थेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय

Submitted by सावली on 8 September, 2015 - 02:23

यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .

पण यावर्षीची दुष्काळी अवस्था पहाता ज्या ज्या शहरांत/ गावात रोज काही तास किंवा अगदी २४ तासही पाणी उपलब्ध आहे त्यांनीही स्वतःला पाणी बचतीची सवय लावुन घ्यायला हवी. इथे पाणी वाचलं तर ते दुसर्या ठिकाणी जिथे कमी उपलब्धता आहे तिथे देता येईल असे वाटते.

रोजच्या कामात कुठे पाणी वाचवता येईल , कुठे कमी पाण्यात भागवता येईल त्याबद्दलच्या उपायांची चर्चा या धाग्यात करुयात.

प्रत्यक्ष पाणी बचत

#
बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे म्हणुन हवे तितके उपसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आधीच कमी असलेली पाण्याची पातळी अजुनच कमी होईल.

# गाडी धुण्यासाठी पाईप लावुन फवारा मारुन न धुता, बादलीत पाणी घेऊन धुतले तर खुप पाणी वाचते.

# घराची फरशी, बाल्कनी, खिडक्या भरपुर पाणी वापरुन न धुता, पुसुन घेता येईल.

#
पाण्याच्या नळासाठी एक जोडणी मिळते, त्यामुळे पाण्यात हवा मिक्स करुन पाण्याचा फ्लो जास्त वाटतो. ते जोडुन घ्यावे त्यामुळे नळ उघडल्यावर कमी पाणी वाया जाते.

#
भाज्या धुतलेले सगळे पाणी बादलीत साठवुन ठेवुन झाडांना घालावे किंवा टॉयलेटमधे ओतण्यासाठी ठेवता येईल.

#
भांडी कमीत कमी पाण्यात घासण्यासाठी वाहत्या नळाखाली न धुता बादली / टब मधे पाणी घेऊन धुता येतील.

#
जेवल्यावर लगेच एखाद्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यातच सगळ्या ताटं, वाट्या व इतर भांडी यांचे खरकटे काढुन टाकता येईल. हे वाहत्या पाण्याखाली केल्यास जास्त पाणी लागते.

#
कपडे धुण्यासाठी शक्यतो वॉ. म. टाळता येईल. दुसरा उपाय नसल्यास एकावेळे दोन / तीन दिवसाचे कपडे साठवुन धुतले तर कमी पाणी वाया जाईल.

#
अगदीच पाणी टंचाई येईल तेव्हा मशिन मधे तीन वेळा पाणी टाकुन कपडे विसळले जातात. त्यातले दुसर्या आणि तिसर्या वेळेचे पाणी एखाद्या ड्रम मधे साठवल्यास ( हे वेळखाऊ काम आहे मात्र ) टॉयलेट्मधे टाकायला , कपडे भिजवायला, भांडी पहिल्यांदा विसळुन घ्यायला वगैरे वापरता येईल. साबणाचा अंश असल्याने हे झाडांना वापरता येणार नाही.

#
जेवताना ग्लासमधे घेतलेले, वॉटरबॅग मधुन उरलेले पाणी सुद्धा फेकुन न देता हात धुणे किंवा झाडांना घालणे यासाठी वापरता येईल

# घरी किंवा ऑफिसमधे स्प्लिट एसी असेल तर त्या एसीच्या पाईपमधुन पाणी बाहेर येते ते एका बादली साठवुन वापरता येईल. हे खरेतर अगदी शुद्ध, म्हणजे हवेतुन आलेले पाणी असते. मात्र एसीचे पाईप साफ नसल्याने पाणीही खराब होते.

#
घरातल्या सगळ्यांना वेळोवेळी बोलुन सध्याची पाण्याची परिस्थिती आणी दुष्काळ याबद्दल बोलुन पाणी बचतीसाठी उद्युक्त करायला हवे. तसेच घरकामाला येणार्‍या बायकांनाही याबाबत सांगत राहुन, पाणी कमी वापरायचे सुचवायला हवे.

# ग्रे वॉटर ट्रिटमेंट प्लांट इमारतीत बसवता येईल, हा खर्चिक उपाय आहे शिवाय जागाही लागते.

अप्रत्यक्ष पाणी बचत करताना अन्न वाया न घालवणे हा खुप मोठा उपाय आहे. या वर्षी काही पिकलंच नाही तर आपण सगळेच काय खाणार त्यामुळे अन्नधान्य आयात केले तर त्याचा एकुण खर्च वाढणार.
तसेच वीजेची बचत करणे मह्त्वाचे आहे. हायड्रोलिक प्लांट पासुन वीजनिर्मिती यावर्षी अगदी कमी होण्याची शक्यता आहे.

अजुन काही उपाय असतील तर इथे लिहा.

प्रतिसादातुन कॉपी केलेल्या कल्पना

#(- अमा )
जमीन पुसणे एक दिव्सा आड

# (- हर्पेन)
टॉयलेट मधल्या एकेच बटन असलेल्या फ्लश टँक मधे एकेक लिटरच्या दोन बाटल्या ( पाण्याने भरलेल्या ) ठेवल्या असता प्रत्येक फ्लश मागे २ लिटर पाणी वाचवले जाऊ शकते. तरीही फ्लश मात्र व्यवस्थित होते. टँक कपॅसिटीचा जरा नीट अंदाज घेऊन अजून एखादी बाटली ठेवता येते का ते बघावे.

( -अरुंधती कुलकर्णी )
#
घरात बाल्कनीत किंवा अंगणात झाडे, रोपे वगैरे लावली असतील तर त्यांच्या मुळांजवळचा भाग सुका पालापाचोळा, निर्माल्य, सुकलेली फुले इत्यादींनी झाकल्यास जमीनीतला ओलावा टिकायला मदत होते. त्यांना खरकटी भांडी विसळलेले पाणी (गाळून) घालू शकता.

#
शॉवर वापरण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे.

#
जिथे शक्य आहे (आणि पाणी वाया जायची भरपूर शक्यता आहे तिथे) नळाच्या पाण्याची धार कमीच करून ठेवणे. खास करून वॉशबेसिन वापरताना भरपूर पाणी वाया जाते. नळाची धार कमी करायला खाली एक वेगळा नळ असतो बऱ्याच वॉशबेसिनना!

#
दात घासणे, दाढी करणे यांसाठी वाहत्या नळाचा वापर न करता भांड्यात पाणी घेऊन ते गरजेप्रमाणे वापरणे.

#
घरातील व सोसायटीतील गळणारे सर्व नळ, पाईप्स दुरूस्त करून घेणे.

#
आपल्या प्रभागात / गल्ली किंवा एरियात कोठे पाणी वाया जात असेल तर शासनाकडे तशी लेखी तक्रार करून तिचा पाठपुरावा करणे.

#
सोसायटीच्या टाकीचे पाणी वाहून न जाईल अशी व्यवस्था करणे.

#
गाड्या पिण्याच्या पाण्याने न धुता कपडे धुण्यासाठी वापरलेले साबणपाणी वापरून त्याने धुणे.

#डीविनिता
रोज रात्री बिल्डिंगचे गच्चीतले व्हॉल्व्ह बंद करतो, व सकाळी साडेसहाला परत चालू करतो. यामुळे वरच्या टाकीत पाणी साठते, लवकर सोडलेले पाणी नळ चालू राहिल्याने जात होते ते आता वाया जात नाही

(आशिका )
#
हौसिंग सोसायटीच्या किंवा ज्यांकडे वैयक्तिक टाकी आहे अशा गच्चीवरील पाण्याच्या टाकीला अ‍ॅटोमॅटीक पंप लावणे ज्यामुळे टाकी भरताच अधिक पाणी टाकीत पडणे थांबेल व ते पाणी वाहून जाणार नाही.

#
नळांना एक नेट बसवून पाण्याची धार कमी करुन घेता येईल.

#
हौसिंग सोसायटीत नोटीस लावून पाण्याचा पाइप वापरुन गाड्या, अंगण धुणे यावर बंदी घालावी.

#
दहीहंडी उत्सव तर होऊन गेला, पण मार्च महिन्यात होळीच्या सुमारास कदाचित ही पाणी समस्या अधिक बिकट झाली असेल. त्यावेळेस पाण्याने रंग खेळण्यावर बंदी घालण्यात यावी.

#
अनेक घरात पिण्याचे पाणी भरून ठेवले असते व ते उरले तर दुसर्‍या दिवशी सरळ ओतून टाकले जाते. ते पिण्यासाठी नाही तर निदान इतर गोष्टींसाटी वापरले जावे.

(दक्षिणा )

#
झाडाला एक दिवस आड पाणी.

#
ओटा प्रथम साध्या कोरड्या फडक्याने पुसून, वरून फक्त किचन क्लिनर स्प्रे करून नविन फडक्याने पुसणे. ओटा धुवत नाही. (अगदी ७-८ दिवसातून एकदा)

#
वॉशिंग मशिन आठवड्यातून २ वेळा लावते.

#
लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही.

#
बाल्कनी मी धुवत नाही, कबुतरांनी अतिशय घाण केली तर १५-१७ दिवसातून एक छोटी बादली पाणी ओतून ठेवते ती घाण पुर्ण खरवडून काढून दुसर्‍या बादलीत फक्त स्वच्छता करते. साबण पावडर वापरत नाही.

# (दिनेश. )
ताटाच्या ऐवजी पत्रावळी वापरता येतील. कोरडे पदार्थ ठेवण्यासाठी पण केळीची पाने, द्रोण, फॉईल वापरता येईल.

(ऋन्मेऽऽष )
#
सरकारने जाहीरातींचा भडीमार करत लोकांना सद्य परिस्थितीची जाणीव करून देत वेळीच सर्वांना पाणी वाचवायला आवाहन करायला हवे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमीन पुसणे एक दिव्सा आड केले आहे.

मोलकरणीचे प्रबोधन करत आहे. एकूणच वापर कमी केला आहे. ५ लि.

एसीतले ते पाणी स्वच्छते साठी वापरते. कार नाहीच. स्कूटर पुसून घेते. धूत नाही.

चांगले उपाय. माझे फक्त दोन आणे. किमान ५-१० झाडे जमत असेल तिथे लावणे. पर्यावरण वाचवा तुम्ही वाचाल.

टॉयलेट मधल्या एकेच बटन असलेल्या फ्लश टँक मधे एकेक लिटरच्या दोन बाटल्या ( पाण्याने भरलेल्या ) ठेवल्या असता प्रत्येक फ्लश मागे २ लिटर पाणी वाचवले जाऊ शकते. तरीही फ्लश मात्र व्यवस्थित होते. टँक कपॅसिटीचा जरा नीट अंदाज घेऊन अजून एखादी बाटली ठेवता येते का ते बघावे.

काही फ्लशटँक्सला दोन बटने असतात. त्यात पाण्याच्या कमी जास्त डिस्चार्जची सोय असते. पाण्याच्या गरजे नुसार त्याचा वापर करावा.

१. घरात बाल्कनीत किंवा अंगणात झाडे, रोपे वगैरे लावली असतील तर त्यांच्या मुळांजवळचा भाग सुका पालापाचोळा, निर्माल्य, सुकलेली फुले इत्यादींनी झाकल्यास जमीनीतला ओलावा टिकायला मदत होते. त्यांना खरकटी भांडी विसळलेले पाणी (गाळून) घालू शकता.
२. शॉवर वापरण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे.
३. जिथे शक्य आहे (आणि पाणी वाया जायची भरपूर शक्यता आहे तिथे) नळाच्या पाण्याची धार कमीच करून ठेवणे. खास करून वॉशबेसिन वापरताना भरपूर पाणी वाया जाते. नळाची धार कमी करायला खाली एक वेगळा नळ असतो बऱ्याच वॉशबेसिनना!
४. दात घासणे, दाढी करणे यांसाठी वाहत्या नळाचा वापर न करता भांड्यात पाणी घेऊन ते गरजेप्रमाणे वापरणे.
५. घरातील व सोसायटीतील गळणारे सर्व नळ, पाईप्स दुरूस्त करून घेणे.
६. आपल्या प्रभागात / गल्ली किंवा एरियात कोठे पाणी वाया जात असेल तर शासनाकडे तशी लेखी तक्रार करून तिचा पाठपुरावा करणे.
७. सोसायटीच्या टाकीचे पाणी वाहून न जाईल अशी व्यवस्था करणे.
८. गाड्या पिण्याच्या पाण्याने न धुता कपडे धुण्यासाठी वापरलेले साबणपाणी वापरून त्याने धुणे.

रोज पाणी जातेच आणि सकाळी चार वाजता वॉचमन सोसायटीचा (६ बिल्डिंग्जची सोसायटी) पाण्याचा पंप चालू करतो तेव्हा लोक नळ चालू ठेवून बिनधास्त झोपून गेलेले असतात, उठवायला गेले की आपल्यावरच चिडचिड करतात, म्हणून आम्ही रोज रात्री बिल्डिंगचे गच्चीतले व्हॉल्व्ह बंद करतो, व सकाळी साडेसहाला परत चालू करतो. यामुळे वरच्या टाकीत पाणी साठते, लवकर सोडलेले पाणी नळ चालू राहिल्याने जात होते ते आता वाया जात नाही, आणि टाकी किती भरते याचा अंदाज येतो. अर्थात हे रोज आम्हालाच करावे लागते, पण थोडीशी बचत होत असावी असे वाटते. खुप प्रयत्न करून ही रेन वॉटर हार्वेस्टिंग ला लोक सहकार्य करत नाहीत.

१. हौसिंग सोसायटीच्या किंवा ज्यांकडे वैयक्तिक टाकी आहे अशा गच्चीवरील पाण्याच्या टाकीला अ‍ॅटोमॅटीक पंप लावणे ज्यामुळे टाकी भरताच अधिक पाणी टाकीत पडणे थांबेल व ते पाणी वाहून जाणार नाही. बर्‍याच ठिकाणी रात्री-बेरात्री अश्या टाक्या ओवरफ्लो होत असतात.

२. काम करणार्‍या बायकांना या प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगणे. कैक वेळा त्या आपल्यासमोर पाण्याची बचत करतात पण आपल्या पाठीमागे पूर्ण मोठा नळ सोडणे, वाहत्या नळाखाली भांडी घासणे असे उद्योग केले जातात. नळांना एक नेट बसवून पाण्याची धार कमी करुन घेता येईल.

३. हौसिंग सोसायटीत नोटीस लावून पाण्याचा पाइप वापरुन गाड्या, अंगण धुणे यावर बंदी घालावी.

४. दहीहंडी उत्सव तर होऊन गेला, पण मार्च महिन्यात होळीच्या सुमारास कदाचित ही पाणी समस्या अधिक बिकट झाली असेल. त्यावेळेस पाण्याने रंग खेळण्यावर बंदी घालण्यात यावी.

५. अनेक घरात पिण्याचे पाणी भरून ठेवले असते व ते उरले तर दुसर्‍या दिवशी सरळ ओतून टाकले जाते. ते पिण्यासाठी नाही तर निदान इतर गोष्टींसाटी वापरले जावे.

मी करत असलेले उपाय
* झाडाला एक दिवस आड पाणी.
* ओटा प्रथम साध्या कोरड्या फडक्याने पुसून, वरून फक्त किचन क्लिनर स्प्रे करून नविन फडक्याने पुसणे. ओटा धुवत नाही. (अगदी ७-८ दिवसातून एकदा)
* वॉशिंग मशिन आठवड्यातून २ वेळा लावते.
* गाडी मी तशी पण रोज धुवत नाही. कारण पार्किंग क्लोज्ड आहे म्हणा. पण मला घाण गाडी पण चालते Proud
* अंघोळीला शॉवर ऐवजी बादली वापरते.
* लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही. (हसु येईल तुम्हाला पण मी खरंच हे करते)
* बाल्कनी मी धुवत नाही, कबुतरांनी अतिशय घाण केली तर १५-१७ दिवसातून एक छोटी बादली पाणी ओतून ठेवते ती घाण पुर्ण खरवडून काढून दुसर्‍या बादलीत फक्त स्वच्छता करते. साबण पावडर वापरत नाही.
* दात घासताना नळ सोडून ठेवत नाही (कधीच) दाढीचा प्रश्नच नाही Proud

आता पाणी टंचाई आहे म्हणून असं नाही पण मी हे वरचं नक्की फॉलो करते. फार तर ओटा धुवत असेन एरवी.

भसाभस पाणी वाया घालवून निर्लज्जपणे त्यावर हसणार्‍या लोकांचे काय करायचे हे मात्र खरंच कळत नाही

लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही. (हसु येईल तुम्हाला पण मी खरंच हे करते)>>>>>>>>>>

मला पण हे लिहायचे होते पण संकोच केला.

बर झाल लिहिले गेले.
मागे जिज्ञासा चा http://www.maayboli.com/node/53442 हा धागा खुप उपयुक्त ठरला होता.

ताटाच्या ऐवजी पत्रावळी वापरता येतील. कोरडे पदार्थ ठेवण्यासाठी पण केळीची पाने, द्रोण, फॉईल वापरता येईल.
रोज ऑफिसला डबा नेणार्‍या लोकांना याचा विचार करता येईल.

राजस्थानात काही ठिकाणी, बारीक रेतीने भांडी घासायची पद्धत आहे, त्याने पाणी न वापरताही भांडी स्वच्छ निघतात.

आदल्या दिवशीचे पाणी ओतून देण्याबद्दल अगदी अगदी.

कितीतरी लोकांना रोज किंवा दिवसाआड (पिण्याच्या पाण्याने) बाल्कनी, गच्ची धुवायची वाईट सवय असते. अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करण्यास सोसायटीत पूर्ण बंदी घालावी. तरीही नियम मोडणाऱ्यांना दंड, सोशल बॉयकॉट यांसारखे कडक उपाय लागू करावेत असे खूप वाटते. दुकाने, शो रूम्स व अन्य व्यावसायिक ठिकाणी फरशी चकचकीत ठेवण्यासाठी दिवसातून अनेकदा पोछा केला जातो. काचा धुतल्या जातात. सकाळ सायंकाळ दुकानाबाहेर सडा घातला जातो. हे पाणी अर्थातच पुनर्वापर केलेले किंवा बोअरवेलचे नसते. राजरोसपणे पिण्याचे पाणी यासाठी वापरले जाते. रेस्टॉरंट्समध्येही तेच. कमर्शियल फ्रंटवर देखील पाणीबचत मोठ्या प्रमाणावर केली जाणे गरजेचे आहे.

आणखी एक,
इकडे सायंकाळी ७ ८ च्या सुमारास नळ येतात तेव्हा काहीजण , विशेषतः अपार्टमेंट मधे राहणारे लोक पिण्याच्या पाण्याच्या नळाखाली भांडे धुतात .. यात मी माझ्या मैत्रीणीला वारंवार सुनवत असते..
जर तुम्ही टाक्यातल पाणी प्यायला नै वापरु शकत तर मग टाक्यातल पाणी पुरावं आणि राहुनराहुन चौकिदाराला टाकी खाली झालि म्हणुन ओरडा करावा लागु नये म्हणुन प्यायच्या पाण्यानं भांडी घासणं म्हणजे अशक्य वाटत मला तरी..

लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही. (हसु येईल तुम्हाला पण मी खरंच हे करते)>>>>>>>>>>मी पन सामिल त्यात..मग्गाभर पाणी पुरत..पण तरी झोपण्यापूर्वी जाते तेव्हा एकदा शेवटच म्हणुन फ्लश करते मी..

गॅलरी मधे दोन मोठे मग्गे पाणी टा़कून मग खराट्यानं ती साफ करुन घेते आणि पाणि काढल्यावर पुसुन टाकते..तेही दोन आठवड्यात एकदा..

वॉशिंग मशिन नै म्हणुन त्याचा प्रश्नच नै..

कपडे खरच खुपदा वगैरे धुत नै.. सहसा जास्त वेळ बाहेर पडायच काम पन पडत नैच म्हणा म्हणुन .. दिवसभर घातलेले कपडे धुते आणि अगदी जेव्हा तास दोन तासाच काम म्हणुन बाहेर घातलेले कपडे निदान ३दा तरी वापरतेच मी..

गाडी धुवायच्या भानगडीत कध्धीच पडत नै..तिला आंघोळ फक्त सर्विसिंग करते तेव्हा घातल्या जाते..बाकी फडके जिंदाबाद..

सरकारने जाहीरातींचा भडीमार करत लोकांना सद्य परिस्थितीची जाणीव करून देत वेळीच सर्वांना पाणी वाचवायला आवाहन करायला हवे.
(म्हणजे केले असले तर माहीत नाही पण माझ्या पाहण्यात तरी अजून असली काही जाहीरात आली नाही.)

कित्येकांच्या गावीही नसेल की यंदा बिकट परिस्थिती आहे पाण्याची आणि पाणी वाचवायची गरज आहे.
मलाही दोनेक दिवसांपूर्वीच असे समजले की यंदा फार परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

तसे मी स्वता पाण्याच्या बाबतीत गरजेपुरतेच हा अ‍ॅटीट्यूड पहिल्यापासूनच ठेऊन आहे. कारण बालपण २४ तास पाण्यात नाही गेलेय.
सध्या ते २४ तास आहे म्हणून एक आंघोळ तेवढी शॉवर खाली करतो, आणि या नाशाडीची कल्पना आहे.
उद्यापासून ती बंद, आणि तांब्या बादली सुरू करतो, या आशयाच्या पोस्टही व्हॉटसपवर फिरवतो, जेवढे ऐकतील तेवढे ठिक आहे. आपणही येथील मुद्दे/उपाय फिरवा.

वर दिलेले उपाय मुळ लेखात खाली नावानिशी समाविष्ट केले आहेत.

फ्लश टँक मधे एकेक लिटरच्या दोन बाटल्या >> हा उपाय खुप चांगला आहे.
वाहत्या नळाचा वापर न करता भांड्यात पाणी घेऊन ते गरजेप्रमाणे वापरणे. >> हे ही खुप उपयोगी.

सोलापूरला गेले असता तिथे फ्लश टँकला चक्क नळासारखा व्हॉल्व्ह होता. जेवढे सोडले तेवढेच पाणी फ्लश होणार, बंद केल्यावर लगेच बंद. खुप उपयोगी वाटला हा प्रकार. तिथे नेहेमीच पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने हा उपाय अंमलात आणला असावा.

धाग्याचा विषय खूप छान आहे आणि सुचवलेले पर्याय सुद्धा.

पण प्रथम लोकांची मानसिकता बदलायला हवी, पाण्यावर प्रबोधन होणं अत्यंत गरजेच आहे. नळ उघडला कि पाणी येत हे असं नसून दूर कुठे तरी पाऊसाचा पाणी साठवून(लोकांचा विस्थापन करून), शुद्धीकरण करून आपल्या पर्यन्त येत हे वास्तव समजावयास हवं. पाणी हि वयक्तिक मालमत्ता नसून सार्वजनिक संपत्ती आहे हे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवला पाहिजे. पाण्याचं नियोजन कसा करावं इथपासून सुरुवात हवी आणि हि सवय अंगी बाळगावी. फक्त पाऊस नाही पडला म्हणून बोम्बाबोम्ब न करता आपापल्या परीने बचत करावी.

आज पाणी येणार नाही (म्हणजे अस समजून) घरातील प्रत्येकाने आठवड्यात किमान एक दिवस पाणी काटकसरीने वापरावे व तसे नियोजन पण करावे.

आपल्याला किती पाणी आवश्यक आहे आणि त्या प्रमाणात आपण नळ उघडला आहे का ह्याचा गणित च लोकांना कळत नाही Sad

आम्ही पाणीपट्टी भरतो मग आमचा आम्ही बघू हि विचार प्रणाली बदलली पाहिजे (पाणी आणि वीज ह्या साठी तर अत्यंत आवश्यक) कर भरता म्हणजे आपण ती वस्तू/सुविधा विकत घेतो अस नाही (विशेषतः भाडेकरू …. ;))

१. ट्रेक ला जाताना मी तरी toilet paper च घेऊन जातो Wink

२. फ़्लश चा किमान वापर ()

३. लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही. (हसु येईल तुम्हाला पण मी खरंच हे करते)>>>>>>>>>>मी पन सामिल >>> मी पण हेच तत्व वापरतो.

४. जेवढी तहान आहे त्या पेक्षा थोडा कमीच पाणी पेल्यात घेतो आणि पितो उगाच टाकून देत नाही (ताटातल्या अन्नाला सुद्धा हाच नियम).

५. पिण्याचा पाणी ३ - ४ दिवसांपूर्वी च असेल तर कपडे भिजवणे, फरशी पुसणे अश्या कामांना वापरतो.

६. भांडी धुताना एका भांड्यचा पाणी दुसर्या मध्ये टाकतो, म्हणजे पाण्याचा अनावश्यक वापर कमी होतो.

अवांतर : ट्रेक निमित्त बऱ्याच दूर दूरच्या भागात जाण्याचा योग आला आणि पाण्याचा भयाण वास्तव समोर आला, आपण नळ उघडला कि पाणी येत तिकडे मैल मैल पायपीट. अगदी लहान लहान मुली सुद्धा डोक्यावर पाण्याचे ३-३ हंडे घेऊन हा प्रवास करतात. कधी चुकून मला पाणी वाया घालवावं लागलं कि हे सर्व चेहरे डोळ्यासमोर येउन जाब विचारतात.

माझी आई मुळची अजमेर (राजस्थान) ची असल्या मुळे पाण्या बाबत खूपच संवेदनशील आहे आणि तीच सवय तिने आम्हाला लावली … ट्रेक करण्याचा सवयी ने त्यात अजून मोलाची भर घातली आहे

http://m.wikihow.com/Make-a-Drip-Irrigator-from-a-Plastic-Bottle

बाल्कनी किंवा घराच्या बागेतील रोपट्यांना, झाडांना आवश्यक पाणी तर मिळावे परंतु पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी एक पाहिलेला उपाय - बिसलेरीच्या किंवा शीतपेयाच्या २ लिटरच्या जुन्या प्लास्टिक बाटल्या तळाशी साधारण १ इंचावर कापून, त्या बाटलीच्या झाकणाला १ ते ४ छिद्रे पाडून ती कापलेली बाटली झाकण लावून झाडांच्या मुळांशी मातीत उपडी खोचून ठेवणे. त्यात पाणी घातल्यावर छिद्रांमधून पाणी मुळांपर्यंत पोहोचते. पाणीबचत होते व झाडांचीही तहान भागते.

१. ढाबे, टपऱ्या, छोटेखानी हॉटेलांत पेल्यात किंवा जगात प्यायचे पाणी घेऊन लोक रस्त्यावर चुळा भरतात, हात-पाय-तोंड धुताना दिसतात ते पूर्णपणे थांबवायला हवे. रस्ता ही चुळा भरायची जागा नव्हे. त्यासाठी वॉशबेसिन वापरा किंवा एखाद्या झाडाभोवती आळे करून तिथे तोंड धुवायला सांगा. पिण्याच्या पाण्याचा फक्त पिण्यासाठीच वापर व्हावा यावर जोर द्या. हॉटेलांत पाणी देताना पेला पूर्ण भरून देतात. त्याऐवजी निम्मा पेला भरून पाणी द्यावे. ग्राहकाने अधिक पाणी मागितल्यासच त्यानुसार पाणी द्यावे.

२. हॉटेलांमध्ये फिंगरबोल देतात हात धुवायला ते बंद करता येऊ शकते. तसे शक्य नसल्यास बोलमध्ये थोडेच पाणी घालून द्यावे. तेवढे पाणी खरकटा हात व बोटे स्वच्छ करण्यासाठी पुष्कळ होते.

३. स्विमिंग पूल कोरडे करून व आच्छादून ठेवणे.

मी चारचकिवर कव्हर टाकले आहे व मर्यादित वापर त्यामुळे कव्हर काढले की गाड़ी ओके ,पाण्याची गराजच लागत नाही धुवायला

आमच्या सोसायटीमध्ये बेसिन बाथरूम वेगळे डक्ट आहे व टॉयलेट वेगळे डक्ट आहे
बेसिन बाथरूम पाण्याचे डक्ट खाली सैंड बॉक्स ठेवला व ते गाळलेले पाणी सोसायटी झाडांकडे वळवले

चांगला आणि समयोचित धागा. हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याचे ग्लास भरून ठेवण्याऐवजी रिकामे ग्लास आणि पाण्याचा जग आणून ठेवावा म्हणजे ज्याला जितके लागेल तितके पाणी घेऊन पिता येईल. ही पद्धत काही ठिकाणी पाहिली आहे मात्र सगळीकडे हे असे व्हायला हवे. जसे उपाय सुचतील तसे लिहित जाईन!

मुंबई चे लोकं पाण्याचा खुप गैरवापर करतात.
त्यांच्यापर्यन्त ही माहिती कशी पोहंचवायची?
आमची सोसायटी खुप मोठ्ठी आहे खुप पाणि वाया घालवतात कोणाला काही बोलायला गेल तर त्यांना ते आवडत नाही शहाणपना शिकवतेय असे समजतात.

एक स्वच्छ आंघोळ करायला शॉवरने एक बादली पाण्यापेक्षा कमी पाणी लागतं.(पाण्यात हवा मिक करणारा शॉवर असल्यास त्याहून कमी)
एक बादलीभर कपडे धुवायला वॉशिंग मशीनमध्ये बाहेरच्यापेक्षा कमी पाणी लागतं.
हा केवळ स्वानुभव नाही तर आम्ही पाणी अगदी मोजून पाहिलंय- म्हणजे वॉमचा आऊटलेट बादल्यांमध्ये ठेवून पाणी मोजून तसेच जेवढा वेळ शॉवरखाली उभं तेवढ्या वेळाचं पाणी टबात गोळा करून पाहिलंय.

मात्रं-
१. दररोज कपडे धुवायचा अट्टहास न करता एक लोड पूर्ण होईल इतके कपडे साठल्यावरच वॉ म लावायची.
२. साध्या, जास्त न मळक्या कपड्यांसाठी तीस मिनिटांची, तीन पाण्यांची सायकल सिलेक्ट करायची.
३. फ्रंट लोडमध्ये टॉप लोडपेक्षा कमी पाणी लागतं (हे मोजून पाहिलेलं आहे)
४. अंगाला साबण लावताना शॉवर बंद करायचा.

माझा एक राजस्थान मधे मुळ गाव असलेला मित्र होता. राजस्थानात पाणी टंचाई म्हणुन काही उपाय त्यांच्या अंगवळणी पडलेले. महाराष्ट्रात २ री पिढी आली तरी

१) जेवणाच्या ताटात हात धुवुन ते पाणी पिणे.

२) चुळ पिण्याच्या पाण्याने भरुन ते पाणी न थुंकता गिळणे.

ह्या सवयी मी त्या मित्रासोबत राहुन उचलल्या. परिंंणाम असा झाला की घरचे तु आधी जेवुन घे म्हणायला लागले. मार खाण्याच्या वयात मी नव्हतो.

नंतर त्या सवयी सुटल्या पण आता कळते की मुबलक पाणी असलेल्या प्रदेशात या सवयी चुकीच्या/ अनहाय्जेनिक वाटतात पण त्या लोकांच्या मात्र संस्क्रुतीत मुरल्या आहेत.

एक बादलीभर कपडे धुवायला वॉशिंग मशीनमध्ये बाहेरच्यापेक्षा कमी पाणी लागतं. >>> ( तू मोजून पाहिले म्हणते आहेस तरी ) ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. खरंतर सेमी ऑटोमॅटिक मशिन्समध्ये कपड्यांपुरेसे पाणी भरुन दोनदा कपडे फिरवले तर हाताने धुण्यात लागते तितक्यात किंवा त्याहून कमी पाण्यात काम होईल. पण हल्ली सगळ्यांकडेच ऑटोमॅटिक असतात ( माझ्याकडेही ! )
पाणीटंचाईची झळ चांगलीच बसल्याने आज वॉ म मॅन्युअली ऑपरेट करायला उभी राहिले ( बादलीने पाणी ओतून ) तर फक्त दोन-तीन मिनिटं फिरवल्यावर मशीन पाणी ड्रेन करायला लागले Uhoh पंचेचाळीस मिनिटांच्या सायकलमध्ये ते बरेचदा ड्रेन करते हे माहीत होते पण इतक्या लवकर करत असेल हे लक्षातच आले नव्हते. दुर्दैवाने मी आत्तापर्यंत नीट लक्ष दिले नाही. मग सतत पॉवर ऑफ-ऑन करत दहा मिनिटं कपडे फिरवून घेतले आणि स्पिन केले. आता ज्या दिवशी रेग्युलर मशिन लावता येईल त्या दिवशी पाऊण तास तिथे उभं राहून मॉनिटर करणार आहे.

बाकी बाबतीत आम्ही पाणी खूपच जपून वापरतो.

फ्लश टँकमध्ये बाटल्या ठेवायची कल्पना चांगली आहे पण आपल्याला टँकच्या आतले सेटिंग चेंज करुन टँक अर्धा ( किंवा पाव सुद्धा ) भरेल अशी व्यवस्था करता येते. खूप सोपे आहे पण इथे उलगडून सांगता येणार नाही. आम्ही फार मागेच तसे करुन ठेवले आहे.

आर ओ सिस्टीम्स प्रचंड प्रमाणात पाणी वाया घालवतात. त्यामुळे ज्यांच्या घरी कॉर्पोरेशनचे पाणी पिण्यासाठी येते त्यांनी ही सिस्टीम अजिबात लावू नये.

वरचे उपाय खरच चांगले आहेत. बरेचसे तसेही रोजच्या वापरात आहेत.

आता गणपतीच्या दिवसात विसर्जनाच्या दिवशी (५, ७, गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशी) नदीला पाणी सोडतात. ते खरे तर बंद केले पाहिजे. तसेही आता महानगर पालिकेतर्फे हौद बांधलेले असतात. त्यांच्या तर्फे मुर्ती दान करण्याचेही आवाहन केले जाते. बरेच लोक घरच्या घरी बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांना घालतात. मग नदीत विसर्जन करायचे म्हणून नदीला पाणी सोडून ते वाया का घालवायचे?

तसेही आता महानगर पालिकेतर्फे हौद बांधलेले असतात. <<

त्या हौदाच्या भोवताली कडे करून हिंदुजनजागृतीवाले बिंडोक (बिंडोकांना सॊरी!) लोक उभे असतात. तुम्ही हौदात विसर्जन करायला निघालात तर बडबड सुरू करतात. तरीही तुम्ही हौदातच विसर्जन केलेत धर्मद्रोही वगैरे पासून काहीही तोंडाला येईल ते बरळतात. आपल्या घरच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला हा असला प्रकार नको वाटतो.
माबोवरच्या पालथ्या घड्यांपेक्षाही जास्त पक्के असल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही.
शास्त्रात असे लिहिले नाही एवढेच पोपटासारखे बोलत असतात.

हा गेल्या वर्षीचा अनुभव आहे.

अरुंधती,
मला तरी फिंगर बाउल हा चांगला पर्याय वाटतो..
त्यामानाने वॉशबेसिन मधे लोक खुप जास्त पाणी वाया घालवतात..

१. भाज्या, मिरच्या, डाळी, तांदूळ वगैरे धुतलेले पाणी एकत्र साठवून बागेला घालता येईल. त्यात मीठाचा अंश नसल्याने ते बागेसाठी सेफ. खरकटे विसळलेल्या पाण्याबद्दल मी साशंक आहे. अन्नात, पानात मीठ असतं त्यामुळे.

२. वॉ म चे शेवटचे सायकल असते त्यानंतरचे पाणी बादलीत साठवून ते टॉयलेटसाठी निदान सू नंतर टाकायला तरी वापरता येऊ शकते. फ्लश फक्त नंबर दोन नंतर.

ही नीधप ह्याची कल्पना आहे. खरे तर नदीमधे विसर्जनाला कायद्यानेच बंदी घातली पाहीजे.

पण तो धाग्याचा विषय नव्हता म्हणून लिहिले नाही उगाच मुळ मुद्दा सोडून धागा भलतीकडेच घरकटायचा.

ढाबे, टपऱ्या, छोटेखानी हॉटेलांत पेल्यात किंवा जगात प्यायचे पाणी घेऊन लोक रस्त्यावर चुळा भरतात, हात-पाय-तोंड धुताना दिसतात ते पूर्णपणे थांबवायला हवे. रस्ता ही चुळा भरायची जागा नव्हे. त्यासाठी वॉशबेसिन वापरा किंवा एखाद्या झाडाभोवती आळे करून तिथे तोंड धुवायला सांगा. पिण्याच्या पाण्याचा फक्त पिण्यासाठीच वापर व्हावा यावर जोर द्या. हॉटेलांत पाणी देताना पेला पूर्ण भरून देतात. त्याऐवजी निम्मा पेला भरून पाणी द्यावे. ग्राहकाने अधिक पाणी मागितल्यासच त्यानुसार पाणी द्यावे. <<
चुळा भरायला अस्वच्छ पाणी/ ग्रे वॉटर कसे चालेल? ते पिण्याचेच नको का?
रस्त्यावर नको इथपर्यंत ठिके पण रस्त्यावर नाही भरल्या चुळा, इतर ठिकाणी भरल्या तरी तो काही पाणी वाचवण्याचा उपाय नाही.

Pages