सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

Submitted by संदीप ताम्हनकर on 25 September, 2015 - 03:35

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.
सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल.
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल.
धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
१. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी.
२. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा -
जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन,
ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके,
हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी.
३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे.
४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार.
५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी.
(सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल)
संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.>>

------ हे असेच दाभोलकर पण म्हणत होते ना ? धर्माचे गाढे अभ्यासक लिम्बुस्वामी यान्च्या मौलिक विचारान्ची वाट बघतो आहे. त्यान्चे लिखाण कमी झालेले आहे.

वेल्कम बॅक अ‍ॅडव्होकेट साहेब. तुमच्या धाग्याचे स्वागत... अत्यन्त महत्वाच्या विषयावर चर्चा घडवण्याचा विचार स्तुत्य आहे. Happy

एका विशिष्ट अजेंडासाठी मायबोलीवर ठाण मांडून बसलेल्यांनी प्रत्येक धाग्याची दिशा स्वतःच्या सोयीनुसार हवी तिकडे वळवलीच पाहिजे का?

नाहीतर एकदाचे जाहीर करून टाका हो प्रशासक, येथे फक्त मोदीद्वेष, हिंदूद्वेष, ब्राह्मणद्वेष हे करणार्‍यांनीच यावे, बाकीच्यांनी रोमातही राहू नये.

<< नाहीतर एकदाचे जाहीर करून टाका हो प्रशासक, येथे फक्त मोदीद्वेष, हिंदूद्वेष, ब्राह्मणद्वेष हे करणार्‍यांनीच यावे, बाकीच्यांनी रोमातही राहू नये. >>

---------- कुठल्याही व्यक्तीचा द्वेष करणे मला मान्य नाही, आवडत नाही. मी कधीकाळात केला असेल तर त्याचा मला पष्चातापही होतो. Sad

मोदीद्वेष जेव्हढा चुकीचा आहे तेव्हढाच राहुल द्वेष आणि केजरीवाल द्वेषही (आणि थोडे मागे इतिहासात डोकावत गान्धी, नेहेरु, सावरकर इत्यादी प्रती) चुकीचाच आहे असे मला ठामपणे वाटते.

राहुल गान्धी यान्च्यावर केलेली खरमरित टिका आपण चवीने वाचतो, त्या टिकेचा आनन्दाने आस्वाद घेतो आणि त्यावर गोन्डस शब्दात प्रतिक्रियाही देतो... तेथे टिप्पणी करताना दुरान्वयेही द्वेष भावनेची जाणिव होत नाही. तर हे असे का ?

संघ हा जातीमुक्त भारताबद्दल कधिच का बोलत नाही?
>>

मी संघात कधीच जातीयुक्त गोष्टी ऐकल्या नाहीत Proud
रेफरन्सेस प्लीज Happy

>>संघ हा जातीमुक्त भारताबद्दल कधिच का बोलत नाही?<<
अहो आत्ता कुठे त्यांना अधिकाराने बोलायची संधी मिळतेय, अजुन थोडे दिवस जाउद्या, तुमची इच्छा ते खात्रीने पुर्ण करतील... Proud

पुरोगाम्यांच्या वैचारिक रेट्यामुळे तसेच काळाच्या रेट्यामुळे संघाला देखील बदलाव लागत आहे. ही अर्थात चांगलीच गोष्ट आहे. आजच्या संघातील तरुणांना देखील गोळवलकर गुरुजींच्या त्या काळातील विचार जसेच्या तसे मान्य होणार नाहीत.

घाटपांडेजी , जबानको लगाम दो... प,पू. गुरुजींचे विचार मान्य नाहीत म्हणजे काय ? लाहौल विला कुव्वत !
प. पू लावयचे विसरल्याबद्दल निषेध.. ::दिवा:

लाहौल विला कुव्वत !
संघाबद्दल बोलताना चक्क उर्दू?!

बरोबर आहे, बदलायचेच तर भाषा पण बदला!

जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत'
पण अजून हे कार्य अपूर्ण आहे. खरे तर संस्कृत, वेद इ. सगळे विसरले पाहिजे.
उगीचच अभ्यास न करता मनाला वाटेल तो अर्थ लावायचा!
बरे एक पुस्तक, एक माणूस प्रमाण मानावे तर तसेहि नाही. ज्याला त्याला स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याचे कष्ट देणारा धर्म. अभ्यासाची कटकट. क्रिकेट नि बॉलिवूड कधी बघणार?
नाही हो होत आताशा हे कष्ट.

त्यापेक्षा धर्मच हवा असेल तर इतर भाषा, धर्म स्वीकारून टाका. त्यांच्यातहि पीर, नि बाबा आहेतच, त्यांच्या मागे लागा. निदान ते हिंदू धर्मातले तरी नाहीत.
त्या धर्मात कसे, अजिबात डोके न चालवता कुणि २००० वर्षांपूर्वी किंवा सातशे वर्षांपूर्वी लिहीले आहे त्याची अक्षरे प्रमाण मानून वागायचे -अभ्यास नको, विचार नको. शंका आलीच तर पोप किंवा मुल्ला असतातच. स्वतःला विचार करायला नको!
निवांत लाच खाऊन श्रीमंत बनायचे नि यथेच्छ दारू पिऊन क्रिकेट नि बॉलिवूड.

म्हणजे सगळ्यांचे विचार कसे एकच झाले की भांडणे नकोत.

हालेलुया! या इलाह अल्ला बिस्मिल्ला!! असे म्हणावे! उगीच काय हटकेश्वर?!

उपहास राहिला बाजूला.
गेली पाच हजार वर्षे धर्म बदलतो आहे, नि आता त्याची ही दशा! कुणि म्हणतो असे करा, कुणि म्हणतो तसे. पुनः हे सगळे फक्त मूठभर शिकलेल्या लोकांपुरते, असंख्य अशिक्षित, गरीब, गांजलेल्या लोकांना कोण दिलासा देणार?
की ख्रिश्चनांप्रमाणे, आमचे ऐकाल तर पैसे देतो, अन्न देतो असे करायचे?

त्यांना स्वकष्टाने शिक्षण पैसे मिळवून सुधारणा करता येईल अशी परिस्थिती आहे का? पैशाशिवाय वैद्यकीय मदत मिळत नाही! मग कुणाकडे बघायचे? जो खोटे का होईना, सहनुभूतीपूर्वक बघतो त्याच्याकडे. नाहीतरी भरपूर पैसे दिल्याशिवाय चांगल्यातला चांगला डॉक्टरहि तुम्हाला बरे करणार नाहीच! मग?

शिक्षण द्या, पैसे मिळवण्याची संधि द्या- सुरुवातीला मदत करा, पण आपले आपल्या पायावर कसे उभे रहाता येईल याचे शिक्षण द्या, तशी परिस्थिती देशात तयार करा!!

लोक आपणहून बदलतील! सांगावे लागणार नाही!

बोवाजी लई लांबचा मार्ग सांगितला. सोप्पा मार्गः हिन्दू राष्ट्र डिक्लेर करा. मंदीर बांधा. सेक्युलर शब्द घटने तून काढा. तसा नसेल निघत तर तो शब्द नसलेल्या जुन्या पुस्तकातली पानेच जाहीरातीत छापा. ३७० कलमाच्या अन समान नागरी कायदा न आणता त्याच्या नुसत्या वावड्या उठवा. पाकला शिव्या द्या. आता तर नेपाळलाही ! हे सगळे कसे सोप्पे....