अविश्वसनीय लडाख ! .... भाग ३

Submitted by सव्यसाची on 19 September, 2015 - 08:14

अधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)

पंगोंग सरोवर, जे प्रत्येक लडाख इछूकाला पहायचेच असते, ते आज गाठायचे होते. गेले २ दिवस आम्ही रोज २२० किलोमीटर केले होते. आज अंतर २०० पेक्षा कमी होते. त्यामूळे जरा आरामात निघणे झाले. सकाळी नेहमीप्रमाणे अतुलची टूथपेस्ट हरवली होती. काल रात्री त्याने आल्या आल्या ब्रश केले होते. मग नेहमीप्रमाणे पेस्ट कुठेतरी आठवणीने ठेऊन दिली. आणि ब्रश मात्र दुसरीकडे. सकाळी ब्रश मिळाला पण पेस्ट जी गायब झाली ती परत कधीच मिळाली नाही. आणि घरी रोज जे करतो तसच इथेही करत रहायच या अट्टाहासामूळे तो आज पण सकाळी सकाळी ओरडत होता माझी पेस्ट हरवली. त्याला म्हटल अरे मग नुसता ब्रश मार आजचा दिवस. शेवटी अक्षय उठला तेंव्हा त्याच्याकडची पेस्ट बाहेर काढण्यात आली. मग पूढे तीच सगळे दिवस वापरली गेली. आजच्या अतुलच्या शोधाशोधीचा एक चित्रण पण केले आहे. नाश्ट्याला गेलो तर चक्क सिरिअल्स ! बास, आता काही भिती नाही काय खायचे त्याची. आडवा हात मारला अगदी. मी जेवढे सिरिअल्स घेतले ते बघून त्या हॉटेलवाल्याचे डोळे पांढरे झाले असतील. मग, उगाच नाही मला सिरिअल किलर म्हणायचे पुर्वी Happy वर मस्त दूधही प्यायलो. आज खऱ्या अर्थाने नाष्टा झाला. आज ऊंचीमधे दुसऱ्या क्रमांकाचा चांग ला चढायचा असल्याने थंडी खूप असेल, पाऊस पडेल अस सांगितल होत. त्यामूळे मी आज हिवाळी जाकीट न घालता पावसाळी सूट घातला होता. तोच जो मी मुंबई मधे पावसाळ्यात घालतो तो. पायात मोज्यांवर प्लास्टीकच्या पिशव्या चढवल्या होत्या. त्यावर बूट. ही तयारी काही फार चांगली नव्हती त्यामूळे धाकधूक वाटत होती. आता आजपासून अतुलच्या बरोबरच आणि शक्यतो मागेच रहायचे असे ठरवले होते. कारण तो जरा हळू चालवायचा आणि मग मागे पडायचा. शिवाय तो थोडा थकतही होता. त्यामूळे आम्हा दोघांच्या मधे त्याला ठेवायचे अस ठरवल होत. पण अतुलच्या फोटोसाठी थांबायच्या सातत्याने रायडिंगमधे सातत्य रहात नव्हते. मग त्याला अधून मधून चल चल अशी घाई करायला सुरवात केली. आणि अतुल फोटोसाठी थांबणार म्हणजे मोठा सोपस्कार असायचा. गाडी बाजूला घ्या, २ २ हातमोजे काढा, हेल्मेट काढा, गॉगल काढा, कानटोपी काढा, खोगीरातून कमेरा काढा, मग या कोनातून त्या कोनातून फोटो, त्यात आपण आलोच पाहीजे, झालच तर गाडी पण पाहीजे. मग परत सगळ उलट्या क्रमाने करा. त्यातही तो काढलेले हातमोजे, कानटोपी हरवून दाखवायचा. आणि त्याला का कोण जाणे, पण हातमोजा काही पटकन चढवता यायचा नाही. एक एक बोट मोजून घालाव लागायच मोज्यात. फारच धमाल !

अक्षयही त्याला अधून मधून जोरदार साथ द्यायचा. त्याच वेड एकच, गाडीचा फोटो पाहीजे जिथे तिथे, आणि त्यात नंबर प्लेट दिसली पाहीजे. काय विचारू नका. शिवाय निसर्गाच्या हाकेचे आणि पाणी पिण्याचे थांबे वेगळे होतेच. अशी मजल दर मजल चालू होती. कधी कधी तर आमची दुरूस्तिची गाडी पूढे निघून जायची. अर्थात त्याबरोबर दुरूस्ती करणारा पण जायचा. म्हणजे आम्ही उघड्यावरच ना. मी पण माझ्या मोबाईल मधून फोटो काढायचो. पण त्यासाठी मला फक्त हातमोजे काढून भागत असे. अतुलकडे शिवाय चित्रिकरणाचा कमेरा पण होता बाईकला लावलेला. तो पण खटाटोप असायचा. अर्थात, त्या फोटोंचा उपयोग आहेच शेवटी स्मृती म्हणून. आणि त्याचा कमेरा चांगला होता. चित्रणाचा मात्र थोडा लोच्या झाला. कमेरा आडवा लावल्याने उभे चित्रीत झाले. जेंव्हा कमेरा मागच्याने हातात धरून चित्रण केले तेंव्हा ते नीट आडवे आले. आता ते उभे चित्रण नव्वद अंशात फ़िरवले आहे पण तरी चित्रण उभच दिसणार ना. फोटो मात्र मस्त आलेत. आधी अजयचा पण चांगला कमेरा असणार होता बरोबर, पण अजयच आमच्या बरोबर चालवत नसल्याने त्याच्या फोटोत आम्ही फारसे नाही.

अतुलचे चालवणे हा एक मोठा गमतीचा विषय होता. चांगल्या, मोठ्या, बिन घाटाच्या रस्त्यावर तो हळू हळू चालवत असे. आणि मधेच घाटात अंध वळणांवर चूकीच्या बाजूने जोरात जाई. किंवा गरज नसताना मधेच पूढे निघून जाईल. अक्षय तर फ़िदा होता त्याच्या अशा चालवण्यावर. बाकी अक्षयने जरा इतरांसारखे जोरात पूढे निघून जावे अस वाटूनही कधीच तसे केले नाही. नेहमी आमच्या बरोबर राहीला. फक्त एकदाच त्याने स्वत: घालून घेतलेला हा नियम मोडला तो सरचूला जाताना. ते येईलच पूढे.

आज जाताना कारूला पंगोंगकडे वळलो आणि रस्त्याला दुतर्फ़ा लडाखी लोकच लोक. सगळे नीट सजलेले आणि हातात फ़ुल घेऊन उभे. अगदी सुरवातीला वाटल रोजच असे उभे रहतात की काय पंगोंगला जाणाऱ्या लोकांना शुभेच्छा म्हणून. अर्थात अस वाटण हा मूर्खपणाच. मग वाटल उद्या तो हेमिस उत्सव आहे म्हणून हे काही आहे का. पण हा रस्ता हेमिसकडे जात नाही. मग कळल की लडाखी धर्मगुरूंची सभा की तत्सम काहितरी आहे आज. म्हणून त्यांच्या स्वागताला ही गर्दी. फारच सुंदर दृश्य होते. पावसाळी हवा होती. थोडा थोडा पाऊस आणि थोडे बर्फ पण पडत होते. लहान लहान एकदम गोजिरवाणी शाळेतली मुल मस्त दिसत होती. त्याच थोड चित्रण आहे अतुलने केलेल. फोटो काही काढता आले नाहीत कारण रहदारी प्रचंड आणि पाऊस. खूप वजनदार व्यक्ती पण येत होत्या हे पजेरो, लेक्सस, बिएमडब्ल्यू गाड्यांवरून कळत होते. पण रहदारी नियोजन उत्तम असल्याने कुठे अडकलो असे नाही. थोड्याच वेळात ती गर्दी उजवीकडे वळली आणि आम्ही सरळ पूढे. इथे लडाखमधे बाईकवरून जाताना रस्त्याच्या बाजूला असलेली लहान मुले आपल्याकडे हात आडवा करून उभी रहातात. अस जर कोणी दिसल तर आपणही त्यांना चालवता चालवताच हात लांब करून टाळी द्यायची असते. मग ते खूष होतात आणि मस्त हसतात. आजही तेच चालू होत बराच वेळ. आता घाट सुरू झाला. एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. तिथे एक दोन संघ चांगलावरून आले होते जिथे आम्ही चाललो होतो. ते म्हणाले आम्ही परत अलोत न जाता कारण वरती तूफान बर्फ पडतोय, १०० २०० गाड्या अडकल्या आहेत. हे ऐकल्यावर मग नुसता गोंधळ. तास दिड तास तिथेच होतो. आमच्यातल्या दोन स्वारांना पूढे पाठवल होत ते काही अजून परत आले नव्हते. निलेश म्हणाला बाईक्स इथेच ठेऊ आणि टेंपो बोलवू. त्यात बसून जाऊ. कारण टेंपोवाल्यांकडे स्नो चेन्स असतात. आणि ते इथलेच चालक असल्याने आपल्याला पंगोंगला नक्की पोचवतील. पण काही लोकांना बाईकनेच प्रयत्न करावा असे वाटत होते. शेवटी हो नाही करता करता बाईक्स घेऊनच निघालो. दरम्यान इथल्या एका दुकानातून अक्षयने गमबूट विकत घेतले. मी रबराचे हातमोजे आतून घालायला. अतुलने पण दुसऱ्या प्रकारचे हातमोजे घेतले. त्याने ठाण्याहून अगदी पातळ पांढरे हातमोजे पण आणले होते जे हॉटेलमधील वेटर लोक घालतात. माझ्या प्रो बाईकरच्या पातळ हातमोज्यांचा आजपासून काही उपयोग नव्हता. मग माझे जूने कातडी हिवाळी मोजे चढवले ते शेवटच्या दिवसापर्यंत तेच वापरले.

आता चांगला शिखर १२ किलोमीटर राहीले असताना एक सैनिकी ठिकाण आले. तिथे १५ २० माणसे होती पुण्याची जी बाईकने वरून आली होती. जय महाराष्ट्र झाले. ते पण म्हणाले वर जाऊ नका. आम्ही भीषण बर्फाच्या वादळातून आलो आहोत. हेल्मेटच्या काचेवर दर ५ सेकंदाला बोटभर बर्फ साचतो. तो काढत काढतच बाईक चालवायची. त्यात साताठ वेळा घसरून पडलो. शेवटी गाडितील हवा काढून टाकली जेणेकरून जास्त पकड मिळेल. मग आत्ता खाली पोचलो. त्यांनी आमच्या समोरच पायपंपाने हवा भरली त्यांच्या गाड्यांमधे. परत खल चालू झाला. इथे पण २ तास गेले. पण आता आमच्यातले अजून काही लोक न थांबताच पूढे निघून गेले होते मगाशीच. ते परत आले नव्हते. तेंव्हा ठरवले चला जाऊ. मग निघालो. तर थोडासा बर्फ, थोडासा पाऊस, थोड्याश्या गारा, भरपूर धुक अस सगळ अनुभवत सुखरूप वर पोचलो. हवामान म्हटलं तर वाईट होत म्हटलं तर फार सुंदर होत. मला तरी खूप मजा आली. त्रासदायक नव्हत. हवामान किती पटकन बदलते इथले त्याचा प्रत्यय आला. सकाळी अशक्य अशी स्थिति आणि सुमारे ४ तासात एकदम ठीक. रस्ता अगदीच खडकाळ होता ते १२ किलोमीटर. पण पोचलो निट. निघताना अतुलला आता या १२ किलोमीटरमधे फोटोसाठी अजिबात थांबू नको अस बजावल होत. सलग राइड कर कारण उशीर झाला आहे, परत हवामान बिघडायच्या आत पूढे पोचल पाहीजे. तरी तो त्यामधेही २ वेळा थांबला. मग भरपूर शिव्या दिल्या त्याला. मग थांबला नाही वरपर्यंत. वर पोचलो तर सगळीकडे बर्फच बर्फ. एकदम पांढर शुभ्र. आणि अजय वगैरे लोक तिथे बर्फात खेळत होते. तूफान थंडी होती. फोटो काढले. थोडे खेळलो. मग अजून बराच पल्ला गठायचा असल्याने निघालो. आता पलिकडे १० १२ किलोमीटर गेल्यावर एका टपरीवर अगदी अमृततुल्य चहा मिळाला. काय बर वाटलय. झाडून सगळे इथे थांबले. आज बहूतेक जेवण केलच नाही आम्ही. इथेच बिस्किटे बुडवून खाल्ली आणि निघालो. इथे एक गोठलेले तळे होते. नाव विसरलो पण बहूतेक चगर नाव असावे. पूढे एक भला मोठा सैनिकी तळ दिसला. इथे काही लोक जेवले काही चहा. मी नेलेला प्रोटीन बार खाल्ला. मग अंधार पडता पडता पंगोंगला पोचलो. इथे तूफान थंडी होती. रात्रीतर बहूतेक शून्याच्या खाली तापमान असावे. थोडा प्रकाश होता तेवढ्यात तळ्यावर जाऊन फोटो काढले. अतुल पण आला. आज अक्षयला बरे वाटत नव्हते. डोके दुखत होते. खूप ऊंचावरील प्राणवायूच्या कमतरतेने येणारे आजारपण. मला ते कारगिलला झाले होते. आमची सोय आज एका लाकडी झोपडीत होती. तिथे एकूण ७ जण झोपणार होतो ट्रेकला जसे बाजूबाजूला झोपतो तसे. तिथे अक्षय झोपून गेला. आम्ही अंधार पडल्यावर येऊन त्याला घेऊन बाजूच्याच झोपडीत जेवायला गेलो. परत एकदा मस्त थुक्पा आणि मोमो. तिथे एक किडकिडीत कोलेजमधला मुलगा एक भली मोठी खोळ घेऊन शिरला. हा महाभाग इंडोनेशियाचा होता. वेरावळ इथे शिकत होता. तो काल लेहमधून नुब्राला गेला होता आणि आज टुर्टूक करून खतरनाक वारिला मार्गे पंगोंगला आला होता. एकटाच फिरत होता आणि तंबू ठोकून रहायचा. त्याच सगळ सामान त्या एका खोळीमधे होत. हिरोची इम्पल्स बाईक, तंबू सगळ भाड्याने घेतलेल होत. एक नकाशा घेऊन फिरत होता. आता जाऊन तंबू लावणार. उद्या मोरिरी सरोवर करणार आणि परवा लेह. कहर आहे. नुब्राला जाताना पडला आणि गाडी बंद पडली, मग सैनिकांनी कशी मदत केली वगैरे सांगितल. हे मात्र खरय तिथे. जाणारे येणारे सगळेच लोक, प्रवासी असोत की सैनिक की लडाखी, मदत करणारच. फारच चांगली आणि गरजेची गोष्ट त्या वैराण प्रदेशात. अरे हो, ते सांगायचच राहील. श्रिनगरला सगळीकडे हिरवेगार पर्वत, वर हिमाच्छादीत असे. आणि ते सोडल्यापासून सोनमर्गपासून वैराण उघडे बोडके पर्वत, वर हिमाच्छादीत. आणि दर दिवशी त्यांच्या रंगात फरक पडत होता. कारगिल पर्यंत गढूळ पांढरे मातकट. मग लेह पर्यंत तपकिरी. आज आणखी वेगळा गर्द तपकिरी, अधून मधून हिरवे पर्वत. एक गोष्ट मात्र सारखीच, सगळे हिमाच्छादीत. असो. आत्ता आपण झोपायला जावे हे बरे. फारच थंडी वाजते आहे, इतकी की दात कडकड वाजत आहेत. निलेश, आमचा नेता, त्याला कारगिलला आल्यापासून उलट्या, डोकेदुखी अस होत होत. आज ते जास्तच वाढल होत. उद्या सकाळी बघू असे त्यांनी ठरवले होते. आम्ही होते ते सगळे कपडे अंगावर चढवून, पायात, हातात मोजे चढवून झोपलो. वर २ जाड रजया होत्या. मस्त झोप लागली.

अधिक आषाढ शुद्ध नवमी (२६ जून)

सूर्योदय साडेपाचला होतो असे हॉटेलवाल्याने सांगितले होते. त्यामूळे सव्वापाचच्या गजरावर महत्प्रयासाने उठलो. बाहेर पाण्यापाशी जाऊन बसलो तर एक गुबगुबीत कुत्रा भयंकर लाडात येऊन मस्ती करायला लागला. इथले कुत्रे खूपच केसाळ असतात. त्याच्याशी ५ मिनिटे खेळलो मग त्याला दुसर गिऱ्हाईक मिळाल. लवकरच सूर्योदय झाला. मला आधी वाटले होते की सूर्य मस्तपैकी दोन पर्वतांच्या खिंडितून पाण्यातून उगवेल. पण तो समोरच्या भल्या ऊंच पर्वतांवरून उगवला. त्यामूळे आधीच त्याचा प्रकाश कोवळा राहीला नव्हता. तो आला तो आगच ओकू लागला. त्यामूळे झटपट फोटो काढून झोपडीत येऊन ताणून दिली. सूर्योदयाच्या नयनरम्य कल्पनेचा विचका झाला. नंतर परत उठलो तेंव्हा पाण्याकडे जाऊन त्या मस्त निळ्या पाण्याचे फोटो काढले. मग थोडा नाष्टा. तेवढ्यात निलेश येताना दिसला. त्याला सकाळीच सैनिकी रुग्णालयात नेऊन प्राणवायू लाऊन आता परत आणत होते. मग काल अजून २ ३ जणांना फार त्रास झाला अस ऐकल. बरय अक्षयला तेवढा त्रास नाही झाला. तो आज सकाळी उठला तेंव्हा मजेत होता. पण अतुलला बर वाटत नव्हता थोड. त्यामूळे त्याने सांगून ठेवले होते की आज नक्की माझ्याबरोबर रहा. अतुल शाकाहारी असल्याने त्याने हॉटेलवाल्याला टोमटो ऑमलेटची ओर्डर दिली होती, बजाऊन की अंडे, चिकन काही घालू नकोस. आणि हा प्राणी कुठेतरी नेहमीप्रमाणे निघून गेला. इकडे त्या हॉटेलवाल्याने ३ प्लेट्स माझ्यासमोर आणून ठेवल्या आणि विचारले कुठे गेले. ती ऑमलेट थंड होऊन गेली. मग हे महाशय कुठूनतरी उगवले. मग ओरडत सुटले की अरे यात अंडे घातलेले आहे. मग ते परत करा दुसरे काहितरी मागवा यात तो गुंतला.

मग मी अक्षय आणि स्वप्नीलने तळ्याच्या बाजूबाजूने थोडे पूढे जाऊन याचे ठरवले. अतुल तिकडेच जाऊन आला होता बहूतेक. आम्ही स्पांगमीकला रहात होतो तळ्याच्या अगदी सुरवातीलाच. तिथून पूढे गेलो खिंडिच्या दिशेला आणि भला मोठा जलाशय समोर आला. एकदम निळशार पाणी, शांत, नितळ. अफलातून दृश्य. रस्ता बाजूच्या डोंगरावर चढत होता म्हणून आम्ही खाली जाणाऱ्या रस्त्याने तळ्याकाठी उतरलो. फोटो वगैरे काढले. इथून आम्हाला थ्री इडियटची जागा दिसत होती पण ती बरीच पूढे होती. एवढा वेळ नव्हता आणि इच्छा तर नक्कीच नव्हती. त्यात काय बघायच आहे? तर मागे वळलो. झोपडीपाशी आलो तर अतुलची बाईक गायब. तो हमखास कुठेतरी गायब होणार नेहमी. मग कळले की तो पूढे निघून गेलाय. इतके वैतागलो त्याच्यावर. स्वत:च सांगितले होते की बरोबर रहा. मग आम्ही पण निघालो. हा प्राणी काही आम्हाला बराच वेळ दिसला नाही. कालच्याच ठिकाणी, त्या चगर तळ्याशी चहा घेतला. पण आजचा चहा अगदीच सपक होता. काल इथेच अम्रुततुल्य मिळाला होता यावर विश्वास बसेना. असो. पूढे निघालो. चांगलाच्या शिखरावर आलो. परत एकदा थोडी मजा केली. आज सकाळपासूनच एकदम लख्ख ऊन होते आणि अगदी वर देखील पाऊस, बर्फ काहिही पडत नव्हत. एकदम मस्त हवामान. काल थोड चिंतेतच होतो की उद्या पण असच असेल तर पंगोंगचे फोटो पण नीट येणार नाहीत. पण आज नशीब जोरावर होते. तर शिखरावर देखील अतुल नव्हता. विचारपूस केली असता तिथे आधी आलेले लोक म्हणाले त्यांना पण अतुल दिसलेला नाही. कोणी म्हणाले तो मागेच आहे. सगळा गोंधळ. मग खाली उतरायला सुरवात केली. त्या १२ किलोमीटर वाईट रस्त्यावर ५, ६ किलोमीटर गेल्यावर समोर एक बुलेट दिसली. त्याला मागे पांढरा शुभ्र पेट्रोल डबा होता रिकामा. निधीने तर आरोळीच ठोकली, अरे देखो अतुल सर !

सापडले एकदाचे अतुल महाराज! मग त्याला चांगलाच झापला आम्ही. तू बोलतो काय करतो काय. तर म्हणे मी सांगून निघालो होतो अजयला पूढे जातोय. पण आमचा प्रश्न एकटा निघालासच का बर वाटत नव्हत तर. वर म्हणतो मला वर शिखरावर आणखीनच बर वाटत नव्हत. उलटी सारख वाटत होत, की झालीच अस काहितरी. म्हटल धन्य आहेस. आता गायब होऊ नकोस. मग परत काल जिथे पहिल्या चहाला थांबलो होतो तिथे पोचलो. तिथे लोक परत त्या दुकानातून काहिबाही विकत घ्यायला थांबली. मी आणि अतुल कालच्याच टपरीवर जाऊन थुक्पा घेतला. आणि बरेच भाजलेले पाव मागवून त्या सूपात बुडवून खाल्ले. आता अतुलला जरा बरे वाटू लागले. मग तो तिथेच एक चौथरा होता झोपण्यापुरेसा त्यावर झोपून गेला. थोड्यावेळाने तो उठल्यावर आम्ही अक्षयला सांगितले की आम्ही पूढे जातो हळू हळू. कुठे थांबणार नाही. पण खाली येईस्तो त्याला बरीच हुशारी वाटत असल्याने शिआ महाल बघायचे ठरवले. अगदी वाटेवरच होता. तिथे फार काहीच नव्हते पण वरून खालचे गाव फारच मस्त दिसत होते. आता जे निघालो ते सरळ हॉटेलवरच आलो. ४ मोठे लांब पल्ल्याचे दिवस पार पडले होते. उद्याचा दिवस आरामाचा होता लेह मधे. आज दोनच खोल्या पलिकडच्या हॉटेलमधे दिल्या गेल्या होत्या. काल आम्ही ऑस्पिशिअस हॉटेलमधे होतो आज आम्ही पंगोंग हॉटेलमधे. आजची खोली जास्त चांगली होती. चला आता उद्या तो रोजचा कर्यक्रम करावा लागणार नव्हता. खोळीत सामान भरा आणि खोली सोडून द्या, दुरूस्ती वाहनात खोळी टाका. उद्या आराम ! हेमिस उत्सवाला जाण्यात काही अर्थ नाही असे आम्ही नेट वरून काढले होते. पण आता अनायसे त्याच दिवसांमधे इथे आलो आहोत तर जाऊन टाकू अस ठरवल. अजय मात्र येणार नव्हता. तो हॉटेलवरच थांबणार होता. आता मी आणि अक्षय बाजारात जाऊन आलो. काल पंगोंगला जाताना माझे बूट भिजले होते थोडेसे आणि मला ते पूर्ण भिजले तर त्या बर्फाच्या थंड पाण्याने काय होईल याची कल्पना आली होती. त्यामूळे मी गमबूट विकत घेतले. तसही गरज पडली तर तिकडे घेऊ गमबूट अस मी ठरवलच होत ठाण्यातच. आता ते प्लास्टीकच्या पिशव्या चढवण नाही.

परवा कारगिलहून निघाल्यावर माझी पावसाळी विजार मागून पूर्ण फाटली होती. ती पण मिळते का पहात होतो. पण ८०० च्या खाली ती साधी विजार नाही म्हटल्यावर मी घेतली नाही. म्हटल वापरू तशीच. गमबूट मात्र ३५० रुपयात चांगले मिळाले. अतुल नेहमीप्रमाणे कुठेतरी गायब झाला होता त्यामूळे तो आमच्या बरोबर नव्हता आत्ता. मस्त क्षीण घालवणारा बाजारातील फेर फटका केला आणि हॉटेलवर आलो. तोपर्यंत खाली घालायची गादी आली होती खोलीत. रोज ३ माणसे एका खोलीत अशी सोय असल्याने एक गादी अतिरीक्त मागवायला लागायची. आणि आलटून पालटून खाली झोपण्याचा क्रम ठरलेला होता. मग अक्षय आणि अतुलची त्या गादीवर नेहमीची लठ्ठालठ्ठी सुरू झाली. हा त्यांचा आवडता उद्योग ५ मिनिटे चालत असे. अतुलची अजून एक गंमत म्हणजे अर्ध्या तासापूर्वी तो एकदम आता मेलोच अशा अवस्थेत असेल, किंवा तसे भासवेल, आणि आता एकदम टुणटुणीत होऊन मारामारी. दरम्यान आमच्या अंघोळी झाल्या. कहर म्हणजे अतुल महाराजांनी चक्क थर्मल्स धूतले. म्हटल अरे एक दोनदाच तर वापरलेस ना? आणि नाही वाळले तर? पण उद्या सुट्टीच होती त्यामूळे वाळले असते असा विचार. जेवण मात्र कालच्याच हॉटेलमधे होते त्यामूळे तिकडे गेलो. येताना अतुलला स्वागतकक्षात सांगितले गेले की खोली फक्त आजच्या पूरतीच आहे. लगेच निलेशशी बोललो. तो म्हणाला बघतो शक्यतो तीच खोली ठेवायचा प्रयत्न करतो. इथे वायफाय उत्तम होते. त्यामूळे स्प्लिटवाईज घेता आले. आत्त्तापर्यंतच्या सगळ्या कागदावरच्या नोंदी त्यात करून टाकल्या. चला, आता आकडेवारी करायला नको. आता हिशोब सोपा झाला. श्रिनगर सोडल्यापासून मला वोडाफोनला संपर्क नव्हता. फक्त प्रत्येक हॉटेलमधे कायम वायफाय होते. पण आजच फक्त यशस्वी झालो. बाकिचे हिशोबाकडे बघतच नव्हते. माझ्यावर टाकून मोकळे झाले होते.

अधिक आषाढ शुद्ध दशमी (२७ जून)

सकाळी आवरून समोर गेलो तर तेंव्हा पण खोली १० पर्यंत खाली करा अस सांगितल गेल. निलेशला विचारल. तर तो म्हणाला हो खाली करावी लागणार आहे. मग परत जाऊन खोळ भरली. आता अतुलच्या थर्मल्सची पंचाईत झाली. ते कसे वाळणार? सध्या तरी ते प्लास्टीक पिशवीत भरून ठेवले त्याने. आणि खोळीला अडकवली ती पिशवी. खोळ तिथेच ठेवली खोलीत. येऊन नाष्टा केला. आज आम्ही तिघेही बाईक काढायला तयार नव्हतो. त्यामूळे आधीच आम्ही दुरूस्ती वाहनात बसून जाणार असे ठरले होते. त्या प्रमाणे त्यात बसलो व हेमिस कडे कूच केले. हेमिस उत्सव १० ला सुरू होतो, तेंव्हा बसायची जागा पकडायला ९ वाजताच तिथे पोचा नाहीतर हालत खराब होते वगैरे ऐकून होतो. त्यामूळे आज परत पहाटेच उठून साडेआठला हॉटेल सोडले होते. रस्ता एका नदीच्या काठाकाठाने जात होता. अतुलने सहज विचारले तर चालक म्हणाला सिंधू नदी आहे. परवा त्याचे संगमावर येणे राहून गेले होते. त्यामूळे आज त्याने परतताना तिथे थांबव थोडा वेळ असे बजाऊन ठेवले त्या चालकाला. मी झोप काढायचा प्रयत्न करत होतो. पण येत नव्हती. त्यात अतुल आजच्या ठाण्यातील धंद्याचा काहितरी घोळ झाला असल्याने सगळा वेळ फोनवर बोलत होता. मग वाहनात लावलेली गाणी ऐकत बसलो. तर काय आश्चर्य, काही मस्त हिंदी गाणी लागली. आणि ती ३, ४ झाल्यावर चक्क हॉटेल कलिफोर्निआ ! कहरच झाला. मस्त धमाल आली. झोप पार पळाली. मी आणि अक्षयने घसा साफ करून घेतला पुढच्या ३, ४ गाण्यांबरोबर.

आता समोर टेकडीवर हेमिस दिसू लागले. सिंधू ओलांडून टेकडी चढली. ३ किलोमीटरवर गुंफा राहिली असताना तिथल्या रक्षकांनी गाडी अडवली आणि आता पायी जा सांगितले. वर ऊन वाढले होते. इथे दिवसा सावली नसेल तर ऊन फार लागते. अगदी घाम येतो. सावलीत मात्र हवा खरी थंड असल्याने त्रास होत नाही. तर आता आली का पंचाईत. सिंधू नंतर वाटेत ४ ५ लडाखी भिख्खूंना गाडीत घेतले होते. ते लगेच चालू पडले. आम्ही जरा हुज्जत घालत होतो बाकिच्या गाड्या जाताहेत मग आम्ही का नाही. तर म्हणे ५ आसनी आणि लहान, अशा गाड्यांना परवानगी आहे. आमची १६ आसनी बस होती. आमची तर त्या ऊन्हातून चालत जायची तयारी नव्हती. पण आमची प्रवासी बसमधील मंडळी पण तिथून चालत गेली होती असे दिसत होते. तेवढ्यात आमचे २ दुचाकीस्वार आले. चला, एका मागे अतुल आणि एका मागे मी आणि अक्षय असे वर पोचलो. वर पोचेस्तो आधीच ठरल्या वेळेपेक्षा उशीर झाला होता. म्हणून आम्ही झटपट तिकिट काढायला गेलो तर इकडे अतुल गायब. तो लगेच खरेदीच्या मागे लागला होता. मग मी आणि अक्षय तिकिट काढून आत गेलो. तिथे आमची प्रवासी मंडळी बसलेली होती जागा धरून. त्यात आम्हालाही जागा होती. बसलो आणि २ मिनिटातच कशाला आलो अस वाटू लागल. वरून सूर्य आग ओकत होता. मग चक्क नेलेले टोपीवाले जाकीट घालून बसलो. त्यात वेगळी टोपी पण अडकवली. तरी पायाला भाजत होते. आणि १० वाजले होते तरी कुठेच काहिही तयारी दिसत नव्हती. तासभर अस शिजल्यावर शेवटी ११ वाजता आता निघून जाऊ म्हणून उठलो तर ५ मिनिटात पहिला नाच सुरू होत आहे अशी घोषणा झाली. मग परत बसलो. नाच कसले, भगवान दादा जसे हळू हळू हालचाली करत नाचल्यासारखे करायचे, तसा प्रकार ते लोक करत होते. अगदीच पाच पैशे प्रकार ! तरी आलोच आहोत आणि आता सुरूच झाला आहे उत्सव, म्हणून ४ नाच बघितले. मग आम्ही तिथून सटकलो. खरतर हा उत्सव आपल्यासाठी नसतोच. तो त्या भिख्खूंनी भिख्खूंसाठी केलेला उत्सव असतो. मुद्दाम बाहेरील प्रेक्षकांसाठी काही वेगळे नाच बसवलेले नसतात. त्यामूळे ते यथातथाच असणार हे आपण गृहीत धरायला पाहीजे. अनेक फिरंग्यांनी ४०० ५०० ची महागडी तिकिटे घेऊन मोठे मोठे कमेरे घेऊन फिल्डिंग लावली होती. त्यांच्या पण चेहेऱ्यावर भ्रमनिरास दिसत होता. आणि हेही दिसले की उगाच आधीपासून जायची काहीच गरज नाही. अगदी आयत्यावेळेला, जेंव्हा नाच सुरू होतात, तेंव्हा आत शिरावे, आणि अगदी जवळून उभ्यानेच नाच बघावे. एकदम सोपे आहे. असो.

बाहेर आलो तर आमचा चालक शोधण्यात थोडा वेळ गेला. तेवढ्यात अतुलने खरेदी केली. मग तो भूक लागली अस ओरडू लागला. त्याला एकदा भूक लागली की दम निघत नाही. म्हटल ते मोमो विकत आहेत खा. तिथे गेलो तर मोमो संपले होते. फक्त थुक्पा होता. मग त्याने विचार सोडला. आता ३ किलोमीटर खाली चालून गाडी गाठली आणि निघालो. वाटेत सिंधूवरील पुलापाशी थांबलो. अतुलने जाऊन पाणी पिणे आणि भरणे असे काम केले आणि तोपण पावन झाला. आता तडक हॉटेल गाठले. सगळी सकाळ जवळपास वाया गेल्यात जमा होती. त्या फालतू हेमिसला न जाता आराम केला असता जो अतिशय गरजेचा होता. अजय शहाणा निघाला. खरतर आमची माझ्या घरी बैठक झाली होती तेंव्हा मीच, तिथे जायची कशी गरज नाही हे त्याला सांगितले होते. पण विनाशकाले विपरीत बुद्धी ! आता काय करणार म्हणा. तर आलो आणि पहिल्यांदा खोली ताब्यात घेऊन अतुलने त्याचे थर्मल्स वाळत टाकले. सकाळपासून त्याला त्याचीच चिंता होती. मग लगेच सैनिकी संग्रहालय बघायला पळालो कारण ते ५ वाजता बंद होते. अजय आत्ता सैनिकी क्षुधागृहात होता. १५ मिनिटात संग्रहालयात गेलो. पहिल्याच दालनात मोठी प्रतिकृती आहे लेह आणि परिसराची. अगदी पार पाकव्याप्त काश्मीरपासून ते मनाली पर्यंतची. त्याची माहिती एक सैनिक देत होता ते ऐकत होतो. ती संपता संपता एक पोरसवदा मुलगा, असेल १२ १४ वर्षांचा, माझ्यासमोर एकदम ऊर्ध्व लाऊन खाली पडला धप्प आवाज करून. त्याच्या वडिलांनी लगेच त्याला उचलला आणि सैनिकानी बाहेर नेला मोकळ्या हवेत. त्याला प्राणवायू कमी पडला होता. मग आम्ही इतर दालने हिंडू लागलो. हे संग्रहालय फार फार अप्रतीम आहे. बघायला अजिबात विसरू नका. हेमिस चे पाप पूर्णपणे धूतले गेले इथे. त्यात एका फोटोवर आम्ही बोलत होतो की कसे खतरनाक रहातात, काय काय गोष्टी करतात ज्याचा आपण विचारच करू शकत नाही, तर एका सैनिकाने आम्हाला हमारे साथ आइये असे फर्मावले. थोडे धास्तावलोच की आपण काय गडबड केली की काय म्हणून आता कोर्ट मार्शल. पण तो आम्हाला दुसऱ्या एका दालनात घेऊन गेला व अस्खलित मराठीत बोलत बरीच माहिती देऊ लागला. मग काय, सहसा न ऐकायला मिळणारे किस्से त्याच्याकडून ऐकले. खूपच मजा आली. तिथली सगळीच दालने भारी आहेत. आम्हाला सगळ्यात आवडले ते सियाचेन मधे कसे रहातात आणि पाकिस्तानची पकडलेली शस्त्रास्त्रे. ती बघून मला मनोजची आठवण आली नसती तरच नवल. त्याच्या पायावरील प्लास्टरवर त्याने संपूर्ण युद्धाचे चित्र काढले होते अगदी शस्त्रे, रणगाडे विमाने यासकट. तिथून बाहेर पडेस्तो आमचे प्रवासी मंडळ आले होते. त्यांना विचारले अजून पूढे हेमिस मधे काय केले. ते म्हणाले नाच यथातथाच होते. पण तिथले संग्रहालय चांगले होते.

आता भूक जोरदारच लागली होती. बाजूलाच असलेल्या कॉफीच्या दुकानात शिरून मस्त बर्गर, बटाटा काप आणि कॉफी हाणली. आत्मा तृप्त झाला. मग सैनिकी क्षुधागृहाकडे गेलो. ते बंद झाले होते पण बाजूचे सैनिकी दुकान चालू होते. मग काय, अतुलला पर्वणीच. अतुल आणि अक्षयने जोरदार खरेदी केली. नेमकी पावसाळी विजार मात्र तिथे नव्हती. अर्ध्या तासाने बाहेर पडलो. वाटेत बाईकमधे भरायला इंजीनचे तेल लहान मापाच्या खोक्यात मिळते का ते पाहीले पण तसे नसतात असे कळले. मग हॉटेलवर आलो तर आमच्या सामानाच्याखाली एक अती जुनी पावसाळी विजार बेवारस पडलेली. कोणाची विचारता काही कळले नाही. मग मी घेऊन गेलो खोलीत. नंतरही कोणीच आले नाही विचारायला. अशा रितिने माझे काम झाले. देवाक काळजी !

आता लगेच बाहेर पडलो बाजारात जायला. आज काय ती खरेदी करून टाकायची होती. पण मुख्य म्हणजे अतुलला त्याच्या कमेराचा चार्जर मिळाला. या अभावी त्याच्या कमेरा बंद पडला होता कारगिल नंतर. मग एका ठिकाणी एक पसरट वाडगा होता धातूचा. त्यावर टोला देऊन टोलाच त्याभोवती फिरवला की त्याचा आवाज मोठा मोठा होत जातो. मजेशीर गोष्ट पण घेऊन काय करणार म्हणा. मग परत येताना टिशर्टच्या दुकानात शिरलो. आम्हा चौघांसाठी मुद्दाम नाव घातलेले टिशर्ट्स करायला टाकले. परवा येऊन घेऊ असा वायदा करून निघालो. बाजारात आज एक स्थानीक कारखान्याचा जर्दाळूच रस आणि सफरचंदाचा रस अशा २ बाटल्या घेतल्या.लेह मधे येण्याचे यश साजरे करायचे म्हणून. मी या प्रवासात दारू प्यायची नाही आणि मांसाहार पण नाही अस ठरवल होत. कारण तसच नेटवर पण वाचल होत. अतुल आणि अक्षय तर पीतच नाहीत. इथे एक उत्तम गोष्ट आहे ती म्हणजे लेह मधे प्लास्टीकची पिशवी देत नाहीत. नाही म्हणजे अजिबात नाही. हो, उगाच मुंबईसारखे नाही की गुपचूप देतात. त्यामूळेच बहूतेक पंगोंग, नुब्रा इथे कुठेच प्लास्टीक असे दिसले नाही फेकून दिलेले. नाहीतर काय लोकांना प्लास्टीक पिशवी एकदा झाल काम की फेकून द्यायची फारच घाई असते. तरिही, नतद्रष्ट लोक कोल्याच्या प्लास्टीक बाटल्या रस्त्यावर टाकून देतच होते. काय करणार ना, जित्याची खोड.... आम्ही मात्र नेहमीप्रमाणे लहान लहान कचरासुद्धा खिशात घालून घेऊन आलो आणि फक्त लेहच्याच हॉटेलमधील कचराकुंडीत टाकला, आणि लेह नंतर एकदम मनालीमधे. हे मुद्दाम सांगण्याचा उद्देश असा की कोणी तिकडे किंवा निसर्गात कुठेही गेलात तर कृपया हे पाळा आणि तिथला तो अजूनही कचऱ्याचे ढीग नसलेला निसर्ग तसाच राहू द्या. मग येऊन जेवलो, उद्याची बांधाबांध केली. तोवर १२ वाजले. मग जर्दाळूची बाटली उघडून ३ पेग भरले आणि चिअर्स केले. आता झोपायला हवे.

अधिक आषाढ शुद्ध एकादशी (२८ जून)

आज खारदुंगला सर करायचा होता. सकाळी आधी पेट्रोल भरायला गेलो. तिथे आम्ही रांग लाऊन उभे होतो तर एक फाटक्या अंगाचा स्थानीक तरूण बाईक घेऊन समोरून येऊन पेट्रोल भर म्हणू लागला. त्याला आमच्यापैकी एकाने रांगेत ये सांगीतले तर तो त्याला क्या तकलीफ है करू लागला. मग आम्ही नाद सोडला. पण योगायोगाने असे झाले की पेट्रोल भरणाऱ्या पोऱ्याने एक मोठी गाडी आणि त्यांनी बरोबर आणलेल एक मोठे पिंप, एवढ्यांचे पेट्रोल भरले. ते पिंप बहूतेक २५ लिटरचे असावे. त्यामूळे त्यात बराच वेळ गेला. मग त्याने अजून एका आमच्या बाईकचे पेट्रोल भरले. ते पाहून त्या स्थानीक तरूणाची चांगलीच चुळ्बूळ वाढली व त्याने येऊन दम भरला पोऱ्याला की काय माज आलाय का, माझे पेट्रोल भर नाहीतर मार खाशील, साला भैया, बिहारहून इथे येता आणि वर शिरजोरी? वगैरे वगैरे. पोऱ्याने मुकाटपणे ऐकले व विचारले किती पेट्रोल पाहीजे. साहेब ऐटीत ५० रुपयाचे टाक म्हणाले... बापरे, तो गेल्यावर आम्ही एवढे हसलो ! गेला अर्धा तास याने हुज्जत घातली व ५० रुपये म्हणजे अगदी मुतल्यासरखे पेट्रोल घेऊन गेला. पण एक खर आहे की स्थानीकांसाठी त्यांनी एक वेगळ टर्मिनल ठेवल पाहीजे. कारण इतर टर्मिनलवर भली मोठी रांग लागते आणि सगळ्यांनाच टाकी पूर्ण भरायची असते. मग स्थानीक वैतागणारच. आणि हे ही दिसले कि इथे पण भैयांचा त्रास आहे काश्मीरप्रमाणेच.

आकाश एकदम स्वच्छ होते. त्यामूळे खारदुंगला चढायला काहीच त्रास पडला नाही. आम्हालाही नाही आणि गाडीलाही नाही. जाताना नॉर्थ पुल्लू व शिखरानंतर साउथ पुल्लू अशी ठिकाणे लागली. तेंव्हा आपण एव्हरेस्ट तर चढत नाहीना असे वाटून गेले. तिथे पण नॉर्थ कोल साउथ कोल अशी ठिकाणे आहेत. वर पोचलो तर प्रचंड गर्दी ! अगदी चौपाटीवर आलो की काय अस वाटत होत. आणि डोक्यावर रणरणते ऊन होते. इतके की डोळे उघडायला त्रास होत होता. त्यामूळे दणादण फोटो काढून पलिकडे उतरायला सुरवात केली. अक्षय थोडा पूढे निघून गेला होता. मी आणि अतुल दोघेच चाललो होतो. तिन साडेतीनच्या दरम्यान मला ऊन अगदी असह्य झाले. खाली उतरायला लागल्यापासून मी हेल्मेट काढून ठेवले होते. कारण परवा रात्री पंगोंगला मला फारच त्रास झाला होता मानेपाशी दुखण्याचा. तेंव्हा आज संधी मिळाली तर हेल्मेट काढून ठेवायचे ठरवले होते. अर्थात, हेल्मेट असते तरी ऊन लागलेच असते इतके भीषण होते. डोके फारच भणभणले. तेवढ्यात खारदुंग गावाच्या थोडसच आधी एक जेवायची टपरी दिसली. मग अतुल आणि मी उत्तम पंजाबी जेवण जेवलो. इथून पण फारच अप्रतीम दृश्य होते सगळीकडे. अतुलने बाहेर जाऊन बरेच फोटो काढले. आता जरा माझे डोके खाली आले होते जेवल्यावर. मग पूढे कूच केले. ५ नंतर नेहमीप्रमाणे वातावरण थंड झाले. आता बरेच बरे वाटू लागले होते. एवढ्यात रस्ता बंद आहे असे दिसले. डांबरीकरण करायचे असे अचानक बिआरओ ने ठरवले होते. अक्षरश: माझ्या पुढची गाडी गेली आणि त्यांनी रस्ता बंद केला. एक सैनिकांची पण गाडी अडकली होती. त्याने अजून २ ३ तास रस्ता उघडणार नाही म्हटल्यावर वरून एक फक्त सैनिकांसाठीच रस्ता आहे तिथून जाउ असे ठरवले. मग १० १२ वाहनांची वरात उलटी फिरली. त्या रस्त्याने आम्हाला सोडले हे विशेष आहे. नशीबाने फार मागे फिरावे लागले नव्हते. एखादा किलोमीटर फक्त. आता आम्ही टेकडीवरून घाटातून चालवत होतो आणि आधी गेलेली वाहने खाली सपाट रस्त्यावरून जोरात पळताना दिसत होती. फारच मस्त दृश्य. आमचा रस्ता फारच कोसळलेल्या दगड धोंड्यांचा होता. त्यामूळे जपून चालवायला लागत होते. असे २० २५ किलोमीटर पार केल्यावर आम्ही पण खाली सपाटीला आलो आणि मुख्य रस्ता आम्हाला येऊन मिळाला. त्याच वेळेस आमचा नंबर वन एफ वन रेसर खालच्या रस्त्याने एकदम वेगाने येउन आम्हाला हाय बाय करून पुढे गेला. म्हणजे आम्ही फार मागे नाही पडलो तर ! हे डिस्किट गाव होते. इथून पूढे हुंडेरला जायचे होते. वाटेत एक डोंगर दिसला त्यावर चक्क चिकट चिकट ग्रिसने फासून ठेवले आहे असे दिसत होते. काय होते नक्की कळले नाही पण पूर्ण डोंगर तसाच होता. अजून थोडे पूढे गेल्यावर तिथले वाळूचे रण दिसु लागले. हो, तिथे चक्क आखातात असते तसे वाळवंट आहे. त्यात फक्त तिथेच आढळणारे २ ऊंचवटे असलेले उंट आहेत. त्यावर चौपाटीवर करता येते तशी फेरी मारता येते. चौपाटीच होती अगदी तिथे. तुफान गर्दी. भरपूर गुज्जू मंडळी होती. आम्ही काही उंटांवर बसलो नाही. मला तर अजूनही ऊन असह्य होत होते. त्यामूळे मी झाडाझुडूपात जाऊन बसून राहीलो. आमच्या फोटोविरांचे फोटो काढून झाल्यावर निघालो. वाटेत एक मस्त झरा होता त्यात पाय सोडून बसलो. तिथे पण भरपूर फोटो काढले. मग तंबूवाल्या तळावर पोचलो. फारच मस्त तंबू होते. इथेही आत चक्क टिव्ही होता. अर्थात आम्ही काही तो लावला नाही. पण सगळ्या सुखसोयी होत्या. वीज होती. त्या मोठ्या तंबूत २ भाग होते एक झोपायची खोली आणि एक स्नानघर. उत्तम व्यवस्था होती. सामान त्यात टाकून बाहेरच गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या त्यावर जाऊन बसलो. आणि मस्त चहा आला ! अहाहा... काय गरजेचा होता तो चहा. अतुल अनवाणी हिंडत होता. कारण त्याने घरुनच चपला आणल्या नव्हत्या आणि घेऊन टाक विकत अस श्रिनगरलाच सांगून देखील घेतल्या नव्हत्या. हा एक अजब प्रकार त्याचा. एरवी धडाधड किमती वस्तू खरेदी करेल पण इथे रोज संध्याकाळी लागणारी चप्पल काही तो घ्यायला तयार नव्हता. असो. उत्त्तम चहा झाला. मग येऊन चांगलेच झोपलो. जेवायला जायचा कंटाळा आला होता पण गेलो. आत्तापर्यंतचे सगळ्यात उत्तम जेवण मिळाले आज. नंतर मी आणि अक्षय अंधारात बाहेर फिरायला गेलो. १५ मिनिटे शांत स्तब्ध वातावरणात मस्त फिरून परत आलो व झोपलो. बाहेर लोक शेकोटी पेटवून नाचत होते. मग मधेच थोडावेळ तिथे जाऊन आलो. अतुल सर नेहमीप्रमाणे फोटो काढत होते. त्याला सगळ्या मुली सर म्हणत होत्या प्रवासभर. आता मात्र गुडूप झोपलो.

अधिक आषाढ शुद्ध द्वादशी (२९ जून)

सकाळी अगदी निवांत उठलो सात वाजता ! मग बाहेर चहा आला होता तो घेतला. तिथे २ लडाखी महिला लडाखी पोशाख घालून फोटो काढावा अस आवतण देत होत्या. मग तो कार्यक्रम झाला. आता उत्तम नाष्टा करत गप्पा टप्पा करत बसलो. बऱ्यापैकी उशीरा, म्हणजे साडेनऊला निघालो. हे आत्तापर्यंतचे सगळ्यात उत्तम रहाणे होते. वाटेत एका उभ्या बुद्धाच्या पुतळ्यापाशी थांबलो. हे जरा टेकडीवर होते त्यामूळे चौफेर पसरलेले रण दिसत होते. ते बघत असताना हळू हळू लांबवर धूळ उडू लागली. तो वारा हळू हळू मोठा होत होत एक छोटेसे धुळीचे वादळ तयार झाले व समोरील पर्वत काही काळ त्यात अदृश्य झाले. काही मिनिटातच ते शमले व आम्ही पूढे निघालो. जाताना त्या रणातून सपाट रस्त्यावरून गेलो जो आम्ही काल वरून घाटातून पाहीला होता. आजही वातावरण स्वच्छ होते पण आज तेवढे प्रखर ऊन नव्हते कालच्यासारखे. आज मी हेल्मेट परत घातले होते. पटापट खारदुंगलावर पोचलो. वर पोचताना थोडा बर्फ होता रस्त्यात त्यावर एक चारचाकी घसरत होती. अक्षय त्याच्या मागे जाऊन फसला आणि त्याची पण गाडी पकड घेईना. मी बाजूने बर्फावरूनच काढली पण मी जाउ शकलो. वर जाऊन गाडी लावली व परत यायला निघालो. पण तोपर्यंत अक्षयची पण गाडी सुटली होती आणि त्याने येऊ नको म्हणून सांगितले. मग अतुलला गाडी घेऊन परत मागे पाठवले. तो परत चढून येताना त्याचे चित्रण केले. आज इथे खूपच सुसह्य होते. गर्दी होतीच. शेवटी, अशा ऊंच ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त थांबु नका हे आठवून निघालो. तिथून झटपट खाली उतरलो आणि सरळ हॉटेल गाठले. आता प्रचंड भूक लागली होती. लगेच जेवायला बाहेर पडलो. मी कालच जर्मन बेकरी बघितली होती जवळच. तिथे जायचे ठरवले. त्यात एक हेतू हा होता की तिथे वायफाय असते. पण तिथे गेलो तर ते बिघडले आहे गेले ३ ४ दिवस अशी माहिती मिळाली. अर्थात, जेवण तिथेच केले. परवासारखेच चीजने भरलेले बर्गर, बटाटा काप आणि वर कॉफी ! मग आम्ही म्हटल आता थोडी ताणून देऊ आणि मग परत बाजारात येउ. तेंव्हाच करायला टाकलेले टिशर्ट्स घेउ. पण अतुल टिशर्टवाल्याकडे जाऊन बसला आणि आम्ही येऊन झोपलो. तासभर मस्त झोप झाली आणि एकदम वाद्द्यांचा मोठा गोंधळ ऐकू येऊन जाग आली. समोरच्याच आमच्या परवाच्या हॉटेलमधे गच्चीत स्थानीक लोकांचा नाच चालू झाला होता पर्यटकांसाठी. मग मी त्याचे थोडे चित्रण केले. मग अचानक मला बनियन धुण्याची आठवण झाली. खोलीत येऊन ते धुऊन परत गच्चीत वाळत टाकले. हे कधी? तर अंधार पडायला फार तर अर्धातास राहिला असताना. पण आज नसते धुतले तर एकदम मनालीलाच ३ दिवसांनी. थोड्या वेळापूर्वी, परवा धोब्याकडे दिलेले कपडे त्याने धुतलेच नव्हते असे कळले होते. ते त्याने म्हणे मगाशीच धुतले. मग ते पण येतील की नाही प्रश्नच होता. पण तिथे खूपच कोरडी हवा असल्याने असेल, रात्री माझे बनियन पण ८० टक्के वाळलेले होते आणि धोब्याचे कपडे पण आले होते पूर्ण कोरडे होउन. चला, उद्या सकाळी धावपळ नको. आता अतुल आला होता आणि फार झोप येत आहे म्हणू लागला. मगाशी ये म्हटल तर आला नाहीस. पण एक झाल, त्याने सगळे टिशर्ट्स, अजयसाठी पण, करून आणले होते. त्याने एक मोठा १० लिटरचा डबा आणला होता पेट्रोलसाठी. कारण उद्या उपशी नंतर जवळपास ३६५ किलोमीटर पेट्रोल पंप नाही. एकदम टंडीलाच. त्यामुळे सगळ्यांनीच ५, ५ लिटर पेट्रोल घ्या असे निलेशने सूचवले होते. पण मला माझी गाडी तब्बल ४८ सरासरी देत होती. फक्त नुब्रालाच तिने ४५ सरासरी दिली होती. टाकी १५ लिटरची होती. त्यामूळे मला मनाली पर्यंत पेट्रोल लागणारच नव्हते. अतुल अक्षयला सरासरी ३५ आणि ३० अशी मिळाली होती. त्यांच्या पण टाकीची क्षमता बघता अतिरिक्त पेट्रोल लागले असतेच अस नाही. त्यामूळे चौघात मिळून १० लिटर घेउ अस ठरवल. पण अजयला फोन केला तर तो म्हणाला त्याने आधीच ५ लिटर पेट्रोल घेतलय. तर मग आम्हा तिघात १० खूपच झाल. हो, उगाच जास्त झाल असत तर चंदिगढमधे काढून घेऊन काय करणार? वायाच गेल असत. त्यामुळे योग्य गणीत करायची गरज होती. १० लिटर घेउ, जर गरज नाहीच पडली कोणाला तर मीच ते माझ्या गाडीत टाकून पूढे जाईन. कारण मी आणि अजय चंदिगढला न जाता मनालीहून स्पितिला जाणार होतो पूढे १० दिवस. मग ठरल्यावर पेट्रोल भरून आणि घेऊन आलो. आता फक्त वैयक्तिक खरेदीसाठी बाहेर पडलो. फार काही घेतले नाही पण बाजारात फिरायला मजा आली. आणि आता आजचा शेवटचा दिवस लेह मधला. हॉटेलवर आलो तर कळले की उद्या पांग ऐवजी सरचूला जाऊन रहायचे अस नक्की झालय. कारण तिथे चांगली सोय आहे पांगपेक्षा. म्हणजे ९० १०० किलोमीटर जास्त. म्हणून पहाटेच उठायचे होते. अर्थात, आत्तापर्यंत सवय झालीच होती भल्या पहाटे उठून २०० किलोमीटर दौड करायची. त्यामूळे फारसे काही वाटले नाही. आज दुसऱ्या रसाची बाटली काढून संपवली.

---

सर्व भाग
http://www.maayboli.com/node/55605 --- सुरवात
http://www.maayboli.com/node/55634 --- भाग २
http://www.maayboli.com/node/55652 --- भाग ३
http://www.maayboli.com/node/55678 --- भाग ४
http://www.maayboli.com/node/55692 --- समारोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो अपलोड करायचा ३ ४ वेळा प्रयत्न केला माझ्या खाजगी जागेत पण झाला नाही. त्यामूळे सध्या सोडून दिले आहे. परत प्रयत्न करेन.

कोई बात नही ! ... फोटोपेक्शा तुमचे विचार च इतके सुस्पष्ट आहेत की तेच फोटो समान आहेत . पण तुमच्या लेखाला साजेशे माझ्या लदाखवारी चे फोटो ड्कवत आहे तुम्हाला हरकत असेल तर ते उडवून टाका ...

DSC03031.JPGDSCN7142.JPG

विजय क्षमस्व माझं नेट बंद पडलं होत त्यामूळे आत्ता उत्तर देतो आहे. तुमचे फोटो मस्तच आहेत आणि माझी काहीच हरकत नाही इथे टाकलेत तर.