मायबोली गणेशोत्सव २०१५ स्पर्धा - तेचबूक! -प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 01:40

गणपती बाप्पा मोरया!

सोशल नेटवर्किंग हा शब्द सध्या मायबोलीसारख्या संकेतस्थळांपुरता मर्यादित राहिलेला नसून फेसबूक, ट्विटर वगैरेंच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण आहे. हल्ली टीव्हीवरही ब्रेकिंग न्यूजमध्ये कुण्या प्रसिद्ध व्यक्तीने त्याच्या फेसबूकवर, ट्विटरवर काय विधान केलं, त्याचे काय पडसाद उमटले याचीही चर्चा असते. चटपटीत गॉसिपसाठी लोकांना हे एक नवीन खाद्य मिळालेलं आहे. हीच संकल्पना वापरून आपण यंदा मायबोलीवर गणेशोत्सवात धमाल करणार आहोत.

साहित्य, सिनेमा, नाटक, टीव्हीमालिका वगैरे माध्यमांतून अनेक व्यक्तिरेखा आपल्या मनात घर करून बसल्या आहेत. मग तो पुलंचा गटणे असो वा शोलेचा गब्बर! आपल्याला त्यांची नुसती तोंडओळख नाही तर अमूक प्रसंगात ती पात्रं कशी वागतील याचाही आपण कल्पनाविलास करू शकतो. आता हे लोक आपल्याशी संवाद साधतील त्यांचं 'तेचबूक' अकाऊंट उघडून! ही पात्रं त्यांचं तेचबूक स्टेटस अपडेट करताना काय लिहितील, एखादा फोटोही टाकू शकतील (प्रताधिकारमुक्त!), 'चेक्ड ईन अ‍ॅट' लिहू शकतील, कुणाला टॅग करु शकतील, फीलिंग नॉटी, बॅड, फॅन्टास्टिक म्हणतील... थोडक्यात तुम्ही आम्ही जे जे आपापल्या फेसबूकवर करतो ते सगळं ही काल्पनिक मंडळी त्यांच्या 'तेचबूक'वर करतील! हे इथेच संपत नाही.. थांबा, खरी मजा तर पुढेच आहे! यांच्या अपडेट्सवर त्यांना किती लाईक्स् आले हे तर तुम्ही लिहालच. पण त्यांची दोस्तमंडळी, अर्थात फ्रेंड्लिस्टमध्ये कोण असेल हेही तुम्हीच ठरवून टाकायचं आहे. आणि ही दोस्तमंडळी आपल्या मित्राला काय काय गंमतीशीर कमेंट्स् देतील, तेही लिहायचं आहे! लक्षात ठेवा, ही दोस्तमंडळीही अशीच काल्पनिक परिचयाची असायला हवीत, एवढीच अट! त्यांचे हावभाव दाखवण्यासाठी मायबोली स्मायलींचा वापर तुम्ही मुक्तहस्ते करु शकता!

कल्पना येण्यासाठी पुढील प्रवेशिकेचं उदाहरण वाचा बरं!
तेचबूक! - फास्टर फेणे
स्टेटस अपडेट :
काल रात्री पुण्याला मामाकडे आलो खरा, पण सकाळी लक्षात आलं की, बाबांचं पार्सल काहीही करुन साहित्य सहवासला पोहोचवायचंच आहे आज. बाहेर निघालो, तर चपला बन्या जोशी घालून गेलेला. मग काय सरकवल्या घरमालकांच्या चपला पायात आणि मारली सायकलला टांग! Wink

२७ लाईक्स.

विश्वासराव सरपोतदार :हा शुद्ध हलकटपणा आहे फेणे. Angry
मोगॅम्बो :मोगॅम्बो खुश हुआ! Biggrin
इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! ते पार्सल साहित्य सहवासला पोचता कामा नये!
धनंजय माने : अर्रर! दोन्ही चपला सारख्या आहेत का? मालक काल देवळात गेले होते. Proud
..

नियमावली -

१) ज्या पात्राच्या नावाने प्रवेशिका आहे ते पात्र खर्‍या आयुष्यात कधीही अस्तित्वात असायला नको. तुम्ही पुस्तक, चित्रपट किंवा मालिका यांमधले कोणतेही पात्र निवडू शकता, फक्त ते काल्पनिक पात्र हवे. (उदा. 'आय डेअर' पुस्तकातल्या 'किरण बेदी' किंवा 'भाग मिल्खा भाग' चित्रपटातले मिल्खाजी किंवा राऊ मालिकेतले 'बाजीराव पेशवे' ह्या व्यक्तिरेखा चालणार नाहीत. 'गारंबीचा बापू'मधला 'बापू', 'झपाटलेला' चित्रपटातला 'तात्या विंचू' किंवा 'होणार सून मी या घरची'मधली 'जान्हवी' या व्यक्तिरेखा चालतील.)
१.अ) रामायण, महाभारतातल्या तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखांच्या प्रवेशिका चालतील.
ब) मायबोली आयडीवर प्रवेशिका चालणार नाही.
क) प्रवेशिका डिलिट किंवा बाद करण्याचे सर्वाधिकार संयोजक मंडळाकडे असतील.
२) लेखन विनोदी हवे.
३) शब्दमर्यादा नाही!
४) प्रत्येक आयडीला एकच प्रवेशिका देता येईल.
५) ही स्पर्धा आहे.

वाटतंय ना मजेशीर? तर मग घ्या पाहू लिहायला तुमची प्रवेशिका!

स्पर्धेत भाग कसा घ्याल?

'तेचबूक!' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नवीन लेखनाचा धागा उघडावा लागेल.
प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून (१७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (२७ सप्टेंबर २०१५, अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रदर्शित करायच्या आहेत. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १७ सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०१५' पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सदस्य झाला आहात.
२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ग्रूप मधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
"तेचबूक! - तुम्ही निवडलेल्या पात्राचे नाव".
४. शब्दखुणा या चौकटीमध्ये "तेचबूक!" आणि "मायबोली गणेशोत्सव २०१५" हे शब्द लिहा.
५. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
६. Saveची कळ दाबा.
७. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल, तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
८. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पद्धतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंत चतुर्दशीनंतर उघडण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब) पण खेळात जरा गंमत यावी या हेतूने आम्ही इथे एक सूट देत आहोत. मायबोलीवर कंपू, गृप आहेत त्यांच्या व्यवच्छेदक लक्षणांसह! तर एखाद्या गृपची प्रातिनिधिक अशी तेचबूक पोस्ट व त्याला आलेल्या इतर गृप्सच्या तसेच वर उल्लेखिलेल्या काल्पनिक पात्रांच्या प्रातिनिधिक कमेंटस तुम्ही लिहू शकता. असे गृप म्हणजे उदा. पुपुकर, टीपापा मंडळ, पुरोगामी, प्रतिगामी, कवी, गझलकार, सिनेमावेडे इ इ.

>>> संयोजक, एरव्ही मजा आली असती पण गणेशोत्सवात हा नियम योग्य नाही. उगाच वाद, भांडणं होतील अशा संधी तुम्हीच का उपलब्ध करून देताय? काढून टाका हे.

बरं, अजून एक शंका की लाईक्स कोणा खर्‍या व्यक्तींनी केल्या तर चालेल का? स्टेटस अपडेट काल्पनिकच असेल.

मामींना अनुमोदन.

हल्लीच्या वादचर्चा आणि इतर धागे बघता या नियमाचा कोण कसा उपयोग करून या उपक्रमाला कोठे नेऊन ठेवतील, हे श्री गणेशालाच ठाऊक!

सर्वाधिकार संयोजकांकडे आहेत आणि उत्सवाला गालबोट लावू नका अशी विनंती केली आहे, ते पुरेसं नाहीये?! संयोजकांवर मायबोलीकरांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी असते तसं संयोजकांची विनंती मायबोलीकर लक्षात ठेवतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा प्रवेशिका डिलिट करण्याचा मार्ग आहेच.

आशुडी, हे तुझं पर्सनल मत असू शकतं पण गणेशोत्सवाचे संयोजक म्हणून विचार केलास तर कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होतील असे मुद्दे टाळलेच पाहिजेत असं मला वाटतं.

संयोजक,

पुरोगामी, प्रतिगामी काय पोलिटिकल मतं काय .... जहाल टॉपिक्स आहे हे माबोवरचे. टीपापावर खार खाऊन असलेले कमी लोकं आहेत का? मग हे माहित असताना मुद्दाम का उकसवताय? कदाचित वाद होणारही नाहीत पण याची खात्री कोण देणार?

प्रवेशिका अप्रकाशित करण्याचा मार्ग असला तरी ज्याची प्रवेशिका अप्रकाशित केली जाईल तो आयडी गपचुप बसेल असं वाटतंय का? मग ते वाद निस्तरण्याचं एक नविन झेंगट तुमच्याच गळ्यात पडेल. संयोजकांकडे भरपूर वेळ हाताशी असेल तर तो विधायक कार्यात लावा. वादावादीत नको आणि गणेशोत्सवाला गालबोटही लागायला नको.

एक मायबोलीकर म्हणून सल्ला दिलाय. घेणं - न घेणं हा तुमचा प्रिव्हेलेज आहेच.

मामी, अर्थातच ते माझं मत असल्याने माझ्या आयडीने लिहीलं होतं. संयोजकांचं मत संयोजक आयडीनेच लिहीलं जातं. धन्यवाद.

मला माहित आहे आशुडी. म्हणूनच मी तुला ते तुझं मत आहे का? असा प्रश्न विचारला नव्हताच. ते तुझं पर्सनल मत आहे हे गृहित धरूनच प्रतिसाद लिहिला होता. गणेशोत्सवाच्या संयोजनात असताना पर्सनल मतं (विशेषतः संयोजकांच्या मतापासून भिन्न असलेली) सहसा मांडू नयेत असा एक अलिखित संकेत असतो. असो.

योग्य निर्णय घेतल्याबद्दल संयोजकांचे आभार.

स्पर्धा जबरदस्त आहे... उदाहरण तर खतरनाक आहे...

वाचाणार तर नक्कीच... जमल्यास बर्‍याच दिवसानी काही तरी खरडायचा पण प्रयत्न करावा म्हणतोय..

संयोजक,

आता हे सगळे धागे 'मायबोली गणेशोत्सव २०१५' च्या गृपात हलवा की. अजूनही संयोजनाच्या गृपमध्येच आहेत आणि त्यामुळे http://www.maayboli.com/node/55589 या लिस्टमध्ये दिसत नाहीयेत.

>>प्रत्येक आयडीला एकच प्रवेशिका देता येईल.

Sad मिलॉर्ड ये सरासर नाइन्साफी है Proud

ज्या पात्राच्या नावाने प्रवेशिका आहे ते पात्र खर्‍या आयुष्यात कधीही अस्तित्वात असायला नको. तुम्ही पुस्तक, चित्रपट किंवा मालिका यांमधले कोणतेही पात्र निवडू शकता, फक्त ते काल्पनिक पात्र हवे.>>>ह्या काल्पनिक पात्रांच्या संभाषणात ख-या व्यक्तीचा/ नावाजलेली व्यक्तीचा उल्लेख असेल तर चालेल का?

हो, चालेल सोनाली. पण नामोल्लेखच हवा, ते पात्र म्हणून तुमच्या लिखाणात येऊ देऊ नका.

Pages