प्रतिमान तपासण्याची आहे. यात मुख्य जबाबदारी ही विकसित देशांची असली तरी विकसनशील देशांनाही सुधारणा करण्यास मोठा वाव आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकीत,

लेख आवडला. अपारंपरिक (unconventional) आणि नूतनेय (renewable) ऊर्जास्रोतांचा वापर वाढवला पाहिजे यावर दुमत नाही. मात्र कर्बोत्सर्जनाचा जागतिक उष्म्याशी जोडलेला संबंध पटला नाही. जागतिक उष्म्यामुळे आर्क्टिक हिमखंड वितळत आहेत असा युक्तिवाद केला जातो. मात्र अंटार्क्टिकावर हिमविस्तार होत आहे याकडे दुर्लक्ष केलं जातंय. नक्की भानगड काय आहे?

आ.न.,
-गा.पै.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. ं

बेफिकीर आणि नंदिनी:
अविकसित देशांमध्ये रीन्यूएबल एनर्जी वापरण्यासाठी अनेक प्रयत्न चालूच आहेत आणि त्याला काही प्रमाणात यश देखिल मिळत आहे. उदा. आफ्रिकेमधील देशांत वीज सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोलर पॅनेल्स वापरली जात आहेत. यासाठी विकसित देश, संयुक्त राष्ट्रसंघ त्यांना मदत देखील करत आहेत. ओबामांनी गेल्या वर्षी पॉवर आफ्रिका प्रोग्रॅम खाली आफ्रिकेत रिन्यूएबल एनर्जी विकासाकरिता ७ बिलियन डॉलर मदत घोषित केली आहे.

ते देश त्यांची रिन्यूएबल एनर्जी आसपासच्या इतर देशांबरोबर शेअर करत आहेत. उदा. झिंबाब्वे स्वतःकडील जलविद्यूत दक्षिण आफ्रिका, केनिया वगैरे देशांना (विकत) देतो. अर्थात त्यांचे प्रॉब्लेम्सही बरेच वेगळे आहेत. त्यामुळे पुढच्या ४०-५० वर्षांतल्या उपाययोजनांमध्ये त्यांना सहसा पकडले जात नाही.
अवांतर: भारतातसुद्धा सुमारे २५-३० कोटी लोकांकडे अजूनही वीज पोहोचलेली नाही! आणि ज्यांच्यापर्यंत ती पोचलेली आहे त्यांना दिवसाचे किती तास मिळते हा संशोधनाचा विषय आहे.

पण या सगळ्या वादात खरे भरडले जातात ते म्हणजे गरीब आणि ग्लोबल वॉर्मिंगचे भयावह दुष्परिणाम भोगणारे देश. हे देश यू. एन. मध्ये ही काहिच करु शकत नाहीत आणि ठरवले तरी अपुर्या उत्पन्नामुळे काही उपायदेखील योजू शकत नाहीत. उदा. पुढच्या ६०-७० वर्षांत समुद्रपातळी वाढून बांग्लादेशचा सुमारे अर्धा भूभाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आता हे निर्वासित जाणार कुठे ? अर्थातच भारतात येणार. आणि ह्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहेच. इच्छूकांनी पीबीएसची वॉटर नावाची डोक्युमेंटरी जरूर पहावी. फीजी सारखे छोटे आयलंड देश तर नाहिसेच होण्याची शक्यता आहे.
आपल्या विकासाचे, विकासाच्या राजकारणाचे, आणि इच्छाशक्तीच्या अभावाचे हे जागतिक परिणाम पाहणे अतिशय पेनफुल आहे.
असो. मोठ्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.

गामा: हरितग्रुह वायू / कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचा ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध वादातीत आहे. यासंदर्भात प्रचंड संशोधन झालेले आहे आणि हे आता एक शास्त्रीय सत्य म्हणून स्वीकारले गेले आहे.
अंटार्क्टीकावरील हिमविस्ताराचा आपला मुद्दा अपूर्ण आहे. अंटार्क्टीकामधील हिमविस्तार प्रामुख्याने समुद्रावरील बर्फाचा होत आहे; जमिनीवरील आइस कव्हर कमीच होत आहे. त्याचबरोबर समुद्राचे तापमान वाढतच आहे.

आता समुद्राचे तापमान वाढूनही त्यातील बर्फ कसा वाढतो हे एक इंटेरेस्टिंग कोडं आहे आणि त्यासाठी बरीच हायपॉथिसीस पुढे आली आहेत. त्यापैकी मुख्य तीन थोडक्यात:
१. अंटार्क्टिकावर ओझोन थराला भोक पडले आहे. यामुळे पोलर विंड पॅटर्न बदलतो आहे. आणि तो समुद्रातील बर्फ अधिक भागावर पसरवतो आहे.
२. हवेचे तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि पाऊस आणि बर्फाचे प्रमाण वाढते. यामुळे ओशन करंट्स बदलत आहेत. त्यामुळे समुद्रातील गरम पाणी सरफेस वर येण्याचे प्रमाण कमी होते. आणि म्हणून बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होते.
३. ही एक अ‍ॅनोमली आहे आणि काही वर्षात असे काही दिसणार नाही.

थोडक्यात, तेथील हिमविस्तार हा ग्लोबल वॉर्मिंग सिद्धांताला अजिबातच धक्का नाही.

आता समुद्राचे तापमान वाढूनही त्यातील बर्फ कसा वाढतो हे एक इंटेरेस्टिंग कोडं आहे आणि त्यासाठी बरीच हायपॉथिसीस पुढे आली आहेत. त्यापैकी मुख्य तीन थोडक्यात:
१. अंटार्क्टिकावर ओझोन थराला भोक पडले आहे. यामुळे पोलर विंड पॅटर्न बदलतो आहे. आणि तो समुद्रातील बर्फ अधिक भागावर पसरवतो आहे.
२. हवेचे तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत आहे. यामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि पाऊस आणि बर्फाचे प्रमाण वाढते. यामुळे ओशन करंट्स बदलत आहेत. त्यामुळे समुद्रातील गरम पाणी सरफेस वर येण्याचे प्रमाण कमी होते. आणि म्हणून बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होते.
३. ही एक अ‍ॅनोमली आहे आणि काही वर्षात असे काही दिसणार नाही. >>>>>>> इंटरेस्टींग.

निकीत,
अभ्यासपुर्ण लेख >>>>+१११... you continue writing on this topic....

We have crossed point of "No return"..... अस वाचण्यात आले होते.....

खूप अभ्यासपूर्ण लेख आणि त्यावरील प्रतिक्रियादेखील. ह्या येत्या परिषदेतून काय निष्पन्न होतंय ते पाहू.
भारतात सौर उर्जा वापरासाठी अनुकूल हवामान असून सुद्धा तितक्या प्रमाणात त्याचा वापर दिसत नाही याचं एक कारण म्हणजे मोठी पायाभूत किंमत (initial cost बरोबर शब्द आहे ना?). ज्यामुळे सौरुर्जेचा खर्च break-even होण्यासाठी लागणारा कालावधी बराच मोठा होतो (किंवा सध्या आहे). ह्या खर्चासाठी काहीवेळा शासनाचे अंशतः अनुदान मिळते असे ऐकून आहे. मात्र एकदा चर्चा करताना एक मुद्दा ऐकला ज्याची खातरजमा करायची आहे. कोणीतरी म्हणालं की ज्या गोष्टींवर शासन अनुदान देतं त्या गोष्टींची किंमत मग बरेचदा उत्पादक वाढवून लावतात. त्यामुळे अनुदानाने तसा फायदा होतोच असं नाही. ह्यात कितपत तथ्य आहे? असं खरंच होत असेल तर ते टाळण्यासाठी काय उपाय करता येतील?

भारतात सौर उर्जा वापरासाठी अनुकूल हवामान असून सुद्धा तितक्या प्रमाणात त्याचा वापर दिसत नाही याचं एक कारण म्हणजे मोठी पायाभूत किंमत >>>>+१
तसेच options देखिल कमी आहे.....

सतीश आणि जिज्ञासा - प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
"पॉईंट ऑफ नो रीटर्न" वगैरे शब्दरचना माध्यमांकडून जरा सनसनीखेज बातम्यांसाठी केलेली असते. खरा "पॉईंट ऑफ नो रीटर्न" बिग बँग लाच सुरु झाला Happy
त्याचा थोडक्यात अर्थ असा: आतापर्यंत साठलेल्या वायूंमुळे वातावरण बदलून आपल्याला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जायला लागणारच आहे. त्यामुळे, आपण आपले उत्सर्जन अगदी ८०-९०% ने जरी कमी केले तरी काही प्रमाणात वातावरण बदल अटळ आहेत. दुसरे म्हणजे - when mean shifts, tails of the distribution shift further, which is dangerous.
परंतु गेल्या काही वर्षंत, तांत्रिक-आर्थिक-राजकीय गणिते (हळूहळू का होईना) बदलत आहेत.

भारतात सौर उर्जा अतिशय आश्वासक आहे - आणि किमती कमी होत आहेत. माझे आधीचे प्रतिसाद पहा. उदा. आपल्या घरातील विजेचा दर (सर्व चार्जेस मिळून) साधारण ६ ते ७ रुपये प्रति युनिट (किलो वॉट आवर) असतो. सौरऊर्जेचा खर्च साधारण ५-६ रुपये. बॅटरी लावल्यास अजून ~२-३ रुपये प्रति युनिट. या प्रकल्पांचा साईझ वाढला की किंमत अजून कमी होते. वीजेचा दर दर वर्षी वाढत जाणार. सौर ऊर्जेचा खर्च फिक्स्ड. त्यामुळे आता ब्रेक-इव्हन पीरीयड अगदीच कमी झाला आहे. शासनाचे अनुदान मिळते - आणि ते बरेच असते (साधारण १० ते ३०%). आता बर्यापैकी ग्लोबलाईझ्ड सप्लाय चेन मुळे आणि स्पर्धेमुळे उत्पादक गंडवून जास्त पैसे लावू शकत नाहीत.

निकीत,
अधिक माहीतीकरिता धन्यवाद...

मी गावला जन्याच्या निमित्त्ताने अनेकदा मुम्बई जुन्नार via माळ्शेज हा प्रवास केला आहे....ह्या पट्ट्यात कमी दोन्ही बाजूने कमी होनारा green belt हा तर GDP च्या रेट पेक्षा अधिक आहे... तो भकास होणार परिसर मन दु:खी करतॉ, वेदना देतो.....
लहानपणी अनुभवलेले नेयमीतप्रामाणे येणारे ऋतू( उन्हाळा, पावसाळ, हिवाळा) आता आपण अनुभवत नाही, मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढ्णारे तापमान.....कुठे तरी ही "मानवीय प्रगती" (?) global warming शी रिलट होते......

ह्यावर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो???
मला वाटते solar energy at home ही एक small step असू शकते.....

पॅरिसमधल्या कॉप २१च्या निमित्ताने भारतातल्या प्रसारमाध्यमांत हवामानबदलाचा प्रश्न प्राइम टाइममध्ये मांडला जाऊ लागल्याचे दिसते.
या लेखाचा विषय हवामान बदलासंबंधाने भारताची बदलती भूमिका आहे म्हणून वर काढतोय.

गेली काही वर्षे (या लेखानुसार काही दशके) प्रगत राष्ट्रे त्यांचे प्रदूषणकारी उद्योगधंदेच manufacturing industries अप्रगत देशांना निर्यात करत आहेत. जोडीला स्वत:चे प्रदूषणविषयक कायदे अधिक कठोर करत आहेत. चीनच्या वेगाने झालेल्या औद्योगिक प्रगतीचे व प्रादूषणिक अधोगतीचे हेही एक कारण आहे.

तर भारताने मेक इन इंडिया म्हणून अख्ख्या प्रगत जगाला जे आवतण दिलंय त्याचे परिणामही असेच होणार नाहीत का? ते उद्योग मेक करायला संसाधनेही बहुधा इथलीच वापरतील. त्यांना उद्योग काढायला जमीन हवी म्हणून आम्ही आमची जंगले आणि शेतजमीन त्यांना देऊ.

यामुळे देशात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत म्हणे. मोठ्या उद्योगांमु़ळे डायरेक्टली तितक्या मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही हे आकडेवारी म्हणते. अर्थात मोठ्या उद्योगांमु़ळे अनेक लहान उद्योगांनाही चालना मिळून अप्रत्यक्षरीत्या रोजगारनिर्मिती होत असेलही पण ती बहुतांशी असंघटित, अनियमित (नियम लागू न होणार्‍या) प्रकारची असते.

तर रोजगार वाढवायला, देशाच्या प्रगतीचे आकडे फुगवायला जर मेक इन इंडियाचा आधार घेण्याची जी किंमत मोजावी लागेल ती परवडणारी आहे का? (इथे भविष्याचा विचार करून ती किंमत काढायची आहे.)

प्रगत आणि विकसनशील राष्ट्रांतील रस्सीखेचीसंबंधीचा हा एक लेख

भरत मयेकरांच्या आख्ख्या पोस्ट्ला अनुमोदन
भारतासारख्या देशात जिथे असलेले पर्यावरण विषयक कायदे कालानुरुप किती सुयोग्य आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा रितीने होते ह्याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर साशंकता आहे.

परदेशी उद्योगांना देशांतर्गत गुंतवणुक करण्याची जी अट घातली जातेय त्याबरोबर पर्यावरणविषयकही कडक अटी घालायला हव्यात.

ते पर्यावरण विषयक मुद्दे पूर्वी मांडवलीकरता असायचे. आता काय आहे आठवत नाही.

आणि अंमलबजावणी वगैरे होत नसते हो भारत! मागल्याच महिन्यात बंगळूर मध्ये तलावातून केमिकल फेस निघतांनाचे फोटो व्हायरल झाले.

आजच वाचले की चेन्नईत पाण्याखाली गेलेली धावपट्टी नदी पात्रात होती म्हणे Wink

अन तलाव क्षेत्रांच्या रक्षणासाठी असलेल्या खात्याचे ऑफिसच तलावात भराव टाकून बनवले होते (सोर्स: एआयबी)

असे शहरात होत असेल तर इतर ठिकाणी विचारायचं नाही.

देशाच्या ग्रामीण भागात महिला कित्येक तास जळणासाठी लाकडं गोळा करायला घालवतात आणि जंगल तोड करतात. चुलीच्या धुराचा घरातली स्त्री व इतर सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतच असतो. अजूनही देशातल्या ६७% घरांमध्ये चुलीवर अन्नं शिजवलं जातं.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 'मिशन स्मोकलेस व्हिलेज' हा प्रोजेक्ट हाती घेतला असून त्या प्रोजेक्ट अंतर्गत गावांमध्ये स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करुन दिला जात आहे. 'विचकुरहल्ली' हे कर्नाटकातील एक गाव. ह्या गावात २७४ घरांमध्ये अजूनही चुलीवरच अन्नं शिजायचं. IOC ने हे गाव पुर्णपणे स्मोकलेस केलं आणि हे गाव देशातील पहिलं स्मोकलेस व्हिलेज ठरलं आहे. ह्यासाठी गावकर्‍यांमध्ये बरीच जागृती करावी लागली. आधी हे लोक आपली चूलच बरी आहे म्हणत व गॅसची काय गरज? असे विचारत. पण चुलीमुळे होणार्‍या प्रदुषणाची व पर्यावरणावरील परिणामाची कल्पना दिल्यावर गावकरी स्वयंपाकाचा गॅस व शेगडी खरेदी करायला तयार झाले. आता प्रत्येक घरात LPG आहे. आता अश्या धूरमुक्त गावांची संख्या वाढत जाईल.

नुकतीच पॅरिसमध्ये प्रदुषणाच्या समस्येसाठी आंतरराष्ट्रीय परिषद झाली तेव्हा परिषदेच्या आदल्या दिवशी आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांनी ट्विट करुन 'विचकुरहल्ली' हे पहिले धूरमुक्त गाव ठरल्याची बातमी देवून गावकर्‍यांचं कौतुक केलं.

पॅरिस अ‍ॅग्रीमेंट बद्दल इथे लिहायला आलो - आणि हे नवे प्रतिसाद पाहिले.
भरत मयेकर: तुम्ही मांडलेले मुद्दे योग्यच आहेत. आणि म्हनूनच भारतासारखे विकसनशील देश आंतररास्ट्रीय पातळीवर पर्यावरणासंबंधी काहीही कमिट करत नाहीत. वस्तू आउटसोर्स करून इंपोर्ट म्हणजेच एमिशन्स आणि पर्यावरणीय र्‍हास एक्सपोर्ट करणे.
खरा मुद्दा तोच आहे - आपण ज्याला आर्थिक विकास म्हणतो तो मुळातच पर्यावरणाच्या र्‍हासावरच आधारलेला आहे. अनिर्बंध (लिमिटलेस) विकास आपल्या फायनाईट सिस्टीम मध्ये होणेच शक्य नाही. दुर्दैवाने, आर्थिक विकास नीती बदलणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे.

भारतासारख्या देशात जिथे असलेले पर्यावरण विषयक कायदे कालानुरुप किती सुयोग्य आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा रितीने होते ह्याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर साशंकता आहे.
>> भारताचे पर्यावरणविषयक कायदे खरे तर खूपच प्रगत आहेत - विशेषतः एन्व्हायरमेंटल इंपॅक्ट असेस्मेंट इत्यादीं मध्ये अनेक तरतूदींची शिफारस करता येते. पण हे सर्व इतके व्हेगली (धूसर?) लिहिलेले आहे की - कायद्यांची सर्व अंमलबजावणी काहीही विशेष न करता पूर्ण करता येते. अर्थात एखादा / एखादी अधिकारी जर प्रोअ‍ॅक्टीव्ह असेल तर तो / ती बरेच काही करू शकतो / ते.

अश्विनी के: विचकुरहल्ली चे उदाहरण मस्तच.

आता पॅरिस परिषदेबद्दल:
ही पॅरिस परिषद अखेरीस शुक्रवारी ११ डिसेंबरला संपली. ही एक ऐतिहासिक परिषदच म्हटली पाहिजे कारण प्रथमच सर्व देशांनी आपापली ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स कमी करण्याची तयारी दाखवत पॅरिस करार स्वीकारला. सर्वात मुख्य म्हणजे - अमेरिकेनेही हा करार स्वीकारला; आतापर्यंत ग्रीन हाऊस गॅस विषयक कोणतेही आंतरराष्ट्रीय करार अमेरिकेने स्वीकृत केले नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने देखील हा करार स्वीकृत केला; पॅरिस करारात भारत मोठाच अडथळा ठरत होता (भारताचे काही मुद्दे अगदी रास्तच होते आणि ते करारात स्वीकारलेही गेले आहेत).
न्यूयॉर्क टाईम्स मधील गेल्या आठवड्यातील हे व्यंगचित्र पॅरिस परिषदेतील भारताच्या भूमिकेविषयी बरेच काही सांगून जाते :

nyt-cartoon-india-climate_650x400_61449578996.jpg

या करारात काय आहे ? - तर, सनसनीखेज बातम्या सोडल्या तर, काहीही विशेष नाही. हे अतिशय मोठे दुर्भाग्य आणि चीड आणणारी घटना आहे. ३ मुख्य गोष्ती आहेत:

१. सर्व देशांनी ग्लोबल वॉर्मिंग २ सें पेक्षा कमी ठेवण्यासाठी आपापले हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्याची तयारी दाखविलि आहे. पण हे करण्यासाठी, लेखात लिहिल्याप्रमाणे २०३० सालापर्यंत आपले (प्रुथ्प्रुथ्वीचे) उत्सर्जन ~५०% ने कमी होणे आवश्यक आहे - जे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे सर्व जणांनी कमिटमेंट दिली हे चांगले आहे - पण या सर्व पोकळ बाता आहेत असे माझे मत.

२. भारतासारख्या विकसनशील देशांनी बंधनकारक उत्सर्जन कपात स्वीकारली नाही. भारताचे कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पोन्सिबिलिटी हे ब्रीद मान्य झाले आहे. अर्थात हे आर्ग्युमेंट जुनेच आहे. पण भारताने (आणि चीन, साऊथ आफ्रिका, मेक्सिको ई.) जी INDC (Independently Determined National Committment) दिली होती - म्हणजे आम्ही स्वतःहून काय उपाय करु असे जे सांगितले होते - ते करणे मात्र भारताला बंधनकारक राहील. उदा. भारताने २०२२ सालापर्यंत १,७५,००० मेगावॅट रीन्यूएबल एनर्जी बांधण्याचे कबूल केले आहे - जे भारताला आता करावेच लागेल.

३. हे विकसनशील देशांना जमावे म्हणून १०० बिलीयन डॉलर्स चा ग्रीन क्लायमेट फंड तयार करण्यात येईल - जो विकसित देश फायनान्स करतील. पण एकून खर्चाच्या दृष्टीने हा आकडा पीनट्स आहे.

पण हे सर्व जुन्या करारांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात होतेच. थोडक्यात, पॅरिस कराराची टिमकी वाजते आहे सर्व देश एकत्र आले म्हनून - पण याहून जास्त त्यात काहीही नाही.

मी आधी लिहिल्याप्रमाणे, या सगळ्या वादात खरे भरडले जातात ते म्हणजे गरीब आणि ग्लोबल वॉर्मिंगचे भयावह दुष्परिणाम भोगणारे देश. उदा. ऑस्ट्रेलिया जवळील मार्शल आयलंड. हा छोटासा देश समुद्रसपाटीपासून ६ फूट उंचीवर आहे. जर तापमानवाढ १.५ सें पेक्षा जास्त झाली तर हा संपूर्ण देश पाण्याखाली जाणार आहे. मार्शल आयलंडच्या अध्यक्षांचे संयुक्त राष्ट्रसंघाला उद्देशून केलेले एक अतिशय पॅशनेट भाषण इथे ऐकता येईल : https://www.youtube.com/watch?v=pgtN_T5uaKg

ह्या कराराचे भारतावर नेमके परिणाम काय होणार आहेत ? जागतिक पातळीवर पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत ? त्याची आर्थिक राजकीय गणिते काय आहेत ? याबद्दल एक वेगळा लेख येत्या काही आठवड्यात लिहेन.

भारताचे पर्यावरणविषयक कायदे खरे तर खूपच प्रगत आहेत - हे वाचून बरे वाटले. आहे त्या कायद्याची नीट अंमल्बजावणी करणारा एखादा जरी निघाला तरी आशा आहेत.

ह्या कराराचे भारतावर नेमके परिणाम काय होणार आहेत ? जागतिक पातळीवर पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत ? त्याची आर्थिक राजकीय गणिते काय आहेत ? याबद्दल एक वेगळा लेख येत्या काही आठवड्यात लिहेन. लेखाच्या प्रतिक्षेत

ग्लोबल वॉर्मिंग मुळे पोलर आणि ग्लेशियल आईस मेल्ट होऊन समुद्रातील पाणी वाढणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सरफेस मास डिस्ट्रीब्यूशन बदलत आहे. वॉटर मास पोल्स कडून विषुववृत्ताकडे सरकत आहे. यामुळे पृथ्वीची रोटेशनल व्हेलॉसिटी (स्वतः भोवती फिरायची गती) बदलायला हवी - आणि ती बदलत आहेच हे निरीक्षण आहे. पण जेव्ह्ढी मॉडेल्स प्रेडिक्ट करतायत तेव्हढी बदललेली दिसत नव्हती. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट खरच किती ? यावर एक सतत नॅगिंग प्रश्नचिन्ह असे. पण आता मात्र याची उकल झालेली आहे. जेव्ह्ढा बर्फ वितळलाय तेव्हढाच स्पीड मध्ये फरक पडलाय. पूर्वीचे निष्कर्ष चुकीचे होते कारण ते मॉडेल चुकीचे होते हे या नवीन शोधाने दाखवून दिले आहे. ग्लोबल वॉर्मिंग डीनायर्सचे हे एकमेव शास्त्रीय आर्ग्युमेंट होते - पण तेही आता मोडीत निघाले आहे.
अधिक इथे वाचा:https://www.washingtonpost.com/news/energy-environment/wp/2015/12/11/sci...

" भारताचे पर्यावरणविषयक कायदे खरे तर खूपच प्रगत आहेत" - "पण हे सर्व इतके व्हेगली (धूसर?) लिहिलेले आहे की - कायद्यांची सर्व अंमलबजावणी काहीही विशेष न करता पूर्ण करता येते. "
निकित "कायद्यांची सर्व अंमलबजावणी काहीही विशेष न करता पूर्ण करता येण्याजोगे " व्हेग असतील तर प्रगत असले काय नि नसले काय

Pages