एक अधिक एक म्हणजे एक हजार !

Submitted by स्वीटर टॉकर on 30 September, 2015 - 06:23

ही सत्यकथा नाही त्याचप्रमाणे काल्पनिकही नाही. गोपनीयतेसाठी सत्यापासून फारकत घेणं जरूरीचंच असतं.

चित्रपटाआधी एक Disclaimer येतो. Any resemblance of these characters to persons living or dead is purely coincidental. यावर कोणीतरी केलेला विनोद माझ्या वाचण्यात आला होता. Any resemblance of these characters to persons living or dead is purely their bad luck. तशी या कथेची स्थिती आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझं ग्रॅजुएशन झाल्याबरोबर माझं लग्न थाटामाटात झालं. वडिलांचं छोटंसं दुकान. सासर गर्भश्रीमंत. लक्ष्मीचा वरदहस्त असलेलं स्थळ मिळालं म्हणून सार्‍यांना कौतुक. लग्नांत मुलाकडच्यांची कोडकौतुकं पुरवता पुरवता बाबांची अन् लक्ष्मीचीच ताटातूट व्हायची वेळ आली. पण योग्य निर्णय घेण्याचं तेव्हां माझ्यात धैर्य नव्हतं अन् अक्कलही.

सासूबाई स्वभावानी मृदु अन् अतिशय प्रेमळ. पण मृदु व्यक्तींना असलेला शाप त्यांनाही होताच. घरात त्यांच्या मताला काहीही किंमत नव्हती.

दोन वर्षांनी मला जुळी झाली. मुलगा अन् मुलगी. कार्यक्षमतेची परिसीमा. एकाच प्रेग्नंसीत चौकोनी कुटुंब हासिल! ऐश्वर्य, प्रतिष्ठा अन् आता दोन गोंडस बाळं. दृष्ट लागावी अशीच परिस्थिती. वास्तव मात्र जरा वेगळं होतं.

ह्यांचा लोकसंग्रह नावापुरताच. त्यांचे फास्ट फ्रेंड म्हणजे त्यांचे वडील. रोज संध्याकाळी दोघं ऑफिसमधून बरोबरच परत यायचे. त्यानंतरची वेळगंमत म्हणजे ड्रिंक घेणे. वर सिगरेटचा धूर. माहेरी मी व्यसन हा प्रकार कधी बघितलेलाच नव्हता. शराबी चित्रपटातल्या अमिताभची नक्कल करत आम्ही बहिणी पोट धरधरून हसत असू. आता मात्र त्या आठवणीनी कसंसंच होऊ लागलं.

मी आणि सासूबाई बाळांच्या संगोपनात व्यग्र असायचो. सासूबाईंना बालसंगोपनाची शास्त्रशुद्ध माहिती. शिवाय जबरदस्त पेशन्स. आजी आणि सासू म्हणून त्या ideal होत्या. पण पत्नी आणि आई म्हणून . . . . . . .?

इकडे ड्रिंक्सचं प्रमाण अन् वेळ दिवसेन् दिवस वाढतंच चालली होती. “तुला काही कमी पडू देतो आहे का? किंवा - एवढ्या मोठ्या बिझनेसचं टेन्शन तुला काय कळणार, किंवा - तुम्हा दुकानदारी टाइपच्या लोकांच्या विचाराचा आवाकाच कमी.” वगैरे कारणं मला पटण्यासारखी नव्हती. माझे अन् त्यांचे वारंवार खटके उडत.

सासूबाई गप्पच. मी विरुद्ध ते दोघे अशा चकमकी रोजच्या. ड्रिंक्समुळे रोजची जाग्रणं. सकाळी ठणकत्या डोक्यानीच ऑफिसला जायचे. कधी जाणं, कधी न जाणं. परिणाम अटळ होता. बिझनेसला घसरण लागली. त्याचं टेन्शन. मग जास्त दारू. विषचक्रानं वेग घेतला.

मुलं मोठी होत होती. त्यांना शुद्धीत असलेल्या बाबांचा सहवास मिळेना. यांचं रोजचं बरळणं आणि मला मारणं. आमचं भांडण सुरू झालं की दोघंही बिचारी कावरीबावरी व्हायची.

विचार करकरून माझं डोकं सुन्न व्हायचं. सोन्यासारखी माझी बाळं – असल्या गटारी वातावरणात वाढणार?

माझ्या माहेरची सांपत्तिक परिस्थिती जरी बेताची असली तरी विचारांनी आम्ही नेहमीच समृद्ध होतो. माझा विश्वास सरस्वतीवर. आयुष्यभर तिची आराधना करायची. ती आपली पाठराखीण होऊन राहाते. ज्ञान कधीही वाया जात नाही. बुद्धिजीवी लोकांकडे सरस्वती असते म्हणूनच लक्ष्मी आली तर येते. सरस्वती कधी वाईट मार्गानी मिळवताच येत नाही. लक्ष्मी मात्र वाममार्गानीही येऊ शकते. लक्ष्मी नेहमी पाहुणी बनूनच राहाते. तिचा आदर करायचा पण तिच्यात जीव अडकवायचा नाही. ती असल्याचा गर्व करायचा नाही, अन् ती निघून गेली तर वाईट वाटून घ्यायचं नाही – असे माझे विचार. इथे मात्र सगळं उलटंच. हेच शिकणार का माझी बाळं ?

मारहाण आणखी वाढली. आता मुलांना घेऊन घरातून बाहेर पडणंच जरूर होतं. दोन मुलांसह माहेरी जाणं शक्य नव्हतं. मग जायचं कुठे? उपजीविकेचं काय? गरजवंताला अक्कल नसते हेच खरं.

एका औषध बनविणार्‍या कंपनीत कारकुनी नोकरी मिळाली. प्रचंड आलिशान गजबजलेलं ऑफीस. माझा पगार बेताचाच होता. पण मानसिक वेदनांवर कामाच्या तोडीचं दुसरं वेदनाशमक नाही. शिवाय दिवसभर आजीच्या प्रेमळ छत्राखाली मुलं एकदम खूष.

सर अन् मॅडम हे दाम्पत्य कंपनी चालवायचे. कंपनी मूळची मॅडमच्या दिवंगत वडिलांची. मॅडमनी सरांशी प्रेमविवाह केला होता. आता मात्र त्यातला फक्त विवाह कसाबसा तग धरून होता.

मला काम फार आवडायचं. एकाच वेळस कित्येक कामं बिनबोभाट करण्याचं वरदान बायकांना पूर्वीपासून लाभलेलं आहे. पुरुषांना तेच करायची वेळ आल्यापासून ‘मल्टीटास्किंग’ अशा भारदस्त पदवीसकट त्याला राजमान्यता प्राप्त झाली. ते मला सहज जमायचं म्हणून म्हणा, किंवा सरांच्या आवडत्या बहुरंगी नखरेल सेक्रेटरीचा माझ्यावर जाम खुन्नस होता म्हणून म्हणा, मॅडमची माझ्यावर मेहेरनजर झाली. जबाबदार्‍या खूप वाढल्या. त्याचबरोबर कामाची वेळही.

छोटीशीच का होई ना, स्वतःची केबिन मिळाली.

एक दिवस उशीरपर्यंत काम करीत बसले होते. माझी केबिन सोडून सर्व ऑफिस अंधारात होतं. अचानक धाड्कन् ऑफिसचा मुख्य दरवाजा उघडला गेला ! माझ्या छातीत धस्सं झालं! चोर! मी चटकन् केबिनमधला दिवा विझवला, कडी घातली अन् मोबाइलवर पोलिसांचा नंबर लावणार, इतक्यात ऑफिसमधले दिवे लागले आणि सरांचा अन् बहुरंगीच्या खिदळण्याचा आवाज आला !

मी त्यांना दिसू नये म्हणून अंग चोरून स्तब्ध बसले पण खरं तर त्याची काहीच जरूर नव्हती. दोघेही इतके उतावळे झाले होते की मी हाक मारली असती तरी त्यांना ऐकू गेली नसती. पुढच्या पंधरा मिनिटांत रिसेप्शनिस्टच्या टेबलावर झालेले सर्व किळसवाणे अंगविक्षेप माझ्या मोबाइलने रेकॉर्ड केले.

माझी झोपच उडाली ! कामात लक्ष लागेना. पर्समध्ये जणु जळता निखाराच होता. का ब्रह्मास्त्र? नशिबाचं दार किलकिलं झालं होतं. पण ‘ब्लॅकमेल’ हा शब्दच घृणास्पद. हेच शिकवलं का तुझ्या आईबाबांनी तुला?

विचार करकरून डोकं भणभणलं. कृष्णनीतीच्या अभावी पांडवांचा विजय झाला असता का? शिवाजीराजे मोगलांशी सत्यासत्याचा उहापोह करत बसले असते तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? द्यूत खेळला महामूर्ख आणि वस्त्रहरण झालं द्रौपदीचं ! रामराज्यात बाकी सारे सुखी. सीतेच्या पदरी मात्र अग्निपरीक्षा देऊनही पुन्हा अरण्यवास ! बस्स झालं आता. बायकांनी खूप सहन केलंय. शिवाय प्रश्न माझा एकटीचा नाही. मुलांच्या भवितव्याचा आहे.

मोबाईलमधलं नाटक सीडीवर कॉपी केलं. सरांच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांना सीडी दिली आणि काही न बोलता परत आले. मला वाटलं होतं माझ्या तोंडाला कोरड पडेल, काळीज धडधडेल, हातपाय कापतील, घाम फुटेल. पण तसं काहीच झालं नाही. मुलांच्या भवितव्याच्या निश्चिंतीमुळे माझ्यात दहा सिंहिणींचं बळ आलं होतं. आत्मविश्वासही.

थोड्याच वेळात पांढरेफटक पडलेले साहेब माझ्या ऑफिसमध्ये आले. प्रश्नांचा भडिमार केला. मी एकही उत्तर दिलं नाही. माझ्या ड्रॉवरमधून वर्तमानपत्र काढलं. तीन बेडरूमचा फर्निश केलेला एक फ्लॅट विकावू होता. त्याच्या जाहिरातीभोवती मी लाल पेनानी खूण केली होती. त्यांच्या पुढे केलं. “माझ्या नावावर. मुदत साठ दिवस.” एवढंच बोलून माझ्या कामाला लागले.

त्यांनी मला इजा करायची किंवा माझा काटा काढायचं ठरवलं तर काय होईल याचा मी विचार करून ठेवला होता. माझ्या हतबलतेचा, किंबहुना माझ्या आयुष्याचा मला कंटाळा आला होता. माझ्या पश्चात सासूबाई माझ्या मुलांचा उत्तम सांभाळ करतील याची मला खात्री होती. मात्र जर का साहेबांनी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही तर काय करायचं हे काही मी ठरवू शकत नव्हते. माझ्या हातात हुकमी एक्का होता खरा, पण तो खेळण्याची माझी इच्छा नव्हती. या हुकमी एक्क्यांचं असं असतं. एकदा खेळला की त्याची किंमत शून्य होते !

पण तशी वेळच आली नाही. अधर्माचे पाय मेणाचे असतात. खरोखरच दोन महिन्यात रजिस्ट्रेशन झालं देखील ! माझ्या चेहर्‍यावरचा आनंद मला लपवताच येत नव्हता. सासूबाईंनी मला खोदून खोदून विचारलं पण मी काहीही सांगितलं नाही. इच्छा प्रचंड होत होती पण ते शहाणपणाचं झालं नसतं.

एक दिवशी मी मुलांना घेऊन बाहेर पडले ते थेट नव्या घरी. सासूबाईंना फोन करून कळवलं. त्यांना रडूच कोसळलं. प्रचंड अपराधीपणाच्या भावनेनी मला घेरलं. त्यांनी मला नेहमीच प्रेम दिलं होतं आणि मी मात्र त्यांचा विश्वासघात केला होता. त्यांनी माझं मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि क्षणभर मी डळमळले देखील. माझे वडील नेहमी म्हणायचे, “कोठल्याही नवीन मार्गाला लागण्याआधी भरपूर विचार करायचा. मात्र एकदा चालायला लागल्यानंतर काहीही झालं तरी मागे वळायचं नाही.”

खरी परीक्षा तर अजून सुरू व्हायचीच होती.

माझ्या अपेक्षेनुसार हे रात्री आले. नेहमीपेक्षा जास्तच घेतली होती. त्यांना गेटच्या आत न सोडण्याबद्दल मी वॉचमनला आधीच सांगून ठेवलं होतं. मग रस्त्यावरूनच आरडाओरडा, अर्वाच्च्य शिव्या, भलतेसलते आरोप. मुलं भेदरून गेली.

मग यांच्या नौटंकीचा नित्यनेमच झाला. रोजच्या तमाशाची वेळ होण्याआधीच मी मुलांना झोपवून टाकायची. रस्त्यांत कधी यांची गाडी आडवी आली तर पुन्हा तेच. मी अजिबात मान खाली घालत नसे. डोळ्याला डोळा लावून उभी राही. गर्दी जमून हॉर्न वाजायला लागले की हेच गाडी पुढे काढीत. सासूबाई गाडीत असल्या तर त्या केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे पहात असायच्या.

मला मात्र आता फार वर्षांनी शांत झोप लागू लागली. कोणी इतकसं काही बोललं की कुढत बसणारी, डोळ्यातनं पाणी काढणारी मी, आता इतकी बदलले?

रविवारी सकाळी पेपर वाचत बसले होते. दाराची बेल वाजली. दार उघडलं तर सासूबाई ! मी काही बोलण्याआधीच नेहमीच्या मृदु आवाजात म्हणाल्या, “तुझी हरकत नसेल तर तुझ्याकडे राहायची इच्छा होती – कायमचं!”

मग नेमकं काय झालं मला आठवत नाही. मी भानावर आले तेव्हां आम्ही दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. गालाला गाल टेकले होते अन् दोघींचे अश्रू एकत्र घळाघळा वाहात होते. मुलगा “आज्जी-आज्जी” ओरडत सोफ्यावर दाणदाण् उड्या मारत होता. मुलगी आजीला बिलगली होती !

पावसाची सर येऊन गेल्यावर वातावरण प्रसन्न होतं तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती. दोघींच्या अश्रूंच्या पुरात माझं टेन्शन, थकवा, आपण अवलंबलेल्या मार्गाच्या योग्यायोग्यतेबद्दलचा संभ्रम, मुलांची चिंता, सार्‍या सार्‍याचा निचरा झाला होता.

स्वतःला आप्त म्हणवून घेणार्‍यांविरुद्ध जिला एकटीनं उभं ठाकायची वेळ येते तिलाच हे अंकगणित समजतं.

एक अधिक एक म्हणजे दोन नव्हे. एक अधिक एक म्हणजे एक हजार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nandini +१
Ani mhanunch ya war jast charcha nako ani jast khulase nakot as mala watalyane mi waracha pratisad lihila hota

सर्वजण,

विचारपूर्वक आणि विस्तारित प्रतिसाद लिहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

रिया,
आपण गप्पा मारताना कित्येक वेळा दुसरी आपल्याला म्हणते, "हॅ. मला नाही पटंत." तेव्हां आपण तिला एक्सप्लनेशन देतोच की नाही? त्यात वावगं काहीच नाही. तिचं चूक नसतं आणि आपलं देखील. त्याचप्रमाणे मी असं समजते की प्रतिसादांना प्रतिसाद द्यावा. ह्या ही एक प्रकारच्या गप्पाच आहेत.

'पुढील आयुष्यात या बाईला आणि तिच्या मुलांना प्रॉब्लेम येऊ नये म्हणजे झालं.' अशा आशयाच्या बर्याच प्रतिक्रिया आहेत. त्याला मी आधीच उत्तर दिलं आहे. आता तिथला financial setup असा आहे की सासूबाई इकडे आल्यानंतर सगळंच एकदम सेफ झालं आहे. आता जरी फ्लॅट आजच्या आज हातातनं गेला तरी दुसर्याची व्यवस्था आहे.

त.टी.
स्वीट आहे का स्वीटर हे फार बारकाईनी वाचलं नाहीत तरी चालेल. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात.

वर कोणीतरी म्हटलेच आहे की कंपनीच्या मालकीणबाईंचा मात्र यात दोन्हीकडून विश्वासघात झाला.
माझ्याही मनात तेच आलेले. नात्याबाबतच नव्हे तर पैश्यांबाबतही. कारण अल्टीमेटली हे फ्लॅटचे पैसे मालकीणबाईंच्या खिशातूनच आले असणार.

वास्तव पातळीवर विचार केल्यास काहीही ड्रामा न घडता हे सहजी घडू शकेल असे वाटत नाही.
वर लेखिकेने म्हटले आहे की काही ड्रामा लपवलाय. याचाच अर्थ ही सत्यघटनेवर आधारीत कथा आहे.
पण मग एवढे भलेमोठे सिक्रेट त्या महिलेने लेखिकेला सांगणे आणि लेखिकेने त्यावर लिहिणे हे पटत नाही.

अर्थात अजूनही बरेच शंका काढता येतील, त्या देखील वरची चर्चा पाहून काढायची हुक्की आली. सहज डोक्याला खाद्य म्हणूनच.

पण एक कथा म्हणून उत्तम वाटली, छान जमलीय. खास करून प्लॉट आवडला.
यावर ठराविक तो ड्रामा अ‍ॅड करत एक चित्रपट बनू शकतो एवढे पोटेंशिअल आहे यात.
तसेही आपण प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे स्वीट टॉकर यांनी ही कथा भर टाकून टाईम्स ऑफ ईंडिया स्पर्धेत दिली आहे. चांगला प्लॅटफॉर्म आहे. कोणाची नजर पडलीच तर काय सांगावे निघूही शकेल चित्रपट. त्यासाठी शुभेच्छा Happy

Pages