मेतकूट कसे बनवतात?

Submitted by Mother Warrior on 9 September, 2015 - 20:13

माझा मुलगा सध्या मेतकूट भात खातो आवडीने. त्याच्या ग्लुटेन फ्री डायेट मध्ये बसतोही तो भात. मात्र मेतकूट पुण्यातील आर पी वैद्यांचे हवे. जरासे तिखट असते ते. मी भारतातून मागवत असते. पण जर सहजरित्या घरी करता येण्यासारखे असेल तर मी करून पाहीन. बहुतेक त्या पाकिटावर घटक पदार्थ आहेत, पण मला प्रमाण माहित नाही. पुण्यातील कोणी ते मेतकूट चाखून पाहिले तर चवीवरून रेसिपी सांगता येईल का?

थँक्स इन अ‍ॅड्व्हान्स!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ वाटी हरबरा डाळ १/२ वाटी

१ वाटी हरबरा डाळ
१/२ वाटी तांदूळ
१/२ उडीद डाळ
२ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
२ टीस्पून तिखट (किंवा ३-४ सुक्या मिरच्या)
१ टीस्पून धने
१ टेबलस्पून जीरे
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून मेथी
१/२ टीस्पून मिरे
आवडत असल्यास जायफळ किंवा जायपत्री
सुंठ
२ टेबलस्पून गहू (ऐच्छिक)

सगळे जिन्नस वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. हळद, हिंग तसेच घातले तरी चालतील. गार झाल्यावर बारीक करून हवाबंद बाटलीत भरून ठेवावेत. काही लोक यात १-२ चमचे गहू देखिल घालतात. बाकीचे जिन्नस देखिल आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करता येतात.

माझी आई पांढरा हिंगाचा खडा, हळदपूड ऐवजी आक्खे हळकुंड, तिखटाऐवजी लाल सुक्या मिरच्या घेते. त्यामुळे असेल कदाचित पण तिचे मेतकूट मी करते त्यापेक्षा जास्त खमंग लागते.

अंजली दळते कशावर? नेहमीच्या कॉफी ग्राईंडर वर किंवा मिक्सरवर होते का?? (भाजणीच्या गिरणीतून दळून मिळायचे. गहू नाही घालत घरी कारण उगीच पेस्टी टेस्ट वाटते.)

माझ्याकडे सुमीत आहे, त्यावर मसाले छान बारीक होतात. वाटलंच तर सपीठाच्या किंवा मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचे.
मीही गहू घालत नाही. आईही घालत नाही. मला नुसत्या डाळींचं आवडतं.

मी कालचं आजीला फोन केला होता हेचं प्रमाण विचारायला. माझी आजी मेतकुट आणि लोणची विकणे हाच व्यवसाय करायची.
तिचे मेतकुटाचे प्रमाण
तांदुळ पाव किलो
चणाडाळ अर्धा किलो
उडीदडाळ १०० ग्रॅम
धणे जीरे प्रत्येकी १ चमचा
लवंग आणि मिरी दाणे प्रत्येकी १०-१२
लाल सुक्या मिरच्या ३-४
हळकुंड १ मोठे
खडा हिंग १ मोठा चमचा पावडर होइल एवढा
हे सगळं छान खमंग भाजुन दळुन आणायचं.

मेतकूट नेहमीच बारीक चाळणीने चाळून घ्यायचे. वरचा भुरा पिठ पेरून करायच्या भाजीत ढकलायचा.

मेतकूट खायच्या आयडीया..

१) तूप भातावर मीठ आणि मेतकूट घ्यायचे आणि कालवायचे.
२) नुसते मेतकूट घेऊन त्यात दही व थोडे मीठ घालायचे
३) ताजी भाकरी घेऊन त्यावर तूप व मेतकूट घालायचे
४) ब्रेड भाजून घेऊन त्यावर तूप वा तेल घालून त्यावर मेतकूट घालायचे
५) पोहे भिजवून त्यावर मीठ व मेतकूट घालायचे. मग त्यावर दही किंवा फोडणी घालायची.

दोन रेसिप्या ऑलरेडी आहेत इथे मायबोलीवर:

http://www.maayboli.com/node/48548

http://www.maayboli.com/node/48552

इथेही अजून दोन प्रकार आले आहेत. त्यामुळे मदर वॉरियर, प्लीज शब्दखुणांमध्ये 'मेतकूट, मेतकुट' हे अ‍ॅड कर म्हणजे पुढच्या वेळी हाही धागा दिसेल कोणाला मेतकुटाचे प्रमाण हवे असेल तर.

मेतकुटाचे डांगर (दही+ मीठ + कच्चा कांदा बारीक चिरून + वरून फोडणी + आवडत असल्यास चिरलेली कोथिंबीर) हे पोळी, ब्रेड, भाकरी, आमटी-भाताबरोबर, ताकभाताबरोबर किंवा तूप-मीठ-भाताबरोबर म हा न लागते. नुसते डिप म्हणूनही वापरू शकतो.

मवॉ, ओट्स पाण्यात शिजवून घेऊन त्यात तूप-मेतकूट घालून खायला मस्त लागतात.

अमि, गरमागरम मऊ भातावर तूप आणि मेतकूट घालून खाणे ही माझ्या आनंदाची परमावधी आहे. मला मेतकूट थोडेसे रवाळ असलेलेच आवडते. अगदी पीठ नाही आवडत.

गरमागरम मऊ भातावर तूप आणि मेतकूट घालून खाणे ही माझ्या आनंदाची परमावधी आहे. मला मेतकूट थोडेसे रवाळ असलेलेच आवडते. अगदी पीठ नाही आवडत. >> मंजुडे हजारदा अनुमोदन. आत्ता वातावरण असलं भारी आहे बाहेर. मेतकूट भात पर्फेक्ट डिश आहे.

अंजली ह्यांनी सांगितलेलेच जिन्नस माझी आजी वापरत असे.

गरमागरम मऊ भातावर तूप आणि मेतकूट घालून खाणे ही माझ्या आनंदाची परमावधी आहे. मला मेतकूट थोडेसे रवाळ असलेलेच आवडते. अगदी पीठ नाही आवडत. >> अगदी अगदी. इथे छान थंडीसुद्धा असते रात्री अगदी योग्य वातावरण.
माझ्याकडे मेतकुट आहेच पण गरम मऊ भात Sad
Missing home !!!

हात्तिच्या!
मला वाटले मेतकूट म्हणजे काही प्रेमप्रकरण कसे जुळवावे याची माहिती असेल.
हे असले मेत्कूट कशाला बनवायचे? इतर पदार्थ काय थोडे आहेत का खायला?

बरं, आता एक चवळटबा कॅटेगरीमधला प्रश्न. मेतकूट गिरणीत दळायला दिलं आणि गिरणीवाल्यानंते तांदळावर दळ्लं तर काय प्रॉब्लेम होत नाही ना? ( मी बर्‍याचदा बायांना अमक्यावर तमकं दळलं म्हणून चव खराब् झाली वगिअरे बोलताना ऐकलंय! म्हणून हा प्रश्न. लगेहाथो कुणीतरी कशावर काय दळायचं नाही याची नियमावली टाकलीत तरी चालेल. आम्ही दुआ देऊ)

मदर वॉरिअर , माझ्याकडे घरी केलेल आईच्या हातच अतिशय छान मेतकुट भरपूर आहे. तुम्हाला चालत असेल तर पाठवुन द्यायला आवडेल मला. आमच्याकडे घरी कोल्हापुरला मेतकूत ,लोणच लागतच जेवणात.

मेतकुटाबरोबरचा भात मात्र असट अथवा गुरगुट्या या कॅटेगरीतलाच हवा. मोकळा पुलावसारखा करून त्यात अजिब्बात मजा येत नाही.

नंदिनी, तांदळावर दळलं तर प्रॉब्लेम येऊ नये कारण तांदूळ हाही घटक आहेच त्यात. पण आई घरीच मिक्सरवर बारीक करते. गिरणीत दळायला देत नाही.

यंदा येताना घाई झाली आणि आणायला विसरले. आता करून बघेन. माझ्याकडे वाय्टामिक्स आहे बहुतेक हे दळण व्हावं त्यात.

>> अमक्यावर तमकं दळलं
अगदी. आजकाल मुंबईत माझ्या माहितीतले सगळे कुठल्यातरी ब्रँडची रेडिमेड पीठं वापरतात त्यामुळे मी हे संभाषण फार मिस करते आजकाल Happy

माझ्याकडे वाय्टामिक्स आहे बहुतेक हे दळण व्हावं त्यात. >>> वायटामिक्स मधे दगड घातलेस तरी त्याचं मेतकूटाएवढं बारीक पीठ होईल बहुतेक ;).

नंदिनी, आई गटातील समस्त महिला (तिच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या आया, हाताशी मुले नसलेल्या महिला इ इ) विशिष्ट वारी गिरणीवाला भाजणी दळून देतो म्हणून सायकलवर ड्बे लावून गिरणीत पिटाळायच्या. (५- १० किलो गव्हाचे डबे असतील तर मोठे भावंड जायचे, पण असं फुसकट २-३ किलो दळण असेल तर आमचा नंबर लागायचा). त्या दिवशी भाजणी, मेतकूट असे एवढेच पदार्थ असायचे. गव्हाचा डबा एकवेळ गिरणीत कधी रात्रभर राहिला तर चालायचे. पण असे पदार्थ लगेच परत घेवून यायला लावायच्या. Sad
मग एका काकूंकडे 'घरातील चक्की' प्रकार आला. त्यांना फोन करून जावे लागायचे (किंवा त्यांचा फोन यायचा). इथे रात्रभर भाजणी मेतकूट राहिलं तरी चालत असे. खरं तर मराठी बाई खाईल ना मेतकूट, भैय्या गिरणीवाला खाईल का असे प्रश्न आई गटाला नसायचे. कमिंग बॅक टू योर क्वेश्चन - अमक्यावर तमकं हा प्रॉब्लेम मेतकूट-भाजणीबद्दल फार ऐकला नाही कधी. थोड्क्यात एक्स्क्लुजिव्ह प्रिमीयम फाईन मेतकूट ग्राइंडींग सर्व्हिसेस हवी Wink

खरं तर मराठी बाई खाईल ना मेतकूट, भैय्या गिरणीवाला खाईल का असे प्रश्न आई गटाला नसायचे. >> smiley36.gif

खरं तर मराठी बाई खाईल ना मेतकूट, भैय्या गिरणीवाला खाईल का असे प्रश्न आई गटाला नसायचे.
च्च! अहो खाई ना का थोडे.
नाहीतरी तिच्या घरातील चक्कीवर फुक्कटच दळून घेता ना! पैसे नाही देत ना? देत असाल तर तिथे बसून लक्ष ठेवा त्या बाईवर.
मग बघा ती बाई तुम्हाला पुनः दळून देते का?
नि तिलाच पैसे द्यायचे तर बाजारातून सरळ मेतकूट विकत आणलेले काय वाईट?

उग्गीचच खाण्यापिण्याचे चोचले नि त्यात लोकांवर अविश्वास. मग आणावी घरातील चक्की आपली आपण.
किती ती चर्चा!

पैसे देतो हो, झक्की! घरगुती चक्की हा दळणकाकूचा व्यवसाय असतो, बिनापैसे त्याच दळून देणार नाहीत. पाच किलो उचलता यायचं नाही अशा वयात आम्ही काय त्या दळणकाकू वर लक्ष ठेवणार. त्या काकूच आमच्यावर लक्ष ठेवायच्या खोड्या करू नये म्हणून Biggrin विकतच मेतकूट आई-आजीने केलेल्या इतकं चवदार नाय हो लागत म्हणून एवढी चर्चा. मेतकूटासाठी दळणकाकू आई-आजीच्या विश्वासातील असते, गिरणीवाला भैय्या फारसा नसतो. का ते मला विचारू नका, मला अजून पर्यंत कळलेलं नाही.

मामी, हळद घरी करायचा प्रयत्न एकदा केलेला आहे. घरच्या मिक्सर, ग्राईंडरवर गिरणीतल्या सारखी पीठ हळद होत नाही. थोडी रवाळच राहाते. कितीदाही चाळलं, अन दळत राहीलं तरी ते टेक्श्चर घरी साधत नाही. तीच गत मेतकूटाची. घरी केलेलं गिरणीतल्या पेक्षा जरा रवाळच राहातं. पण कुणाकुणाला तसं आवडतही... सो आवड आपली आपली Happy

मी करते घरी मेतकुट. बाजारच्याइतकं सपीट नसतं. पण जितकं असतं ते आवडतं. ड्राय ङ्राईंडर वर दळते. प्रमाण हेच अगदी वर अंजलीने दिलय तेच.
आम्हा बाहेर रहाणार्‍यांचा प्रॉब्लेम एक असा असतो की, भारतातून इथल्या दुकानात येणारा पदार्थं किती दिवस कुठेकुठे शेलफवर बसलेला असतो. त्याचा ताजेपणा गेल्यात जमा.. कितीही छान पॅकिंग असलं तरी.

मी घरी दळण्यामागे चोचला एकच - ताजेपणाची म्हणून चव असते ती लागावी. कुणाकडे घरघंटि वगैरे असती तर नक्की दळून घेतलं असतं.

अंजली तुझ्या प्रमाणाने केलय. फक्त पिल्लुसाठी केलय सो मिरची वगळली. पण मस्त खमंग झालय. आणि तसं झटपटही झालं. Happy थँक्यु ग
मदर वॉरियर तुलाही थँक्यु Happy

IMG_20150913_181039.jpg

अवल, मेतकूट मस्त दिसतंय. आंबेमोहोर तांदळाचा आसट गुरगुट्या भात, ताजं मेतकूट, भsssरपूर तूप आणि त्याच्या बरोबर लिंबाचं गोड लोणचं. स्वर्ग :).

अंजली, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मेतकूट करून पाहिले. छानच खमंग झाले. धन्यवाद!
मुलाला लेन्टिल्स चालत नाहीत म्हणून मी दोन प्रकारची मेतकुटं केली. डाळ्शिवाय व नेहेमीचे. (हरभरा / उडिद डाळ ह्या लेन्टिल्स मध्ये मोडतात का हे नक्की समजेना. इंटरनेटवर लेन्टिल्स म्हणल्यावर मसूराचे चित्र आले.) . सध्यातरी मुलगा नेहेमीचे मेतकुट घालून भात आवडीने खात आहे. खूपच आभारी आहे.

हात्तिच्या!
मला वाटले मेतकूट म्हणजे काही प्रेमप्रकरण कसे जुळवावे याची माहिती असेल.
हे असले मेत्कूट कशाला बनवायचे? इतर पदार्थ काय थोडे आहेत का खायला?

>>>
बोवाजी हे आवडले.
मेतकूट हा शब्द मेतकूट जमणे या वाक्प्रचारातच ऐकलेला होता. तो खाद्यपदार्थ आहे हेच मुळी माहीत नव्हते. मला वाटते रा ग गडकर्‍यानी गोविंदाग्रज नावाने जे विनोदी लेखन केले आहे त्यात काही विनोदी पाककृती दिल्या आहेत त्यात या मेतकुटाचा उल्लेख होता. त्यामुळे मेतकुट या शब्दाला एक विनोदी छटा माझ्यालेखी आहे. त्याचा अर्थ लफडे, भानगड, प्रेप. असाच आहे. बोवाजीना हेच अभिप्रेत आहे. पुढे प्रत्य्क्षात अनेक दशकानंतर मेतकूट बाजारातून आणून चाखले तर अजिबातच नाही आवडले. त्या विषयी जे वाचले त्यावरून मेतकूट भात हेच फक्त एक दुजे के लिये आहेत असे लक्षात आले. तसेच भाताबरोबर वरण करण्याच्या कंटाळ्याला तो पर्याय असावा असे वाटते Happy

अय्या हूड, तुला मेतकूट माहीत नाही? जरा भरड दळले की डांगर.

गरम भात, तूप मीठ व मेतकूट कालव आणि बरोबर एक दोन चमचे सायीचे दही घेऊन खा. हीच तुला शिक्षा. Happy दिवे

जरा भरड दळले की डांगर.
>>
मामीसाहिबा ह्याचा अर्थ तर अजिबातच कळ्ळा नाही. डांगर म्हणजे भोपळ्याचा एक प्रकार ना? तो कसा दळतात?

मेतकुटाचेच मटेरिअल भरड दळायचे. किंवा बहुतेक मेतकूट पावडर चाळून घेतल्यावर हे वर उरत
असेल. त्यात मीठ, कांदा चिरून आणि दही व कोथिंबीर घालायची, मोहरीं व हिंगाची फोडणी द्यायची. भाकरी पोळीला लावून मस्त खाता येते. हे ते डांगर. डांगर भोपळा तो वेगळा. आमचे म म्मी पप्पा वडूज भागातले शेत करी. ते नेहमी खात.

बोम्बला ! आमचेकडे जनरेशन नेक्स्ट ला नेहमी फडफडीत , प्रत्येक दाणा सुटा असलेला बिर्याणीसारखा भात लागतो. स्वतः मात्र चिक्कट भात बनवतात !