अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी

Submitted by मार्गी on 6 October, 2015 - 05:42

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

हिमालयाच्या पायथ्याशी

“अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराज: पर्वतोs हिमालय:” अर्थात् महाकवि कालीदासाने म्हंटलं आहे की, उत्तर दिशेला हिमालय म्हणून ओळखला जाणारा एक पर्वतांचा महाराजा आहे. हिमालयाकडे जाणा-या ह्या प्रवासाची सुरुवात संपर्क क्रांती एक्स्प्रेसने झाली. नाव सार्थ करत ट्रेनने फक्त दोन- तीन स्टेशन घेत वेळेमध्ये दिल्लीपर्यंत पोहचवलं. रस्त्यामध्ये राजस्थानात पहाटेच्या उजळत्या आकाशाआधी अमवस्येच्या थोड्या आधीचा चंद्र आणि त्याजवळ शुक्र ग्रहाचा अद्भुत नजारा बघायला मिळाला. नजारा इतका सुंदर होता की, नदीच्या पाण्यामध्येही दोघांचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. लवकरच सूर्योदय झाला.

दिल्लीला पोहचल्यानंतर आनंद विहार आयएसबीटीवरून पिथौरागढ़ची बस घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. नातेवाईक पिथौरागढ़ला जात असल्यामुळे प्रवास त्या बाजूने करायचा असं ठरवलं. उत्तराखंड परिवहन निगमची ही बस आहे आणि पहाडी रस्त्यांना लक्षात घेऊन छोट्या आकाराचीही आहे. दिल्लीच्या पुढे गाज़ियाबाद, मुरादाबाद, उधम सिंह नगर, रुद्रपूर अशा गावांमधून जाऊन पहाटे टनकपूरला पोहचलो. टनकपूर नेपाळच्या सीमेला अगदी लागून आहे. इथून पुढे पहाडी रस्ता सुरू होईल. टनकपूर- चंपावत- पिथौरागढ़ रस्ता नेपाळच्या सीमेला लागूनच जातो. इथून पुढे जाऊन कैलास मानससरोवर यात्रेचा एक मार्ग सुरू होतो.

थंडीच्या दिवसात हिमालयात फिरायचं असल्यामुळे थंडीची सवय होण्यासाठी स्वेटर वापरलं नाही. तशा थंडीत पहाटेचा नजारा सुरू झाला. सततच्या प्रवासामुळे डोळ्यांवर झोपही होती. पण जेव्हा रस्ता इतका रम्य असेल, इतका अपूर्व असेल तेव्हा झोप कशी येणार. ह्या रस्त्यापासून बीआरओ म्हणजेच सीमा सडक संघटनेचं कार्यक्षेत्रसुद्धा सुरू होतं. कश्मीरपासून मिझोरमपर्यंतच्या सर्व सीमावर्ती आणि दुर्गम भागांमध्ये बीआरओ सेनेसह आपली सावलीसारखी सोबत करते. ह्या मार्गावर टनकपूरपासून पिथौरागढ़ फक्त १५० किलोमीटर अंतरावर आहे. पण त्यात मोठ्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागतात. नागासारखा सर्पिलाकार जाणारा रस्ता एक पर्वत पार करतो आणि परत उतरतो. लगेच पुढे दुसरा पर्वत तयार! अशा चढ- उतारांमध्येच शेत, मळे, गाव आणि डोंगरात आतमध्ये पसरलेली घरं! खरोखर इथून मानवप्राणीसुद्धा बदलतो! बदलणारच.


दूरवर बर्फाच्छादित पर्वतरांगांची एक रेखा

चंपावतच्या पुढे एका जागी लोहाघाटजवळ एक रस्ता फुटतो. हा रस्ता अल्मोडा जिल्ह्यातील मायावती आश्रमाकडे जातो. पिथौरागढ़च्या दिशेने जाताना आपण हळु हळु अशा उंचीवर पोहचतो जिथून दूरवरचा नजारा दिसू लागतो. इथून हळु हळु हिमालयातली एक एक पर्वतरांग दिसू लागते. त्रिशुल आणि ॐ पर्वत दिसतात. खरोखर २५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून ते दर्शन देतात. पण पुढे जाताना आपण पर्वत उतरून खाली येतो, तेव्हा ते दिसेनासे होतात आणि परत पुढच्या उंच बिंदूवरून दिसू लागतात.

पिथौरागढ़च्या आधी घाट नावाच्या ठिकाणापासून अगदी सुंदर नजारा दिसतो. तसं तर उत्तराखंडातलं प्रत्येक स्थान पर्यटन स्थळ आणि रम्य स्थळ आहे. तरीही उंच जागांवरून आणखी सुंदर नजारा दिसतो. जवळच उंच पर्वत आणि जवळच दरी आणि त्यांच्या मधोमध वाहणारी खळाळती रामगंगा नदी. . .

गुरना नावाचं एक छोटं मंदिर आहे. रस्त्यामध्ये प्रवाशांचा थकवा दूर करून त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी असे स्थान पहाडात सर्वत्र आहेत. प्रकृतीचा अविष्कार इतका विराट आणि रौद्र आहे की, मन:शांती ठेवण्यासाठी जुन्या काळापासून असे स्थान बनवले गेले असावेत. निसर्गसुद्धा त्याच्या बाजूने माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. डोंगरांमधून वाहणारे शुद्ध पाण्याचे झरे त्यासाठीच तर आहेत. उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशांमध्ये पिण्याचे पाणी ब-याच प्रमाणात नैसर्गिक स्रोतामधून येणारं वाहतं पाणीच असतं. ही निसर्गाची एक छोटीशी देणगी आहे आणि निसर्गाच्या जवळ पोहचल्याचं एक छोटसं बक्षीससुद्धा.

खरोखर पुढचा सगळा नजारा असा विलक्षण आहे की फोटो, शब्द, व्हिडिओ अशा गोष्टींमध्ये तो मावूच शकत नाही. ज्याची मिती विराट आहे; ज्याचे पैलू अथांग आहेत, त्याचं वर्णन करावं तरी कसं? हिमालयाची ती अथांग उंची आणि तितकीच प्रगाढ खोली! सूर्य नाही पण सूर्याचं प्रतिबिंब म्हणून हे काही फोटो. .

अशा रम्य मार्गाने दुपारपर्यंत पिथौरागढ़ला पोहचलो. मानस सरोवराच्या एका मार्गावर असलेला हा उत्तराखंडच्या पूर्व- उत्तर सीमेवरील जिल्हा आहे. गांव छोटंच आहे आणि अगदी डोंगरात वसलं आहे. पिथौरागढ़ला नातेवाईकांसोबत एक दिवस थांबेन आणि तिथून ट्रेकिंगला पुढे जाईन. जोशीमठ- बद्रिनाथ परिसरात रस्ता चालू असेल तिथपर्यंत जाण्याचा विचार आहे. म्हणून जातानाच पहिले कर्णप्रयाग आणि बागेश्वरच्या बसची चौकशी केली आणि चांगली माहिती मिळाली. इथून बागेश्वरपर्यंत डायरेक्ट बस जाते. ती पहाटे पाचला निघते.
संध्याकाळी आराम केला. थंडी खूप जास्त आहे. रात्री थोडा पाऊससुद्धा पडला. हे एक चांगलं लक्षण आहे. जर हिवाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाच्या पायथ्याच्या भागांमध्ये पाऊस होतोय ह्याचा अर्थ निश्चितच उच्च पर्वतांवर बर्फ पडत असणार. उद्या पहाटेपासून पुढचा खरा प्रावास सुरू होईल. . .


रमणीय रामगंगा


कूमाऊँ रेजिमेंट!

 पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!
अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः
पुर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः प्रुथ्विया इव मानदण्डः ||१||

अशी कुमार सम्भव ची सुरवात कालिदासाने केली आहे.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

@ शशांक पुरंदरे सर, काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिला होता.

@आउटडोअर्स, मी हिंदी आणि मराठीत पॅरलल लिहितो. कधी मराठी आधी तर कधी हिंदी आधी. धन्यवाद.