कंदिल विझवू नका (लावणी)

Submitted by संतोष वाटपाडे on 23 September, 2015 - 02:18

एकटीच अंधारात , सोडविते अंबाड्यास
गाठ ओढली जोरात , पोथ गुंतली केसात
नका घाई उगा करु , पदरास ओढू नका
अहो थांबा राया....... कंदिल विझवू नका..

दारी पडतो पाऊस , धो धो आवाज करीत
जाऊ कापडं काढाया , कशी एकटी मोरीत
फ़टीतून येते पाणी , खिडकीला खोलू नका
अहो थांबा राया....... कंदिल विझवू नका..

आले भिजून घरात , दम छाटला उरात
थेंब छतातून काही , खाली भरली परात
तोल जाईल घाईने , पाय मधे घालू नका
अहो किती घाई........कंदिल विझवू नका..

सारी रात जळतात , काळ्या कंदिलाच्या वाती
थंडी भरते अंगात , थरथर होते राती
घाम येऊ द्या जरासा , वात खाली करु नका
अहो राया तुम्ही..... कंदिल विझवू नका..
..थांबा ना....अहो राया तुम्ही... कंदिल विझवू नका..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सहीच रंगली आहे लावणी. शेवटचे कडवे थोडे नीट हवे होते शंब्द अधिक झाले आहेत. मस्त डफाचा ताल आणि घुंगराचा आवाज ऐकू आला वाचताना.