विसर्जन

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 28 September, 2015 - 06:02

अनंत चतुर्दशीची संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायला बरेच जण त्या समुद्रकिनारी जमले होते. बाप्पाने जाऊच नये अस वाटत असताना आता गेला नाही तर पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची ओढ कशी लागेल? त्यामुळे जड अंतःकरणाने त्याच्या विसर्जनाप्रीत्यर्थ डोळ्यात अश्रू घेऊन सगळे त्याला पाहत होते. “ती" मात्र रडत होती अगदी हमसून हमसून. २४-२५ वर्षांची असावी बहुतेक. गळ्यात साधस मंगळसूत्र आणि बाकीही अलंकार खोटेच पण अगदी लहान मुलासारखी रडत होती. तिची समजूत काढायची ? अरे पण लहान बाळ थोडीच आहे ? तरीही सासू सासरे समजावत होते. नवरा पुढे बाप्पाला घेऊन विसर्जनाकरिता समुद्रात पोहोचला होता आणि ते थोडे लांब वाळूतच त्याला पाहत होते. तिच्याकडे नकळत लक्ष गेल आणि आठवल हि तर बयोची मुलगी. बयो .. धारावीत राहणारी आणि दादर स्टेशनजवळ भाजी विकणारी. पुढे हि देखील तिच्याबरोबर दिसायची पण लग्न झाल आणि आईबरोबर येण थांबल. चेहरा लक्षात होता म्हणून जवळ जाऊन विचारलं. तिनेही ओळख दाखवली अन सासू सासर्यांना न जुमानता बोलून गेली , "काय करू ताई ? धा दिवस देव घरात होता म्हणून नवर्याने दारूला शिवल नाही आता तो गेला पण दारू परत येईल कि .... " आणि ती आणखीन जोरात रडू लागली. तिच्या अशा रडण्यामागचं कोडं उकलल. पण तिने रडू नये म्हणून तिची समजूत ती काय काढणार ? कोणीतरी तिच्या नवर्याची समजूत काढायला हवी ना ?

तिच्या नवर्यासारखेच आपल्यातले कितीतरी जण. तो व्यसनी म्हणून लक्षात राहतो. तिच्या रडण्यामागचं कारण कळत. पण बाकीच्यांचं काय.? "बाप्पा जाताना आमची दु:ख तुझ्याबरोबर घेऊन जा" अस सांगतो आपण, पण आपण स्वतःच किती व्यसन जपून ठेऊन असतो? एखाद्याबद्दलचा राग, द्वेष, कुरघोडीपणा या असल्या गोष्टी आपण का नाही विसर्जित करू शकत? त्या बाप्पाचाच बाजार मांडला जातो, देवावरची श्रद्धा महत्त्वाची कि त्याला केलेलं डेकोरेशन महत्त्वाच? देवाला नैवेद्य खाऊ घालताना तोच नैवेद्य एखाद्या गरिबालाही खाऊ घालू शकतोच ना आपण? देव आलाय घरी म्हणून त्याला छान छान वाटावं म्हणून सोज्वळ वागायचं पण देव म्हणजे न्यायदेवता आहे का की जी अंधा कानून अस काहीतरी म्हणत आपल्या इतर चुकांकडे दुर्लक्ष करून आपल्याला न्याय मिळवून देईल? अरे जो देव आहे त्याला कुठल्यातरी पेठेचा, गल्लीचा राजा ठरवून तुम्ही त्याला खालची उपाधी देत नाही का? दादागिरी वा हिरोगिरी करता यावी म्हणून एखाद्या मंडळच प्रतिनिधित्त्व करता? जात - धर्म यावरून अभिमान बाळगता बाळगता आता आमची मुंबई अशी, पुणे अस तर आम्ही नाशिककर आम्ही कोल्हापूरकर हा नवीन वाद निर्माण करताय ? फक्त मी "मानव" आहे, मनुष्य जातीला जन्माला आलोय असा अभिमान बाळगता नाही येत का? कोणीतरी आज लिहील, "गणपती विसर्जनाबरोबर आज ध्वनी प्रदूषणाचाही विसर्जन झाल " हे अस वागण शोभत काय ? बाप्पा फक्त दहाच दिवस असतो त्याच्यासाठी कायपण ... अरे मान्य आहे पण कायपण म्हणजे सगळंच गुंडाळून टाकायचं?

अशाने बाप्पा पावेल ?

देवाचं विसर्जन केल्यावर आपण त्यासोबतच्या पावित्र्याच, मांगल्याच विसर्जन केल्यासारख का वागतो? ये रे माझ्या मागल्या म्हणत. बाप्पाबरोबर स्वतःची दु:ख दूरदेशी पाठवताना स्वतः मधले दुर्गुणही विसर्जित करा. तेव्हा खरा निरोप त्याला पोहचेल आणि पुढच्या वर्षी तो त्याच्या गुणी भक्तांच्या ओढीने लवकर परत येईल. दहा-अकरा दिवसांत जस आपण सोज्वळ वागतो तसंच नंतरहि वागल तर तो लवकर प्रसन्न होईल, नाही का?

बाप्पा तू तर होतास, आहेस आणि राहशीलच...सदैव हृदयात, ध्यानात अन स्मरणात ... अन त्याच बरोबर आता आमच्या कृतीतही.

........... मयुरी चवाथे-शिंदे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय!!

छान !

छान लिहिले आहे , आवडले.
असा काही फायदा होणार असेल तरच या भक्तीला अर्थ आहे. नाहीतर सारी पूजाअर्चा व्यर्थ आहे.