चिमणी आणि बाळ (परीकथा)

Submitted by जव्हेरगंज on 15 September, 2015 - 12:51

भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली.
बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही.

बाळराजे उदास झाले. तोंड पाडून गपगार बसले. चविष्ट खाऊकडं बघेनासे झाले. गाल फुगवुन त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांना वेगवेगळी अमिषे दाखवू जायला लागली. त्यांना आभाळात फेकुन पुन्हा झेलले गेले. ईवल्याश्या पिपाण्या तुताऱ्यांसारख्या फुंकल्या गेल्या. चविष्ट खाऊ तोंडात भरवले गेले. पण बाळराजे बधले नाहीत.

कुठुणतरी वाऱ्याची झुळुक आली बाळराजेंचे दु:ख आपले मानुन पुढे गेली. उनाड वाऱ्याने चिमणीशी युद्ध पुकारले. झाडाझाडांच्या फाद्यांनी आपला पाठींबा दर्शविला. जोरदार वादळ सुरु झाले. पाऊसही क्रोधीत होऊन कोसळायला लागला. अवकाशाच्या रणांगणात एका चिमणीसाठी महायुद्ध पेटले. चिमणीचा नि:पात अटळ होता. ईवल्याशा पंखात बारा हत्तींचे बळ घेऊन भुरभुर चिमणी वळचणीला आली. भिजलेल्या पंखात गारगार वाऱ्यात तिला हुडहुडी भरली. खुंटीवर बराचकाळ थरथरत राहिली. रात्री कधीतरी जमीनीवर खाली धारातिर्थी होऊन पडली.

बाळराजे उदास झोपले होते.
आज स्वप्नात ते आकाशी उडत होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान