एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र

Submitted by जव्हेरगंज on 28 September, 2015 - 21:57

(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी )

प्रती :- शंभरातील एकास...

प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं.

सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा.

परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे. मग टपरीवर नेऊन त्यानं मला चहा पाजला.
हे एक थोरच आहे.

प्रभुणे येतो अधुनमधुन रुमवर. त्याच्या बापसाने म्हणे दोन लग्न केली होती. दोन बायका एकाच घरात. त्यांची सात आठ पोरबाळं. कुठलंही पोर कुणालाही प्यायचं. याला अजुन माहीतीचं नाही हा नक्की कुठल्या आईचा.
ही एक भलतीच गोष्ट झाली.

रात्री जेवायला गेलो. मेसमध्ये फीस्ट होती. सुरेश शेजारीच बसला होता. त्याच्या ताटातली दह्याची वाटी मला देत म्हणाला, नुसतचं पाणी आहे. ईथल्या गायी म्हशी आटल्या वाटतं. मी म्हणालो, नंतर सिगरेट पिऊया. उदाहरणार्थ माझी खीरीची वाटी त्याला दिली.

सिगारेटीही महाग झाल्यात आजकाल. नाक्यावरुन बीडीचं बंडल आणलं. सुरेश म्हणाला, मला नको. मी म्हणालो, चालतयं. सुरेश निघुन गेला. मग खिडकीपाशी खुर्ची घेऊन बिड्या ओढत बसलो. एक एक करत बंडलच संपवल. टेबलावर एक मुंगळा फिरताना आढळला. हाताने धरत त्याला वहीवर ठेवला. पेनाच्या टोकाने त्याच्याशी खेळत बसलो. एकाएकी हातावरुन सदऱ्याच्या बाहीत शिरला वगैरे. नको तिथे चालला वगैरे. पुन्हा पकडुन वहीवर ठेवला वगैरे. तो आता वहीच्या खाली चालला वगैरे. पुन्हा त्याला पकडलं वगैरे. आता याला कुस्तीसाठी नवीन मुंगळा पकडला पाहीजे वगैरे. सगळ्या खोलीत वगैरे शोधत फिरलो. शेवटी फडताळात वगैरे एक सापडलाच. त्याला वहीवर ठेवायला घेऊन आलो तर हा पहिला गायब. का हाच होता तो. शेवटी त्याला खिडकीबाहेर टाकुन दिलं वगैरे. यातच रात्र गेली. आजही समाजशात्राचा अभ्यास बोंबलला. पहाटे थोडावेळ झोपलो तर सुरेश दारात हजर. बहिणीच्या लग्नाला स्टेशनवर जायचय, तो म्हणाला. अख्खा दिवस मी तारटवल्या डोळ्यांनी घालवला.
आता हे खुपच झालं.

तू एक काम कर, आधी बी.कॉम वगैरे पुर्ण कर. मंजिरीसोबत जास्त फिरु नकोस. जाम लफडेबाज आहे ती. बाजारात सुधाकर तिला घेऊन फिरत होता. दिवसभर. म्हणजे सिनेमा वगैरे पाहिला दोघांनी. संध्याकाळी किशोर तिच्या रुमवर गेलता. नोटस् वगैरे आणायला. बराच वेळ बाहेर आला नाही असे सुरेश म्हणाला. रात्री मला ती पुलाखालच्या काळोखात बसलेली दिसली. रामदासच्या पुढे. नागवीच.

गेल्या महीन्यात ट्रिपला महाबळेश्वरला गेलो होतो. मित्रांबरोबर.
महाबळेश्वर
एक प्रचंड हिरवगार टेकाड. समोर कायम घोंगावणारा वारा. त्याचा आवाज मनात घुमतो आहे. आणि मी स्पॉटांमागुन स्पॉट पाहतो आहे.
एका स्पॉटात भलीमोठी दरी. अक्राळविक्राळ. खालुन थेट शिखराकडे पाहते आहे. काय पाहते आहे? झाडाझुडपांनी फार फार वेढलेली. मध्येच उजाड ओबडधोबड माळरान.त्या बोडक्या माळरानाकडे मी टक लावुन पाहतो आहे. या माळरानावरचं दगडांचा हिशोब मांडलाय. मी पुन्हा खाली पाहतोय. एवढी मोठी दरी नजरेच्या एका टप्प्यात पाहता येत नाही वारंवार डोळे फिरवावे लागतात. अतिशय हिरवळ. आणि गारठा. हा गारठा घोंघावण्याऱ्या वाऱ्यासमवेत झेपावत येतो. आणि मला बधीर करुन जातो. ही बधीरता शब्दात मोजता येणार नाही. मी तसाच पायरीवर बसतो. प्लीज किप मी वॉर्म, माझ्यावर दया कर. ही दरी आपली किव करणार नाही. ही लिक्विड नायट्रोजन पोटात गोठवुन बसली आहे.
पुन्हा दुसऱ्या स्पॉटकडे. तशीच भव्य दरी. तिसरीही तशीच. दर स्पॉटवर तेच.
एका स्पॉटवर गच्च हिरवळ आहे. मी कितीही आत गेलो तरी संपणार नाही. त्या जंगलात मी इकडे तिकडे फिरलो. ईथे खरच काही नाही.
या गारठलेल्या बधीरतेत रोमांचाला सीमा नाही. ईथे तर फक्त एक दिवसाचा खेळ.

गेल्या आठवड्यात तुझ्या घरी गेलतो. हात मागायला. तुझा बाप म्हणाला, कामधंदा काय करता, नोकरी वगैरे. मी म्हणालो, गावाकडे शेती आहे, ट्रँक्टर आहे, चार म्हशी आहेत, दुमजली घर आहे. तुझा बाप म्हणाला, असा कसा तुमच्या गळ्यात आम्ही धोंडा बांधायचा.
हे थोरच आहे.

माझं आयुष्य असं हे खुंटीला बांधलेलं. तुझ्याही प्रेमात पडु वाटलं म्हणुन पडलो. तुला कोणी धोंडा वगैरे म्हटल्यालं आपल्याला नाही आवडणार. तरीही तुझ्याशीच पाट लावणार. उदाहरणार्थ हे चुकच आहे. म्हणजे बरोबर.

कळावे
शंभरातील दुसरा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीला उदाहरणार्थ थोडं ओढूनताणून केल्यासारखं वाटलं, पण नंतर नंतर चांगलीच लय वगैरे सापडली आहे तुम्हाला! आवडलं!

उदाहरणार्थ हे लिखाण थोरच आहे असेच सुर्शासकट सारीच म्हणतील. इचल्याला तर भलतंच आवडायचं कारण त्याला वगैरे पांड्याच्या लकबी उदाहरणार्थ हॉस्टेलवर असल्यापासूनच मंजूर आहेत. बाकी पोर्गीचा बाप हलकट आहे हे शेती आहे, ट्रँक्टर आहे, चार म्हशी आहेत, दुमजली घर आहे इतकं सांगूनदेखील तुझ्या गळात धोंडा उदाहरणार्थ म्हणतो ते चूकच आहे; पण म्हणजे बरोबरही असेलच. तसंही झेंझट म्हणजे बाप आणखी पाप अशी बाब आपण इथे शिकायला येऊन वगैरे जाणतोच म्हणा.....च्यामारी पूर्वजांच्याच नशिबी नपुंसकगिरी नव्हती म्हणून हे फेरे म्हणायचे....बाकी ह्या जव्हेरगंजाने उदाहरणार्थ सांगवीकराचे चांगलेच कौतुक केले आहे. हे म्हणजे भलतेच भारी म्हटलं पाहिजे...म्हणतोदेखील...पुस्तक तर अमरच आहे....अमर सायकल मार्ट.

आवडले Lol

बेफिकीर....तुमच्यासारख्या दर्दी माणसाच्या "ओरिजिनलपेक्षा आवडलं..." तसेच साती सोनू यांच्याही प्रतिक्रियेमुळे मलाही भलतीच तरतरी आली, त्यामुळे आपलेही दोन शब्द जव्हेरगंजाच्या कौतुकासाठी द्यावेत असे उदाहरणार्थ वाटले.

तसेही पाहिले तर पुस्तक न आवडणारे म्हणत राहतीलच....काय फायदा....दाय फायका ?? वगैरे.

अशोक,
मस्तंय प्रतिसाद.
वावे,
सुरुवातीला उदाहरणार्थ थोडं ओढूनताणून केल्यासारखं वाटलं
>>
कोसला मधे उदाहरणार्थ नी वगैरे हे शब्द प्रचलीत भाषेप्रमाणे नाहीयेत.
सुरुवातच मी आज उदाहरणार्थ २५ वर्षाचा आहे अशी काहीशी होते. तसाच तो वगैरे शब्दं.

सोनू, मी कोसला २-३ वेळा वाचली आहे. कोसलामध्ये जसा उदाहरणार्थ वापरलाय, तसाच मी प्रतिसादात वापरायचा प्रयत्न केलाय. इथे लेखकाला उत्तरार्धात जास्त चांगली लय सापडली आहे, एवढाच माझ्या म्हणण्याचा अर्थ (वगैरे) Happy

वावे मान्य, सुरुवातीला जरा अडखळतच होतो.

बेफिकीरजी धन्यवाद. पण ओरीजनल मला प्रंचड आवडलं होतं. आजही आवडतं.

अशोकराव _/ \_ Lol

बाकी सर्वांच्याच प्रतिसादाने भरुन पावलो. Happy