पिठलं ... आणि तोंड मिटलं

Submitted by मनीमोहोर on 14 September, 2015 - 18:56

कोकणात आमच्याकडे पावसाळ्यात भातशेती करतात आणि जमीनीचा पोत कायम राखणयासाठी हिवाळ्यात कुळथाचे पीक घेतले जाते. घरचेच असल्यामुळे सहाजिकच आमच्या आहारात भात आणि कुळीथ यांचा समावेश जास्त असतो. साधारण नोव्हेंबरच्या सुरवातीला कुळथाची पेरणी होते. याचे वेल असतात. कुळथाच्या वेलाचं हिरवगार शेत फार सुंदर दिसत. फेब्रुवारी मार्च मध्ये याच्या लांबट, शिडशिडीत शेंगेत दाणा तयार होतो. मग तोडणी, झोडपणी , पाखडणी वगैरे संस्कार होऊन चपटा , गोल, लालसर काळ्या रंगाचा दाणा मोकळा होतो खरा पण हाय, पुढे वर्षभर खाण्यासाठी आमच्या कोठी खोलीत बंदिस्तच केला जातो.

कुळथाचं शेत

From mayboli

आणि हे जवळुन

From mayboli

या कुळथाची इतर कडधान्याची करतात तशी मोड आणुन उसळ आणि कळण ही करतात. मोड आलेले लाल पांढरे कच्चे कुळीथ ही खूप सुंदर दिसतात. या उसळीत आम्ही इतर कोणता मसाला न घालता वेस्वार नावाचा फक्त आमच्याच भागात केला जाणारा मसाला घालतो. कुणी पाव्हणे मंडळी आली की खास म्हणुन एखाददा होतेच ही उसळ.

कुळथाचं पीठ करण्यासाठी त्याची डाळ करावी लागते. त्या साठी कुळीथ मडक्यात भाजुन नंतर ते जात्यावर भरडले जातात. मग पाखडुन सालं आणि डाळ वेगळी केली जाते. सालं काढलेली डाळ पिवळट दिसते. ही दळुन आणली की कुळीथ पीठ तयार. या डाळीच वरण अप्रतिम होत. डाळ शिजली की फार घोटायची नाही आणि जास्त पाणी ही घालायचं नाही. त्यात हळद , हिंग , मीठ आणि लाल मिरच्या, जीरं, सुकं खोबरं याच वाटण घालायचं. या वरणावर तूप न घालता नारळाचा घट्ट रस घालायचा . हे वरण, गरम भात आणि जोडीला पापड कुरडयांच तळण. आमच्याकडचा सॅालिड हिट बेत आहे हा.

नमनाला घडाभर कुळीथ खर्ची पडलेत आता पिठल्याकडे वळु या . अहो , उसळ,कळण काय किंवा वरण काय , हे पाहुणे कलाकार. कधीतरी होणारे. देशावर करतात त्या शेंगोळ्या तर आमच्याकडे कधी होतच नाहीत . खरं हुकमाच पान म्हणजे कुळथाचं पिठलं जे पानात वाढलं की पान खरोखर भरुन जातं. पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. आमच्याकडे कुळथाच पिठलं सगळ्यांना आवडतं . पिठलं म्हटलं की कुळथाचच, कधी चण्याचं केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही . ह्या पिठलं प्रेमावरुनच माझ्या एका सासुबाईनी " पिठलं... आणि तोंड मिटलं अशी मुळी म्हणच तयार केली आहे. घरात काही महाभाग आहेत पानात पिठल्याचा थेंब ही पाडुन न घेणारे . पण ते किती ? अपवादाने नियम सिद्थ होतो म्हणण्या इतपतच.

जनरली कोकणात न्याहारीला पात्तळ पेज असते पण आमच्याकडे न्याहारीला असतो पिठलं भात. करायला अगदी सोप पण चवीला भन्नाट. थोड्या तेलात कांदा परतायचा , नंतर त्यात पाणी घालायच. मीठ, तिखट आणि चवीला एखाद सोलं टाकायच आणि अंदाजाने पीठ घालुन ढवळत रहायच, गुठळी होऊ द्यायची नाही. पाच सात मिनीटं उकळवायचं , पिढल्याचा घमघमाट दरवळला की गॅस बंद . पिठल तयार. हिरवी मिरची, कोथिंबीर असे पिठल्याचे लाड क्वचितच होतात कोकणात. गरम भात, तूप , पिठलं आणि दही भात त्यात चवीला पिठलं . तोंडी लावायला आंब्याच लोणचं . न्याहरीचा न्याराच बेत. ओरपा हव तेवढ. अशी भरभक्कम न्याहारी झाली की माणूस आहारला नाही तरच नवल.

एवढ जरी असल तरी दुपारच्या जेवणात पिठलं कधीच नसत. कारण दुपारच्या जेवणातल्या पीठल्याचा संबंध अशुभाशी लावला गेला आहे. हां पण पानातली भाजी अगदीच कोणाच्या नावडतीची असेल तर सकाळच्या उरलेल्या पिठल्याचा वाडगा त्याच्या समोर ठेवला जातो.मग त्याच जेवण बिनबोभाट होतं. शिळं पिठलं ही काही जणांना जास्त आवडत पण मला स्वत:ला नाही आवडत ते.

सणासुदीच्या दिवशी दुपारच गोडाधोडाचं जेवण, ते ही थोड्या उशीराच झालेलं. रात्री जेवणार नाही फक्त ताक घेऊ असं सांगुन पुरुष मंडळी ओटीवर गप्पा मारत बसलेली असतात. घरातल्या इतर माणसांसाठी आणि मुलांसाठी रात्री भात पिठलं केलच जातं. पिठल्याचा घमघमणारा दरवळ ओटीवरच्या पुरषांना स्वयंपाकघरात खेचुन आणतो. " घासभर पिठल भात खाईन म्हणतो" असं म्हणत एकेकाची विकेट पडायला लागते . आम्हाला याचा अंदाज असतोच. पिठल भात जास्तच केलेला असतो. पण मंडळी कधी कधी असा काही हाणतात पिठल भात की आम्हाला दोन्ही पुन्हा करावं लागतं . (स्मित )

पिठलं फक्त कोकणातल्या आमच्या हेड आॅफिस मध्येच केलं जात असं नाही तर मुंबई पुण्याच्या शाखांमध्ये ही ते तेवढ्याच आवडीने केलं जातं. पिठाचा स्टॅाक कायम लागतो घरात. अगदाी परदेशी रहाणारी मंडळी ही बॅगेतुन कुळथाच्या पिठाची पुडी आवर्जुन नेतात. ह्या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तुना चटकन् लागतो व तो लवकर जात ही नाही म्हणून जाड पॅकिंग करुन नेतात पण नेल्याशिवाय रहात नाहीत. इथे मात्र पीठ कधी संपलं तर चार दिवस आमटी, सार असं करुन काढले जातात, पण नंतर गावाला फोन केलाच जातो पीठ कुरिअर करा असा. वास्तविक हल्ली सगळीकडे कु. पी विकत मिळतं तरी ही कुरिअरने पीठ मागवणे हे खरं तर कोब्राना शोभत नाही. पण काय करणार? विकतच्या पीठाला आमच्याकडे बिग नो . पीठ घरचचं हवं. त्या साठी मग कुरिअरचा खर्च ही सोसायची ह्या कोब्रांची तयारी.

जाऊबाई सर्दी पडशाने बेजार झाल्या की जेवताना म्हणतात ,“ पिठलं वाढ ग थोडं, तोंडाला रुची येईल जरा " नवीन सुना घरात रुळायच्या ही आधी पिठलं आवडीने खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर रहाणारी मुलं घरी आली की "काकू, पिठलं पोळी वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये " असं म्हणतात. दोन वर्षाचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवत आणि भात पिठलं मिटक्या मारत खात .

या सगळयामुळे पिठलं प्रेमाची आमच्या घरची ही परंपरा या पुढे ही अशीच कायम राहील याची खात्री पटते आणि मन आश्वस्त होते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. मला कुळथाच्या पिठल्याची सवय लग्नानंतर झाली. नवर्‍याच्या मते, पिठलं बाय डीफॉल्ट कुळीथाचंच. मला अजूनही "कोकणी रेसिपी" नीट न समजल्यानं (:फिदी:) हे पिठलं कायम नवराच करतो. मला आयतं मिळाल्यानं चव अजूनच चांगली लागत असणार.

आमच्याकडेही ब्रेकफास्टला पिठलंभात, पिठलंपोळी (भाजी पोळीसुद्धा) आयटमस हिट आहेत.

ममो, तुमचे लेख फार आवडतात. तुम्ही फार सहज आणि ओघवतं लिहिता.

काय चविष्ट लिहिल आहे. लेखन खुपच सुंदर झाल आहे. लिहत रहा.

आमच्याकडे बेसनाच असत. कुळीथ अजून आमच्या एरीयात दिसल नाही. त्यामुळे फक्त बाहेर जाण झाल म्हणजे कोकण-अलिबाग साईडला की तिथून मी विकत घेऊन येते कुळीथ पीठ.

मनीमोहोर, किती सुंदर लिहिले आहे तुम्ही. तुमच्या आठवणींत कोकणाविषयीचा, तुमच्या घराविषयी जिव्हाळा आणि अभिमान इतका ओतप्रोत भरलेला असतो >>>> +११११
तेही सासरच्या घराविषयी लिहिलेलं असतं. वाचतांना असं वाटतं की याच घरात जन्मलेली, वाढलेली एक मुलगी लिहीतेय घराचं, रितीरिवाजांचं कौतुक. सासरच्या घरात अगदी समरसून गेल्याची पोचपावतीच आहे ही ! ग्रेट.

रेसिपी तर एकदम मस्त अ‍ॅज युजवल आणि लेखनशैलीही !.

जमल्यास फोटोही टाका पिठल्याचा

फार सहज सोपं मस्त आणि पोटभर लिहीलं आहे, पिठल्यासारखं!
मला पिठलं प्र चं ड आवडतं. कसंही, कशाचंही, कशाहीसोबत.

ममो................अग्ग क्काय्य(!) जिव्हाळ्याचा विषय घेतलास!
माझ्याकडे अजूनही कोकणातूनच येतं कुळीथपीठ. दुकानातून विकत बिकत घ्यायचं म्हणजे अग्गदीच काय ते हे!:फिदी:
माझे सासरे(तेही कोकणीच) कोकणात गावी गेले(कामानिमित्त) की माझ्या सासूबाईंच्या माहेरी जायचे. आणि सासूबाईंच्या वहिनीला सांगायचे.........मस्तपैकी कुळिथाचे पिठले आणि भात कर. आणि त्या (म्हणजेच माझ्या नवरोबांच्या मामी ना त्या....) अगदी इडली, गुलाबजाम असलं काही तरी करण्याच्या खटपटीत ....कारण जावई माणसाला कसलं ते कु. पिठलं करून घालायाचं.
त्यांच्यातले हे डायलॉग अज्जून आठवताहेत!
पण एक आहे...............जर आयुष्यात कधीच हे खाल्ले नसेल तर याची टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो.
पण एकदा का चटक लागली......................................................................................................!!!!!!!!!!!
चला बै........................रात्रीचा मेनू ठरला ...कुपि नक्कीच!

सुंदर लिहिलंय.. यावेळी भारतवारीत मायबोलीकर शोभाने घरचे पिठ दिलेय.
मालवणला आमच्या घरी पिठले म्हणण्यापेक्षा पिठी म्हणतात. शिळे पिठले खरेच छान लागते कारण ते जेलीप्रमाणे घट्ट होत असते.

कुळथाचे पिक देशावर अजिबात घेतले जात नाही, पण पुर्वापार तिथे कुळीथ वापरात आहेत. कोकणातले व्यापारी कुळीथ, सुके खोबरे, हळद, जवळा असा माल घेऊन विशाळगड मार्गे वरती व्यापाराला येत.

देशावर शेंगोळ्याबरोबरच माडगं पण करतात. पिठ पातळसर शिजवून त्यात गूळ आणि मीठ घालून पितात. हे पेय शक्तीवर्धक आहे. खास करून थंडी ताप आला असेल तर अवश्य देतात.

माझ्या शिक्षिका, सौ बापट यांनी मला तूपाची बेरी घालून केलेले कुळथाच्या पिठाचे लाडू शिकवले होते ( इथे आहे कृती ) भन्नाट लागतात शिवाय पोट भरून जाते, एक लाडू खाल्ला तरी.

गोव्यात, मोड आलेल्या कुळथात कोहळा वगैरे घालून, कोदोल करतात. तेही मस्त लागते.

ममो, सुंदर. माझ्या जिव्याळ्याचा विषय.

आमच्या घरी पिठले म्हणण्यापेक्षा पिठी म्हणतात.>>>>>>>>>> +१ . पिठलं म्हणजे फ़क्त बेसानचं असं आमचं गणित. कुळीथाच्या पिठाचा वास तर दरवळतोच पण पिठी केल्यावर तर आहाहा! तोंपासू. बाहेर मस्त पाऊस आणि जेवायला गरम गरम पिठी भात. अगदी स्वर्ग सुख! आजही आमच्या घरात नेहमी पिठी असते. आणि अजूनही मी लहानपणी सारखीच, पिठी केलेली कढई शेजारी घेऊन जेवायला बसते. कढईतली पिठी संपल्यावर, कडेला लागलेली जी जरा घट्ट झालेली पिठी असते ती , अंगठ्याने खाण्याची सवय माझी अजून तशीच आहे. काय मस्त लागते ती! कोकणात ती लोखंडी कढईत करतात त्यामुळे जास्त छान लागते. Happy

ह्या पिठाचा वास बॅगेतल्या इतर वस्तुना चटकन् लागतो व तो लवकर जात ही नाही म्हणून जाड पॅकिंग करुन नेतात >>>>>>...दिनेशदा, हे वाचताना तुमचीच आठवण.झाली. Proud

मी कधीच खाल्ले नाही हे कुळथाचे पिठले . आता खावून बघायला पहिजे,
पण आमच्यात पिठले म्हणजे बेसनाचेच . त्यामुळे जरा अवघडच आहे

सुशोभा... पुर्वी मालवणहून आणायच्या सामानात कुळथाचे पिठ, खाजा, काजू, सुके बांगडे, आमसूले, केरसुण्या, खटखटे लाडू, चुनकापं असलं काय काय असायचं. प्लॅस्टीक उपलब्ध नसायचे.. मग यस्टीत नुसता वासांचा कल्लोळ असायचा.

कुपिचा वास लागतो म्हणून गावाहून त्याला एखादा कपडा बांधून मग पिशवीत ठेऊन आणतो. नाहीतर सर्वाना वास लागतो. खाजा, खटखटे लाडू अजूनही आम्ही आणतो गावाहून. तिथे बुंदीचे गुळाचे लाडू पण मिळतात ते नवऱ्याला खूप आवडतात.

वेसवार विशिष्ट भागात केलं जातं. माझ्या माहेरी संगमेश्वर तालुक्यात नाही वेसवार हा प्रकार, सासरी आल्यावरच मला कळला तो प्रकार. देवगड तालुक्यात फेमस आहे.

डाळीचे पिठलं आवडतं पण कु पि प्रचंड आवडतं.

मस्त लिहिलंय. आज्जीमुळे मला कुळथाच्या पिठल्याची चव कळाली व गोडी लागली. आजी कोंकणातली असल्यामुळे तिला कुळथाबद्दल विशेष प्रेम. ते प्रेम का, हे तुमच्या लेखातून कळतंय. Happy गरमागरम पहिल्या वाफेचा आसट भात, त्यावर लोणकढं तूप आणि सोबत कुळथाचं पिठलं = स्वर्ग.
तांदळाची भाकरी, कुळथाचं पिठलं, वरून तूप आणि सोबत आंब्याच्या लोणच्याची फोड = डबल स्वर्ग.
पावसात भिजून आल्यावर किंवा थंडीच्या दिवसांत या पिठल्याची मजा काही औरच! Happy

Maze origin Marathwada, aaj var rahile Pashchim Maharashtrat, tondi boli bhasha Puneri+Kokanatil bhashechi zak, Sasar Kanadi, mala ek shabda dhad yet nahi Kanaditala. Kahi kama nimitt koakanat jane zale & tethil 2 padartha prachannnnnndd aawadale & te me banavayla pan shikle lagech.
1) Ukadiche modak
2) Kulithache pithl
Mala kahi koni kulithache tayar pith pathavnare nahi. So, me kulith thode korde bhajun, thand karun, dalayala dete girani var. Sale kadhali nahit tar prakrutis te apaykarak aahe ka?
& me je pithale banavate, tyat fodanis kanda, lasun, lal suki mirachi, hing, halad, jeere-mohori etc. ghalate & sole panyat ghalate ukli aalya nantar. Chaan lagte.

काल अपलोड केलं पिठलं आणि आत्ता आले माबोवर. एवढे प्रतिसाद ! खुप खूप धन्यवाद सगळ्यांना. पण खरं सांगु का पिठल ते ही कुळथाच , म्हणजे अगदी जिव्हळ्याचाच विषय आहे सर्वांचा .

आज एवढच. सविस्तर प्रतिसाद लिहीते लवकरच.
फोटो नाहियेत आणि लगेच काढण शक्य ही नाहीये तेव्हा तुम्हीच कोणी केलं तर टाका. मी केलं की टाकीनच. ज्यांनी अजुन चाखलेलं नाहीये त्यांनी लवकरच खाऊन बघा. ज्यांना आवडत नाही त्यांनी परत खाऊन बघा आणि ज्यांना आवडत त्यांनी असाच लोभ करा कु पि वर.

क्रिश्नन्त | 15 September, 2015 - 17:11
कुळथा काहि महिति नाहि फोतु टाकाल का
>>

क्रिश्नन्त,
कुळथाचं पिठलं म्हणजे कुळथा काय असं नाही विचारायचं. कुळीथ म्हणजे काय ते विचारायचं Wink

इथे फोटो आणि सविस्तर चर्चा झालीय बघा.

मस्त! Happy

कुळथाचं पिठलं भारी आवडतं. (न आवडणारे कोकणके नामपे धब्बा आहेत! :P)
पिठल्यात आमसूल, जिरं+सुकं खोबरं वाटून (हे वाटण फार लाडात आल्यास आणि वेळ असल्यास), आणि फोडणीत सुक्या लाल मिरच्या आणि भरपूर लसूण!! Happy

सारी दुनिया एक तरफ और कुळथाका पिठला एक तरफ! Proud

Pages