अविश्वसनीय लडाख !

Submitted by सव्यसाची on 17 September, 2015 - 08:01

मंगलमूर्ती मोरया !

जूले …… !

कोणे एके काळी....

जेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.

सायकलनंतर आठवी पासूनच मी एक मोपेड चालवू लागलो आणि मग बाईक. बरेच प्रवास केले बाईकवर पण फार लांबचे नाहीत. जास्तीतजास्त अडीचशे किलोमीटर. तेंव्हाही लडाख असा काही प्रांत आहे, तिथे लहानपणी नकाशात पाहीलेले लेह गाव आहे अस काही माझ्या गावी नव्हत. पण २०१० मधे अचानक लडाख लडाख अस बरच ऐकू येऊ लागल. मग अभिजीत सुमोने लडाखला जाऊन आला. तेंव्हा पहीला किडा वळवळला डोक्यात. तोच म्हणाला पुढच्या वर्षी लडाखला येतो का बाईकवरून. शैलेद्र म्हणाला माझी चारचाकी घेऊन जाउया त्याला पण जायचय. आणि... मी लडाखची माहिती गोळा करायला सुरवात केली.

मी काही स्वत:ला बाईकवेडा म्हणणार नाही. पण बाईक एकूणच भारतामधे वापरायला सोपी पडते म्हणून नेहमीच बाईक वापरत आलो कामावर जायला आणि इतर ठिकाणी भटकायला. भारतात चारचाकी कमीच वापरली. सायकल मात्र महाविद्यालयात जायला वापरली होती. तर त्यामूळे बाईक वर खूपच बसून झाले आहे आणि त्यात एक वेगळीच मजा असते जी चारचाकीत नाही हे माहीत झाले आहे. त्यामूळे लडाखवारी मला शक्यतो बाईक वरूनच करायची होती. पण माझे नेहमीचे मित्र येणार असतील तर चारचाकी पण चालली असती. पण आता सगळ्या स्वत: वाहन चालवणाऱ्या भटक्यांचे आणि विशेषत: दुचाकी स्वारांचे मक्का मदीना, लडाख, हे करायलाच पाहीजे असे मनावर घेतले.

अभिजित बरोबर काही जाता आले नाही कारण नोकरी चालू होती आणि मग मला असा मोठा प्रवास ठरवायचा आळस येतो. फार काही सयुक्तिक कारण नाही पण तेंव्हा नाही जमवल हे खर. २०१४ साली मित्रांमधे २ ३ वेळा भरपूर चर्चा झाली पण फलनिष्पत्ती नाही. त्यामूळे २०१५ साली आपण जाऊन यायचच अस ठरवल होत आणि बाईकवरूनच. त्यामूळे डिसेंबर २०१४ पासून मोर्चे बांधणीला सुरवात केली होती. जानेवारीच्या शेवटी शेवटी नोकरी सोडावी लागणार असे दिसू लागले आणि मला आनंदच होऊ लागला. चला आता निवांतपणे लडाखला जाता येइल. नाहीतरी माझा जो तब्बल एक महिन्याचा बेत होता तेवढी सुट्टी मिळालीच नसती. मी जोमाने माहिती गोळा करायला सुरवात केली. जगाचे नकाशे दाखवणारी कुठलिही साइट ही माझी आवडती साइट असायची आधीपासूनच. मी तासंतास अशा साइटवर जाऊन जगाचे नकाशे बघत बसतो. आत्ताही तेच केल. एकूणएक अंतरांची माहिती भरलेली एक शीट तयार केली. निरनिराळे बेत तयार केले. अगदी मुंबईपासून बाईक चालवत जाण्यापासून ते मनाली मधे बाईक भाड्याने घेऊन श्रिनगरला सोडून देणे इथपर्यंत. प्रत्येक दिवशी कुठे थांबायच, तिथे इंधन, गाडी दुरुस्ती, एटीएम इत्यादी सोयी आहेत का वगैरे. शेवटी असे दिसले की तिथे आपल्याबरोबर एक वाहनतज्ञ असणे गरजेचे आहे. शिवाय, गाडीला फार काही झाले तर उचलून नेता येण्यासारखे वाहन देखील पाहीजे. आपल्याकडे खूप सामान असणार तर त्यातले बरेचसे सामान पण त्या वाहनात टाकता आले पाहीजे. कारण नाहीतर गाडीवरच प्रचंड सामान होते. त्यामूळे एखाद्या मंडळाबरोबर जाणे जास्त योग्य ठरेल. आणि तसही मी स्वत:चा संघ जमवण्याच्या, सगळ दुरुस्तीच सामान घेऊन जाण्याच्या फ़ंदात पडणारा माणूस नव्हतोच. मग बऱ्याच मंडळांची माहिती गोळा केली तारखांसकट. मला २ गोष्टी करायच्या होत्या, लडाख आणि स्पिति. तस दोन्ही लागोपाठ करणार कोणतही मंडळ मिळत नव्हत.

यथावकाश नोकरीचा रजिनामा दिला आणि ३ महिने काढायचे होते ते पूर्ण माहिती गोळा करण्यात गेले. याच दरम्यान मी माझी कचेरीतील बसायची जागा बदलली आणि शेजारच्या माणसाने, २ ४ दिवस माझी तयारी पाहून मला विचारले तुम्ही लडाखला जाणार आहात का. म्हटल हो. त्याला देखील २ ३ वर्ष जायच होत पण कोणी मिळत नव्हत, म्हटल चल माझ्या बरोबर. अशा रितिने अक्षय बरोबर येणार हे ठरल. मग मी एक मंडळ ठरवल की यांच्या बरोबर जायच. त्यांचीच आधी लडाखवारी करायची, मग १४ दिवस मनालीतच मुक्काम करायचा आणि मग त्यांच्याच बरोबर स्पिति करायची तिथूनच. मोठा बेत होता. हे ठरल्यावर मी एफबी वर पोस्ट केल 'लडाख कॉलींग'. कारण आता नक्की होत की मी जाणार. ताबडतोब मित्राचा प्रश्न आला बाईकने का, म्हटल हो, तो म्हणाला मी येतोय नक्की. अश तऱ्हेने अजय अमच्या संचात आला. हे मी अतुलला सांगीतले तर तो पण यायला तयार होता फक्त आयत्या वेळी ठरवू शकेन म्हणाला.

मग दोन अडीच तासांची जोरदार बैठक झाली माझ्या घरी. मी अमोल अजय आणि अतुल. अजून यांना अक्षय माहीत नव्हता. पण एक जण असणार आहे बरोबर असे सांगीतले होते. आमच आम्हीच जायच ठरवत होतो. सगळ्यांना काहिनाकाही कामाचे वाटप होऊन बैठक संपली. मग 'वा' संघ तयार केला अक्षय सकट. २ आठवडे गेले. संघावर तूफान चर्चा. मग अमोल म्हणाला त्याला जमणार नाहीये यायला. तो पर्यंत मी एक ठाण्यातलेच मंडळ शोधले होते. त्यांच्या बरोबर लडाखवारी, आणि पुण्याच्या एका मंडळाबरोबर लगेच स्पिती वारी, अस ठरवल होत. म्हणजे मला १४ दिवस मधे काढावे लागले नसते. अजय देखील या दोन वाऱ्या करणार होता माझ्या बरोबर. तर आता या २ मंडळांबरोबर जायच नक्की झाला. मंडळांना पैसे देणे, त्यांचा बेत मिळवणे, विमानाची तिकिटे काढणे. सगळ झाल. दरम्यान अक्षयने एका मुलीला बाईकवर घ्यायच ठरवल होता लडाखवारीत. मग तिला संपर्क करणे, तिला हे घे ते नको अशा सुचना झाल्या. अक्षयने तिला कबूल करायच्या आधी पहिलेच २ प्रश्न काय विचारले असतील? तुझे वय काय आणि तुझे वजन किती... हाहाहा ! ती नंतर त्याला म्हणालीपण की जे मुलीला कधी विचारायचे नसतात तेच प्रश्न तू मला पहिल्यांदाच विचारलेस. पण अर्थात, ते बाईकस्वारीसाठी महत्वाचे होते. अशा रितिने निधी आमच्या संचात सामील झाली.

आता खरे पडघम वाजू लागले. आता खरेदी रायडिंग गिअरची. हातमोजे, कोपराढोपराचे संरक्षक, रायडिंग जाकीट अस बरच काही. मी नेहमीप्रमाणे स्वस्त ते मस्त अस धोरण ठेवल होत. कारण मला माहीत होत मी मोठी बाईकवारी अशी ही एकच करणार आहे. नंतर काही मी अशी मोहीम हाती घेणार नाहीये. आणि इथल्याइथे महाराष्ट्रात जेंव्हा जातो तेंव्हा हे कधी घालत नाही. मग उगाच एका फेरीसाठी ५ ६ हजारांचे जाकीट, २ ३ हजारांचे संरक्षक अशी दहा बारा हजारांची खरेदी काही मी करणार नव्हतो. आणि कितितरी लोकांना हे सगळ न घेता लडाखवारी करताना मी अनेक चित्रणांमधे पाहील होत. आत्तापर्यंत अतुलचे पण नक्की ठरले आणि सगळी खरेदी झाली. त्याने तर चलतचित्रणाचा कमेरा, त्यासाठी गाडीच्या बटरीवर चालणारा चार्जर, बाईकच्या हण्डलवरचा स्टँड अस पण घेतल. पाहीजे तशी कार्गो विजार मिळवायला तर मी पुण्यातल्या जुन्या बाजारात पण जाऊन आलो. एक खोगिर घेतले दोन्ही बाजूला खोळ असलेले. ते गाडीच्या मागच्या बैठकीवर टाकायचे. मग त्यावर दुसऱ्याला बसताही येते.

बाईक ट्रक मधे टाकायला एका रविवारी काल्हेरला गेलो. तिथे बरीचशी तयारी आम्हीच केली. मी ४ दिवस आधीच पेट्रोल काढावे लागेल तेंव्हा सामान घेऊन या सांगितले होते. पण निलेशने, म्हणजे मंडळातर्फ़े असलेल्या नेत्याने, तसे सांगितले नसल्याने कोणीच काही आणले नव्हते. मीच फक्त एक नरसाळे, सायफन आणि ५ लिटरचा डबा घेऊन गेलो होतो. सगळ्यांनी त्या गोष्टींचा उपयोग केला. मला काय, मला चार साडेचार लिटर पेट्रोल फुकट मिळाले. माझे स्वत:चे जेमतेम अर्धा लिटर होते. मी सोडून बाकी तिघांनी त्यांच्या बायकांचा एकदम जोरदार बंदोबस्त केला होता. एक नखही दृष्टीस पडणार नाही याची खबरदारी घेतली होती. मी मात्र अर्ध्या तासात थोडिफार बांधाबांध करून थंड पडलो. आता पुढे गाडीच नशीब. मिळेल तशी मिळेल श्रिनगरला. बऱ्यापैकी उकडत होते. मग कोला, पाणी वगैरे आणण्यात आले. आज ३ ४ जण सोडल्यास सगळेच बाईकर्स आले होते. त्यामूळे सगळ्यांशी ओळख झाली.

अजून प्रवासाला निघायला १५ दिवस होते. आता मी घरी बसलो होतो पण कोणाला माहीत नव्हते. मिही आवर्जून सांगीतले नाही. मला वाटले सुट्टी घेतली आहे अस सांगीतल की प्रश्न कमी येतील. पण एवढी सुट्टी कशी मिळाली हा प्रश्न सगळ्यांनाच होता. पण माझे आणि नोकरीचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे बऱ्याच जणांना माहीत असल्याने तो प्रश्न फार गंभीरतेने कोणी विचारला नाही. १५ दिवस झटपट गेले. बरच सामान गोळा केल होत. आता भरायच कस आणि विमानात वजन जास्त तर होणार नाहीना ही चिंता. अगदी आयत्या वेळी संतोषकडून त्याची मोठी खोळ आणली. माझी खोळ पुरणार नाही अस दिसल. शेवटी कटोकट १५ आणि ८ किलो अस वजन झाल घरी मोजताना.

---

सर्व भाग
http://www.maayboli.com/node/55605 --- सुरवात
http://www.maayboli.com/node/55634 --- भाग २
http://www.maayboli.com/node/55652 --- भाग ३
http://www.maayboli.com/node/55678 --- भाग ४
http://www.maayboli.com/node/55692 --- समारोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन, खोगीर Saddlebag साठीचा शब्द खासच वाटला. वारी होऊन गेलीय दिसतेय ... तयारीचे फोटो नाही टाकलेत?

तुझे वय काय आणि तुझे वजन किती
>> Lol

पुढील लेखनास शुभेच्छा ...

सव्या, एकदम भारी आणि सुरस असे वर्णन लिहितो आहेस. ही मालिका मी पुरवून पुरवून वाचणार हे ठरवलं आहे.

तुझी याआधीची 'एक अविस्मरणीय प्रवास' ही मालिका मला अजूनही अधून मधून आठवते.

पुढच्या सगळ्या भागांकरता शुभेच्छा!

गजानन, तुला त्या प्रवासाचे लिखाण अजून आठवते आहे म्हणजे कमाल झाली. खूप वर्ष झाली त्याला. मजा आली होती ती लेखमाला इथे टाकताना मला.