नोकरी गेली तेव्हा....

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 September, 2015 - 13:26

नोकरी गेली तेव्हा
ती हसली बेछूट बिनधास्त
तशीच तिच्या स्टाईलन
डोळ्यातील पाणी मागे फिरवून
मनातील दु;ख गिळून
काहीतरी चांगलेच होईल यातून
असे मोठ्याने वदून
गेली सहजतेचा आव आणून
अजूनही आपल चुकलं
असं तिला वाटत नव्हतं
व्यवस्था पद्धतीकडेच
तिचं बोट दाखवणं होतं
प्रत्येक वाक्य तिचं
त्यांनाच जबाबदार ठरवत होतं

पण घरी येतांना एकटीच रस्त्यानं
मन भरून आलं होतं
डोकं जड झालं होतं
नकळत डोळ्यातून
दु:ख घळघळ वाहत होतं
तसं तिचं चुकलं
हे तिला माहित होतं
कळत न कळत हातून
एक आकाश पडलं होतं

बेपर्वा बेछूट वागणं
का जन्मतःच येतं
आक्रमक वाकवादरता
का कोण कुणास देतं
असुरक्षितता माणसाला
बनवते भित्रा वा आक्रमक
आणि दु:ख त्याला
बनवते दयाळू वा कडवट

त्यामुळे तिचं दु:ख वा भीती
कधी कुणाला दिसलंच नाही
दिसलं ते फक्त
चिडणं बोलणं रागावणं ओरडणं
ते तिच्यासाठी एवढं नॉर्मल होतं
की आपलं चुकत हेच तिला कळत नव्हतं
त्यातून जन्माला येणारी अपरिहार्य वेदना
हे तिचं प्रारब्ध होतं
असं आतून आणि बाहेरून
दुहेरी मरण भोगत होती ती
वाटेवर काटे उधळत
स्वत:च चालत होती ती
रक्ताळले पाय तरीही हसत
वेदना जिंकल्याच्या अविर्भावात
चालत होती ती
पण शरीर अन मन होतं ते
नक्कीच पिळवटत होतं
आणि दु:ख ढग होवून
कोसळून पडत होतं

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users