रियुनियन - सौ. विमलाबाई गरवारे

Submitted by बेफ़िकीर on 20 September, 2015 - 07:04

विमलीज रियुनियनः (सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या १९८५ पास आऊट बॅचची रियुनियन)

तीस वर्षांनी १७ जण भेटले. एकदोन, एकदोन हाकांमध्ये! जणू काही ह्या हाका कधी मारल्या जातायत ह्याचीच वाट पाहत होते सगळे! जणू काही ह्या हाका ऐकू येतील इतक्याच अंतरावर ताटकळून उभे होते. पाच, सहा जण खूप लांब होते. ते व्हॉट्स अ‍ॅपवरून मिनिटामिनिटाला अपडेट्स मागत राहिले. त्यांचे नेहमीचे आयुष्य तासभर खुंटीला टांगून ते तीस वर्षापूर्वीच्या वर्गात ह्या सतराजणांबरोबर जणू मनाने उपस्थित राहिले.

जमाना उलटलेला होता. युग मागे पडलेले होते. गतकाळाची कसलीच निशाणी आता कुठेच नव्हती. ना रस्त्यावर, ना इमारतींमध्ये, ना गल्लीबोळांमध्ये आणि ना भेटलेल्यांच्या चेहर्‍यांवर! कोणी जाड, कोणी पांढरी खुंटं मिरवणारा, कोणी बर्‍याच केसांना गेल्या काही वर्षांच्या सोबतीला पाठवून बसलेला, कोणी अगदी तस्साच!

कोणी डॉक्टर, कोणी व्यावसायिक, कोणी वरिष्ठपदी, कोणी आजही सामान्यच आणि कोणी आजही लोकप्रियच!

फार तर दोन सेकंद लागत होते प्रत्येकाला ओळखायला. प्रत्येकजण आला की उत्साहाची नवीन कारंजी उसळत होती, शेकहँडसाठी हात सरसरून पुढे होत होते. चेहरे उमलत होते. नुसते एकमेकांना पाहूनच मने भरत होती. चेहर्‍यावरचे हसू लोपतच नव्हते. आयला तू, अरे किती वर्षांनी, मला वाटते पंच्याऐशीनंतर आत्ताच, तस्साच दिसतोयस वगैरे शेरे दुमदुमत होते. 'कोणी आपल्याला प्रत्येकाला निरखून बघताना बघत तर नाही ना' ह्याची खात्री करून प्रत्येक नजर ह्या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत फिरत होती. प्रत्येक चेहर्‍यावर क्षण - दोन क्षण स्थिरावत होती. कान मात्र होते प्रत्येकाच्या बोलण्याकडे! कोणीही कसलाही विनोद केला तरी सगळे जोरजोरात हसत होते. विनोदाच्या दर्जापेक्षा ते हसणे खरे तर ह्या गोष्टीसाठी होते की 'अरे आज इतके वर्षांनी वर्ग भरल्यावर हा अगदी तस्सेच बोलला जसा त्यावेळी बोलायचा'! विनोदापेक्षा आनंदाचे हसूच जास्त होते.

वेटर्स ताटकळलेले होते. ऑर्डर देण्यात खरे तर कोणालाच स्वारस्य नव्हते. जिथे तीस वर्षांचा काळच वेटर बनून बाजूला अवाक नजरेने ताटकळत उभा राहिला होता तिथे पदार्थांची ऑर्डर कोण देत बसणार? तरीही औपचारिकता म्हणून ऑर्डर दिली गेली. ऑर्डर तरी काय? १७ इडली सांबार! असे का? तर ऑर्डर देण्याच्या प्रक्रियेतही कोणाला एक क्षण वाया घालवायचा नव्हता.

'तू काय करतोस, भाऊ कसाय, बहिण कुठे, आई बाबा कसे आहेत' वगैरे जुजबी माहितीची देवाणघेवाण झाल्यावर जणू मधल्या सुट्टीची बेल वाजली. प्रत्येकाने डबा पहिल्या दोन तासांनाच शिक्षकांची नजर चुकवून खाल्लेला असल्याने सगळे अचानक उधळले. कोण काय बोलतोय, कोणाशी, कोण का हसतोय काही कळत नव्हते.

व्यवसाय आड येत नव्हते. कामाच्या ठिकाणी असलेली प्रतिमा आड येत नव्हती. आर्थिक स्तर आड येत नव्हता. आजचे व्यक्तिमत्त्व आड येत नव्हते. आड येत होते फक्त एक दु:ख!

एक दु:ख, जे मनाच्या तळाशी वर्षानुवर्षे साचत मनाचा एक भाग बनून बसलेले होते ते आड येत होते. कसले दु:ख होते ते? तर ह्या गोष्टीचे की आपण सगळे पुन्हा नक्की भेटू, तितकीच किंवा त्याहून अधिक धमालही करू, पण......

पण तो वर्ग पुन्हा भरू शकणार नाही. येथून पुढे एकत्र, हातात हात घेऊन नक्की जाता येईल. पण पंच्याऐशी साली हात सुटत होते तेव्हाचा क्षण पुन्हा आणून ते हात न सुटू देण्याचे काम नाही करता येणार. आज आपण कितीही कर्तृत्त्ववान असलो तरीही इतके नाही करता येणार.

हा, हा समोर हसतोय तो, तो पलीकडचा, हा शेजारचा, हा तेव्हा आपल्या मागे बसणारा, तो तेव्हा दंगा करणारा! हे सगळे आणि आपण! काहीतरी शोधत होते सगळे! खरे तर एकमेकांना नव्हते शोधत! स्वतःलाच शोधत होते. ह्यातल्या प्रत्येकासोबत प्रत्येकानेच स्वतःतला थोडा थोडा भाग तेव्हाच जोडून दिलेला होता. आपल्यातला तो थोडासा आपला भाग पुढे कायम त्याच्याचबरोबर राहिला. आपल्याकडे परतलाच नाही. तो भाग शोधत होतो आपण! हे सगळे भाग एकदम एकत्र मिळाल्यामुळे आपल्याला आपणच एकदम खूप प्रमाणात परत मिळालो. आज आपण जे आहोत ते मुळातले आपण नाहीच आहोत. मुळातले आपण ह्या समोरच्यांमध्ये आणि त्या परदेशात राहिलेल्यांच्यामध्ये केव्हाच विभागलो गेलो. आता आपले नांव, प्रतिष्ठा, श्रीमंती आणि कर्तृत्त्व उरलेले आहे. आपले कुटुंब, जबाबदारी, अपेक्षांचे ओझे आणि उद्दिष्टे राहिलेली आहेत. पण मुळचे आपण्च आता राहिलेलो नाही आहोत.

हे सगळेजण हसत आहेत ते सगळे भेटल्यामुळे हसत नसून सगळे स्वतःलाच कैक वर्षांनी भेटल्यामुले हसत आहेत. दु:ख आहे ते 'हे स्वतःला भेटणे इतके परावलंबी असण्याचे'! सुखही हेच आहे की निदान हे एक दु:ख तरी परावलंबी आहे. बाकी उरलेली सगळीच दु:खे फक्त आपल्यावर अवलंबून आहेत.

आता पुन्हा भेटी ठरत आहेत. ग्रूप विस्तारत चालला आहे. प्रत्येकाला जगाच्या कानाकोपर्‍यातून खणून काढतील. पार्ट्या होतील, ट्रिपा ठरतील.

पण एकमेकांच्या डब्यात हक्काने हात घालून भाजीची चव नाही घेता येणार! मधल्या सुट्टीत खेळता नाही येणार! शिक्षक वर्गात आल्यानंतर खडबडून उभे राहून 'एकसाथ नमस्ते' म्हणण्याची वेळ येणार नाही.

शाळेसमोरून आलिशान गाडीतून जाताना 'कधी ह्याच गेटबाहेर आपण कधी एकदा घंटा वाजतीय आणि गेट उघडतंय ह्याची वाट पाहात तिष्ठत असायचो' ह्याची आठवण येते. डोळे भरून येतात. शाळा बिचारी तश्शीच उभी आहे. आपल्या वैभवाकडे काहीश्या अभिमानाने आणि भरून आलेल्या विद्ध नजरेने अबोलपणे, मूकपणे पाहत! नकळत सिग्नलला गाडी थांबलीकी हात जोडले जातात!

आज सगळे भेटले. एक युग जागे झाले पुन्हा एकदा! अगदी खडबडून जागे झाले. भेटनाताचा, भेटल्यावरचा आणि पुढच्या भेटी ठरवतानाचा आनंद एकापेक्षा एक बढकर असा होता.

पण शेवटी भेट संपवून आपापल्या वाटेला लागताना प्रत्येकाच्या मनात विचार आला असेल.

'काय साला काळ होता तो! तो काळ नाही आता येणार! आता घरी जाऊन पोराबाळांच्या जबाबदार्‍या, आपली कामे, रोजचेच सगळे! एकदा खाकी चड्डी आणि पांढर्‍या शर्टात विमलाबाई गरवारेचा बिल्ला खिशावर शिवून बारा वाजता शाळेच्या गेटबाहेर उभे राहून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ढसढसून रडायला पाहिजे! मग खरी रियुनियन झाल्यासारखी वाटेल बहुधा'!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय बेफी. आम्ही पण आमच्या बॅच (१९९६) चे १-२ वेळा रियुनियन केले होते (आम्ही कॉलेजात असताना!) . ते हे मुद्दाम प्राथमिक शाळेच्या (बाल शिक्षण मंदीर, भांडारकर रोड) ग्राउंडवर. त्या नंतर योग नाही आला. आता तर सग़ळेच जगभर विखुरले आहेत.
जेव्हा परत भेटू तेव्हा भावना मात्र अशाच काहीशा असतील Happy

जबरी लिहीले आहे. प्रभात रोडच्या त्या इमारतीसमोर उभे केलेत परत!

माझा शाळेतील कोणाशीच फारसा संपर्क राहिलेला नाही नंतर कधीच. त्यामुळे आता रीयुनियन ला गेलो तरी काय गप्पा मारेन कोणास ठाउक!

छान लिहिलेय.
पण फक्त सतराच जण आले?
बादवे
1985 च्या दहावीच्या बॅचला विमलाबाई गरवारे मध्ये माझ्या दोन जुळ्या बहिणी होत्या, अनघा-अस्मिता.

अनघा - अस्मिता मला आठवतात. तुमच्या दोन जुळ्या बहिणी म्हणजे? त्या तुमच्या सख्ख्या बहिणी होत्या का? मला त्यांचे आडनांव आठवत नाही आहे आत्ता

अरे वा! आमच्या ९९ बॅचचे असे रियुनिअन नाही झाले. काही मुली भेटलो होतो आम्ही. पण पूर्ण बॅचचे नाही बहुधा..

आमच्या १९८६च्या बॅचचे महारियुनियन (म्हणजे सगळ्या तुकड्यांचे एकत्र) शाळा सुटून २५ वर्षे झाली तेव्हा म्हणजे २०११ मधे झाले होते. त्यांनी शाळेला भेट देऊन काही देणगी देखिल दिली होती म्हणे! मी त्यावेळी बॅचच्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर होतो त्यामुळे मला कळले नव्हते. पण अजूनही आमच्या बॅच मधली मुले अधून मधून भेटत असतात. माझी तुकडी ब, आम्ही सगळे व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्कात आहोत. खास त्या तुकडीचे गटग ही अधून मधून होत असते म्हण्जे परदेशस्थ मुले मुली पुण्यात आले की ज्याला जसे जमेल तसे जमतात.

मी पहिल्यांदा अशा गट्गला गेलेलो तेव्हा माझाही कुणाशीच अजीबात संपर्क नव्हता. त्यामुळे मलाही फा सारखेच काय बोलेन कुणास ठाऊक असेच वाटत होते त्यावेळेस व्हॉट्सअ‍ॅप गृपही तयार झालेला नव्हता. मला चेहरे तर जाऊदे पण नावेही नीटशी आठवत नव्हती सगळ्यांची, पण गटगला गेल्यावर सगळ्यांना भेटल्यावर खूप मजा आली. तर फारेण्डा मी म्हणेन अशी संधी मिळाली तर जरूर लाभ घे. (फु स) Happy

वरचे लिखाण आपल्या शाळेचे नाव काढून दुसर्‍या कुठल्याही शाळेचे घातले तरी खूप वर्षांनी भेटणार्‍या मुलांचे प्रातिनिधिक असे वर्णन झालेले आहे

आमच्या १९८३ च्या बॅचचे रियुनियन आत्ताच २५ एप्रिलला शाळेतच झाले. २५ डिसेंबर २०१३ ला व्हॉट्सॅप ग्रुप उघडला गेला होता. शाळेत दहावीच्या दोनच तुकड्या. मी ग्रुप जॉइन केला तोवर जवळपास ४० मुलेमुली होती. या वर्षीच्या सुरुवातीला रियुनियनची आयडिया आली. आधी जोमाने हरवलेल्यांचा शोध घेण्यात आला. अगदी रियुनियनच्या आदल्या दिवसापर्यंत. सत्तर शाळूसोबत्यांशी संपर्क साधला गेला.
शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रम. सापडले तितके माजी शिक्षकही हजर. त्यांचा सत्कार केला गेला. संस्थाचालकही होते.
मग विविधगुणदर्शनाचा कार्यक्रमही होता. पण त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.शेवटी डिनर. ६० मुलंमुली हजर होती. त्यातली काही कोकणातून, पुण्याहून , कोल्हापूरहून आली होती. परदेशात असलेल्या चौघांसाठी स्काइपवरून कार्यक्रम दाखवायचा प्रयत्न होता. पण तो धड न जमल्याने त्यांनी एकमेकांशीच गप्पा मारल्या.

आमच्या शाळेत मुलगे विरुद्ध मुली असे शीतयुद्ध होते. अगदी एका सोसायटीत राहणारी मुलेमुलीही एकमेकांशी बोलत नसत. असे दोघे तर जवळजवळ ३५ वर्षांनी एकमेकांशी बोलले. रियुनियनपर्यंत व्हॉट्सॅप दिवसरात्र तुडुंब वाहत असे.

यानिमित्ताने शाळेसाठी काहीतरी करायची कल्पनाही रुजली. पैसेही गोळा झाले होते. (रियुनियनच्या समारंभाच्या खर्चासोबतच- वेगळा अकाउंट उघडून ऑनलाइन ट्रान्स्फर इ.) नक्की काय करायचे यावर खूप चर्वितचर्वण होऊन शाळेला स्मार्ट बोर्ड आणि सगळ्या इयत्तांसाठी ई-लर्निंगसाठी सीडीज असं गजून महिन्यात दिलं गेलं.

कोणीही भेटल्यावर क्षण दोन क्षण चेहरा ओळखण्यात आणि नावाशी सांगड घालण्यात जायचे.व्हॉट्स्अ‍ॅप ग्रुपमुळे सगळ्यांची नावे व काहींचे आताचे चेहरेही दिसलेच होते. बहुतेक जण जुन्या आठवणींतच रमले होते.
जुलै महिन्यात दोन परदेशस्थ शाळासोबती आल्याने त्यांच्यासाठी पुन्हा एक मिनि रियुनियन झाले.

मस्त. मला अजूनही तो २८ नंबरचा वर्ग सर्वात जास्त आवडतो. त्या खालो खाल १७ नंबर. आमच्या १९८० बॅचचे सर्व फेसबुक वर आहेत. डिसेंबरात भेटायचा प्लॅन आहे.

अमा नमस्कार ! असा वर्ग क्रमांक वगैरे आठवणार्‍यांबद्दल मला फार आदर वाटतो. मला हे असले काही म्हणजे काहीही आठवत नाही. पाचवीचा वर्ग मात्र, वर्गातून टिळक तलाव दिसायचा म्हणून आठवतोय Happy

मस्त एकदम! जुन्या आठवणी जागृत झाल्या...टिळक तलाव, शाळेतली ती विवेकानंद आणि ज्ञानेश्वरांची सुंदर भित्तीचित्रे, पहिल्या मजल्यावरचे ते लांबुळके वर्ग, चौथ्या मजल्यावरच्या हॉलमधली चित्रे (बहुतेक चित्रकलेच्या शिक्षकांनी काढलेली)...:)

ह्या उहाळ्याच्या सुट्टीत ४ जुलै च्या विकेंडला १९९० च्या बॅचचं रियुनियन फार फार दणक्यात झालं. मला जाता आलं नाही ह्याची फार रुखरुख लागली सगळे फोटो आणि व्हिडिओज पाहून.
१ ओवरनाइट ट्रिप, डिनर , मित्र मैत्रिणींनीच दिलेली लाइव एंटरटेनमेंट, आणी शाळेतच झालेलं गॅदरिंग तेही शिक्षकांना बोलावून, ..

त्यासाठी खूप सार्‍या मित्र-मैत्रिणींनी खूप मेहनत घेतलेली मात्र.

शुम्पी, रीअली? मी पण अगदी हेच लिहायला आले होते? मी पण १९९० बॅच आणि जाता आल नव्हत रीयुनियन ला? पण आता डिसेंबरात भेटायचा प्लॅन आहे.
बेफि.... रम्य त्या आठवणी...........

शूम्पे, तू अभिनवला नव्हतीसच का कधी?

चीकू, शूम्पी, आभा - धन्यवाद!

माबो-गरवारे-गटगच व्हायला पाहिजेल बहुतेक Proud

मस्त लिहीलंय Happy

आमचं ९२ च्या बॅचचं ह्यावेळी जुलैत न ठरवता बर्‍यापैकी मोठं गटग झालं. आम्ही खूप जणी त्या सुमारास पुण्यात होतो. २५ जणी भेटलो. समुद्रमध्ये. त्यानी वरच्या हॉलमधली जागा दिली. शेजारच्या टेबलावरची ४ जणं ५ मिनीटात "अशक्य आहे इथे बसणं" असं पुणेरी वाक्य आम्हाला ऐकू जाईल ह्याची खात्री करत म्हणत उठुन गेली. मजा आली खूप.
ह्या आधीपण भेटलो होतो, ५ वर्षापूर्वी, १६ जणी.

२ वर्षापूर्वी ९२ च्या मुला-मुलींचं गटग झालं होतं शाळेतच. त्यावेळेस नव्हते मी पुण्यात. गरवारे हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे Happy

केजी ते ४थी अभिनव आणी ५वीत गरवारेला घालायची पद्धत होती त्याकाळी>>>
आमच्या वेळी केजी ते चौथी - बाल शिक्षण मंदीर, भांडारकर रोड आणि नंतर गरवारे..
गरवारे पेक्षा काकणभर जास्त सॉफ्ट कॉर्नर अजूनही बाल शिक्षण बाबत आहे Happy

अप्रतिम लिहिलय. सगळ्या भावना अगदी तशाच व्यक्त झाल्यात. आमचाही अनुभव अगदी अगदी हाच होता. फक्त शाळेचं नाव वेगळं..
फक्त नेमकं मनात काय चाललय, एवढं भारलेपण कसल आहे हे ओळखताच आलं नव्हतं तेंव्हा. ते काम आज तुम्ही केलत.
त्या भेटीच्या वेळेच्या आमच्याच भावनांची इथे नव्याने ओळख करून दिल्याबद्दल आपला शतशः ऋणी आहे.
_/\_

सर्वांचे मनापासून आभार!

>>>केजी ते ४थी अभिनव आणी ५वीत गरवारेला घालायची पद्धत होती त्याकाळी<<<

तेच म्हंटलं मी शूम्पी! माझेही तसेच!

बस्के, अभिनवचेही रियुनियन जोरदार झाले आणि आता व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर सगळे टचमध्ये आहेत.