कोकणात आमच्याकडे पावसाळ्यात भातशेती करतात आणि जमीनीचा पोत कायम राखणयासाठी हिवाळ्यात कुळथाचे पीक घेतले जाते. घरचेच असल्यामुळे सहाजिकच आमच्या आहारात भात आणि कुळीथ यांचा समावेश जास्त असतो. साधारण नोव्हेंबरच्या सुरवातीला कुळथाची पेरणी होते. याचे वेल असतात. कुळथाच्या वेलाचं हिरवगार शेत फार सुंदर दिसत. फेब्रुवारी मार्च मध्ये याच्या लांबट, शिडशिडीत शेंगेत दाणा तयार होतो. मग तोडणी, झोडपणी , पाखडणी वगैरे संस्कार होऊन चपटा , गोल, लालसर काळ्या रंगाचा दाणा मोकळा होतो खरा पण हाय, पुढे वर्षभर खाण्यासाठी आमच्या कोठी खोलीत बंदिस्तच केला जातो.
कुळथाचं शेत
From mayboli
आणि हे जवळुन
From mayboli
या कुळथाची इतर कडधान्याची करतात तशी मोड आणुन उसळ आणि कळण ही करतात. मोड आलेले लाल पांढरे कच्चे कुळीथ ही खूप सुंदर दिसतात. या उसळीत आम्ही इतर कोणता मसाला न घालता वेस्वार नावाचा फक्त आमच्याच भागात केला जाणारा मसाला घालतो. कुणी पाव्हणे मंडळी आली की खास म्हणुन एखाददा होतेच ही उसळ.
कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते. त्या साठी कुळीथ मडक्यात भाजुन नंतर ते जात्यावर भरडले जातात. मग पाखडुन सालं आणि डाळ वेगळी केली जाते. सालं काढलेली डाळ पिवळट दिसते. ही दळुन आणली की कुळीथ पीठ तयार. या डाळीच वरण अप्रतिम होत. डाळ शिजली की फार घोटायची नाही आणि जास्त पाणी ही घालायचं नाही. त्यात हळद , हिंग , मीठ आणि लाल मिरच्या, जीरं, सुकं खोबरं याच वाटण घालायचं. या वरणावर तूप न घालता नारळाचा घट्ट रस घालायचा . हे वरण, गरम भात आणि जोडीला पापड कुरडयांच तळण. आमच्याकडचा सॅालिड हिट बेत आहे हा.
नमनाला घडाभर कुळीथ खर्ची पडलेत आता पिठल्याकडे वळु या . अहो , उसळ,कळण काय किंवा वरण काय , हे पाहुणे कलाकार. कधीतरी होणारे. देशावर करतात त्या शेंगोळ्या तर आमच्याकडे कधी होतच नाहीत . खरं हुकमाच पान म्हणजे कुळथाचं पिठलं जे पानात वाढलं की पान खरोखर भरुन जातं. पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाच पिठलं सगळ्यांना आवडतं . पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही . ह्या पिठलं प्रेमावरुनच माझ्या एका सासुबाईनी " पिठलं... आणि तोंड मिटलं अशी मुळी म्हणच तयार केली आहे. घरात काही महाभाग आहेत पानात पिठल्याचा थेंब ही पाडुन न घेणारे . पण ते किती ? अपवादाने नियम सिद्थ होतो म्हणण्या इतपतच.
जनरली कोकणात न्याहारीला पात्तळ पेज असते पण आमच्याकडे न्याहारीला असतो पिठलं भात. करायला अगदी सोप पण चवीला भन्नाट. थोड्या तेलात कांदा परतायचा , नंतर त्यात पाणी घालायच. मीठ, तिखट आणि चवीला एखाद सोलं टाकायच आणि अंदाजाने पीठ घालुन ढवळत रहायच, गुठळी होऊ द्यायची नाही. पाच सात मिनीटं उकळवायचं , पिढल्याचा घमघमाट दरवळला की गॅस बंद . पिठल तयार. हिरवी मिरची, कोथिंबीर असे पिठल्याचे लाड क्वचितच होतात कोकणात. गरम भात, तूप , पिठलं आणि दही भात त्यात चवीला पिठलं . तोंडी लावायला आंब्याच लोणचं . न्याहरीचा न्याराच बेत. ओरपा हव तेवढ. अशी भरभक्कम न्याहारी झाली की माणूस आहारला नाही तरच नवल.
एवढ जरी असल तरी दुपारच्या जेवणात पिठलं कधीच नसत. कारण दुपारच्या जेवणातल्या पीठल्याचा संबंध अशुभाशी लावला गेला आहे. हां पण पानातली भाजी अगदीच कोणाच्या नावडतीची असेल तर सकाळच्या उरलेल्या पिठल्याचा वाडगा त्याच्या समोर ठेवला जातो.मग त्याच जेवण बिनबोभाट होतं. शिळं पिठलं ही काही जणांना जास्त आवडत पण मला स्वत:ला नाही आवडत ते.
सणासुदीच्या दिवशी दुपारच गोडाधोडाचं जेवण, ते ही थोड्या उशीराच झालेलं. रात्री जेवणार नाही फक्त ताक घेऊ असं सांगुन पुरुष मंडळी ओटीवर गप्पा मारत बसलेली असतात. घरातल्या इतर माणसांसाठी आणि मुलांसाठी रात्री भात पिठलं केलच जातं. पिठल्याचा घमघमणारा दरवळ ओटीवरच्या पुरषांना स्वयंपाकघरात खेचुन आणतो. " घासभर पिठल भात खाईन म्हणतो" असं म्हणत एकेकाची विकेट पडायला लागते . आम्हाला याचा अंदाज असतोच. पिठल भात जास्तच केलेला असतो. पण मंडळी कधी कधी असा काही हाणतात पिठल भात की आम्हाला दोन्ही पुन्हा करावं लागतं . (स्मित )
पिठलं फक्त कोकणातल्या आमच्या हेड आॅफिस मध्येच केलं जात असं नाही तर मुंबई पुण्याच्या शाखांमध्ये ही ते तेवढ्याच आवडीने केलं जातं. पिठाचा स्टॅाक कायम लागतो घरात. अगदाी परदेशी रहाणारी मंडळी ही बॅगेतुन कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जुन नेतात. ह्या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तुना चटकन् लागतो व तो लवकर जात ही नाही म्हणून जाड पॅकिंग करुन नेतात पण नेल्याशिवाय रहात नाहीत. इथे मात्र पीठ कधी संपलं तर चार दिवस आमटी, सार असं करुन काढले जातात, पण नंतर गावाला फोन केलाच जातो पीठ कुरिअर करा असा. वास्तविक हल्ली सगळीकडे कु. पी विकत मिळतं तरी ही कुरिअरने पीठ मागवणे हे खरं तर कोब्राना शोभत नाही. पण काय करणार? विकतच्या पीठाला आमच्याकडे बिग नो . पीठ घरचचं हवं. त्या साठी मग कुरिअरचा खर्च ही सोसायची ह्या कोब्रांची तयारी.
जाऊबाई सर्दी पडशाने बेजार झाल्या की जेवताना म्हणतात ,“ पिठलं वाढ ग थोडं, तोंडाला रुची येईल जरा " नवीन सुना घरात रुळायच्या ही आधी पिठलं आवडीने खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर रहाणारी मुलं घरी आली की "काकू, पिठलं पोळी वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये " असं म्हणतात. दोन वर्षाचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवत आणि भात पिठलं मिटक्या मारत खात .
या सगळयामुळे पिठलं प्रेमाची आमच्या घरची ही परंपरा या पुढे ही अशीच कायम राहील याची खात्री पटते आणि मन आश्वस्त होते...
सुंदर लेख मी १-२ वेळा केलं
सुंदर लेख
मी १-२ वेळा केलं होतं कुळथाचं पिठलं पण मला शिंगोळेच आवडतात.
सिंडरेला, शेंगोळे हा प्रकार
सिंडरेला, शेंगोळे हा प्रकार मी तुमच्या श्रीरामपूरमधेच खाल्ला प्रथम. आवडला मला पण पिठलं जास्त आवडतं.
मी आमच्या मालकांकडे पिठलं नेऊन दिलं अशी देवाण-घेवाण झाली. त्यांनापण आवडलं पिठलं. :). त्यांच्याकडे जिलबी म्हणायचे शेंगोळयांना.
जसं शेंगोळे विविध पद्धतीने करतात तसंच पिठल्याच्या पण विविध पद्धती इथे दिसल्या.
भारी पिठलं. खूप आवडतं.
भारी पिठलं. खूप आवडतं.
माझी आत्या देवगड जवळच्या
माझी आत्या देवगड जवळच्या नारिंग्र्याची. तिच्याकडे लहानपणी रोज तो मौमौ लालसर भात आणी ही पिठी हा नाष्टा घरच्या सगळ्यांना आणि गडी माणसांना.
खूप दिवसात खाल्ली नाही पिठी.
देवगड म्हणजे जिथे जगातला
देवगड म्हणजे जिथे जगातला सर्वात बेस्टेस्ट हापुस पिकतो ते देवगड?
मस्त मस्त मस्त ! भूक लागली
मस्त मस्त मस्त ! भूक लागली आता .
जेवणं झाली की उरलेलं पिठलं छोट्या पातेल्यात ओतून ठेवायचं आणि मग ते मोठं पातेल्याला चिकटलेलं पिठलं आडव्या अंगठ्याने नीट कोरून काढायचं आणि मग बोटं चाटत चाटत मटकावायचं .
येस स्वाती, माझंपण सासर देवगड
येस स्वाती, माझंपण सासर देवगड तालुक्यात.
शुम्पी माझी चुलत नणंद नारीग्र्यात राहते. आतेसासुबाईन्चे सासर पण नारीन्ग्रे.
देवगड म्हणजे जिथे जगातला
देवगड म्हणजे जिथे जगातला सर्वात बेस्टेस्ट हापुस पिकतो ते देवगड?>> लो ये भी कोइ पूछने की बात है?
अन्जू
टेष्टी टेष्टी लेख! पण कुळीथ
टेष्टी टेष्टी लेख!
पण कुळीथ च बघितलं नाही मी कधी
आता हा लेख वाचुन कुळथाचं पीठलं काय आहे ह्याबद्दल उत्सुकता वाढलीय. खायलाच पाहिजे असं झालंय!
पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी
पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं.
>>>>>>>
हा हा .. मला तर लहानपणी कुळथाचेच पिठले किंवा पातळ वर्जन पिठी माहीत होते.
शाळेतले मित्र आणखी कश्याला म्हणजे चण्याच्याला पिठले का म्हणतात हे कळायचे नाही.. ते गंडले आहेत की माझ्या घरचे गंडले आहेत हे समजायचे नाही..
पिठी भात वा पिठले भाकरीबरोबर लाल ठेचा आणि भाजलेले सुके बोंबील मी कच्चाकचा चावून खातो.. दोन्ही वास एकमेकांना पूरक वेड लावणारे.. खास करून बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत असेल तर आई हमखास हा बेत आखणार
बाकी मनीमोहोर आपण नियमित कोकणावर काहीबाही लिहित राहा... बरे वाटते वाचून
मस्त लेख! देशावरचे असल्याने
मस्त लेख!
देशावरचे असल्याने कुळथाचे नेहमी शेन्गोळेच खाल्लेत, पिठल खायला हव कधी योग आला तर..
(बाय द वे सणासुदी पिठल,खिचडी करु नये अस म्हणतात)
धन्यवाद सगळ्यांना परत एकदा.
धन्यवाद सगळ्यांना परत एकदा. माबोवर कु पि फॅन एवढे असतील असं वाटलं नव्हतं.
कुणीतरी करा आणि फोटो डकवा इथे. मी सध्या मुकलेय पिठल्याला . निदान फोटो तरी बघते. खरं सांगायचं तर पिठल्याची लईच आठवण येतेय सध्या म्हणूनच तर लेख लिहीला गेला.
कुळथाचं पिठलं विशेष आवडत
कुळथाचं पिठलं विशेष आवडत नाही, रादर पिठलंच आवडत नाही. >>>>> सायो अगदीच अनुमोदन ! अपवाद फक्त सिंहगडावरच्या पिठल्याचा.
लेख आवडला पण
लेख वाचून राहवलंच नाही. कालच
लेख वाचून राहवलंच नाही. कालच रात्री बेत केला हा :
सिंडीनं लिहिलेले शेंगोळे
सिंडीनं लिहिलेले शेंगोळे अजून करायचे राहिलेतच.
छान लेख लिहिलाय
छान लेख लिहिलाय मनीमोहोर.
कुळीथ माहिती नाही म्हणुन पिठलेही माहिती नाही. आता शोधायला हवं.
आमच्याकडे पिठले म्हणजे फक्त चण्याच्या पिठाचेच. पपांना मुळीच आवडायचे नाही पिठलं त्यामुळे पिठलं भाकरीचा स्वयंपाक असला की ते "पिठलं , डोके उठलं" म्हणायचे.
प्राजक्ता, कोंकणात घरचं कुणी
प्राजक्ता, कोंकणात घरचं कुणी 'गेलं' की त्या संध्याकाळी घरात चूल पेटत नाही आणि शेजारपाजारचे पीठलं भात आणून देतात.
)
म्हणून सणासुदीला/चांगल्या दिवशी/पाहुणचाराला पीठले भात करत नाहीत.
(पण आम्ही हॉस्टेल मधून किंवा सासरहून सणासुदीलाच सुट्टी असली की घरी जाणार आणि आमच्यासाठी आईला ते करावेच लागणार अशी परिस्थिती आहे.
साती, देशावरही हिच पद्धत आहे,
साती, देशावरही हिच पद्धत आहे, सणावारी, लग्नघरी पिठल, खिचडि, भाकरी ही बनत नाही, असो अगदिच विशयान्तर होइल
लेख चान्गला लिहलाय.
किती सुंदर लिहिलेय.
किती सुंदर लिहिलेय. कुळथाच्या शेतीचे फोटो टाक गं.
आमच्या घरीही कुळथाच्चे पिठले हिट्ट आहे. मी गावी गेले की गगनगिरी कुळीथ पिठीची पाकिटेच घेऊन येते. गावच्या दुकानदारालाही आम्ही दिसल्यावर कुळथाच्या पाकिटांची आठवण येते
मामी, ते ताट पुढ्यात घ्यावसं
मामी, ते ताट पुढ्यात घ्यावसं वाटतयं, काय झकास दिसतयं
सोनु फोटो बद्द्ल थान्कु.
सोनु फोटो बद्द्ल थान्कु. कुळीथ मुम्बइ मधे कुटे मिलेल
सर्वसाधारण, कोणत्याही
सर्वसाधारण, कोणत्याही वाण्याकडे कुळीथ आणि कुळीथ पिठ मिळतं मुंबईत. जास्त मराठी वस्ती असलेल्या ठिकाणी तर नक्कीच मिळेल.
आमच्याकडे रायगड पट्ट्यात
आमच्याकडे रायगड पट्ट्यात चण्याचं/बेसनाचं पिठलं करतात त्यामुळे कुळथाचंही पिठलं असतं हे थेट लग्नानंतरच समजलं... एनीहाऊ नाही आवडलं कुळथाचं पिठलं फारसं! बेसनाच्या पिठल्यात कांदा मिरचीवर लसूण ठेचून जीरे-मोहरी-हिंग-कडीपत्त्याची खमंग फोडणी हवीच! वर आमसूल व कोथींबीर!! कधी शेवग्याच्या शेंगाही पुरवठ्याला! आणि वर साजूक तुपाची धार!! तळाशी लागलेलं खरपूस पिठलं खरवडून खायला विशेष आवडतं.
दिवसभर धावपळीचा कार्यक्रम/पूजा असेल तर रात्रीचा बेत म्हणून, अचानक पाहुणे आले, पावसाळ्याचे दिवस आहेत व घरात बाकी भाज्या नाहीयेत तर झटपट होणारा पदार्थ म्हणून पिठलं मेन्यू असतोच!!
पण मनी, तू लिहील्याप्रमाणे कोकणात मात्र कुळथाचं पिठलं अगदी हिट्ट प्रकार आहे! गावी गेलं की चिंचगोळे, आमसूलं व घरी केलेली कुळथाची पिठी आणतेच! बाळ अगदी चवीनं जेवतं!
त्यामुळे कुळथाचंही पिठलं असतं
त्यामुळे कुळथाचंही पिठलं असतं हे थेट लग्नानंतरच समजलं... एनीहाऊ नाही आवडलं कुळथाचं पिठलं फारसं!
>>>>
कुळथाच्या पिठल्याबाबत हे असे होण्याची शक्यता जास्त असते. कारण काही पदार्थांबाबत टेस्ट बडस लहानपणापासून डेवलप होणे गरजेचे असते अन्यथा अचानक खाल्ले आवडले/झेपले असे नाही होत.
सुंदर लेख!!! कुळथाची पिठी आणि
सुंदर लेख!!!
कुळथाची पिठी आणि भात आणि बाहेर धो धो कोसळणारा पाऊस ह्या आठवणीनेच बैचेन व्हायला होतेय.
मामी, फोटो पाहून तोंपासू.............
कुळथाचे पिठले आतेबहिणीकडे आधी
कुळथाचे पिठले आतेबहिणीकडे आधी खाल्ले होते. तेव्हा फारसे आवडले नव्हते, पण शेजारच्या काकुन्कडे शेन्गोळे खाल्ले तेव्हा मात्र अफाट आवडले. ऋन्मेष म्हणतो तसेच आहे. बेसनाला सरावलेल्या जीभेला कुळथाची टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो.
मामी फोटो का टाकलात्?:अरेरे: पटकन ताट ओढुन जेवायला बसावे असे वाटतेय.:फिदी:
धन्यवाद परत एकदा सर्वांना.
धन्यवाद परत एकदा सर्वांना.
मामी, तुला स्पेशल धन्स फोटो डकवलास म्हणून. तुमाखमै. माझी गुणाची बाय ती.
फोटो कातिल आलाय. सही झालाय पिठल. परफेक्ट कंसिटन्सी. फोटो बघितल्या मुळे जरा जिवात जीव आला माझ्या. आता पिठल्या शिवाय काही दिवस काढु शकेन फोटो पाहुन.
मामे, भाकरी पण मस्त झालीय !!
मामे, भाकरी पण मस्त झालीय !!
यम यम. कुळथाचं कधी खाल्लं
यम यम.
कुळथाचं कधी खाल्लं नाही पण नॉर्मल पिठलं भाकरी एकदम आवडता मेनु.
(पिठलं भात्/भाकरी आवडीने खाणारी लहान मुलं कुठे मिळतील?)
मला काल नाही करता आले . आता
मला काल नाही करता आले
. आता पुढच्या आठवड्यात करेन.
मामी पूर्ण डिश मस्तच. आज उपास आहे पण.
Pages