अविश्वसनीय लडाख ! .... भाग ४

Submitted by सव्यसाची on 20 September, 2015 - 07:26

अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)

सकाळी भल्या पहाटे उठलो. आम्ही तिघे लवकर आटोपून सगळ्यांच्या आधी अर्धा तास निघालो जवळपास ७ वाजताच. चांगलीच हाणली गाडी. उपशीला आलो तर तिथे एका वहीत नोंद करावी लागते म्हणून थाबलो. तर तिथला सैनिक म्हणत होता वर बर्फ असणार कारण इथे पाऊस पडतोय. आज मी गमबूट घातले होते. पावसाळी सूट पण होता पुर्ण. पण तरी धाकधूक होतीच. लगेच पूढे निघालो. एका मस्त चिंचोळ्या खिंडितून वाटचाल होती. अर्थातच नदी होतीच त्या खिंडीत. इथे सगळीकडेच आपण सतत खिंडितून जात एखादा घाट चढत असतो व त्या खिंडीत नदी असतेच असते. ही खिंड मात्र जरा जास्तच चिंचोळी होती त्यामूळे त्याच गूढ वाढल होत. वाटेत एका ठिकाणी फोटोसाठी आणि कोणाला तरी पावसाळी जाकीट चढवायच होत म्हणून थांबलो. तर मागून आमचे इतर बाईकर्स आले. म्हटल हात्तिच्या, इतकेच आपण पूढे होतो? हा तर विनोदच झाला. अर्थात, आम्ही सोडल्यास एवढे हळू हळू चालवणारे इतर 4 5 जणच होते. एक दोघे तर इतके वेगात चालवायचे की त्यांना फॉर्म्युला रेसरच म्हणत असू. त्यांना सिडिंग पण देण्यात आले होते. तर ते गेले पूढे. आणि मग नक्की काय झाले लक्षात नाही पण अतुल बहूतेक फोटोसाठीच थांबला आणि अक्षय चांगलाच वैतागला. त्याने मग अतुलला जरा सुनावले आणि न थांबता गाडी सुसाट सोडली व खूप पूढे निघून गेला.

आता खिंड थोडी मोकळी झाली होती आणि त्यामूळे तो बऱ्याचदा एकदम दूरवर एक ठिपका म्हणून दिसत असे. मी मात्र अतुलच्या मागे मागेच चालवत रहिलो. बराच वेळ खिंडीत नदीच्या पातळीवरच चालवत होतो. मग घाटाचा चढ सुरू झाला आणि कुठेतरी अक्षय थांबला होता आमच्यासाठी तो भेटला. हा टांगलांगला तर फारच नयनरम्य होता. खूपच बर्फ बर्फ सगळीकडे आणि हिरवेगार पण. श्रिनगर ते लेह, लेह ते पंगोंग किंवा नुब्रा, हे रस्ते आणि डोंगर वैराण होते. आता लेह ते मनाली मधील पर्वत हिरवेगार दिसू लागले. आणि बऱ्याचदा रस्त्याच्या दुतर्फा बर्फच बर्फ. आणि वर सगळीकडेच एकदम निळ आकाश. फारच अप्रतीम ! पाऊसही थांबला होता आणि बर्फ पडत नव्हता. शिवाय आता घाट चढायची उतरायची एवढी सवय झाली होती की घाट नसेल तरच चुकल्यासारख वाटायच. अगदी आरामात शिखरावर पोचलो. फोटो काढले. आणि उतरायला सुरवात. काही २० २५ किलोमीटर गेलो असु. आता रस्ता सपाट होऊ लागला होता, खिंड मोठी होऊ लागली होती. आणि एकदम खडी, दगड आणि पांढरी धूळ यांचा रस्ता सुरू झाला. या रस्त्यावरून जायला थोडा बिचकलोच, कारण पंक्चरची भिती. पण मागून आमचे एफ १ रेसर्स आणि निलेश दणादण आले आणि वेगात पूढे गेले. म्हटल चला असच जाव लागणार आहे. मग आम्हिही सूटलो जोरात. गाडी हले डुले चालली होती. पण जाम मजा आली. एक जण धूळीत पडला देखील. एकदम १० १२ गाड्या तिथून जाउ लागल्याने भरपूर धूळ उडाली होती. अस ४ ५ किलोमीटर गेल्यावर डेब्रिंगला एक टपरी लागली. तिथे जेवायला थांबलो. ४ ५ मिनिटात गरम गरम परोठे आले समोर. झकास जेवण झाल. बाजूलाच एक गोड म्हातारी विणत बसली होती. तिचा फोटो काढला. आता थोड अंतर अजून खराब रस्त्यावरून गेल्यावर एकदम गुळगुळीत रस्ता लागला. आणि दूतर्फा पूर्ण सपाट रुक्ष जमीन. सगळे एकदम सुसाट सुटले ८० ९० च्या वेगात. फारच धमाल आली. हे होते मूरे मैदान. अर्धा पाऊण तास या मैदानातून गेल्यावर एका मस्त खोल दरीपाशी येऊन पोचलो जिथे नेहमीप्रमाणे एक नदी वहात होती. तिथे फोटो काढून, नुसतेच बसून, गप्पा मारून, असा बराच वेळ काढला व मग निघालो.

पांग गाव जवळ येत चालल होत. मी एवढा वेळ मागे होतो ते थोडसच फर्लांगभर पूढे गेलो. वाटेत आमचे काही बाईकर्स थांबलेले दिसले. मला वाटल असेच फोटोसाठी थांबलेत. त्यांनीही पूढे जात रहा अशी खूण केली आणि मी गेलो पूढे. २ ३ किलोमीटर उतरल्यावर पांग गावी पोचलो. तिथे थांबून वाट पहात बसलो हे दोघे आत्ता येतील मग येतील. मला वर ती मगाचची थांबलेली लोक दिसत होती पण कोण आहे ते कळत नव्हत. घाट पण दिसत होता पण त्यावर हे दोघे नव्हते. आणि मला परत त्या लोकांपर्यंत जायचा कंटाळा आला होता. शेवटी १० मिनिटे थांबूनही हे दोघे न आल्याने मी पूढे निघालो. परत एकदा चिंचोळ्या खिंडितून जायचे होते. १० १५ मिनिटांनी एक पूल ओलांडला आणि रस्त्याच्या कडेला गाडी लाऊन मी कडेला दगडांवर आडवा झालो. मला जाम झोप आली होती आणि तसही परत एकदा यांची वाट पहावी असा विचार केला. कारण आता परत एक घाट सुरू होताना दिसत होता. १० २० मिनिटेच झोपलो असेन, तेवढ्या वेळात मला ४ ५ तरी ट्रक, कार, बाईकर्सनी थांबून विचारले की कारे बाबा का झोपलास, काही मदत हवी आहे का. म्हटले नाही असाच झोपलोय, की मग हसून पूढे सो जा सो जा अस म्हणून निघून जायचे. खूपच मदत करणारी, तयारी असणारी माणस असतात इथे. अजूनही कोणीच आले नव्हते आमच्या मंडळींपैकी. मग म्हटले आता एकटेच जाउया. नंतर कारण कळल ते न येण्याच. ते म्हणजे एकाची गाडी पंक्चर झाली होती. पांगच्या आधी जिथे लोक थांबले होते ना तिथेच. अतुल अक्षय थांबले म्हणून त्यांना ते कळले. मग अतुलकडे अतिरीक्त ट्यूब होती ती त्याला दिली. पण आमचे दुरुस्तीवाहन कुठे नव्हते आसपास. मग एक दुसरा संघ आला त्यांच्या दुरुस्ती वाहनात सगळी हत्यारे होती. त्यांच्या तज्ञाने ती ट्यूब घालून दिली बाईकला. मग हे सगळे निघाले. तर असे सगळेजण तिथे मदत करतात.

मी मात्र या घडामोडींपासून अनभिज्ञ होतो. थोडा थोडा पाऊस पडत होता. मी मजल दरमजल करत वर पोचलो तेंव्हा कळले की मी लाचूंगला चढून आलो आहे. तुफान थंडी वारा होता. आणि माझ्या मागे पूढे जवळपास १५ मिनिटे कोणीच नव्हते. फोटो काढायचा तरी कसा. मग एक युक्ती करून काढला खरा माझा आणि त्या दगडी फलकाचा एकत्र फोटो. तिथून निघालो, तो घाट उतरून लगेच दुसरा घाट चढलो. आता मी नकिला सर केला होता. इथेही परत तीच परिस्थिती होती, त्यामुळे त्याच पद्धतीने सेल्फि काढून पूढे निघालो. आता जरा सपाट प्रदेश सुरू झाला एका नदीच्या काठाकाठाने. तिथे छोट्या प्रमाणात का होइना, पण अगदी ग्रंड कनीअन सारखे दृश्य होते. आणि खूपच शांत, फारशी वस्ती नसलेला प्रदेश. हळू हळू एका टपरीपाशी पोचलो तर तिथे अजय आणि इतर मंडळी बसलेली होती. तिथे कळले की निलेश पूढे तळावर गेलाय आणि तळाचे नाव मुलकिला असे आहे, व तो ८ किलोमीटरवर आहे. अजून जायचे आहे या कल्पनेने कंटाळलो व तिथेच बसलो. पण १० मिनिटानी अजून थोडी लोक आली तरी त्यात अतुल अक्षय नव्हते. मग ठरवले चला जायचेच आहे अजून तर संपवून टाकू सिलसिला. मग थेट तळावर पोचलो, आमचा तंबू बघून सामान टाकले व चहा प्यायला पळालो. इथे पण मस्त चहा आणि बिस्किटे मिळाली. मग थोडा अंधार पडू लागला होता तेंव्हा अक्षय दिसला. आजचे तंबू फक्त दोघांसाठी होते त्यामूळे तो आज दुसऱ्या तंबूत होता. तो म्हणाला अतुल तंबूत गेलाय म्हणून मी तिकडे गेलो. जाऊन तंबूत बसलो तर अतुल आला. त्याला काही तो तंबू, ती जागा मनास आली नव्हती. त्यामूळे इथे हे नाही ते नाही अशी ओरड चालू होती त्याची. त्याला पाणी पाहीजे होते पण पाण्याचा जग वगैरे काही नव्हता. हा अगदीच साधा फक्त जरूरीच्या गोष्टी असलेला तळ होता. वर त्याला थंडी पण तुफान वाजत होती, प्रचंड दमला होता, झोप आली होती. किरकिर करत झोपला. मी पण झोपलो. तर थोड्यावेळाने एकदम त्याच्या रडण्याने, मोठमोठ्यांदा ओरडण्याने जाग आली. चांगलाच दचकलो म्हटल झाल काय याला. तर तो पायात आकडी आली आहे, हुडहुडी भरली आहे अस ओरडत होता वर आता मेलोच अशा आविर्भावात तडफडत होता. आणि मला ती आकडी कशामूळे आली ते काही कळेना, त्याला सांगता येइना. मग तो निलेशच्या नावाने शंख करायला लागला की त्याने कशी नीट व्यवस्था केली नाहीये. त्याला बोलवून आण, वैद्य आण. त्याचा एकूण ओरडा पाहून माझी चांगलीच पाचावर धारण बसली. म्हटल इथे कित्येक मैल रुग्णालय तर सोडाच, वस्तीच नाही तर करायचे काय. मग त्याला म्हटले मी विचारतो त्याची फक्त उत्तरे दे. पहिला प्रश्न, तूला मधुमेहामूळे ही आकडी आली आहे का? मग तो म्हणाला नाही त्याने नक्कीच नाही. मग तुला आकडीचा जास्त त्रास होतोय की थंडीचा. म्हणाला आकडीचा. मग म्हटल तूला हे पाणी कमी प्यायल्याने होतय का? पाणी किती प्यायलास? तर मग म्हणाला हो जवळ्पास अजिबातच पाणी प्यायल गेल नाहीये दिवसभरात. मग म्हटल चला काहितरी करता येईल. मग एक लिटरची पाण्याची बाटली होती त्यात एक पाउच इलेकट्राल घालून प्यायला दिले. ५ मिनिटात आकडी कमी झाली. तरी मी निलेशकडे जाऊन बोलावले. तो आला नाही पण म्हणाला भरपूर पाणी दे त्याला आणि निधीला बोलाव. ती कुठल्या तंबूत आहे ते एका मुलीने दाखवले. बाहेरून तिला हाका मारल्या पण ती गाढ झोपली होती त्यामूळे ऐकू गेल नसणार. परत तंबूत आलो अजून पाणी घेउन. येताना अक्षयला घेऊन आलो. त्याने अतुलचे पाय चेपायचा प्रयत्न केला आकडी घालवायला पण अतुलच्या फारच हालचाली होत होत्या त्यामूळे जमले नाही. पुढील अर्ध्या तासात अतुलला थोड थोड करत सगळ इलेकट्राल पाजल. आता त्याची आकडी पूर्ण थांबली. आता त्याला थंडीची आठवण झाली. म्हणाला पाय प्रचंड गार पडलेत. मग त्याच्या अंगावर २ गाद्या व २ मोठ्या रजया टाकल्या. पण त्याची थंडी थांबेना. मग माझ्याकडे आम्ही घेतलेली वॉर्मी म्हणून गोष्ट होती. ते पाउच फोडले, त्यातल्या पिशव्या त्याच्या पायात मोजे घालून त्यात टाकायच्या अस ठरवल. म्हटल त्याच्या खोगीरात अतिरीक्त पायमोजे, कानटोपी, हातमोजे, पूर्ण बाह्यांचे टिशर्ट अस सगळ असेल ते त्याला चढवू. तर कसल काय, या महभागाने काय आणाव खोगीरात? ३ अर्ध्या बाह्यांचे टिशर्ट्स, बाकी कुठलेच मोजे नाहीत, कानटोपी नाही. ही हद्द झाली. माहीत होत आधीच की इथेही पंगोंगसारखी थंडी वाजणार आहे आणि हा बिनकामाच्याच फक्त गोष्टी आणतो. कहर.. ! मग माझे अतिरीक्त मोजे पायात घालून त्यात ते वॉर्मी घातले एका पायात एक. हळू हळू ते तापले व मग त्याला बरे वाटले. आता तो थोडा झोपला. मग मी अक्षयला तिथेच बसवून दुसऱ्या तंबूत जेऊन आलो. जेवण मस्त होते. येताना अतुलसाठी पण आणले होते. अक्षय आता जेवायला गेला. अतुलचे जेवण झाले व तो झोपला. मग मी अजून पांघरुणे मागवली व झोपलो.

अधिक आषाढ शुद्ध चतुर्दशी (१ जुलै)

सकाळी उठलो तर हा गायब. बाहेर मोठ्या जोमाने कमेरा घेऊन फिरत होता. काल हा एवढा आजारी होता कोणाला वाटणार पण नाही. म्हटल चला ठिक आहे ना, उत्तम ! मग चहा नाष्टा झाल्यावर अर्धे पेट्रोल अक्षयच्या बाईकमधे टाकले. त्यासाठी एक लिटरची रिकामी बाटली अर्धी कापून त्याच नरसाळ केल. कारण मी नेलेल नरसाळ फारच छोट होत. त्याचा मागचा डिस्क ब्रेक लागत नव्हता. मग तज्ञाला शोधले. तर तो म्हणे दुसऱ्याच कुठल्यातरी मंडळाची गाडी बंद पडली होती ते पहायला पूढे गेला होता. मग अक्षयनी तशीच चालवली बाईक. आज बारलाचाला चढलो. इथे भरपूर म्हणजे भरपूरच बर्फ होता आजुबाजूला चढताना व शिखरावर. तसाही हा घाट भरपूर बर्फवृष्टीसाठी प्रसिद्ध आहेच. अक्षयची कमाल आहे मागचा ब्रेक अजिबात लागत नसतना त्याने फक्त पूढच्या ब्रेकवर गाडी चालवली या बर्फात. य घाटात बराच वेळ काढला. आज आम्हाला तसही कमी अंतर जायचे होते. मग उतरताना एक अप्रतीम सुरज विशाल नावाच तळ आल. त्याच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांवरून बर्फ पार तळ्याच्या पाण्यापर्यंत आला होता. थोडा पाण्यावरही तरंगत होता. काय अफलातून दृश्य होत ते ! तिथून एक मस्त फोटो काढला. मग तळ्याच्या मोठ्या बाजूकडून आम्ही तळ्याच्या उजवीकडून जाउ लागलो. आता त्याच्या पलिकडच्या निमुळत्या टोकाकडे पोचत आलो होतो. नुकताच अतुल माझ्या पूढे गेला होता आणि तो त्या टोकावर थांबला असणार याची मला खात्री होती. म्हणून मी तिकडे बघायला गेलो आणि..., नजर हटी तो दुर्घटना घटी ! चाकाखाली दगड आला आणि गाडीने फिरकी मारली. खरतर मला तो दगड शेवटच्या क्षणी दिसला होता व त्यावरून आपण पडणार नाही अस वाटल होता. पण अपघात होतो त्यावेळेस आपल्या हातात काही नसत याचा प्रत्यय आला. गाडी डाविकडे झुकली व माझा उजवा पाय तोल सांभाळण्याकरता बाहेरच्या दिशेला फेकला गेला. सर्वसाधारणपणे तो नुसताच हवेत फिरून माझा तोल सांभाळला गेला असता, पण तिथे नेमका एक भला मोठा दगड रस्त्यावर मधेच बाहेर आला होता कडेने, त्यावर तो आपटला. त्यामूळे माझी तोल सावरायची प्रक्रिया बंद पडली व मी डाव्या बाजूला पडलो. ते अतुलने पाहीले होते व त्याने अक्षयला सांगितले होते. त्यामूळे तो धावत आला. तोपर्यंत मला तिथूनच जाणाऱ्या फिरंग्यांनी उभे केले होते. आता आधी काय काय मोडले, शरिराचे, गाडीचे नंतर, ते पहायला पाहीजे. तरी मी गेले २ ३ दिवस विचार करत होतो की या प्रवासात मला काही झाले कसे नाही, पाठ, कंबर, ढुंगण दुखले नाही, मान फक्त एकदाच दुखली, पडलो नाही. पण म्हटले नशीब जोरावर दिसते आहे, किंवा कोणितरी जगन्माता काळजी घेते आहे. पण कसचे काय, उजवा पाय ! हो, उजवा पाय करंगळीमागे दुखत होता, आणि डावी कंबर. डाव्या कंबरेचे जरा जास्त वाटत होते. पण हिंडतोय फिरतोय म्हणजे हाड मोडले नाहीये. गाडीला काही झाले नव्हते. चला सुटलो. मग त्या टोकाशी जाऊन फोटो काढले. अतुल म्हणाला मी कमेरा काढून तुझ्याकडे रोखत होतो व तू पडलास. एक दोन क्षण उशीरा पडला असतास तर फोटो आला असता. अरेरे... ! Happy

इथून पूढे निघालो. पूढे अजून एक सुंदर तळे लागले. त्यात चक्क एक नाव पण होती हंसाच्या आकाराची, पायाची वल्हवाली. पण वापरात दिसत नव्हती. बहूधा हे दीपक ताल असाव. तिथून पूढे निघालो. आता उजवा पाय थोडा ठणकत होता. पण गाडी चालवता येत होती. त्यामूळे ठीक होत. जिस्पा इथल्या ज्या हॉटेलला उतरायच ठरवल होत तिथे पोचलो. या दोघांचे फोटो काढणे सुरू झाले. नंबर प्लेट सकट बरका ! नाहीतर तो फोटो बरोबर नाही. ५ वाजले असुनही उन्हात उभ राहवत नव्हत त्यामुळे मी मात्र एका सिमेंटच्या बस थांब्यात जाऊन बसलो. तिथे अर्धा तास थांबल्यावर कळल की हॉटेलवाल्याने पूढे २० किलोमीटरवर किलॉंगला सोय केली आहे. मग वरात तिकडे निघाली. मला आता थांबत थांबत यांच्याबरोबर फोटो काढत येणे अशक्य झाले होते. मग मी पूढे पळालो. हॉटेलवर पोचलो व आधी जवळची खोली द्यायला सांगितली. तरी एक मजला चढावा लागलाच. मी खोगीर गाडीवरच ठेवले. पण एक मुर्खपणा केला तो म्हणजे गाडी मधल्या स्टंडवर उभी केली. त्यात परत उजवा पाय दुखावला. मग गरम गरम पाण्याने ताबडतोब अंघोळ केली. मग पाय गरम पाण्यात बुडवून ठेवला. थोडा सुजला होता. दाबले तर एका ठिकाणी चांगलाच दुखत होता. मग अतुल अक्षय आले. अतुलने स्प्रे मारून क्रेप बंडेज बांधले. मग तो बाहेर गेला तेंव्हा एक गोळी घेऊन आला पण ती काही घेतली नाही कारण त्यात परसिटेमॉल होते. उगाच अशक्तपणा येईल. खिडकीतून खाली नदी, पलिकडे ऊंच हिरवागार पर्वत, वर हिमाच्छादीत शिखर असा मस्त नजारा होता. पलिकडील डोंगरावर तूरळक घर इतक्या मस्त जागी होती, की वाटल ही लोक खरी मस्त जागी रहातात. मस्त जगतात.

जेवायला खाली गेलो. जेवण यथातथाच होते पण बहूतेक दही मिळाले त्यामूळे दहिभात खाल्ला. आता व्यवस्थित लंगडत चालत होतो. उजवा पाय फक्त टाचेवर टेकवता येत होता. तरी अस्थिभंग आहे अस वाटत नव्हत. परत येऊन मी ब्रुफेन घेऊन लगेच झोपून टाकले.

---

सर्व भाग
http://www.maayboli.com/node/55605 --- सुरवात
http://www.maayboli.com/node/55634 --- भाग २
http://www.maayboli.com/node/55652 --- भाग ३
http://www.maayboli.com/node/55678 --- भाग ४
http://www.maayboli.com/node/55692 --- समारोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast part ha pan.... tumhi riding guard vaparat nahi ka....
Padalat vachun vait vatale.... waiting for next part

Mast part ha pan.... tumhi riding guard vaparat nahi ka....
Padalat vachun vait vatale.... waiting for next part

प्रवीण, मी गार्डस वापरत होतो पण ढोपर आणि कोपर यांचे. बूट पण होते. पण तरी मला लागले ते पायाच्या करंगळीच्या मागे. आणि अर्थातच मांडीला काही गार्डस नव्हते. चलता हैं Happy

ससा, इथे फोटो resolution कमी करून टाकावे लागतील अस दिसतय. कृपया facebook वर बघ. शेवटच्या भागात दिली आहे माहिती.

चलता है..... like more risk.. more profit.... Ladakh thikani tar honar cha asa. Tumchya group madhe konakade yamaha Fz hoti ka. majhya kade aahe Blue core series City madhe pan average det nahi Happy

प्रवीण , हो आमच्यात एक यामाहा FZ व एक फेझर होती. मला आठवतंय त्यानूसार त्यांना थोडा प्राणवायूचा त्रास झाला चांगला चढताना
आणि पडलो त्याच काहीच वाटल नाही फारसं. चलता है । फक्त स्पिति झाली नाही म्हणून थोड वाटलं