सेलिब्रेशन या नाटकाच्या सिडीच्या निमित्ताने.

Submitted by दिनेश. on 28 September, 2015 - 11:55

मराठी नाटक बघायला मला मनापासून आवडत असले तरी सध्या मी त्याला मुकलोय. माझे मुंबईतले वास्तव्य आणि नाटकाचे प्रयोग यांचा योग जूळत नाही. यावेळेस मला तळ्यात मळ्यात बघायचे होते, पण त्याच्या
प्रयोगाच्या तारखा जुळत नव्हत्या. मग एक पळवाट म्हणून नाटकाच्या सिडीज शोधत राहतो.
तर यावेळेस प्रशांत दळवींचे, सेलिब्रेशन या नाटकाची सिडी घेऊन आलो. या नाटकाचे प्रयोग होत होते,
त्यावेळेसही मी भारतात नव्हतोच बहुतेक. एका मायबोलीकरणीकडूनच या नाटकाची तारीफ ऐकली होती.
तर आधी थोडेसे या नाटकाबद्दल लिहितो..

नाटक सबनीसांच्या कुटुंबाचे. भाई सबनीस आणि मालती सबनीस यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. त्याचे
हे सेलिब्रेशन. भाई आणि मालतीबाई, पुण्याला सहकार नगरात राहताहेत. घरी नोकर आहे पण मुले
नोकरीनिमित्त बाहेर आहेत. मोठा मुलगा श्रीवर्धनला आहे. धाकटे दोघे बहुदा मुंबईत आहेत. एक मुलगीही आहे,
पण तिने स्वतःपेक्षा वयाने फार मोठ्या माणसाशी लग्न केल्याने, तिच्यात आणि भाईत गेली १० वर्षे संवाद नाही.

तर त्या दोघांनी या दिवसाची खुप तयारी केलीय. सगळ्यांसाठी भेटवस्तू घेऊन ठेवल्यात. जुन्या फोटोंचे
अल्बम शोधून ठेवलेत. अगदी उत्साहाने वाट बघताहेत. दोघांची, खास करुन भाईंची तब्येत जरा नाजूक आहे.
तरीही दोघे खुप धावपळ करताहेत. पाहुणे अगदी तासाभराच्या अंतरावर येऊन ठेपलेत आणि अचानक, भाईंना
हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि खुर्चीतच त्यांचा प्राण जातो.

मालतीबाई मन घट्ट करून सेलिब्रेशन करायचे ठरवतात. भाईंच्या अंगावर शाल, गळ्याला पट्टा आणि डोळ्याला
गॉगल लावून त्या भाईंची वाचा गेलीय, त्यांना अर्धांगवायूचा झटका आलाय अशी बतावणी करतात.
सर्व पाहुणे येतात. भाईंबद्दल तशी आधी कुणाला शंका येत नाही, कारण यायच्या आधी भाईंचे फोनवर बोलणे
झालेलेच असते.

त्यांची व्हीलचेयर ( ते त्यात बसलेले असतानाच गेलेले असतात ) मालतीबाई आत नेऊन ठेवतात. मुलीत आणि
त्यांच्यात अबोला असल्याने मुलगी त्यांना भेटायला आत जाते. तिला वाटते कि तिच्याशी बोलायला लागू नये,
म्हणून त्यांनी ते सोंग घेतलेय. ती त्यांना हवे तसे बोलते आणि अचानक ते कोसळतात. ते तिच्या बोलण्यामूळेच
गेले, असा तिचा ग्ह्ह होतो आणि ती बाहेरच्या खोलीत येते. सेलिब्रेशन चालूच राहते पण आधी मोठ्या सुनेच्या
आणि मग मधल्या मुलाच्याही ते लक्षात येत.... आणि पुढे मालतीबाई भडाभडा बोलून टाकतात.

विषय तसा वेगळा नाही पण प्रसंग अनोखा रचलाय नाटकात. लेखन तसे बांधीव आहे पण मुलगी सोडल्यास
बाकीच्या कुटुंबातले, खास करून भावाभावातले तणाव तितकेसे स्पष्ट होत नाहीत. इतक्या वर्षात ते एकत्र
का आले नाहीत, एकमेकांशी संपर्कात का नाहीत ते कळत नाही.

मुलीची बाजू मात्र स्पष्ट होते. लेखकांनी सी.के.पी. कुटुंबातले नाटक रचलेय, त्याचे संदर्भ आणि त्यांचे शब्दही
योग्य तसे आलेय ( फक्त ते पदार्थ करायला किती वेळ लागतो, याचे गणित मात्र चुकलेय. )

प्रमुख भुमिकेत राजन भिसे आणि वंदना गुप्ते आहेत. दोघांचाही अभिनय उत्तम आहे. छान आहे नाटक.. पण...

पण ही नाटकाची सिडी आहे, प्रत्यक्ष रंगमंचावरचे नाटक आपण बघत नाही याची नको तेवढी जाणीव सतत
होत राहते. आणि आज लिहायचे आहे ते त्याबद्दलच.

नाटक आणि चित्रपट ही दोन भिन्न माध्यमे आहेत, हे मी लिहायला हवे का ? पण अगदी सुरवातीला यात
खरेच गल्लत झाली. नाटकांची परंपरा अर्थातच जुनी. त्यामूळे पहिले चित्रपट हे नाटकांचेच चित्रीकरण असे.
म्हणजे कॅमेरा एका जागी आणि रंगमंचावर पात्रांनी एंट्री एक्झिट करावे तसे पडद्यावरची पात्रे करताहेत.
अर्थात नंतर पुढे फार सुधारणा झाल्या. नाटकातही आणि चित्रपटातही ( तरी पण अगदी हा विषय खास
चित्रपटाच्या भाषेत मांडलाय, असे वाटायला लावणारे चित्रपट विरळाच. )

तरीही नाटकाचे चित्रपट ( गारंबीचा बापू, महानंदा ते अगदी शाळा पर्यंत ) होतच राहिले. नाटकाच चित्रपट ( माझा खेळ मांडु दे ) आणि चित्रपटात नाटकही ( इये मराठीचिये नगरी ) पण ते अपवादच होते.

आणि मग दूरदर्शन आले. थिएटरमधला चित्रपट आणि रंगमंचावरचे नाटक त्यावरही आले. चित्रपटाबाबत फारसे
काही करायचेच नव्हते पण नाटकाचे काय ? काहितरी करायलाच हवे होते. आणि मग तिथे विनायक चासकर,
सुहासिनी मुळगांवकर, याकुब सईद, विनय आपटे असे प्रशिक्षित निर्माते आले. रंगमंचावर सादर होत असलेली
नाटके त्यांनी सादर केलीच पण खास त्या माध्यमासाठीदेखील उत्तम कलाकृती घडवल्या.

चिमणराव कोण विसरेल ? खरे तर त्या काळात साधने अगदी मोजकी असत. तंत्रज्ञानही फारसे पुढारलेले नव्हते.
पण तरीदेखील ते अपार मेहनत घेत असत. हि मेहनत, सेट, चित्रीकरण, ध्वनि, या सर्वच बाबतीत असे.
पुलंची वार्यावरची वरात आणि एका रविवारची कहाणी देखील असेच उत्तमरित्या सादर झाले होते. आजच्या
तरुण पिढीलाही ते आवडते. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटतेय, कि आज जी धुरकट प्रिंट आपण बघतो, तसे मूळ
सादरीकरण नव्हते. ते दर्जेदारच होते. हा धुरकटपणा बहुदा व्हीडीओ टेपवरून डिजिटलायझेशन करताना आलाय.

त्या काळात अनेक छोटी छोटी नाटकेही सादर होत असत, आणि ती खास दूरदर्शनसाठीच असत.
आपुले मरण पाहिले या डोळा ( दत्ता भट, लालन सारंग ) साठा उत्तराची कहाणी ( भारती आचरेकर, अरुण जोगळेकर ) अंधारवाडा ( रीमा ) अशी काही नाटके मला अजूनही आठवताहेत.

आणि मग दोन जबरदस्त सादरीकरणे झाली. दोन्हॉ अर्थातच भारीबाई म्हणजेच विजयाबाईंची.
हमिदाबाईची कोठी चे हिंदी रुपांतर हमिदाबाईकी कोठी आणि वाडा चिरेबंदीचे हिंदी रुपांतर, हवेली बुलंद थी. बाईंनी झिम्मा मधे या दोन्ही सादरीकरणाबद्दल सविस्तर लिहिले आहेच, तरी इथे माझ्या काही आठवणी.

इथे दोन्ही मराठी नाटकांचे हिंदी रुपांतर झाले होते तरीही भाषा खटकली नाही कारण विदर्भातली भाषा, आणि
हमिदाबाईची भाषा, दोन्ही हिंदीला जवळच्याच. शिवाय या दोन्ही नाटकांत ती ती वास्तू एक महत्वाची भुमिका
बजावते. बाईनी नाटकाचा सेट न वापरता अगदी चपखल अश्या वास्तू निवडल्या होत्या ( हवेली साठी मात्र बहुदा सेटच होता ) या वास्तूमुळे ते ते प्रसंग अगदी वेगळ्याच उंचीवर गेले.

उदा हमिदामधला सत्तारचा जिन्यातला प्रसंग जिन्यातच चित्रीत झाला होता. हमिदा नमाज पढते तो प्रसंगही
असाच छोट्या रुममधे चित्रीत केला होता. यात बाह्यचित्रण फारसे नव्हतेच.
हवेली... मधे मुंबईहून सून येते, त्यावेळी गंजक्या ट्रॅक्टरला अडकून तिचा पदर फाटतो. हा प्रसंग हवेलीबाहेर
चित्रीत झाला होता. त्यात ट्रॅक्टरही पुर्ण नव्हता.. पण त्याचा परीणाम जबरदस्त झाला.

स्टेजवर नाटक बघताना, प्रेक्षक एकाच कोनातून ( हवे तर प्रेक्षकाच्या सीट्नुसार प्रत्येकाचा कोन वेगळा असतो म्हणू या, पण तरी प्रत्येकाचा नाटकभर एकच कोन असतो ना ! ) बघतात. पण हे वेगळे माध्यम वापरताना
बाईंनी पण काही वेगळेच प्रयोग केले. उदाहरणार्थ हवेलीतल्या आज्जी, मुझे कोई कुछ बताता क्यू नही असे
दाराआडून विव्ह़ळत असतात त्यावेळी कॅमेराही त्यांच्याकडे वरून केविलवाणा बघतो. तर वहिनी जेव्हा
सर्व दागिने घालून बघतात त्यावेळी कॅमेरा खालून वर बघतो, त्यामूळे त्या फारच भव्य वाटत राहतात.
एरवी नाटकात खास प्रकाशयोजना करून असे प्रसंग उठावदार केलेले असतात तरी त्यात कॅमेराच्या कोनाचा
परीणाम नसतोच. या दोन्ही कलाकृती सादर होऊन ३५/४० वर्षे नकीच झाली असतील, तरीही त्या माझ्या
चांगल्याच लक्षात आहेत ( याच्या सिडीज मात्र बाजारात दिसल्या नाहीत. )

त्यानंतर खास दूरदर्शनसाठी नाट्यनिर्मिती थांबलीच म्हणायला हवी.. आणि मग पुढे आल्या त्या प्रिझमसारख्या
कंपन्या. या पकड नाटक आणि कर त्याचे शुंटींग असे करत सुटल्या. माझ्यासारख्यांना नाईलाज म्हणून
या बघाव्या लागतात पण अगदी मोजके अपवाद सोडले तर बहुतांशी या सिडीज, निराशाच करतात.

हे मला तांत्रिकपणे नाही लिहिता येणार, पण एक प्रेक्षक म्हणून काय वाटते ते लिहितो. तश्या या बाबी काही नव्या आहेत अश्यातला भाग नाही. या क्षेत्रातला कुणीही हे सहज समजू शकतो.. पण अजूनही या सिडीज मात्र
अगदी शिकाऊ कलाकारांनी घडवल्यात असे वाटत राहते.

अगदी पहिल्यांदा काय खुपते ते चित्रीकरण.
नाटकाचा प्रयोग सलग सादर होतोय आणि त्याचे ढोबळमानाने चित्रीकरण होत राहतेय असेच वाटत राहते.
खुपदा तर कॅमेरामनला त्या पात्राची पुढची हालचाल काय आहे त्याची कल्पनाच नसावी असे वाटते. ते पात्र
स्क्रीनच्या बाहेर जाते आणि मग कॅमेरा शोधा म्हणजे सापडेल, अश्या अविर्भावात फिरत राहतो. बहुदा हे चित्रीकरण एकाच कॅमेराने होत असावे त्यामूळे इतर पात्रांच्या प्रतिक्रिया टिपल्याच जात नाहीत. सलगच
चित्रीकरण होत असल्याने शॉट डीव्हीजन वगैरे काही नसतेच.

नंतर खुपतो तो अभिनय.

नाटक सादर होताना, प्रेक्षक काही किमान अंतरावर असतात. त्यामूळे थोडा लाऊड अभिनय करावाच लागतो.
पण कॅमेरा ज्यावेळी तूमच्या चेहरा जवळून टिपतोय, त्यावेळी अभिनय थोडा टोन डाऊन करायला नको का ?
अगदी साध्या साध्या प्रसंगात फारच तीव्र प्रतिक्रिया पात्रे देत आहेत ( भुवया जास्तच ताणल्यात, ओठांचा
फारच चंबू झालाय ) असे वाटते. हे कलाकार निपूण आहेतच आणि असतातच पण त्यांना हे सांगितले जात
नसेल का ?

मेकप

आपण नाटक खुर्चीतून बघितले तर नटांचा मेकप जाणवतही नाही पण तेच जर तूम्ही त्यांना मध्यंतरात भेटायला गेलात तर त्यांच्या चेहर्‍यावर लावलेला रंग, कोरलेल्या भुवया, मिश्या फारच बटबटीत वाटते. या सीडीजमधे
नेमके तसेच वाटत राहते. अगदी पांढरे केसही मुद्दाम रंगवलेत असे वाटत राहते. आपल्याकडे कसबी कलाकार याही क्षेत्रात आहेत, पण नेहमीच्याच पद्धतीने मेकप करून या सिडीज चे चित्रीकरण केले जाते.

दुसरे म्हणजे, अनेक कलाकारांच्या चेहर्‍यावर ( यात अगदी प्रशांत दामले, प्रदीप गायकवाडही आले) वयाच्या खुणा, जागरणाचे ताण अगदी स्पष्ट दिसतात. एखादेवेळ स्टेजवर नाटक बघताना ते जाणवणार नाहीत पण
या सीडीजमधे दिसतातच.

आवाजाची पट्टी

पुर्वी नाटकाच्या स्टे़जवर मोजकेच माईक असत. आता कदाचित काही छुपे माईक वापरतही असतील. पण तरीही
ते अगदी तोंडाजवळ नसतात. त्यांमूळे कुजबुजत म्हणायचे संवादही अगदी मोठ्यानेच म्हणावे लागतात.
( तुलना करायचा मोह आवरत नाही पण लूटेरामधे तळ्याकाठी रणबीर सिंग आणि सोनाक्षी चा एक हळुवार प्रसंग आहे.. त्यातले संवाद शक्य असल्यास ऐकाच. ) या सिडीजमधेही कलाकार आवाजाची तिच पट्टी लावतात.
खुपदा कर्कश वाटते ते.

नेपथ्य..

या सिडीजसाठी नाटकाचा मूळ सेटच वापरला जातो. तो अर्थातच तकलादू असतो. त्याचे हे तकलादू पण आणि
इतर प्रॉपर्टीचा खोटेपणा ( प्लॅस्टीकची फुले वगैरे ) जाणवतो. शिवाय नाटक हे नेहमी एकाच बाजूने बघितले
जाते त्यामूळे त्या भिंतीना मागची बाजू नसतेच. म्हणजे समजा एखादे पात्र भिंतीआड जाऊन दुसर्या दरवाज्यातून परत येणार असले, तरी कॅमेरा त्याच्यामागून जाऊ शकत नाही ( जातही नाही, म्हणा. )

अश्या काही बाबीमूळे या सीडीज बघून नाटक बघितल्याचे समाधान काही मिळत नाही. पण अनेक नाटकांचे
प्रयोग काही काळांनी बंद होतात ( कारणे काहिही असोत) त्यांचे असे चित्रिकरण झाले नाही तर आपण त्या
अनुभवाला कायमचे मुकू..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे मुद्दे पटले. अगदी नावाजलेली नाटकं, यशस्वी कलाकार असलेली ही फार कंटाळवाणी होतात सीडीवर बघताना. पण सीडी हे नाटकाचं माध्यमच नाही, तर जे माध्यम नाहीच त्यात कसं चांगलं दिसू हे बघण्याचा अट्टाहास का करावा असही वाटतं. हल्ली बरेचदा खुपतो तो कंटेंटचा अभाव.
लेखामध्ये मधलं स्मरणरंजन फार लांबल्यासारख आणि विषयांतर वाटलं.

छान मांडलंय दिनेशदा Happy नाटक जिव्हाळ्याचा विषय आहे, तो प्रत्यक्ष रंगमंचावर पाहणे जेवढे आनंददायक, आणि तशी सोय नसतांना सीडी/यूट्यूब च्या माध्यमातून पाहणे तेवढेच त्रासदायक होते. मुद्दे पटले. कदाचीत यानंतर चित्रीत होणारी नाटके तरी बर्‍याप्रतीची असावी अशी भाबडी आशा Happy

दिनेशदा अगदी पुर्णपणे सहमत आहे.
पाहताना फार त्रास होतो. आनंद जातो.

हे होण्यामागे अनेक कारणे असावीत.
त्यातले पैसा हे प्रमुख असावे.

बहुदा सिडी च्या माध्यमातून तेव्हढासा पैसा उभा रहात नसावा. त्यामुळे कसेतरी एकदाचे एक रेकॉर्डिंग करून ठेवले जात असावे.
शिवाय एकदा नाटक रेकॉर्ड झाले की ते लगेच चोरीला जाते.
मग लहान शहरातला नाटकाचा प्रयोग बसतोच... म्हणजे प्रेक्षक येतच नाही.

भारताबाहेर असले तर माझ्या माहितीतले फार कमी लोक मराठी नाटकांच्या अधिकृत सिडीज विकत घेताना पाहिले आहेत. बहुतेक लोकांकडे कॉपीज आहेत/असत. किंवा अनेक लोक आपली मराठी सारख्या साईतवरून चोरलेले उपलोड पाहतात. (अनेकांना आपण कसे नवीन चित्रपट फुकट पाहिले याची प्रौढी ही वाटते...)

मराठी माणूस जर न चोरता नाटके पाहू लागला तर निर्मात्यांना आपोआपच त्यात पैसा दिसेल.
पैसा आला तर निर्मिती मूल्ये बदलतील आणि निर्मिती नक्की सुधारेल.

पण स्पष्ट बोलायचे तर मला फारशी आशा नाही...

अमित, स्मरणरंजन असे नाही, याही माध्यमात नाटक उत्तम सादर करता येते हेच सांगायचे होते.
फार दुखरा कोपरा आहे माझ्या मनाचा. बाकी कलाप्रकार अगदी गायनही टिकवून ठेवता येते, पण ही जिवंत कला
टिकवून ठेवण्याचा कुठलाच मार्ग नाही का ?

रसिका ओक, अचानक गेली तेव्हा मला फार वाईट वाटले. तिचे फक्त हलकं फुलकं हे एकच नाटक मी बघितले होते ( त्यात तिने ७ भुमिका केल्या होत्या ) तिची बाकिची नाटके बघायचीच राहिली.. आणि आत तर ती नाहीच.
जॉनी गद्दार मधे तिला एक का दोन सीन्स, भुलभुलैया मधेही तसेच.. पण लक्षात राहतेच कि ती. जबरदस्त ताकदीची कलाकार...

अशी अनेक नाटके, मोजके प्रयोग होऊन बंद पडली. पहिले प्रयोग होतात त्यावेळी अगदी चपखल कलाकार निवडलेले असतात. पण एकदा ते कलाकार बदलले, किंवा प्रयोग थांबले.. कि संपलेच.

निदान नाट्यकर्मींच्या अभ्यासासाठी तरी याचे चित्रीकरण व्हायला हवे.

निनाद, हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. आणि तश्या काही फार महाग नसतात या सिडीज. मल्टीप्लेक्स च्या एका तिकिटाएवढ्याच किमतीच्या असतात.

यु टुय्ब वर पाहिल हे नाट्क. छान आहे.आवडलं.
ह्या नाट्कावर सिनेमा येतोय..फॉमिली कट्टा..वंदना गुप्ते आणि दीलिप प्रभावळ्कर

@ दिनेश., आपलं विचार पटले. स्टेजवर नाटकं भरपूर पाहिली. आणि काही सीडीवरसुद्धा पाहिली. पण आपण सांगताय त्या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. कधी लक्षातच आलं नाही. खरं आहे! सीडी बनवताना नाटकाचं कॅमेर्याने सरळसोट चित्रीकरण न करता, त्या माध्यमाला अनुरूप नाटकाच्या सादरीकरणात योग्य ते बदल करावयास हवेत.

पाहिले नाटक युटुबवर. वंदना गुप्ते मस्तं. राजन भिसे थोडी दि. प्रं ची कॉपी करत होते असे वाटले. ते एकत्र होते ना त्या सिरिअलमध्ये (शु. गो पण होती ती).

रसिका जोशीचं हलकंफुलकं नाटक मस्तंच होतं. त्यातली तिची सहकलाकार पण नंतर कश्यात दिसली नाही.

रसिका ओक, अचानक गेली तेव्हा मला फार वाईट वाटले. >>> त्या रसिका जोशी होत्या.>>>

रसिका ओक जोशी. माहेरचं आडनांव ओक होतं.