आशा

Submitted by यतिन-जाधव on 6 October, 2015 - 02:47

मध्य कोकणातलं मारळ सारखं एक अतिदुर्गम, जेमतेम तीसेक घरांच खेडेगाव, याच गावातला एक हुशार मुलगा विजय, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरीसारख्या शहरी भागात जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या वीणाबरोबर अतिशय घनिष्ट मैत्री आहे, वीणा त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे, विजय तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणी गरज ओळखुन विजय आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही आणी तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग वीणाला प्रपोज करायचं, थोड्याच दिवसांत विजयला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागते, विजय आनंदाने हि बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे वीणाला मागणी घालण्यासाठी म्हणून वीणाच्या घरी जातो पण त्याला आता फार उशीर झालेला असतो, वीणाचे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडिलधाऱ्या नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका मुंबईत राहणाऱ्या मुलाशी तीच जबरदस्तीने लग्न ठरवल जातं, नाईलाजाने वीणाला लग्न करणं भाग पडतं, लग्न करून वीणा मुंबईला निघून जाते, यागोष्टी इतक्या अचानकपणे घडतात कि त्याबद्दल विजयशी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही.

विजय निराश मनाने घरी परततो, तो आता वीणाला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या तिला विसरू शकत नाही, यापुढे आयुष्यात पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निश्चय करून पुढे स्वतःला कामात बुडवून घेतो, लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून विजयला सारखे लग्नासाठी पाठी लागतात, विजय त्यांना खूप विरोध करतो, पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो, घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच कुसुम नावाच्या एक सुस्वरूप, यथायोग्य मुलीशी विजयचं लग्न करून देण्यात येतं, विजय नवीन संसारात फारसा रमत नाही, नुसताच संसारगाडा रेटत असतो, पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो, त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर मुंबईला बदली होते, साहजीकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला जाणं भाग पडतं, हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाचच फटकून वागतो, तिला समजूनच घेत नाही, प्रेमात अपयश आल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतोय, तसं पाहिल तर यात तिची काहीच चूक नाहीय, विजय आता आपलं वागणं सुधारतो आणि कुसुमशी नॉर्मल वागू लागतो.

थोड्याच दिवसांत त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं, त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होते, दोघांचाही संसारही व्यवस्थित चाललेला असतो, दोघेही आपली सुख-दुख एकमेकांशी शेअर करतात, विजय एक दिवस मूडमध्ये येउन आपलं लग्नापूर्वीच वीणाबरोबर जमलेलं प्रेम व काही कारणांनी तिच्याबरोबर होऊ न शकलेलं लग्न ही सगळी हकीकत कुसुमला सांगतो, कुसुमही सगळं निमूट ऐकून घेते, झालं गेलं विसरून जा आता वीणाच्या जागी मी आहेना तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही इतक मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा विजयला धीर देते, विजय आता कुसुमला आग्रह करतो कि तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित-गोष्ट सांगायची असेल तर सांग, कुसुम सुरवातीला लाजते, नाही-नाही म्हणते, विजय मात्र तिला सांगण्याची गळचं घालतो, कोणालाही न सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो, त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो, इतका विश्वास दिल्यावर कुसुमसुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने विजयाला सांगते पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र विजयचा पुरुषी अहंकार परत जागा होतो, तो कुसुमची ही गोष्ट पचवूच शकत नाही, त्या दिवसापासून विजय-कुसुमच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो, तो तिला टाळू लागतो, स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो, रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो, सुट्टीच्या दिवशीदेखील घरात कुसुम किवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहु लागतो, सारखा चिडचिड करतो, कुसुमशी तुसड्यासारखं वागू लागतो, मुलीचा राग करतो, अशाच धुमसत्या परिस्थितीत दोन तीन वर्ष निघून जातात.

विजयच्या वागण्याने कुसुम मनातून कोलमडते, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो, निरुत्साह आणी अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते, तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून विजय आता तिला पूर्णपणे टाळू लागतो, सतत पाच-सहा दिवस, आठवडाभर बाहेर राहू लागतो, असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या विजयला कुसुम हाक मारते, विजय तिच्याकडे दुर्लक्षचं करतो, पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाहीय, तेव्हा बेबीला आज तू जाताजाता शाळेत सोड, मग पुढे ऑफिसला जा, विजय चिडतो, नाही म्हणतो, ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो, शेवटी कुसुम त्याला विनवणी करते कि तुझा राग माझ्यावर आहे तर मग बेबीला यात कशाला ओढतोस, तिचा यात काय गुन्हा, शेवटी एकदाचा चरफडत विजय नाईलाजाने बेबीला शाळेत सोडायला जातो, शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते, फक्त मुलांनाच गेटमधून आत सोडलं जातं, पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात, विजय बेबीला घेऊन गर्दीत घुसतो आणि बेबी गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो, बेबी सुखरूप आत गेल्यावर हुश्य करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणी जमलेल्या इतर पालकांच्या चिकाटीकडे कौतुकमिश्रित आश्चर्याने पहात राहतो, तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता साधारण वीणासारखा चेहरा दिसतो, विजय मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो पण गर्दीच्या रेटारेटीमध्ये त्याला नीटसं काही दिसत नाही, वीणासारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे विजय अस्वस्थ होतो, त्या दिवशी ऑफिसमध्ये देखील त्याच कामात लक्ष लागत नाही, तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या वीणाच्या आठवणींनी बेचैन जातो, रात्री नीट झोपत नाही व आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाउन खात्री करून घ्यायची की ती नक्की वीणाच आहे की दुसरी कोणी.

विजय सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून बेबीला शाळेत सोडायला निघतो, कुसुम मनातून सुखावते, विजय आता शाळेजवळ पोहोचतो पण आज त्याची नजर मात्र वीणासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा सतत शोध घेत असते, लवकरच तो क्षण येतो, तो चेहरा त्याला पुन्हा ओझरता दिसतो, विजय आता पटकन बेबिला गेटमधून आत सोडतो आणि तिथेच त्या चेहऱ्याची जवळ येण्याची वाट पहात घोटाळत राहतो, इतक्यात वीणाच आपल्या लहान मुलाला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते, विजय तिच्याकडे पाहताच राहतो, दोघांचीही नजरानजर होते, विजय स्माईल देतो, वीणा नुसतीच त्याच्याकडे पाहते, मुलाला गेटमधून आत सोडते आणी विजय काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात वीणा पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते, विजय नुसताच पहात राहतो, मात्र आता पुन्हा वारंवार वीणाची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो, काहीही करून आता पुन्हा तिला गाठायचच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचीच असा विचार करून विजय तिथून निघतो आणि नंतर जवळजवळ दोन-तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ वीणाची वाट पहात राहतो, पण वीणा काही त्याला भेटत नाही.

चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलाला सोडायला आलेली वीणा त्याला दिसते, त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते, हिम्मत करून विजय आज तिला काहीही करून गाठतोच आणि वीणा अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो, वीणा आता त्याला ओळख तर दाखवते, पण मोजकच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते, इकडे विजय बेचैन होतो, पुढच्याच दिवशी विजय पुन्हा शाळेबाहेर वीणाला गाठतो आणि काहीतरी महत्वाच बोलायच आहे अस सांगून तिच्याशी फक्त पाचच मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, वीणा वेळ नाहीय, उशीर झालाय, घरी कामं आहेत असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते पण विजय खूपच आग्रह करतो, तिचाही नाईलाज होतो, ती विजयला आज नको उद्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बोलू अस सांगून आपली सुटका करून घेते.

इकडे वीणाच्या मनातही चलबिचल होते, आपला लग्नापुर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना ? त्याला आपल्याशी काय बरं बोलायच असेल ? आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो त्याचा जाब तर त्याला विचारायचा नसेल ? की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल, आता आपण एक विधवा, आपल असं एका परपुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का ? कोणी पाहिलं तर काय म्हणेल ? त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाचच दोघांचीही बदनामी होईल, काय कराव ? भेटायला जाणं योग्य कि अयोग्य ? जाउदे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटनं तर सोडाच पण साधी ओळखही न दाखवण्याबद्दल खडसावून सांगुया असा विचार मनात पक्का करून ती दुसऱ्या दिवशी विजयला भेटायला जाते.

दुसऱ्या दिवशी विजय आणि वीणा मुलांना शाळेत सोडून जवळच्याच एका साध्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जातात, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्यांच्या पूर्वीच्या एकमेकांवरच्या प्रेमाचा विषय निघतो, अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिरस्थावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही, अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणी तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला स्वतःलाच जबाबदार धरून विजय वीणाची सर्वप्रथम माफी मागतो, पुढे गप्पांच्या ओघात विजयला तिची खरी कहाणी कळते, की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धच तिच लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिल होतं, पण लग्नानंतर साधारण दीड वर्षांतच तो एडस सारख्या भयंकर रोगाने दगावला, त्याच्यापासूनच तिला एक मुलगा आहे, घरी बेडवर खिळलेले आजारी सासरे असतात, घरात कमावतं दुसर कोणीच नसल्या कारणाने वीणाला जवळच्याच एका साध्याच कंपनीत काम करून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागतेय, त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे, त्यामुळे विजय आता वीणाला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्याच प्रॉमिस करतो, वीणा सुरवातीला अवघडते, पण विजयच्या आग्रहापुढे शेवटी नाईलाजाने तयार होते.

पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या-बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळुवार मैत्री फुलते, ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त नंतरही त्याचं एकत्र बाहेर फिरणं, सिनेमा, शॉपिंग या गोष्टी वाढतात, दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांचा सहवास आवडू लागतो, अशातच विजय एक दिवस वीणाला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसांसाठी दुसऱ्या शहरात आपल्यासोबत मिटींगला चालण्याचा आग्रह करतो, वीणा नाही म्हणते, लहान मुलगा, आजारी सासऱ्यांची अडचण सांगते, विजय तिची ही अडचणसुद्धा सोडवतो, आता तिच्यापुढे विजयबरोबर मिटींगला जाण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही आणि ती तयार होते.

मिटींगच्या आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी थांबतात, फ्रेश होतात आणी गप्पा मारत बसतात, गप्पांच्या ओघात वाहवत जाउन विजय थोडा रोमॅंटिक मूडमध्ये येतो आणि वीणाला आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करतो, ती विरोध करते, त्याला ढकलून स्पष्ट नकार देते, पण विजयच्या अगदीच हट्टापुढे शेवटी नाईलाजाने त्याला आपली सद्य कहाणी सांगते की तुझ्या माझ्यात आता आपले पूर्वीसारखे संबंध पुन्हा नाही बनू शकणार, मी तुला आता आणखी अंधारात ठेवू इच्छित नाही, तुला तर आधीच माहित आहे की लग्नानंतर दीड वर्षातच माझा नवरा एडस सारख्या रोगाने मरण पावला, पण जाता-जाता तो मलाही त्या रोगाची लागण लावून गेलाय, आणि तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून माझ्यापासून तुला या रोगाची लागण व्हावी हे मला स्वतःला नाही आवडणार, थोड्याशा मोहापायी मला तुझा सुरळीत चाललेला संसार विस्कळीत नाही करायचाय, त्यामुळे तूही मनाला थोडा आवर घाल, शरीरसुख म्हणजेच सर्वस्व असं नसतं अरे, आपण मनाने एक आहोत, फक्त एकत्र राहणं म्हणजेच संसार करणं असं मुळीच नसतं, आणि तरीही जर तुझा हट्टच असेल तर मात्र मी तुला जराही अडवणार नाही, तू अगदी तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहेस, पण त्याआधी एकदातरी अगदी मनापासून, प्रामाणिकपणे आपल्या बायको मुलांचा विचार मनात आण, आपण त्यांना फसवतो आहोत, त्यांच्याशी प्रतारणा करतो आहोत असं तुला जराही वाटत नाहीय का, तुझ्या मनालाच विचार, आणि उत्तर जर हो असं येत असेल, तर मात्र तू माझ्याकडून नुसतंच शारीरिक सुख मिळवशील पण त्यातल्या आत्मिक सुखाला मात्र कायमचं मुकशील.

विजय वीणाच बोलणं मनापासून ऐकतो आणि पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो आणि हाताने तिच्या तोंडावर हात ठेवून तिच बोलणं मध्येच थांबवतो, आणि आता आपली बाजू वीणाला समजावून सांगतो, हे बघ वीणा, तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतंय, पण मला नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय, हो मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरय, पण त्याला ती स्वतःच जबाबदार आहे, खरं म्हणजे तुझं लग्न होवून तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात काडीचाही रस नव्हता, मी माझ्या लग्नाचा विषय नेहमीच टाळत राहिलो, पण लहान भावंडाच्या खोळंबलेल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर मला माझ्या एका लांबच्या मामाच्या मुलीशी म्हणजेच कुसुमशी नाईलाजाने लग्न कराव लागलं, माझ्या त्या मामाने दारूमध्येचं आपलं सगळं जीवन बुडवलं होतं, मग त्याच्यामागे त्याच्या एकट्या तरुण मुलीलाही आधाराची गरज होती, पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणीमुळे मी मनाने तिला कधीच आपली समजू शकलो नाही, पुढे माझी इकडे मुंबईला बदली झाली, जसजसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला लागलो, थोड्याच दिवसांत आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो, आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवायची नाही या प्रामाणिक विचाराने मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं, तिनेही ते मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं, मग मी तिला तिच्या एखाद्या गुपिताबद्दल सांगण्याचा आग्रह केल्यावर तिने मला तिची जी कहाणी सांगितली त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

आमच्या लग्नापूर्वी दोनेक वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा नेहमीप्रमाणे साधारण एप्रिल मे महिन्यात मुंबईहून बरीचशी मंडळी आपल्या मुलाबाळांसोबत गावाला सुट्टी घालवण्यासाठी जातात, तशीच काही नातेवाईक, मित्रमंडळी गावाला तिच्या शेजारच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आलेली होती, शेजारचाच घर असल्याने कुसुमचही त्यांच्या घरी अगदी घरच्या प्रमाणेच येण जाण होतं, अशातच पाहुणे मंडळींची आणि कुसुमची चांगलीच गट्टी जमली, त्यातल्याच एका तरुणा बरोबर कुसुमचे खास मैत्रीचे संबंध जुळले, त्याच मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन अधिक वाहवत जात शरीरसंबंधापर्यंत त्यांची मजल गेली, नंतर लग्नाच्या आणाभाका झाल्या, आणि बघताबघता सुट्टीचे दिड-दोन महिने संपले, पाहुणेमंडळी पुन्हा मुंबईला निघून गेली.

पण मुंबईला गेल्यावर मात्र त्या तरुणाचा ना पत्ता ना फोन, तेव्हा कुसुम मनातून चांगलीच घाबरली, आपण फसवलो गेल्याची तिला पक्की जाणीव झाली, इकडे थोड्याच दिवसात कुसुमच्या शरीरावर मातृत्वाच्या खुणां दिसू लागल्या, गावात चर्चा होऊ लागली, बदनामीच्या भीतीने अगदी जवळच्या शेजारच्या काही मंडळींनी सरकारी दवाखान्यात नेउन कुसुमची सुटका करवून घेतली, पण त्यात एक नवीनच बाब पुढे आली की तिला एचआयव्हीची लागण झालेली आहे, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले, त्या एका मोहाचा क्षणाचा डाग मात्र तिला एडसच्या रूपाने कायम आयुष्यभर लागला, हीच गोष्ट मनाला लावून घेत तिच्या वडिलांनी सतत दारू प्यायला सुरवात केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर कसलाच सुगावा लागू न देता तिच माझ्याबरोबर गुपचूप लग्न लावून देण्यात आलं, लग्नानंतर बरेच दिवस तिला कोणत्याच गोष्टीत उत्साह नसे, सतत थकवा, नेहमीचं आजारपण या गोष्टी तर नित्याच्याच, पुढे प्रेग्नन्सिम्ध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, आता तर तो रोग मला सुद्धा लागलाच आहे पण आमच्या मुलीलादेखील होण्याची दाट शक्यता आहे, मुलीसाठी थांबलो नाहीतर मी कुसुमला केव्हाच घटस्पोट घेऊन मोकळा झालो असतो, तशी कुसुमची सध्याची अवस्था तर वाईटच आहे, त्या रोगाचे परिणाम आता तिच्या शरीरावर अगदी स्पष्टपणे दिसतात, सतत थकवा, कसलाच उत्साह नाही, काही खायची इच्छा नाही, खाल्लेला पचत नाही, प्रतिकार शक्ती कमी, त्यामुळे साधी सर्दी देखील जीवघेणी ठरते, अनेक उपचार झाले, आता तर डॉक्टरांनी देखील आशा सोडली आहे, त्यामुळे ती आता फार दिवसाची सोबती नाही, तेव्हा पुन्हा मी एकटाच पडणार आणि तिच्यामुळे हा आजार मला आधी झाला असल्यामुळे तुझ्यामुळे मला पुन्हा हा आजार होईल याची तू काळजीच करू नकोस, खरं पाहिल तर आपण आता एकाच बोटीवरचे दोन प्रवासी आहोत, आपला मार्ग देखील एकाच आहे, मी तुझ्याबरोबर तुझ्या मुलाचा देखील सांभाळ करायला तयार आहे, फक्त कुसुम जिवंत असेपर्यंत उघडपणे आपण काही करू शकत नाही, तेव्हा ती जायची वाट आपल्याला पहावीच लागेल, मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्याने एकत्र येऊ अशी आशा करूया.

पण आता कुसुमच्या मरणाची आशा करता करता जवळपास बावीस-तेवीस वर्षे लोटलीत, दोघांची मुलं सुद्धा आता मोठी झालीत, शिक्षणं पूर्ण करून लग्नाला झालीत, कुसुमची प्रकृती कधी खूपच बिघडते, पुन्हा तितक्याच वेगाने सुधारतेदेखील, पण अशा परिस्थितीत विजय आणि आशा कोणताच ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण कायद्याच्या दृष्टीने विचार करता संपूर्ण सहानभूती कुसुमच्याच बाजूने जाते, तेव्हा आता नुसतच मुग गिळून समोर जे घडतंय ते पहात राहण्याशिवाय विजय आणि वीणापुढे कोणताच पर्याय उरलेला नाही, त्यामुळे आता सतत ऑफिसच्या आउटस्टेशन मिटींगच्या कारणाचाच तेवढा काय तो त्यांना आधार आहे, दोघेही आपले आशेवरच जगताहेत, ही आशाच फार वाईट असते, कधीकधी जीवन उध्वस्त करते.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गप्पांच्या ओघात वाहवत जाउन विजय थोडा रोमॅंटिक मूडमध्ये येतो........... विजय ला स्वतःहुन वीनाला सान्गाव अस वाट्ल नाहि का?

गुड पॉईंट मनस्वि८९.

>>>>पुढे गप्पांच्या ओघात विजयला तिची खरी कहाणी कळते, की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धच तिच लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिल होतं, पण लग्नानंतर साधारण दीड वर्षांतच तो एडस सारख्या भयंकर रोगाने दगावला, त्याच्यापासूनच तिला एक मुलगा आहे<<<<

कदाचित यावरुन विजयला कळाले असेल की वीणाला सुद्धा एड्स झालाय.