एक्स्प्रेशन्स हायवे!

Submitted by आशूडी on 29 August, 2015 - 01:41

एक आरभाट कलाकृती व खरपूस फिल्म्स कृत "हायवे एक सेल्फी आरपार" हा सिनेमा म्हणजे गिरीश आणि उमेश कुलकर्णीद्वयीची आणखी एक दर्जेदार कलाकृती. एवढं मोठं आणि अतरंगी नाव असूनही चित्रपटाच्या फ्रेम्समधून त्यातला प्रत्येक शब्द धीरे धीरे सार्थ होत राहतो. प्रवास हा या कलाकृतीचा मूळ गाभा. पण हा प्रवास फक्त गंतव्य स्थळी पोचण्यासाठीच सुरु झालाय असं नाही. किंवा तो कधी कुठे सुरु झालाय तेच ठाऊक नाही. हा प्रवास आहे गंमतीचा, नात्यांचा, नकळत निर्माण होणार्‍या बंधांचा, जोडलेल्या जीवांचा, तोडलेल्या पाशांचा, वर वर उथळ वाटणार्‍या आयुष्याला अंतर्मुख करायच्या ताकदीचा.

अनेक पात्रांना घेऊन त्यांची मोट बांधणं आणि त्या संपूर्ण गोंगाटातून एकच सूत्र वाहात असल्याचं अखेरीस दाखवणं हे आव्हान हायवे लीलया पेलतो. सुरुवातीला अनेक तुकडे तुकडे आपल्याला गोंधळात टाकतात पण हळूहळू त्यातल्या प्रत्येक तुकड्याचा आकार, रंग, रुप आपण बारकाईने न्याहाळू लागतो आणि अलगदपणे त्या गोंगाटाचाच एक भाग होऊ लागतो. जसं की एखाद्या हायवेला लागण्यासाठी त्या गावाच्या शहराच्या वेशीपर्यंत यावंच लागतं, तिथले रोजचे व्यवहार पूर्ण करत करत आपण आपोआप एका परीघातून दुसर्‍या परीघात प्रवेश करते होतो तसंच मध्यंतरापूर्वीचा आणि नंतरचा हायवे आपल्याला अलगदपणे एका भावविश्वातून दुसर्‍यात नेऊन सोडतो. त्यासाठी सुरुवातीचा कोलाहल आणि नंतरची बरसत राहणारी शांतता एखाद्या पात्रासारखी भूमिका निभावतात. चित्रपटातल्या काही चौकटी इतक्या चपखल आहेत की संवादांची गरज भासू नये. उदाहरणार्थ, पहिल्याच दृष्यात एका चाळीच्या मागे उभारलेली टोलेजंग इमारत दाखवली आहे आणि आजूबाजूला नवीन बांधकामांच्या जाहीराती. त्या चाळीतून एक तरुण बाहेर येतो ज्याला आपण कुठे जायचंय, कुणाला भेटायचं हे काहीच माहीत नसतं तरी तो निघतो. श्रीमंत होण्याचं त्याचं स्वप्न त्या टोलेजंग इमारतीसारखं आणि जाहीरातींसारखं त्याचा पाठलाग करत असतं!

सिनेमाला नेपथ्य म्हणावं तर असं काहीच नाही. कॅमेराचा फोकस फक्त आणि फक्त कलाकारांच्या चेहर्‍यावर. त्यामुळेच फक्त चेहर्‍यावरच्या हावभावांवरुन संपूर्ण पात्र जिवंत करणं ही अभिनयाची परीक्षा जवळपास प्रत्येक कलाकार अव्वल गुणांनी पास झाला आहे. म्हणूनच हा एक्सप्रेशन्स हायवे ठरतो. कुणाकुणाचं कौतुक कराल! अचूक पात्रनिवड यापेक्षा दुसरा समर्पक शब्द नाही. गिरीश कुलकर्णीचं लेखन म्हणजे खुसखुशीत विनोदांची पखरण हे समीकरण इथेही आहे. सुनील बर्वे आणि त्याच्या बायकोचा एक सीन आहे त्यात प्रेक्षक इतकं रीलेट होतो की अक्षरश: हसून हसून गाल दुखायला लागतात! 'बेस्ट ऑफ कॉमेडी सीन्स' मध्ये तो सीन जाऊन बसणार. मुक्ता बर्वेला तिचा सूर परफेक्ट सापडलेला आहे. ही अभिनेत्री कमाल आहे. नागराज मंजुळे आणि किशोर कदम यांच्याबद्दल क्या कहेने! हे दोघं नुसतं 'आहेत' इतनाही काफी है. रेणुका शहाणेचा वावर खरंच आश्वासक आहे. डोक्याचं भिरभिरं करुन सोडलेल्या या अनेक पदरी कथावादळाला तिचं पात्र एक ठेहराव देतं.अशी स्त्री पात्रं किती सामान्यतः आपल्या आजूबाजूला वावरत असतात पण त्यांच्या अस्तित्वाची, स्वभावाची ओळख इथं नव्याने होते आणि चित्रपट उंचीसोबतच खोलीही गाठतो. गिरीश कुलकर्णीचा एनाराय अजून थोडा सहज हवा होता असं वाटलं. हुमा कुरेशी आणि तिस्का चोप्रा या फक्त पाहुण्यांसारख्या नाहीत तर त्यांनाही पूर्ण लांबीच्या सुरवात, मध्य, शेवट असलेल्या भूमिका दिल्या आहेत आणि त्यांनीही 'अभिनयाला भाषेचा अडसर नसतो' हे सिध्द करत प्रामाणिकपणे निभावल्या आहेत त्याबद्दल विशेष कौतुक. निपुण धर्माधिकारी, गिरीशचा ड्रायव्हर दाखवलेला नट, सुनील बर्वेची बायको दाखवलेली नटी, नागराजचे साथीदार दाखवलेले नट यांनीही तोडीस तोड साथ दिली आहे. यातलं सर्वात जास्त कुणाचं काम आवडलं विचाराल तर सांगणं अवघड आहे.

एडिटिंग इज जस्ट राईट. इतक्या सार्‍या समांतर कथा दाखवायच्या म्हणजे सारखं रुळ बदलणं आणि वेग कमी जास्त करणं आलं. पण उत्तम एडिटिंगमुळे हे सर्व बदलत असताना घर्षण मात्र होत नाही. वैभव जोशी आणि जसराज जोशी यांची गीतं कहाण्यांच्या या मोटेला फिरवत ठेवणारी तर अमित त्रिवेदी यांचं संगीत म्हणजे त्या मोटेला हळूच घुंगरु बांधून सगळ्या पसार्‍यालाच 'एक नादखुळा' आहे असं आश्वासन देणारं. उमेश कुलकर्णींचं दिग्दर्शन एखाद्या सोबत्यासारखं आहे. ते कशावरच भाष्य करत नाही. हे चांगलं ते वाईट असं शेरे मारत नाही. आपलं जगणं हे अनेक व्हेरीएबल्सचं एक समीकरण आहे, ज्यातल्या कशाचीही किंमत बदलली (आणि ती बदलत राहतेच) तर अंतिम उत्तर वेगवेगळं असू शकतं एवढंच फक्त हे या सोबत्याचं सांगणं आहे. सिनेमाच्या सुरवातीला आणि शेवट वापरलेली रुपकं अप्रतिम आहेत.

इतक्या सार्‍या कलाकारांना एकत्र आणायचं म्हणजे अनेक सिनेमात तो 'विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम' झाल्याचं आपण बघितलं आहे. पण इथे मात्र प्रत्येक पात्राच्या, कलाकाराच्या असण्याचं कारण आणि परिणाम जस्टिफाय होतात. ठराविक लांबीची भूमिका प्रत्येकाला मिळाली आहे आणि त्या प्रत्येकानं त्याचं सोनं केलं आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून, आपलं रोजच्या जगण्याचंच नेपथ्य लाभलेला हा आपलाच सेल्फी प्रत्येकानं मोठ्या पडद्यावर जरुर पाहावा असाच आहे.

हायवेच्या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल बक्षीसाच्या रुपात हायवेच्या प्रिमीयरचं तिकीट दिल्याबद्दल माध्यम प्रायोजकांचे मनःपूर्वक आभार. अनेक मोठमोठ्या ब्रँडससोबत मोठ्या पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकताना पाहून मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिक्षण आशू...

अनेक मोठमोठ्या ब्रँडससोबत मोठ्या पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकताना पाहून मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटला....>>>> अगदी अगदी. मी आणि रुमाने लोगो दिसल्यावर जरा मोठ्यानेच मायबोलीचा लोगो असं म्हटलं जेणेकरून आजूबाजुच्यांना ऐकु जावं. Happy

खुपच छान लिहिलंयस आशू Happy रेणुकाच्या भूमिकेबद्दल बिल्कुल सहमत. तिचं घन तमी चित्रपटात अगदी योग्य नोटवर आलं आणि तोवर हवेत पसरलेल्या विचित्रशा अशांततेला शांत शांत करून गेलं. तिनं म्हणलंयही छान ते.

चित्रपटाची रूपरेखा अतिशय नावीन्यपूर्ण, व्यक्तिरेखांचं प्रचंड वैविध्य, केवळ रस्त्याच्या कॅनव्हासवर मांडलेल्या अनेक कहाण्या, त्यात कव्हर केलेले कित्येक समाजवर्ग, हे सगळं मांडण्याची परिणामकारक शैली, छायाचित्रणाची अवघड कसरत, अशी बरीच वैशिष्ट्यं ठळकपणे जाणवली.

मंगेश धाकडेंचं पार्श्वसंगीत प्रभावी वाटलं. विशेषतः शुभमच्या हालचालींची भिंतीवरची प्रतिबिंबं सुरू असतानाचे व्हायोलीनचे तुकडे. मला व्यक्तिशः जसराजचं गाणं फारसं आवडत नाही पण ह्यातलं सुरुवातीचं 'कलंदर सारे' चांगलं झालंय.

लौकिकाला साजेसा आणखी एक लक्षवेधी चित्रपट सादर केल्याबद्दल दोन्ही कुलकर्णींचे अभिनंदन. अपेक्षा उंचावतायत.

आणखी एक चांगला चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक आणि मायबोलीचे आभार.

अतिशय सुंदर चित्रपट आणि त्यावर सुंदर परिक्षण. हा चित्रपट मायबोलीकरा सोबत काही वेगळाच आनंद आहे.

अनेक मोठमोठ्या ब्रँडससोबत मोठ्या पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकताना पाहून मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटला....>>>> +१

मयूरेश, आत्मधून,चनस, दिनेश, सई, जिप्सी,अरूंधती, सुजा, भागवत सर्वांचे आभार. Happy
आता थोडंसं प्रिमीयरच्या वृत्तांताविषयी लिहीणे आवश्यक आहे. त्याशिवाय ते मायबोलीकरांचे संमेलन सिध्द होत नाही. Happy
तर प्रिमीयरच्या खेळाला मी, अरूंधती,सई, अगो, मुग्धमानसी, आर्फी, चिनूक्स, साजिरा, भागवत, आयडू असे दहा मान्यवर उपस्थित होतो. भेटल्याभेटल्या स्मितहास्य ते चित्कार अशा वाईड रेंजमध्ये एकमेकांचे स्वागत केले. मग कोण कुठून मजल दरमजल करत इथवर आलंय त्याची तोंडी विपू झाली. आर्फी तर एक महिन्याची मोहीम काढून खास प्रिमीयरसाठी आल्याचा संशय आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या उगवत्या स्टारचे (फोटोशॉप करून पोटबिट आत घेतलेले) मिनीएचर मॉडेल म्हणून शिफारस करायला हरकत नाही किंवा थोडक्यात लहानपणीचा स्वप्नील जोशी. Proud तेवढ्यात सातची दिवेलागणीची वेळ साधून अकुने मी व ती कोणकोणत्या प्रिमीयरला एकत्र होतो याचा परवचा म्हणून घेतला. आमचे लहानपणीचे नसते उद्योग चार लोकात वर आलेले पाहून चिनूदादा (उर्फ विदर्भ, हार्टलेस) व साजिरा शक्य तेवढे लांब उभे राहत होते व बिझी असल्याचे भासवत होते. मधे मधे चित्रसृष्टीतले अनेक मान्यवर आम्हाला भेटून जात होते व आमच्यासोबत फोटो काढून घेत होते. आम्हाला आधीच वेळ कमी असल्याने फोटो ऐवजी व्हिडीओ काढला तर मधेच तोंड मिटावे लागणार नाही व गप्पात खंड पडणार नाही असाही एक विचार मनात चमकून गेला. तितक्यात हार्टलेस चिनूक्सने मनाची श्रीमंती दाखवत गरीबांना तिकीटवाटप केले. तितक्यात आर्फीने उंचीचा फायदा सर्वांना देत खालच्या थरातल्या लोकांसोबत एक सेल्फी काढला. एका महत्त्वाच्या ठिकाणाचा पत्ता शोधत मी व अगो जरा फिरलो. पुणेरी असूनही पाट्या, दिशा न वाचण्याचा अडाणीपणा आम्ही केल्याने प्रायश्चित्त म्हणून आम्हाला पुढच्या जन्मी दुपारी एक ते चार मध्ये साबण व डिटर्जंट विकण्यासाठी तीन पुणेरी घरांच्या बेल वाजवाव्या लागतील अशी भीती आहे. त्याचे परिमार्जन करण्यासाठी मी आणखी दोन गरजू मुलींना नीट भाषेत पत्ता सांगितला. तेवढ्यात वाल्याचा वाल्मिकी झालेल्या आयडूने एंट्री मारली. वाल्मिकी होऊन परत आल्यावर बाकीचे कसे वागले हे कुठल्याच गोष्टीत सांगितलेले नसल्याने आम्ही सैरभैर अवस्थेत त्याचे स्वागत केले.
तेवढ्यात हाहाकार झाला. अरूंधतीताईंनी स्वत:च्या नशीबात असलेले तिकीट स्वत:च्या हातांनी घालवले!' विदर्भाच्या दानाची पुणेकरांना काय किंमत' असा जळजळीत लेख लिहावा की काय असेच मनात आले. पण शांत व संयमित चर्चा करण्यासाठी प्रसिध्द असलेले काही लोक परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे आले.मी म्हटले मला एकाच नंबराची दोन तिकीटं आली आहेत. तर हार्टलेस म्हणाला, तुला पुढल्यावेळी एकही देणार नाही. शांत उभी राहा. मग आम्ही प्रूफ बाय एलिमिनेशन घ्यायचे ठरवले. प्रत्येकाने आपला तिकीट नंबर सांगायचा. दहा सलग (जनरलाईज्ड गृहीतक) आकड्यांपैकी मिसींग आकडा अकुचा सीट नंबर असे ठरले. आमचे आकडे लावणे ऐकून आपोआपच भोवती संरक्षक कडे तयार झाले. सगळे आकडे संपल्यावर बहुतेक सर्वात पहिलाच नंबर अकुचा असेल असा अंदाज लाावला. आणि कडे विरघळले.
मला आत्मधून ने येण्याबद्दल विचारले होते पण ती अजून पोचली नव्हती. म्हणून मी विचारले की "ती आतमधून अजून बाहेर आली नाही का? " तर कुणाला काहीच कळाले नाही. वीस सेकंदांनी सई हसली. तर साजिरा म्हणे जरा नीट वागा. याला काय अर्थय?
आम्ही वरच्या मजल्यावर पोचल्यावर म्हाळसाकांत पोंबुर्पेकर उर्फ संदीप खरे दिसले. त्यांनी हेअर विव्हींग केल्याने पटकन ओळखू आले नाहीत पण हिरव्यागार टी शर्टने काम सोपे केले. योगायोग म्हणे मान उजवीकडून डावीकडे फिरवली तर पूनम मिल्याची जोडी. काही विचारायच्या आत पूनमने आम्ही हायवेच्याच दुसर्या प्रिमीयरला आलोय हे जाहीर केले. मनात म्हटले, शाळेतून बसा व बहिस्थ विद्यार्थी म्हणून बसा सगळ्यांना एकच पेपर द्यायचा आहे. तर आम्ही वेगवेगळ्या परीक्षागृहात = प्रेक्षागृहात गेलो.
सिनेमा सुरू व्हायच्या आधीच इतके सामाजिक उपक्रम केल्याने भूक लागली होती. मला काहीतरी खायला आणायचे होते. पण विदर्भाने आख्ख्या महाराष्ट्राचा रस्ता अडवून ठेवला होता. शेवटी मनोमन डाळ शेपूचा नवस बोलले तेव्हा मार्गातल्या अडचणी दूर झाल्या. हातभर pattice पोटभर खाल्यावर मग कुठे आमचे लक्ष समोर फळ्याकडे लागले. पुढील गंमत वर आहेच!

Light 1 Proud

आशू, धम्माल!

संदीप खरे दिसले >> हे वाचून जीव जळून पाणी पाणी झाला Sad
चिनुक्स, पुढच्या वेळेला ज्या प्रिमिअरला संदिप खरे आहे त्या प्रिमिअरला मला इन्व्हिटेशन दिलं नाहीस तर बघच!

आशू, तू धम्माल आहेस Happy

आशूडी Rofl

माझ्याकडून वृत्तांतात काही भर : अगो, मुग्धमानसी, मी व सई यांची 'मोड आलेल्या मुगाचे सारण घालून पराठे कसे बनवावेत' यावर गंभीर व गहन चर्चा थ्येटरात आपापल्या आसनांवर स्थित अवस्थेत चालू होती. तेवढ्यात तिथून साजिरामहाशय अवतरले व आम्ही इतक्या समरसतेने काय चर्चा करत आहोत हे कान देऊन ऐकू लागले. मुगाच्या सारणाचे पराठे कसे करावेत याचा ऊहापोह चालू आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा चेहरा मूगगिळंकृतभावाने अधिकच कांतिमान झाला आणि ते ''काय, इथेही पाककृती आणि आहारशास्त्र??!!" असे उद्गार काढून गप्प बसले! (नशीब!) यानिमित्ताने त्यांनी मायबोलीवरील एका आघाडीच्या व ज्वलंत ग्रूपची जाहिरात केल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच!

अवनी, चर्चा(व रेसिपी) अर्धवट(च) राहिली! Lol

आशूडी, प्रॅक्टिकलला गेलेल्या बालकांनी बाहेर फूड काऊंटर्सवर काय हाहा:कार माजवला असेल या कल्पनेनेच आमच्या हृदयांत (व पोटात) कालवाकालव होत होती. ती महत्प्रयासाने दाबून आपले चित्त अन्य चर्चेत गुंतवावे अशा महान व उदात्त ध्येयाला समोर ठेवत आम्ही उपलब्ध समयाचा कौशल्यपूर्णतेने सदुपयोग करत होतो! Proud

तरी मी तुम्हाला जरा तरी सामोपचारानं सांगत होतो. विदर्भातून तर दडपशाही तंत्राच्या सूचना येत होत्या. 'बघ! या बायकांनी इथंही गटग सुरू केलं की मग सरळ डिव्हाईड अ‍ॅंड रूलच केलं पायजे!!' अशा स्वरूपाच्या. Proud

मस्त लिहिलं आहेस आशूडी !

वृत्तांत भारीच Biggrin

अवनी, स्टफ्ड मुगाच्या पराठ्यांची रेसिपी मंजूडीच्या पाखुंमध्ये मिळेल.