ठका , डाली आणि प्रश्नचिन्ह

Submitted by -शाम on 1 September, 2015 - 23:53

सर्व शिक्षा अभियानाच्या रगाड्यातून हे प्राणी कसे काय वाचले कोण जाणे. मात्र
सक्तीने करून घेतलेल्या सर्व्हेक्षणात ही मंडळी दिसली तेंव्हा माझे डोळेच पांढरे
होण्याचे बाकी होते.
एका शेताच्या बांधावरच्या कुडाच्या कोपी समोर तीन लहानगी खेळताना दिसली.
शाळकरी वयाची होती आणि तरीही शाळेच्या बाहेर?
"तुमचे आईवडील कुठे आहेत?"
माझ्या सहज प्रश्नाने पाखरांना शिकाऱ्याची चाहूल लागावी तसे ते भुर्र झाले.
कोपीत डोकावले तेंव्हा ६०-६५ वर्षांचा अगदी
जराजर म्हातारा कानाला हात लावून मिचमिच्या डोळ्यांनी नुसताच माझ्याकडे बघू लागला.
कोपीत किंचितच उजेड होता.आत सामान असं काहीच नव्हतं. चार दोन बारदानी , गोधड्या, काही कपडे, चिंध्या,
आणि चार-सहा भांडी. चूल तर त्या टीचभर अंगणातच होती. शेजारी लाकूडफाटा.
"बाबा ही मुलं कोणाची आहेत?" मी विचारले.
"आं sss" कानाचा हात तसाच ठेवत म्हातारा बोलला.
"बाहेर खेळणारी मुलं कोणाची आहेत?"
मी जरा मोठ्याने.
"व्हत्या त्सांग दोन माजी आन याक माह्या पोरावालं"
"शाळेत जातात का?"
"नाहा "
''का?''
मग बाबा जे बोलला त्याचा आशय असा.
ठाकर समाजाचं हे कुटुंब. बाबाची ही पाचवी बायको होती जिची ही मुलं होती. बाईआता ह्यात नव्हती.
बाबा आपल्या दुसऱ्या बायकोच्या मुलासोबत तिथे राहत होता. त्या मुलाचीही एक मुलगी होती.
असे ते तिघे बाहेर खेळत होते. मुलगा वाट्याने शेती करत असल्याने हंगामा नुसार त्यांची कुटुंब यात्रा चालली
होती. कधी या गावात तर कधी त्या गावात. मुले शाळेच्या वयाची झालीत हे त्यांच्या गावीही नव्हते.
जरा वेळात त्याचा मुलगा आल्या नंतर मी त्याला .
बालकांचा शिक्षण हक्क कायदा , शिक्षणाचे महत्व वगैरे सरकारी बाबी समजावून मुलाना शाळेत
पाठवण्याची गळ घातली. त्याच्या शेतमालकाची मुलेही शाळेत येत होतीच २ किमी चालायला
फार नव्हते.
दुसऱ्या दिवशी ते तिघेही शाळेत आले.
मी सरकारी बडग्यातून मोकळा झालो होतो. आता माझ्या परिसरात
एकही मुलगा शाळाबाह्य नसल्याचा मला आनंद होता.

पहिल्यांदाच शाळेत आल्याने त्यांना बुजल्या सारखे वाटत असावे म्हणून मी त्यांना बोलतं करण्यासाठी काही विचारणार
तो माझ्या लक्षात आलं की त्यांच्या अंगावरचे अपडे अनेक दिवस धुतलेलेच नव्हते.
त्यांनी स्वत:ही कितीतरी दिवस अंघोळ केली नसावी असा मळ गळ्याखाली , हाता पायांवर दिसत होता.
दात उगवल्यापासून घासलेलेच नसावेत इतके खराब. नाक , डोळे. विचारूच नका. केससुद्धा घरीच कापलेले.
मला काही काळ काहीच सुचेना.
मग भात शिजवणाऱ्या (शालेय पोषण आहार) बाईला दहा रुपये देऊन तिच्या मदतीने त्यांना हातपंपाखाली अंघोळ घातली .
आता जरा बरे वाटत होते. रोज अंघोळ करावी , स्वच्छता ठेवावी वगैरे त्यांच्या जगात नसणाऱ्या बाबी मी त्यांना समजावू लागलो.
खरी कसोटी पुढे होती. मी आणि माझा सहशिक्षक आम्ही दोघेही त्यांना हळू हळू प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू लागलो.
पण ही मुलं काहीच प्रतिसाद देत नव्हती. ती नाव सांगत नव्हती की काही बोलत नव्हती. शाळेत बसले की दरवाजाकडे
तोंड करून बसतात. फळ्याकडे बघायाचंच नाही असं जणू त्यांनी ठरवूनच घेतलंय.
त्यांनी त्या दिवशी घातलेले कपडे अद्यापही धुतलेले नाहीत. त्यांच्या भावाने दिलेल्या दाखल्यावरून
मुलाचे नाव ठका, मुलीचे डाली आणि दुसरीचा दाखलाच नाही. बरं ह्याला काही विचारावे तर ह्याचा तंबाखूचा तोबरा.
आणि अगदी असहाय्य करणारा दर्प.
महिना झालाय चित्र बदलायचे नाव नाही. उलट परवातर या नव्या विद्यार्थिनीने वर्गातच सुसू केली.
माझ्या शिक्षणशास्राच्या दोन्ही डिग्र्या आणि बालमानसशास्राचे ज्ञान पार तोंडघाशी पडलेय.

त्यांच्या शेतमालकाच्या मुलांना काही प्रश्न विचारून समोर आलेल्या बाबी अशा -
त्यांना टीव्ही पाहायला आवडतो. ते मोबाइलची गाणीही आवडीने ऐकतात.
घरी भरपूर बोलतात, खेळतात.
मी माझा मोबाईल त्यांना देऊन पहिला. खरोखर त्यांची भिरभिरणारी नजर स्थिरावली.
मग लक्षात आलं इलेक्ट्रॉनिक ग्याझेटचा वापर करून आपण आपल्या अध्यापनात सुधारणा घडवू शकतो ज्याचा या सर्वच आदिवासी
मुलांना फायदा होईल. माझ्या कडे १००% आदिवासी ( ठाकर) मुलं आहेत. मग त्या दृष्टीने मी पष्टेपाडा , ता. शहापूर जि. ठाणे . कर्डेलवाडी शिरूर, जि. पुणे
अश्या तंत्रस्नेही शाळांना भेट देऊन माहिती मिळवली. आणि शाळेत उपयोगात आणता येणारी डिजिटल क्लासरूम
ही संकल्पना राबवायचे ठरवले आहे. त्यासाठी भरपूर खर्च आहे, शासन अशा उपक्रमांचे फक्त कौतुक करते मदत नाही.
मी माझा प्रयत्न करतोय मित्रांनो. तुमच्या सदिच्छा आणि मदतीची गरज आहे.

https://www.youtube.com/watch?v=bcvoY09Ejqg

https://youtu.be/yd3yysuaHbE

https://youtu.be/e6MEwmsibn8

हे काही व्हिडीओज आहेत मित्रांनो... तुम्हाला थोडीशी रुपरेषा स्पस्ट होईल.

स्वाती , तुम्ही दिलेली माहीती उपयुक्त आहेच.. त्याचाही मी विचार करतोय... आपण सर्व माझ्या बरोबर
आहात याचा मनस्वी आनंद आहे...

स्पर्श पटलाचे (touch screen)आकर्षण, ह्या नैसर्गिक भावनेचा अध्यापनात उपयोग करून त्या आधारे
विविध अध्ययन कौशल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश या डिजिटल क्लासचा आहे.
असेच काही प्रयोग वरील व्हिडीओजमध्ये पहावयास मिळतात. जे अगदी यशस्वी आहेत.
मी ज्या वस्तीत काम करतो तिथे १०० % आदिवासी ठाकर राहतात. ते अगदीच हेमलकसा सारखे नसले.
तरी त्यांची मानसिक जडणघडण, रहाणीमान, बौद्धिक स्तर आदी बाबी चिंताजनक आहेत.
त्यामुळे माझा हेतू फक्त या दोन मुलांपुरता मर्यादित नसून एकूणच शाळेतील सर्वांना नव्या तंत्राच्या आधारे
किमान अध्ययन पातळी पर्यंत नेण्याचा आहे. तुम्ही जो विश्वास दाखवलात त्या बद्दल मी खूप खूप आभारी आहे.
मला अनेकांनी फोन मेसेज करून मदतीचा हात पुढे केलाय ज्याचा आनंद तर होतोय पण प्रचंड दडपण सुद्धा आहे.
असो.

माझा विचार एक असे युनिट तयार करण्याचा आहे ज्या मध्ये विद्यार्थ्यांना एका सुसज्ज शाळेत असल्याचे समाधान मिळेल.
समाजातल्या कोणत्याही मुलांच्या गणवेश ,टाय- बुटाचे , त्यांच्या बोलण्या वागण्याचे दडपण या मुलांवर येऊन त्यांचा आत्मविश्वास डळमळणार नाही.
आणि मुख्य म्हणजे कृतीतून आणि ज्ञानरचनावादाधारे त्यांच्या अध्ययन क्षमता विकसित होतील.
त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा एवढाच प्रामाणिक हेतू आहे.

या साठी २ टप्प्यात काम करावे लागणार आहे.

१. तांत्रिक गरजा -
या प्रकल्पासाठी (प्रोजेक्ट) विद्यार्थी संख्येच्या इतके किंवा अर्धेतरी शैक्षणिक tablets. with HDMI PORT
किमान १ संगणक / laptop संच
इंटरनेट कनेक्टीव्हिटी,
स्पीकर सिस्टीम
INTERACTIVE बोर्ड / LCD प्रोजेक्टर / LCD डिस्प्ले १
डिस्प्ले शेअरिंग डिव्हाईस १
स्क्रीनिंग बोर्ड / पडदा
सोलरयुनीट बॅटरीबॅकप
----------------------
२. भौतिक गरजा -
यात खूप गोष्टी आहेत.
भिंतींची सजावट, १ पंखा , १ LED highmax,प्लास्टिक कार्पेट.
प्लास्टिक रूफिंग , पडदे, लाईट फिटिंग, चप्पल स्टेंड, इत्यादी इत्यादी...

वैयक्तिक बाबी...जसे , गणवेश, लेखन साहित्य, स्कूल bags,
साबण, नेपकिन आदीची व्यवस्था शासकीय तसेच स्थानिक पातळीवरून शक्य होत आहे.
म्हणून त्याची गरज नाही.

मला कोणीही पैसे द्यावेत असे अपेक्षित नसून यातली कुठलीही गोष्ट आपण देऊ शकता. जी नेण्याची व्यवस्था मी स्वतः करेन. अगदीच शक्य नसेल तरच आपण आपणास हवी ती रक्कम मुख्याध्यापक खात्यावर वर्ग करू शकता ज्याचा नंबर मी संपर्कातून देईलच. शिवाय वस्तू खरेदीचा तपशीलही आपणास मिळेल. आपण देऊ केलेल्या वस्तूवर आपले नाव असावे कारण नंतर तो मुद्दा विनाकारण त्रासाचा होतो.

एका सुसज्ज शाळेत वरील बाबी काटेकोरपणे असतात ज्यासाठी एका प्रकारे फी च्या माध्यमातून पालकच पैसे पुरवत असतात.
इथे परिस्थिती वेगळी असल्याने मी हे आवाहन करत आहे
- शाम
मो. ९४२०९५२५७३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिल्डवर तुला हे सगळरोजच भेटत असणार, यापेक्षा अवघड परिस्थितीशी तू सामना करत असशिलच. फार चर्चा न करता योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलल आहेसच. सहभागी व्हायला आवडेल. फक्त असं एवढ्या दूरुन कसा सहभाग घेता येईल याचा विचार करते आहे.

खुप खुप आभारी आहे बाबु... भीतभीतच पोस्ट केले होते. कारण इमोशनल ब्लॅक्मेलीन्ग वाटू शकते.
माझा प्लान रेडी आहे. मी सविस्तर बोलेन त्यावर.आपण दिलेल्या नंबर वर मेसेज टाकावा. मी सन्पर्क करेन.

डिजीटल माध्यमातून शिक्षण हे, दुर्गम भौगोलिक परिस्थिती, कुशल शिक्षकांची वानवा अशा अनेक अडचणी दूर करणारे वरदान ठरू शकते हे मान्यच आहे. त्यामधे काम करायला आवडेलही पण रेडी प्लॅन सविस्तर बोलण्या ऐवजी मोघम तरी लिखित स्वरूपात इथे मांडलात तर खूप बरे होईल.

शाम दादा आम्ही नावचे अन तुम्ही खरे खुरे सैनिक आहात!! माझ्या पामराचा एक मानाचा मुजरा घ्या ! तुमचे लेखन वाचले अन तुमच्याशी इंटरेक्शन केले ह्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो आहे _/\_

तुम्ही फार प्रशंसनीय काम करत आहात! कुठे असता तुम्ही? तुमचा प्लॅन आणि लागणारी मदत ही माहिती ह्याच धाग्यावर लिहा. मला स्वतःला जमेल तेवढी मदत करायला आवडेल.

नेमकी कशा स्वरुपाची मदत अपेक्षीत आहे? बाकी उत्तम काम करत आहात. तुमच्या कार्यात मला जमेल अशी नक्की मदत करेन.

रेडी प्लॅन सविस्तर बोलण्या ऐवजी मोघम तरी लिखित स्वरूपात इथे मांडलात तर खूप बरे होईल. >> +१

मी यापूर्वीही या संदर्भात काम केले आहे. थोड्या प्रमाणात आजही रीमोटली चालू आहेच.
मला सध्या रीमोटली आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा प्रत्यक्ष ग्राऊंडवर्क दोन्हीमधे सहभागी व्हायला आवडेल.

बेफि. मी तुमच्याकडे कुठलीही गोष्ट या मुलांसाठी हक्काने मागु शकतो याची खात्री आहे.

ढोबळ मानाने
१० / १२ शैक्षणिक tablets. with HDMI PORT
स्पीकर सिस्टीम
INTERACTIVE बोर्ड / LCD प्रोजेक्टर / LCD डिस्प्ले या पैकी काहीही १
छोटा कॅमेरा
स्कॅनर /प्रिन्टर
आणि
डिस्प्ले शेअरिंग डिव्हाईस १

ह्या सुरुवातीस लागणार्‍या महत्वाच्या गोष्टी आहेत...

एकाला शक्य नसल्यास दोघा-चौघांच्या मदतीनेही ह्या वस्तू उपलब्ध करता येतील.
यातुन सुरुवात करता येईल.. एकदा काम दिसू लागले की बाकीच्या बाबी उस्फुर्तपणे हाती येतील.

एखादे टॅब्लेट देणे शक्य असेल तर कोणाला संपर्क करयचा. कसे पाठवायचे?

इंग्रजी असले तरी उपयोगाचे पडू शकेल म्हणूनच फक्त ही लिंक द्यायचे धाडस केले आहे - https://www.google.com/edu/

काही उपयोगी पडले तर बरेच होइळ.

CalAA-kaar -

yess Google n playstore is always for us... there is many apps which are child freindly and free

im already using them bt mobile device is not sufficient for all.

nway thanks.. and welcom.

call on my no. for tab. handover.

आणि नवीनच हवेय असे काही नाही... जुने परंतु सुस्थितीत असणाऱ्या वस्तूही चालतील.

कधीमधी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये युबीस्लेट किवा इतर टॅबलेट्सची जाहिरात येते. साधारण ४-६ हजार किमतीचे, अँड्रॉइड वाले असतात. ते ह्या कामासाठी कसे असतात?
वरील विडीयोमध्ये दाखवलेले शैक्षणिक कार्यक्रम त्या टॅबलेट मध्ये आधीच घालून मिळाले नसल्यास ते तुमच्याकडे उपलब्ध असतील का?
कुठल्या गावात/जिल्ह्यात आहे? उन्हाळ्यात सरासरी तापमान काय असते? वरील इलेक्ट्रोनिक सामान सरासरी ६-७ सलग तास वापरले जातील असे वाटते. उन्हाळ्यात अशा वापराने wear-n-tear वाढू शकते. ह्याचा विचार केला आहे का? वरील विडीयोतील कार्यकर्त्यांचे ह्या संदर्भात काय निरीक्षण आहे.

प्लास्टिकचे कार्पेट म्हणजे कार्पेटच की चटयासुद्धा?
इंटरनेट कनेक्टीविटीसाठी त्या भागात ज्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क असेल त्या कंपनीच्या मुख्यालयात किवा मोठ्या अधिकार्यांना भेटल्यास त्यांच्याकडून CSR अंतर्गत मदत मिळेल असे वाटते.

बर्याच वेळा लग्न, वाढदिवस अशा समारंभात बरेच पाहुणे एकच भेट घेऊन येतात. इथेही दूरस्थ मदत पोहोचवताना सगळ्यांना टॅबलेट्स किवा प्रोजेक्टर देणे सोपे होऊ शकते. आणि दुसरी कुठली आवश्यक पण कदाचित सहज शक्य नसल्याने किवा वैयक्तिक आवाक्यात नसल्याने राहून जाऊ शकते.
तेव्हा सर्वसाधारण सध्या हातात असलेल्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक वस्तू किती लागतील, ताबडतोब किती लागतील आणि वरील wear-n-tear लक्षात घेता ठराविक कालावधीनंतर किती लागतील आणि त्यातल्या आतापर्यंत किती मिळाल्या वगैरे असे तुमचे नियोजन असेलच...

vt220 >>>

तुमच्या शंका रास्त आहेत.. या सगळ्याचा विचार नक्कीच केला गेलाय.

टाईपींग मध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही कॉल करु शकता. किंवा नंबर दिल्यास मी करेन.

शाम. धन्यवाद. प्रयत्नांना लागतो कृपया ती यादी मला विपूतून पाठवून ठेवलीत तर बरे होईल. धन्यवाद.

सर,

सर्वात आधी तुम्हाला शाम संबोधल्याबद्दल क्षमस्व,

एक नेटबुकचा बंदोबस्त झाला आहे. HDMI पोर्ट नाहिये मात्र त्यात,इतर गोष्टींची जमवाजमव चालू आहे.

तुमची हरकत नसल्यास शाळेला प्रत्यक्ष भेट द्यायला आवडेल. तुमचे कष्ट व तळमळ लेखातून पोहोचते आहेच. भेटीमुळे आणखी चांगल्या प्रकारे भिडेल

@ बागुलबुवा >> सर्वात आधी तुम्हाला शाम संबोधल्याबद्दल क्षमस्व >>> काहीतरीच राव...
तुम्हीही काहीही म्ह्णा no prob.
आपल्या सहकार्या बद्दल आभारी आहे.

सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

सविस्तर माहीती इथेच दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. युट्युब्वरच्या लिंका बघायला अजून जमले नाहीये, बघतो आणि परत संपर्क साधतो

Pages