पुन्हा पाऊस वळला

Submitted by भुईकमळ on 5 October, 2015 - 08:35

पाठमोरा होता होता पुन्हा पाऊस वळला
दिलाशाच मंद हासु रानी सांडूनिया गेला ∥ धृ ∥

नाचणारया पावलांनी बाळवारा वनी आला
पाचोळ्याचे भिरभिरे फिरवीत उधळला
संगे गिरकी घेताना पंख फुटले धुळीला ...

रानझरी खुदकली गरतीचा साज ल्याली
सानओहोळ कुशीत घेऊनिया झेपावली
सांगे कडेकपारींना 'आला मु-हाळी न्यायला '...

घळीतून कारवीचे निळे सूर ओघळले
आवतन मधुदाट कुणी वेचले, टिपले
निळ्या पावरीचा सूर आज समेवर आला....

रानअळु खुळावले सुखभारे हिन्दोळ्ले
कुणी पर्णकायेवरी चन्द्रमणी खेळवले
चाळा रानझुळुकेचा गोड छळुनिया गेला …

सोनसळी कांतीवर पंखस्पर्श थरारला
सोनकीच्या बिंबासवे मेघ नीळुला डुंबला
रंगभासांची कंपने ,ऋतू झिम्म शहारला ….

धारावत्या ओळींतून थेंब नितळ ओवले
वेशीवरती स्वप्नाच्या शब्द पाकोळ्यांचे झाले
मल्हारल्या कवितेत प्राणगंध ठिबकला …
.............माणिक वांगडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरंदरे शशांक तात्काळ प्रतिसादासाठी खूप धन्यवाद बेफिकीर तुमची दाद मिळाली खूप छान वाटतंय

छान !

आपल्या कवितेचं केलेलं कौतुक
कुणाला आवडत नाही?>>>

अगदी खरंय आपलं म्हणनं!
पण हिमालयापुढे,येरव्ही ऊंच वाटणारी झाडं खुजी वाटायला लागतात! काही मान्यवरांच्या प्रतिभेसमोर आपला प्रतिसादही असाच असेल,असं वाटतं कधी-कधी...नि कधी-कधी तर ती भव्यता निःशब्दच करुन जाते!
अंतरजालावर,'निःशब्द' असा शब्द नोंदवून ती निःशब्दताही व्यक्त करावी लागते...हेही खरंच!
चुका झाल्या तर निदर्शनास आणून देत रहाल,या अपेक्षेसह...
धन्यवाद!

अन्जू,मुक्तेश्वर कुळकर्णी आणि मनीमोहोर खूप आभारी आहे .आपल्या सारख्यांच्या प्रतिसादांच्या झिमझीमत्या का होईना सरींनी मनातल कवितेच रोपुलं अजुनही तग धरून आहे
चुका झाल्या तर निदर्शनास आणून देत रहाल,या अपेक्षेसह...>>>सत्यजित जिथे माझी स्वतःचीच कविता बाल्यावस्थेत आहे तिथे इतरांना मी काय सांगणार क्वचितच काही खटकल तर मी बोलते .तुम्ही जो मान देताहात त्याबद्दल...धन्यवाद पुन्हा एकदा..