ये कैसी अजब दास्ता हो गयी है

Submitted by संदीप ताम्हनकर on 8 October, 2015 - 05:34

सुरय्या जमाल शेख ने 'ये कैसी अजब दास्ता हो गयी है' हे गाणं गायलं आणि त्यावर अभिनय केला तेव्हा ती साधारण 34 वर्षांची होती. 'रुस्तुम आणि सोहराब' (रुस्तुम ऐ सोहराब - 1963) ही तिच्यासाठी आजच्या भाषेत कमबॅक फिल्म होती. नायक पृथ्वीराज कपूर आणि प्रेमनाथ असे बुलंद नट होते. अजून एक माहिती म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक 'विश्राम बेडेकर' होते.

हिंदी सिनेमामध्ये अनेक सुंदर चेहऱ्याच्या नट्या झाल्या, अनेक अभिनय संपन्न नट्या झाल्या, अनेक सुरेल गायिका झाल्या पण या तिन्हीचा सुवर्ण संगम म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे गाणं आवर्जून बघा. नटीच्या चेहऱ्याचा एवढा टाइट क्लोज-अप लावून केवळ डोळ्यांनी केलेली एक्सप्रेशन्स, अतिशय बोलके डोळे आणि अभिनय याला आज पर्यंत तरी दुसरी जोड नाही. गाण्याचे टेकिंग अप्रतिम. एवढ्या ताकदीने काळजात घुसणारं दुसरं गाणं नाही, सुरय्याला तोड नाही.

महान रुस्तुम झाबूली आणि राजकन्या तहमिना यांची पहिली भेट होते तेव्हा ताकदवान आणि बुलुंद देहयष्टीचा रुस्तुम राजकन्येच्या वाटेत पडलेलं झाड लीलया उचलून बाजूला करतो. सैन्यातील नोकरीची ऑफर धुडकावून आणि नंतर बक्षीस म्हणून दिलेली सोन्याची मोहोर केवळ दोन बोटात अंगठ्याने दाबून वाकवून परत राजकन्येच्या अंगावर फेकून रुस्तुम आपल्याच मस्तीत निघून जातो. राजकन्या त्याच्यावर भाळते, रुस्तुमला आपल्या राजमहालात आणण्यासाठी सेवकांकरवी त्याचा प्रिय घोडा पळवून आणते.

घोड्याच्या शोधत महान रुस्तुम पर्शियाच्या कैकावूस राजाच्या दरबारात येतो. त्याला शांत करून आगत स्वागत करून महालात विश्रांतीसाठी पाठवले जाते. तेव्हा राजकन्या तहमिना दासीच्या वेशात आपला चेहरा घुंगटने झाकून, हार्प वाद्य छेडत आपल्या भावना या गाण्यातून व्यक्त करते. केवळ स्वर्गीय अनुभव. आपणही जरूर पहा. गाण्याचे टेकिंग, शब्द, संगीत इत्यादी गोष्टी अप्रतिम आहेतच. त्यावर लिहिण्यापेक्षा अनुभवाच कसे.

https://www.youtube.com/watch?v=97otjre1psI

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे गाणे हे, आवडीचे होतेच.

यातील इतर गाण्यांबद्दल पण लिहा ना फिर तूम्हारी याद आयी ( रफी, मन्ना डे ) आणि ए दिलरुबा नजरे मिला ( लता ) चित्रपट बघितला नाही, म्हणून कथानकाची काहीच कल्पना नाही.

सज्जाद हुसेन चं संगीत आहे ह्या गाण्याला.

मेंडोलिन वर शास्त्रीय संगीत वाजवण्याईतकं प्रभुत्व असणारा, अतिशय गुणी, तितकाच फटकळ ("ठीक तरह से गाईयें लताजी, यह नौशाद की धुन नही है" असं लता ला ऐन रेकॉर्डिंग च्या वेळी ऐकवू शकणारा), स्वतःविषयी आणी स्वतःच्या कामाविषयी उद्दामपणाकडे झुकणारा अभिमान बाळगणारा, ह्याच दुर्गुणांपायी (?) उपेक्षेच्या अंधारात संपून गेलेला संगीतकार म्हणजे सज्जाद हुसेन.

"ठीक तरह से गाईयें लताजी, यह नौशाद की धुन नही है" असं लता ला ऐन रेकॉर्डिंग च्या वेळी ऐकवू शकणारा>>>>>
ती नेहमी ठीक तरहसेच गायली आहे. नो वंडर तो विस्मृतीत गेला. असो. अवांतर बद्दल क्षमस्व.

गाणे सुंदरच आहे.