'अशी ही अदलाबदली' - पा. कॄ. क्र. १ - गाजर आणि चणा डाळ वडी बदलून पनीर आणि बीट वडी

Submitted by आशिका on 22 September, 2015 - 05:41

पनीर आणि बीट वडी

बदललेले घटक

१. गाजराऐवजी पनीर
२ चणा डाळीऐवजी बीट रूट

लागणारा वेळ - ३० मिनिटे
साहित्य

१) ३ कप पनीर
२) १ कप साले काढून किसलेले बीट
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कॄती

१. पनीर कुस्करुन घ्यावे.
२. बीटाची साले काढून किसून घ्यावे व ओले खोबरे वाटून घ्यावे.
३. पाऊण कप साखर घ्यावी.
४. कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यावर बीटाचा कीस मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावा. तो मऊ झालेला जाणवेल. नंतर बीटाचा कीस वेगळा ठेवावा.
५ बीटाचा कीस थंड झाल्यावर त्यात कुस्करलेले पनीर मिसळून ग्राईंडरमध्ये घालून २ मिनिटांसाठी फिरवावे.
६. कढईत एक टेबलस्पून तूप घालून त्यात हे मिक्सरमधून काढलेले मिश्रण, वाटलेले ओले खोबरे व साखर घालून मंद आचेवर परतावे.

७.५ मिनिटांनंतर हळू हळू मिश्रण गोळा होऊ लागेल व कढईच्या कडांना त्यातील काही भाग घट्ट होऊन चिकटेल. अजुन जरासे परतून घ्यावे व त्यात .स्वादानुसार वेलची, जायफळ किंवा केशर घालावे. (मी वेलची पूड घातली आहे).


८.एका ताटलीला अर्धा चमचा तूप लावून वड्या थापाव्यात.

९. १५ मिनिटांत वड्या सेट होतात. त्या कापून प्लेटमध्ये काढाव्यात व आवडीप्रमाणे सजावट करावी.

वाढणी प्रमाण-
वरील प्रमाणानुसार २५-३० वड्या होतात.

अधिक माहिती-
१. मूळ पा. कृ. नुसारच मऊ वड्या होतात.
२. वड्या कडक होण्यासाठी साखर थोडी जास्त घालून अधिक परतावे लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Apratim

यांचं नाव 'मनोहर वडी'>>>> म्हणजे जो प्रकार मी केलाय त्याला असे काही विशिष्ट नावही आहे तर .... हम्म.

हे माहीत नव्हते.

आशिका पदार्थ अगदी मस्त आहे.

पण मला वाटते तु फोटो जरा अजुन चांगला काढ. तुझे बाकीचे फोटो ठिक आहेत पण शेवटचा मेन डिशचा फोटो अगदीच अंधारात आलाय.

यावेळच्या पाकृ जेवढे मार्कस बनवण्याला घेतील त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स प्रेझेन्टेशनला घेतील हेमावैम.

आधीच इथल्या सुगरण मंडळींनी नेहमीच्या पाकृ फोटोंचा बार अगदी उंच नेऊन ठेवलाय आणि त्यात ही आहे स्पर्धा, तेव्हा फोटो बेस्टांबेस्टच असायलाच हवेतच.

फोटो छान दिसतोय. पनीर आणि बीटाची चव छान लागेल. बीटाचा ऊग्रपणा पनिराने झाकला जाईल.

पण एक कप साले काढून किसलेले बीट म्हणजे काय? एक कप सालं निघतील एवढं बीट घ्यायचंय का? Wink Light 1

फोटोतलं प्रमाण ३+१ कपाचं वाटत नाहीये.

एक कप सालं निघतील एवढं बीट घ्यायचंय का?>>>> नाही बीटाचा किस १ कप घेतला आहे. आणि बीट साले काढून किसले आहे.

प्रमाण बरोबरच आहे. मात्र कप लहान आहे. शिवाय कढईतले मिश्रण मिक्सरमधून काढल्यानंतर म्हणजेच मिळून आलेले असल्याकारणाने कमी वाटतेय.

नव्या प्रतिसादकांना धन्यवाद.

बीट उकडून साल काढून किसले तर चालेल का>>> चालेल की, त्यामुळे चवीत फरक पडेल असे वाटत नाही, पण बीटाचा किस खोबरं आणि पनीरला सुटलेल्या पाण्यात तसाही शिजणारच त्यामुळे मी बीट आधी उकडून घेतले नव्हते.