"तीट कवितेला - कविता क्र.२ - यावा अशात साजण"

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 13:23

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.
७. आपल्याला आवडलेल्या नवीन कडव्याला आणि शीर्षकाला 'लाइक' करायची सोय आहे.
आजची कविता:

मूळ नाव: यावा अशात साजण
कवयित्री: जयवी -जयश्री अंबासकर
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/7932

सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा

हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्‍याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ

सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्‍या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा

निळाईने पसरावे
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात

खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात

नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कविता इतकी पुर्ण आहे की मधे एखादे कडवे बसवणे वा पुढे ह्या कवितेला वाढवणे अवघड आहे.

तरीही एक प्रयत्नः

कवितेचे नावः अशी ही रात...

डोळ्यात उतरावा
माझा चांदवा राजस
पापण्यांनी मिटावे
घेऊन स्वप्नांना कुशीत

नाव : आवर्त यावी उशीराने

नाव : आवर्त

यावी उशीराने जाग
मऊ रेशमी उन्हांनी
पुन्हा मोहरावे अंग
त्याच्या स्पर्शाच्या खुणांनी

नावः अशी मी आज सलज्ज..

फुले वेचताना सुगंधी
वार्‍याने सडा उडावा
मी पदराने झाकता अंग
तू उष्टावलेला तिळ दिसावा Happy

शीर्षक : रोमँटिक रसायन

खट्याळ इशारा, अवखळ शहारा, वेडे मन
सागर, लाटा, चंद्र- चांदणे, रात आणि रातराणी
शरांची फुले नि फुलांचे शर, वेडे मन, गंधित श्वास
सारेच घटक आहेत की या रोमँटिक रसायनी

Light 1

शीर्षक - चंद्रकमळ

रात्र व्हावी कमळण
शुभ्र वर्खात न्हाताना
व्हावी गंधघुसळण
चंद्रथेंब तोलताना

होय साती ,स्वातीने जे काहीअफाट सुंदर लिहिलंय त्याच्यापुढे तर कविता जाऊच शकत नाही. आता काहीही लिहल तर अधल्या मधल्या कडव्यांसाठीच होईल. अस मलाही वाटतंय. प्रतिसादासाठी धन्यवाद!

कवितेचे नाव

'रहाटगाडगे'

लपवून खाणाखुणा
गाठू किचन मुकाटे
शाळेमध्ये धाडायाचे
आहे मोठे नी धाकटे.

(ही अ‍ॅक्च्युअली तीट आहे इतक्या सुंदर कवितेला.)
Wink

वर सातीचे कडवे वाचून मला वाटले कवितेला समपर्क लिहिणे चुक की बरोबर कारण विषय कवितेला तीट असे आहे? तीट म्हणजे काजळाचा एक ठिपका ना नजर लागू नये म्हणून लहान मुलांच्या कपाळाला लावला जातो? असे जर असेल तर सातीचे कडवे बरोबर आणि बाकी इतरांची समजुत चुकीची.

बी, तीट लावल्याने बाळ जास्तच गोड दिसते ना? तीट नसतानाही बाळ गोजिरेच असते. त्यामुळे कडवे लिहून कवितेेचे सौंदर्य आणखी खुलवा!

फार सुरेख आहे कविता!
स्वाती_आंबोळे, अप्रतिम!

शीर्षक: सय
अशा मंतरल्या राती
मनकुपीतला ठेवा
सय साजणाची येता
पुनःपुन्हा उघडावा

नीधप आणि जिज्ञासा मस्तं.

नी- हलके उजळेल आता ऐवजी 'हलकेच उजळेल' कर मस्तं वृत्तात बसेल.
जिज्ञासा- 'मनाच्या कुपीतला ठेवा' चं वृत्तात बसणारं काही वर्जन पहावं लागेल. 'मनकुपीतला ठेवा' असं चालेल.

साती, भुईकमळ धन्यवाद!
साती, बरोबर आहे 'मनाच्या' वृत्तात बसत नाहीये, 'मनकुपीतला' साठी धन्यवाद! बदलते लगेच. माझं मराठी व्याकरण इतकं पक्कं नाही Happy

शीर्षक - साजणा तुझ्यासाठी
केशरिया रंगाने व्हावा
सारा आसमंत धुंद
यावे पौर्णिमेच्या चंद्राने
उधळीत बकुळफुलांचा सुगंध