मरणावर बोलू काही ...

Submitted by दिनेश. on 7 September, 2015 - 07:39

शीर्षक वाचून दचकलात ना ? सणांच्या दिवसात कसले अभद्र बोलतोस ? असेही म्हणाल. कुटुंबात कुणी नुसते विल करायचेय असे म्हणाले तरी घरातील लोक असेच बोलतात. प्रकाश घाटपांडे यांचा धागा आणि त्यावर साती आणि दीमांनी जे सुंदर प्रतिसाद दिलेत ते वाचून, माझ्या मनात बरेच दिवस येत असलेले विचार लिहून काढतोय.

माझ्या जन्मदिवशीच एक विचित्र घटना घडली. त्या पुर्वी आई सांगते ती आठवणही सांगायला हवी. आम्ही
मालाडला दत्त मंदीर रोड वर रहात होतो. त्या देवळातली दत्ताची मूर्ती फार सुंदर आहे. दर गुरुवारी आम्ही तिथे
जात असू. मी पोटात असताना अशीच आई तिथे गेली होती आणि देवाच्या समोर असतानाच अचानक आईच्या
पदराने पेट घेतला. पुजर्यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनीच ती आग विझवली. आईला त्यांनीच धीर दिला व
ते म्हणाले, मनात काहीही अशुभ विचार आणू नका.. तूम्हाला लाभ होणार आही. दत्तगुरु नेहमी सगळ्यांचे
भलेच करतात.

आमच्या शेजारी गुप्ते फॅमिली रहात असे. दोन कुटुंबात खुप घरोबा होता. आई आणि काकू सख्ख्या बहीणीसारख्याच वागत असत. आणि त्या दोघीही एकाचवेळी गरोदर होत्या. माझ्या जन्माच्या वेळी आई
ज्या दिवशी हॉस्पिटलमधे गेली, त्याच दिवशी काकू पण दाखल झाल्या. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण
होते. माझा जन्म दुपारचा आणि त्यानंतर काही तासांनी काकूंना पण मुलगा झाला. पण तो जन्मताच गेला.

एरवी रोज घरी येणे जाणे असलेल्या काकू अगदी मिटून गेल्या. त्या घराबाहेरही पडत नव्हत्या. त्या काळी
लहान बाळांना ४० दिवस घराबाहेर नेत नसत. काकूंबद्दल आईला पण खुप वाईट वाटत असे. मी ४० दिवसांचा
झाल्यावर आमच्या दुसर्या शेजारी, वेटेबाई ( या सध्या पार्ल्याला राहतात ) मला घेऊन काकूंकडे गेल्या, आणि
मला त्यांच्या मांडीवर ठेवून आल्या. काकूंना खुपच आनंद झाला. पुढे मी ११ वर्षांचा होईपर्यंत काकूंनी माझे
खुप लाड केले. मला मावशीची अनुपस्थिती ( माझ्या मावश्या मुंबईत नव्हत्या ) कधी जाणवली नाही. ( काकू १९८३ साली वारल्या. )

पुढे वर्षभरांनी काकूंना मुलगी झाली.. ती आणि मी एकत्रच वाढलो. शाळेतही एकत्रच जात होतो ( ती आता कॅनडाला असते ) तिचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी माझे सख्खे आजोबा वारले. पण या दोन्ही
योगायोगांची आमच्या कुटुंबात चर्चाच काय कधी उल्लेखही झाला नाही. मला या घटना माझ्या वडीलांनी
२० वर्षांनी सांगितल्या.

पण याचा परीणाम म्हणून का ते माहीत नाही, पण मी अगदी सुरक्षित वातावरणात वाढलो. जवळपास एखादा
मृत्यू झाला तर मला तिथे जाऊ दिले जात नसे. मी २० वर्षांचा झाल्यावरच पहिल्यांदा मृतदेह जवळून बघितला.
मला दहावीला उत्तम मार्क्स होते. सायन्सला आणि पुढे मेडीकलला अगदी सहज अॅडमिशन मिळाली असती,
पण त्या वयात ( १४ वर्षे ) मला रक्ताचीच एवढी भिती वाटत असे कि, मी तो विचारही करू शकलो नाही.

मालाड्ला त्यावेळी जोहरा ( आताचे संगिता ) थिएटर सुरु झाले होते. नूतन उदघाटनाला आली होती आणि
तिचाच गौरी नावाचा चित्रपट तिथे लागला होता. त्या चित्रपटात डोळ्यांचे ऑपरेशन दाखवलेय. तो सीन चालू
झाल्यावर मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. तेरे मेरे सपने ( या चित्रपटासाठी गुप्ते काका रंगतज्ञ होते ) बघायला
आम्ही फिल्म सेंटरमधे गेलो होतो, त्या चित्रपटातले सिझेरियन सेक्शनही मी बघू शकलो नव्हतो.

पुढे वय वाढले, अनेक डॉक्टरांशी मैत्री झाली. हॉस्पिटलमधे स्वतःसाठी, ईतरांना सोबत म्हणून जावे लागले, आणि ती भिती हळूहळू नाहिशी झाली. पण पूर्णपणे नाहिशी झाली असे म्हणवत नाही. ( एक साधी गोष्ट आहे,
मराठीत प्रेमग्रंथ आणि मरणगंध असे दोन माहितीपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत ( लेखक बहुतेक बाळ सामंत ) मी नेहमी हे ग्रंथ पुस्तकांच्या दुकानात बघत असतो, पण विकत घ्यायचा मात्र धीर होत नाही. )

पण आता असे वाटतेय कि एकंदर समाज म्हणूनही आपण मृत्यूबाबत फार हळवे आहोत. आपला कायदा ( कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट ) मृत्यूला मोस्ट सर्ट्न इव्हेंट मानतो. म्हणजे एखादा करार जर एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच
पार पडायचा असेल तर तो कायदेशीर आहे ( गैरसमज नकोत, हा काही सुपारीचा वगैरे करार नाही. ) पण त्याचवेळी जर एखादा करार, एखाद्याच्या जन्मावर अवलंबून असेल तर तो मात्र कायदेशीर नाही कारण जन्म
म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मोस्ट अनसर्टन इव्हेंट. मला आठवतेय बिझिनेस लॉ शिकवताना, आमचे प्रोफेसर ( अॅड ) गोविलकर यांनी ज्यावेळी हे कलम वर्गात शिकवले होते, त्यावेळी सर्व वर्ग हळहळला होता.
हीच विचासरणी मला फाशीच्या शिक्षेबाबतही दिसते. याच समाजाने घडवलेल्या नियमाने, आरोपी विरुद्ध
गुन्हा सिद्ध झाल्यावर, त्याला बचावाची पुर्ण संधी दिल्यानंतर जर फाशीची ( ओह, त्याला देहदंड म्हणायचे नाही का ? ) शिक्षा झाली, तर त्याबद्दल आपल्या मनात अपराधीपणा का असवा ? त्यानंतर दयेचा अर्ज वगैरे का असावा ?
( आजकाल ही शिक्षाच रद्द व्हावी असा विचार पुढे येतोय, म्हणून हा उल्लेख केला. )

इथे आफ्रिकेत आल्यावर मात्र मृत्यूबाबात या लोकांच्या वेगळ्याच प्रतिक्रिया बघितल्या. हि घटना अगदी
नैसर्गिकपणे ते स्वीकारतात. मृत माणसाच्या वियोगापेक्षा त्या प्रसंगी करायला लागणार्या खर्चाची तरतूद
कशी करता येईल, याचीच त्यांना जास्त विवंचना असते. काही महिन्यांपुर्वी आम्ही दोघे गाडीत असताना,
माझ्या ड्रायव्हरची बहिण वीजेचा शॉक लागून गेली, असा त्याला फोन आला. त्याने शांतपणे तो घेतला.
मी त्याला म्हणालो, हवे तर तू घरी जा, मी जाईन टॅक्सीने. तर त्याला त्याने नकार दिला, म्हणाला ती तर
गेली, आता मला आधी पैश्याची व्यवस्था करायला हवी.

दक्षिण अमेरिकेतील मायन संस्कृती बद्दल वाचले त्यातही त्या लोकांना मृत्यूची भिती तर नसेच उलट त्याचे
आकर्षणच वाटत असे. नरबळी सर्रास दिले जात असत ( आपण नारळ फोडतो ) अटीतटीच्या स्पर्धा घेऊन, हरणार्याला नव्हे तर जिंकणार्याला मारत असत. जिवंतपणी एखाद्या व्यक्तीचे हृदय काढून देवाला अर्पण
करत असत. ( याचे एक क्ल्पनाचित्र नॅशनल जिओग्राफीकच्या एका मासिकात बघितले होते. ) ब्रॅड पिटच्या
लिजंडस ऑफ फॉल, या चित्रपटातही हा हृदय अर्पण करायचा प्रसंग आहे, पण त्यात ती व्यक्ती मृत झालेली
असते.

आपल्याकडे असे सेरेमोनियल मृत्यूचे उल्लेख फक्त सती च्या प्रथेत आणि किल्ल्यांच्या बुरुजात चिणण्यासाठी
दिलेल्या बलिदानात वाचलेत. पद्मिनीचा जोहार आणि जालियनवाला बागेतील स्त्रियांनी आपल्या बचावासाठी
जे केले ते अत्यंत दुर्दैवी होते, पण तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. ( आणखी काही उल्लेख असतील तर
अवश्य सांगा. )

आपल्या हिंदु धर्मातही वासांसि जिर्णानी असे उल्लेख आहेत. सर्व संतांनी माया मिथ्या आहे, देह हा जायाचा, जाणार शेवटी असे सांगितले आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, साने गुरुजी अशी काही आपणहून
म्रुत्यूला सामोरे जाण्याची उदाहरणे आहेतच.. पण तरी सर्वसामान्य जनांत हि भिती आहेच.

एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या मृत्यूबाबत आपण मेला, ठार झाला असे उल्लेख सहज करू. पण परीचित व्यक्तींबाबत
मात्र वारला, देहत्याग केला, अखेरचा श्वास घेतला, देवाघरी गेला, कैलासवासी झाला, स्वर्गलोकी गेला, इहलोक
सोडून गेला, अमर झाला, प्राणज्योत मालवली, घटका भरली असे अनेक आडवळणाचे शब्दप्रयोग करतो.
मेल्या, मुडदा बशिवला, कुठे उलथला होतास अशी संबोधने हि कायम कौतूकाचीच असतात.

तर माझा मूळ मुद्दा हि भिती का आहे ?

मरण हे अनिवार्य आहे, अटळ आहे हे माहित असूनही आपण त्यासाठी तयार का होत नाही ? कुणी म्हणेल कि
आपल्याकडे वानप्र्स्थाश्रम / संन्यास / सर्वसंगपरित्याग या कल्पना आहेत. पण यात आपण केवळ नातेसंबंधाचा
त्याग करतो. देहाच्या किमान गरजा, निदान अन्न पाणी तरी घ्यावे लागतेच.

सातीने लिहिल्याप्रमाणे काही मृत्यू हे वेदनादायी असू शकतात आणि प्रकाश घाटपांडे म्हणताहेत कधी कधी
त्याची वाट बघत जगणे हे जास्त वेदनादायी असते.

साती किंवा दीमा म्हणताहेत त्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला वाचवायचा अटोकाट प्रयत्न करतात, आणि तो त्यांचा
धर्मच आहे, याबद्दल वाद नाही. माझे अनेक मित्र हे करतही असतात.

पण तरी काही शंका आहेतच...

अनेकदा हे प्रयत्नच असतात. आज अनेक नवीन औषधे, सर्जरीची नवीन तंत्रे विकसित झाली असली तरी
जगण्याची हमी तर कुणीच देऊ शकत नाही.
जीव वाचला पाहिजे, या हेतूने क्वचित प्रसंगी एखादा अवयव काढून टाकला जातो. बहुतेक वेळा उपचारानंतर
नॉर्मल आयूष्य जगता येते पण क्वचित प्रसंगात काहीतरी न्यून राहतेच.

शिवाय डॉक्टर सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. जे रुग्ण त्यांच्यापर्यंत पोहोचतात. किंवा ज्यांच्यापर्यंत
डॉक्टर स्वतः पोहोचतात, तिथेच हे शक्य आहे. काही प्रसंगात तर ते हजर असूनही, साधने नाहीत, औषधे नाहीत,
वाहतुकीची व्यवस्था नाही.. असे अनेक घटक उपचारात अडथळे आणू शकतात. याशिवाय भारतात आणि इतरही काही देशात, वैद्यकिय उपचारांसाठी लागणार्या पैश्याचा प्रश्न बिकट आहे. केवळ याच कारणासाठी उपचार टाळणे हे अगदी सहज घडते. आपल्या देशात मोफत उपचारांची सोय सरकारने केली असली तरी ती किती अपुरी आहे, ते आपण जाणतोच.

डॉक्टर उपलब्ध असूनही, जर साधनांअभावी ते उपचार करू शकले नाहीत तर जसा त्यांच्यावर समाजरोष होतो,
तसाच रोष आर्थिक कारणांसाठी उपचार करू न शकणार्या रुग्णांच्या नातेवाईकांवर होतो. या मदतीसाठी
याचना करणारी आव्हाने आणि जाहिराती आपण बघतही असतो. आपण हे उपचार करु शकत नाही, याचा असह्य
ताण नातेवाईकांवर आलेला असतो.

तरुण वय असताना, कौटुंबिक जबाबदार्या असताना मृत्यू येऊ नये अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी
आपण दिवाळीत दीपदान करतो पण मला सांगा डॉ अब्दुल कलाम आझाद किंवा शाहीर विठ्ठल उमप यांचे
मृत्यू, म्हणजे त्याची वेळ, आपल्या सर्वांनाच हेवा करण्यासारखी वाटली कि नाही ? म्हणजे शरीर पुर्ण भरात कार्यरत असताना, एक समृद्ध जीवन जगून झाल्यावर आपण मृत्यू का लांबणीवर टाकायचा ?
एका वयानंतर तर आपण सर्वच त्याची वाट बघत बघत दिवस कंठत असतो.

जीवनाची आसक्ती कधी संपतच नाही आपल्यासाठी. ही आसक्ती सुखाची असते ( मला इथे जायचंय, हे बघायचंय, ते अनुभवायचेय, हे खायचंय ) किंवा मायेची ( मुलाचे लग्न होऊ दे, सूनमूख पाहू दे, नातवंड बघू दे.. ) या याद्यांना अंतच नसतो. या आसक्तीपासून मुक्त होण्याचे आपल्याला साधलेले नाही आणि याबाबतीत आपल्या धर्माचे आणि संतांचेही प्रयत्न वायाच गेलेले आहेत.

बरं जीवनाची आसक्ती सरली तरी मरणाची भिती राहतेच. त्यापैकी प्रत्यक्ष मृत्यूच्या क्षणी होणार्या वेदनेची
किती असते ? ( याबाबत सातीने खुप छान लिहिले आहे. ) आणि तीच नाहिशी झाली तर.
शांतपणे, वेदनारहीत, आपल्याला हवा त्यावेळी मृत्यू आला तर ....

पण मरणाबद्दल एक भिती तरीही दशांगूळे उरतेच.. का ?

मला कल्पना आहे हे लेखन फारच विस्कळीत झालेय. माझे म्हणणे मला नीटपणे मांडता आलेले नाही..
प्रश्न अनेक.. जर एखाद्याचे जीवन त्याचे खाजगी असेल तर मृत्यू का नाही ? त्यासाठी इतरांची परवानगी का लागावी ? एकाचा मृत्यू झाल्यास, आपणच त्याला जबाबदार आहोत असे इतरांनी का मानावे ? जे अटळ आहे त्याबद्दल शोक का ? अपराधी पणाची भावना का ? तो नसताना, त्याच्या नसण्याचे दू:ख करण्यापेक्षा त्याने असताना जे काही चांगले केले, त्याची आठवण आपल्याला का होत नाही ? मग त्याने सतत असले पाहिजे, चांगलेच केले पाहिजे.. अशी अवाजवी अपेक्षा का ?
मृत्यूची अटळता, त्याने होणारा सर्वच गोष्टींचा अंत.. आपण का स्वीकारू शकत नाही ? आणि आपण ते स्वीकारले नाही, म्हणून ते बदलणार आहे का ? इजंट धिस ऑल्सो अ फॅक्ट ऑफ लाईफ ? काय वाटतं तूम्हाला ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश,
मरणावर इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिलेलं पहिल्यांदाच वाचलं. लेख विस्कळित झालाय हे नक्की, पण ते अत्यंत साहजिक आहे कारण विषयच तसा आहे.
नजिकच्या काळात आमच्याही घरात २ मृत्यू झाले ते हि आकस्मात आणि चटका लावून जाणारे. तुमच्या मनात आलेले सर्व प्रश्न अगदी रास्त आहेत. खरंतर प्रत्येक माणसाच्या मनात मृत्यू बद्दल असेल विचार येत असतील.
तुम्ही शेवटच्या पॅरात जे लिहिलं आहे ते मला तंतोतंत पटते.
पण एखाद्याच्या मरणावर रडले नाही तर त्या माणसाला दु:ख झाले नाही असं गृहित धरले जाते, मग हंबरडे फोडून दु:ख सिद्ध केले जाते. शेवटी काय मनुष्यप्राणी हा स्वार्थीच. गेलेल्या माणसाचा आधार आपल्या पाठिवरून गेला हे सत्य पचवणं कठिण असतंच की त्यामुळे त्यासाठी तरी निदान तो माणूस जगायला हवा होता असं वाटून जात असेल. अगदीच व्याधीने जराजर्जर व्यक्ती गेली तर एक वेळ सुटकेचा नि:श्वास टाकला जाऊ शकतो. तो ही उघडपणे नाहीच. कारण आपली संस्कृती आणि समाज तसं करू देत नाही.
कुणाचं कुणावाचून अडत नाही हे जरी सत्य असलं तरी मृत्यू माणसाचा पचवता येत नाही हे खरं.

(माझी पोस्ट पण विस्कळीतच झाली आहे, मला ही नक्की काय म्हणायचं आहे ते नीट मांडता आलं नाही. Sad असो..)

खुपच विस्कळीत असले तरी छान लिहिलेय. हे प्रश्न स्गळ्यांनाच कधीनाकधी पडत असतील.

जीवनाची आसक्ती हेच एक मृत्युच्या भितीचे कारण नसावे. फक्त जीवनाची आसक्ती नसते तर आपल्या आजुबाजुच्या, आपण गोळा केलेल्ल्या वस्तूंची आसक्ती हे एक कारण असावे. आपल्या मागे राहिलेले लोक आपल्यावाचुन नीट राहतील का ही शंका हेही एक कारण असावे. अर्थात ते तसे राहतात हे आपण अनेक उदाहरणात पाहिलेले असते, पण आपल्याला आपले कारण नेहमी स्पेशल वाटत असते. आपण कमावलेले आता इतरांच्या ताब्यात जाणार याचे दु:ख हेही कार्ण असावप, पण हे कारण तितकेसे स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही. आणि मेल्यानंतर आपले काय? आपण कूठे जाऊ? याची भयानक भिती हे सगळ्यात मोठे कारण. तसे म्हटले तर हे कारण वैज्ञानिक दृष्त्या अतिशय तकलादु आहे, याला फक्त धार्मिक आधार आहे. तरीही हे कारण खुप प्रभावी आहे.

मरणाची भिती दोन प्रकारची असते.

१. आपल्या स्वतःच्या मरणाची भिती: ही नक्की भिती असते का उत्सुकता? मरणानंतर पुढे काय याचे उत्तर माहीत नसल्याने दडपणमिश्रीत उत्सुकता असावी. भिती असते ती त्या आधी होऊ शकणार्‍या वेदनांची आणि परावलंबित्वाची.

२. आपल्या जवळच्या माणसांच्या मरणाची भिती: त्या माणसांबरोबर आपला एक comfort zone तयार झालेला असतो आणि तो सोडून बाहेर पडायची आपली तयारी नसते. हे पचवायला खूप कठीण आहे. पण पचवल्यानंतर मात्र खूप सोपे जाते. उरतो मुद्दा आठवणींचा. एका मायबोलीकरणीचेच खूप उपयोगी बोल आहेत - 'आठवणींना आपल्या भवती पिंगा घालू देण्यापेक्षा त्यांना सुगंधी कुपीत बंद करून ठेवावे'.

लेख छान आहे.
अगदी समोर बसून बोलल्यासारखा.
बरंच तुमच्या विपूत लिहीलंयच.

कलामांसारखा मृत्यू येणे हे भाग्यवंतांच्याच नशीबात!

छान लिहिलय.

निसर्गाकडुन खुप काही शिकण्या सारखे आहे ना? एक कळी उमलुन फुल बनते ते फुल कोमेजून गळुन जाते बियांच्या रुपात तिचा अंश मागे ठेवते मानवाचे ही असेच ना?
दु:ख आहे का कोठे?
दु:खाला सामोर जाण्याची,तिच्या कडे तटस्थपणे पाहन्याची कला शिकता आली तर मरण उत्सव होऊ शकतो.

जसा जन्मोत्सव.

छान विषय आहे!!

स्वतःच्या मृत्यूची भीति म्ह्णजे स्वतःचे अस्तित्व नष्ट होण्याची भीति!! आपण आयुष्यभर स्वतःला इतके महत्व देत जगतो की आपल्यानंतर आपली म्हटलेली सगळी माणसे पुन्हा काही दिवसांनी सुरळित जगू लागतील, हळूहळू आपल्याला विसरतील आणि आपल्यावाचून इथे काहीच अडणार नाही ही कल्पना आपल्याला सहन होत नाही. म्हणूनच स्वतःच्या मृत्यूची आपल्याला भीति वाटते. वेदना वैगेरे ह्या विचारांना तितके महत्व आपण देत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. स्वतःच्या अस्तित्वावर अतिव प्रेम आणि स्वतःच्या अस्तित्वाला दिलेले बेसुमार महत्व हेच मृत्यूच्या भीतिस कारणीभूत आहे!!

झोप आणि मृत्यू यात थोडासाच फरक आहे.झोपेतून आपण जागे होतो,मृत्यूतून नाही.

अज्ञाताची भिती हे मृत्यूच्या भितीचे कारण असावे.

१. आपल्या स्वतःच्या मरणाची भिती: ही नक्की भिती असते का उत्सुकता? मरणानंतर पुढे काय याचे उत्तर माहीत नसल्याने दडपणमिश्रीत उत्सुकता असावी. भिती असते ती त्या आधी होऊ शकणार्‍या वेदनांची आणि परावलंबित्वाची.>>>>>> +१

पुर्वी बाळंतपणा नंतर पुनर्जन्मच मानला जाई. कारण बाळंतपणात मृत्यूचे प्रमाण हे आजच्या तुलनेने बरच असायच.प्रसुती मधे वैद्यकीय हस्तक्षेप झाला व ती सुलभ झाली. मग जन्मामधे जर वैद्यकीय हस्तक्षेप जसा समाजमान्य झाला तसा तो मृत्यूतही झाला पाहिजे. त्यासाठी प्रबोधनच कामी येणार आहे.

सुंदर लेख.
मला वाटते की अज्ञाताची भिती किंवा मरणानंतर काय ह्याची भिती वाटण्यापेक्षा 'जगायला न मिळण्याची' भिती जास्त असते. ..
जीवनाची आसक्ती कधी संपतच नाही आपल्यासाठी.>> हे खरे..बाकी, जर वेदनारहित हवा तेव्हा मृत्यू येणार असेल तर त्याला कोणीच घाबरणार नाही...
पण प्रत्यक्ष मृत्यूच्या क्षणी होणार्या वेदनेची भिती किती असते ?>> ही भिती माझ्यामते सगळ्यात मोठी..

पण प्रत्यक्ष मृत्यूच्या क्षणी होणार्या वेदनेची भिती किती असते ? >>> सगळ्या वेदना मृत्यूच्या आधी असतात कारण वेदना फक्त सजीवालाच होऊ शकतात.

मृत्यूची अशी कोणती वेदना असेल असे नाही वाटत. मृत्यू यायच्या आधी जी परिस्थिती असते (उदा. आजार, अपघात) त्यात मात्र वेदना असू शकते. त्याचीच भिती वाटते.

प्रगट-चिंतन चांगलं आहे. युधिष्ठिराला यक्षाने विचारलेला प्रश्न एकदम समोर आला! मृत्यू इतका शाश्वत आणि सतत बरोबर असूनही आपण सतत भविष्याचा विचार करत असतो हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपल्या प्रियजनांच्या मृत्युचं दुःख आणि आपल्या स्वतःच्या मरणाच्या कल्पनेने होणारं दुःख(? किंवा इतर भावना) ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मला स्वतःला स्वतःच्या मरण्याबद्दल नक्की काय वाटतं हे कळलेलं नाहीये. मी त्याबद्दल तेवढा विचारही केला नाहीये. पण एकदा एका क्षणी खूप प्रकर्षाने हा विचार समोर आला! नवीन ब्रिटीश शेरलॉक होम्स मध्ये एका भागात शेरलॉक होम्स उंच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करतो. तो त्या गच्चीच्या कठड्यावर उभा असतो आणि खाली बघत असतो. मालिका पाहताना त्याक्षणी खूप तीव्रतेने वाटलं की उद्या किंवा कधी ज्या क्षणी संपूर्ण शुद्धीत असताना जर माझ्या मृत्यूचा क्षण असा समोर आला तर माझं काय होईल! जाम भीती वाटली होती तेव्हा! तो सीन पॉज करून मी काही वेळ सुन्न होऊन बसले होते. तेवढंच. त्यानंतर ह्या सोबत्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मजेत आयुष्य जगते आहे! Que Sera Sera!

जबर्रदस्त विषय.. सुरेख लिहिलेय !

आयुष्यावर प्रचंड प्रेम असेल तर मरणाची भिती नाही वाटत. आयुष्यावर प्रेम म्हणजे जगण्याचा मोह नसून आहे त्या क्षणात भरभरून जगणे. मग उद्या काय याची फिकीर उरत नाही.
असे मला आपले वाटते .. Happy

बरेच जण ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ म्हणत मरण्याआधी जगून घेऊया म्हणतात. पण मला वाटते अश्यांच्या मनाला मृत्युचा विचार शिवला असतो म्हणूनच त्यांना अशी फिलॉसॉफी सुचते.
त्यापेक्षा राहिली एखादी गोष्ट मरण्याआधी करायची तर राहिली, त्यात काय एवढे मोठे. तसेही मेलो तर खेळ खल्लासच. मग खंतही कुठे उरते. Happy

असो,
वर साती वगैरेंनी अमुकतमुक लिहिले आहे, असे उल्लेख आहेत. त्याच्याही लिंका द्या. काढतो आताच वाचून
तसेही मरणाचे विचार नेहमी रात्रीच करावेत, उद्याचा दिवस आपण दुप्पट जोमाने जगायचे ठरवतो Happy

आणखी एक म्हणजे, जेव्हा आपण मरणावर बोलू काही म्हणत विचार करू लागतो तेव्हा ते विचार त्या मरणाआधी आयुष्य कसे जगायचे याच विचारांवर आणून सोडतात..

दिनेशदा,

लेखन विस्कळीत आहे खरं, पण कोणत्याही सर्वसाधारण (=नॉर्मल) माणसाचं तसंच असायला हवं. Happy याचं कारण असं की आल्याला मृत्यूची नीटशी कल्पना नसते. किंवा लहानपणापासून करून दिली जात नाही.

तुम्ही म्हणता तो मृत्यू म्हणजे देहमृत्यू आहे. मृत्यू आणि निद्रा ही सख्खी भावंडं आहेत. आपण निद्रेशी चांगले परिचित असतो. पण मृत्यू तिच्याहून जवळचा असूनही आपल्याला तितकासा परिचित नसतो. पारंपारिक समजुतीनुसार हा अखिल इहलोकच मुळी मृत्युलोक आहे. म्हणून मृत्यू आपल्या देहासकट सर्व चराचराला व्यापून आहे.

मृत्यू आपल्या देहात कार्य करतो म्हणून देहातल्या पेशी त्यांचा जीवनक्रम पार पडून मरण पावतात. पेशींच्या जीवनक्रमामुळे देहाची धारणा होते. पेशींचा मृत्यू होतो म्हणून दररोज सकाळी आपल्याला मलमूत्रत्याग करायला मिळतो. त्यातूनच पुढे भूक लागते, आणि अन्नभक्षण करून देह तगवला जातो. अशा प्रकारे आपल्या दैहिक जीवनाचा आधार मृत्यू आहे. हे सत्य एकदा नीटपणे आकळून घेतलं की मृत्यू आपला मित्र बनतो. Happy

जीवनाचे नियम (=कर्मसिद्धांत) मृत्यूला (=यमाला) अगदी अचूकपणे ठाऊक असतात. म्हणूनच मृत्यूला मित्र बनवणं म्हणजे अमरत्व प्राप्त करून घेणं होय. यालाच अध्यात्मिक साधना म्हणतात. सध्याच्या काळी नामजप करणे हीच कालोचित साधना आहे.

आता एक प्रश्न उद्भवतो. जर हा मृत्यू आपल्या देहाला व्यापून आहे, तर तो आपल्याला जाणवत का नाही? याला माया ऐसे नाव. मृत्यू सतत जवळ असल्याने त्याची अतिपरिचयात् अवज्ञा झालेली असते. तिला देहमृत्यूच्या वेळेस अकस्मात तडा जातो. म्हणून मृत्यूची भीती वाटते.

असो.

आता माझा अनुभव सांगतो.

मला जेव्हा हृद्विकाराचा जोरदार झटका आला होता, तेव्हा रुग्णवाहिकेत पडल्यापडल्या डोळे विस्फारले गेले. कपाळातून काहीतरी बाहेर जातंय असं वाटू लागलं. मी ओळखलं की देह सोडून निघायची वेळ झाली. पण माझी नैसर्गिक धडपड देह पकडून राहण्याची होती. मी देहाबाहेर ढकलला जात होतो. पहिले पाचेक सेकंद प्रतिकार केला. पण नंतर ठरवलं की असं मारून मुटकून मागे राहण्यात काही पुरुषार्थ नाही. म्हणून धडपड थांबवून शांत राहिलो. शेवटचा धक्का मिळण्याची वाट पाहू लागलो. पण पुढचे पंधरावीस सेकंद तसा धक्का मिळाला नाही. तेव्हा कळलं की आपण आता मरत नाही.

मात्र वर सांगितलेलं सगळं विसरलो होतो. आपण एका बदलाचा भाग आहोत एव्हढंच कळंत होतं. फक्त देह धरून ठेवण्याची धडपड चाललीये एव्हढंच भान उरलं होतं. उरलेला वेळ शांत होतो. त्यामुळे वर झाडलेल्या तत्त्वज्ञानाचा कितपत फायदा झाला याची शंकाच आहे. तोटा मात्र आजिबात नसल्याने वरील तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला निश्चितच हरकत नाही. कुणास ठाऊक कदाचित मला शांत राहण्याची प्रेरणा त्यातूनच मिळाली असेल. कदाचित हाच तो फायदा असेल ! आणि कदाचित इतरांना वेगळ्या प्रकारे लाभ होईलही ! Happy

आ.न.,
-गा.पै.

दिनेशदा,

काय सुंदर लेख आहे. अहो गामा सारखा माणुस विरळा जो मृत्युच्या दारातुन परत येतो. सिल्वर कॉर्ड इ. स्टेज मधुन परत आलेले खरे सांगतात की आधी वाचली ती माहिती प्रगट करतात याला तर्काशिवाय दुसरा पुरावा रहात नाही.

जे आपण पाहिले नाही. जे अनुभवले ( आत्मा अमर आहे या चालीवर ) ते मागील जन्माचे आठवत नाही अश्यावेळी अनुभव कथन करणे जरा कठीणच. कुणाच्या मते हा विस्कळीत लेख असेल तर साहजीक आहे.

आपुले मरण म्या पाहिले डोळा असे तुकाराम महाराज म्हणुन गेले आहेत. या ओवी/उक्तीचा अनुभव घ्यायला, त्याचा अर्थ समजायला आयुष्यात सजग असावे लागते.

लेखाचा विषय खरोखरंच छान आहे..

जवळच्या नातेवाईकांचा वियोग सहन करणं अवघड असतं, पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यन्त दाखवलेली सजगता
हिम्मत देऊन जाते, असा माझा अनुभव आहे.नुकतेच माझे काका आय सी यू मधे होते, शरीराचे इतर अवयव हळूहळू निकामी होत होते पण त्यांचा मेंदू इतका सजग होता कि तिथल्या साऊथ इंडिअन नर्स ला आपल्या खोल गेलेल्या आवाजात सांबारा ची रेसिपी विचारून घेतली. दुसर्‍या दिवशी ते गेले पण आम्हा सर्वांकरता आपल्या सुंदर आठवणी सोडून गेले. काही वर्षांपूर्वी, आत्या कॅन्सर च्या दुखण्याने इतकी त्रासली होती पण तिच्या मुलांनी हट्टाने
तिला वेंटीलेटर वर ठेवलं होतं, एका दिवशी तिने निर्णय घेतला आणी आता वेंटीलेटर नको म्हणून स्वतःच साईन केलं लेटर आणी शांतपणे गेली. माझे आई दादा ही असेच झोपेतच गेले.
अशा सर्व उदाहरणांमुळे कि काय आमच्या घरी मृत्यू चा विषय , घाबरवत नाही.
आम्ही तर घरातली, बाहेर ची , बँकिंग, इन्वेस्टमेंट इ. इ.कामे वाटून न घेता ज्याला वेळ असेल तो निपटवतो. यामागे कारण एकच जर दोघांतील कुणी एक उरलं तर त्याने आपल्या छोट्यामोठ्या कामांकरता कुणावर अवलंबून राहू नये.
या शिवाय आपल्या मागे मुलांना कष्ट पडू नयेत त्या दृष्टीने आपला पसारा स्वतःच कमी करणे, कागदपत्रं, हिशोब चोख ठेवणे इ. कामंही करत असतो. या सर्वामागे प्रॅक्टीकल विचारच आहेत.
बाकी कब कैसे असले विचार सध्यातरी नाही येत मनात Happy

दिनेश लेख लिहिल्याबद्द्ल धन्यवाद!

मी कुठेतरी वाचल होतं की जेव्हा मरण येतं तेव्हा आपल्याला संपूर्ण आयुष्याचा जीवनपट डोळ्यासमोर येतो..मेमेरी पूर्ण फ्लॅश होते.. त्यामुळे कपाळामध्ये एकदम झटका लागल्या सारखं वाटतं आणि डोळ्यासमोरून एकदम प्रकाश येऊन नंतर अंधार्या अवकाशात गेल्यासारखं वाटतं..

गामा तुमचा अनुभव वाचून वरचं आठवलं..

डॉक्टर माबोकर काही शास्त्रीय माहिती द्याल का?

haa lekh lihilyaapaasun malaahee faar asvasth vaaTatey ?
yaa ekaa shaashvat goshTeebaddal aapaN kiteetaree kamee jaaNatoy. khare tar pratyax maraNaachee bhaavanaa kashee asate he thoDese gamanchyaa anubhavaavarun kaLatey, paN sagaLyaancheech tashee asel kaa ?

aaNi aapaN gelyaavar kaay hoNaar, haa faarach svaarthee vichaar jhaalaa. kharech kuNaavaachun kaaheech aDat naahee.

aapaN khupadaa baghato, ekhaadaa sahakaaree taDakaafaDakee raajeenaamaa deoon nighoon jaato, company chalatech ki.

Indira Gandhee gelyaa tevhaahee bhaarataachee avasthaa tasheech jhaalee hotee.. paN saavaraloch ki aapaN.

हे लिहायला घेतल्यावर, गिरिश कुबेर यांचे जैविक युद्धाबाबतचे एक पुस्तक वाचायला घेतले. पहिलेच प्रकरण अगदी उबग आणणारे आहे ( उबग त्यातील सत्यघटनांचा ) स्वाईन फ्लू हा आजार आणि त्यावरचे टॅमी फ्लू हे औषध कसे मानवनिर्मित होते आणि त्यामागे ज्यूनियर बूश चा कसा हात होता याचे सविस्तर वर्णन आहे.

औषध कंपन्या आपला माल विकण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात, त्याबद्दल एक मेसेजही व्हॉट्स अ‍ॅप वर फिरतोय... ते सगळे वाचून एक विचार मनात आला..

बाबांनो आजारी का पाडताय ? त्यापेक्षा एकदम सोडवाच कि.. आणा एखादे औषध बाजारात. घे गोळी आणि मिळव मुक्ती.

काय वाईट आहे त्यात ? आज सिरियासारख्या अनेक देशांतील नागरीक मरणापेक्षा भयानक जीवन जगताहेत.
त्यापेक्षा हे काय वाईट ? स्वतःचा निर्णय असावा हा. हवा तर वैद्यकिय पथकातर्फे तपासून घ्यावा. यात कुणाचाही
आर्थिक फायदा होणार नाही हे पहा आणि विमा असलाच तर तो रद्द करून घ्या हवातर....!! ( विचार वाईट आहे, पण आला खरा मनात. आज कळत नकळत या जैविक युद्धाला आपण सामोरेही जात असू. उद्या उघड हल्ले होतील. आज छुपे चालूही असतील. )