तव्यावरची ब्रोकोली

Submitted by हर्ट on 22 August, 2015 - 09:40
brocoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक पाव ब्रोकोली
लसणाचा अर्धा गाठा
छोटासा कांदा
मोहरी
जिरे
हिंग
तेल
मीठ
हळद
मिरची

क्रमवार पाककृती: 

१) ब्रोकोली भाजी हातानीच निवडून घ्यावी आणि देठाकडचा भाग चिरुन घ्यावा. कृपया चित्र बघा:

२) तवा मध्यम आचेवर तापत ठेवा आणि तो तापत असताना लसूण सोलणे आणि कांदा चिरणे ह्या दोन गोष्टी आटोपून घ्या म्हणजे उगाच तवा तापायला ठेवताना तिष्ठत रहावे लागणार नाही:

३) तापलेल्या तव्यावर पळीभर तेल घाला:

४) आता मोहरी, जिरे, हिंग, मग हिरवी मिरची, लसूण, कांदा एकत्रित करुन कांदा गुलाबी होऊ द्या:

४) आता चिरलेली ब्रोकुली घाला आणि ती परतण्याआधीच त्यावर मीठ घाला जेणेकरुन परत परत परतावे लागणार नाही. मी मीठाचे खडे घातलेत जे नीट मुरायला वेळच लागतो म्हणून ते आधीच घातलेले बरे:

५) ब्रोकुली अरत परत करेपर्यंत ती थोडी आक्रसते त्यामुळे त्यावर झाकण ठेवले की ते बरोबर तव्याला टेकते आणि हवा आत शिरत नाही. (हे झाकण किती छान आहे ना...काठाला मस्त दुमड आहे आणि एक वेलबुट्टी सारखे वळण आहे. माझे सर्वात आवडते झाकण. कधीकधी पुजेला वापरतो. अमरावतीला घेतले.)

५) आता एक दोन मिनीटे उलटली की तव्यावरचे झाकण हळुच बाजुला सारुन ब्रोकुली अरत परत करा आणि परत एकदा झाकण ठेवा. दोन मिनिट झाले की गॅस विसझून टाका पण पुढील दहा मिनिटे झाकण नाही काढले तर भाजी अजून छान चवदार लागते. ही बघा तयार झालेली भाजी. ही भाजी फार गलगल शिजवू नये. सत्व कमी होते. आणि तशीही ब्रोकुली ही फायबर असलेली भाजी आहे ती जरा कमी शिजवून खावी. ब्रोकुली ही योग्य प्रमाणात शिजवली की आणखीच हिरवी होऊन उजळते.

वाढणी/प्रमाण: 
एक पाव भाजी एक वा दोन व्यक्तिला पुरेल.
अधिक टिपा: 

फोटो जरा अवाढव्य झालेत त्याबद्दल क्षमस्व!

माहितीचा स्रोत: 
तुमच्या प्रेरणा.. तुमची मैत्री...थोडीसी नमी.. थोडा आसमा.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्डवेअरच्या दुकानात ३० नंबरचा एक कापडी सँडपेपर मिळतो. भारतात १० रुपयांचा मिळेल. हा पाण्यात भिजवला तरी खराब होत नाही.

त्या तव्याला फाऽरच जास्त चिकटा जमलाय, तो त्या सँडपेपरने छान घासला जाईल, व तवा (खरं तर शॅलो फ्राइंग पॅन आहे ती) जरा बरा दिसेल. Happy

बी,

मस्तंय हे!

के व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असल्याने ह्या भाजीला मी बरेचदा मुकतो. पण बघून जळजळ झाली. Proud

Happy

खूप छान दिसतेय भाजी. रेसिपी सुद्धा व्यवस्थीत स्टेप बाय स्टेप दिलीय.
ही अशा पद्धतीने बनविलेली ब्रोकली नुसती साइड डिश म्हणून सुद्धा खायला मस्तं लागेल.

होय

मस्तय रेसिपी .
बी , दीड मायबोलीकर म्हणताय त्याप्रमाणे तो तवा खरच क्लीन कर किंवा बदल..

श्री आणि दीमा - तो तवा अतिशय स्वच्छ आहे. मी लोखंडी भांडी खरडून खरडून घासत नाही कारण तसे केली की ती गंजतात आणि तो गंज जर पदार्थाला लागला तर हानीकारण असतो. म्हणून लोखंडी भांड्याना तेल बरबटलेले असले की ती भांडी वापरण्याजोगी असतात. हा तवा बाजूला तो खराब झालेला दिसतो आहे तो मी दरवेळी घासतो पण खरडून घासला की माझ्या पोळ्या भाकरी जळतात. तरीही धन्यवाद. हलक्या हातानी घासून पाहीन.

अन्जू आमच्या बावधनात मिळते ही भाजी पण इथल्याप्रमाणे ताजी नाही मिळत आणि जरा महाग वाटते. पण ह्याचा फार आनंद होतो की हल्ली भारतात वेगळ्या वेस्टर्नस भाज्या मिळतात. मी किवी सुद्धा पाहिले भारतात.

थोडीसी नमी.. थोडा आसमा >>> नमी भाजीबद्दल लिहिली असेल तर ओके. ते 'जमीं' आहे माझ्या माहितीनुसार.

भाजी छान दिसतेय. Happy

ब्रोकोली..
कधी खायचा योग नै आला..मस्त दिसतेय..आणावी लागेल..
डेक्कन जिमखाना जवळ राहत असताना संभाजी पुलाच्या तिथे चितळेंची शाखा आहे तिथल्या भाजीविक्रेत्याजवळ असायची..
इकडं शोधावी लागेल..

छान रेसिपी...करुन बघेन
ब्रोकुली एकदम गोडुली सारखं वाटतय Happy

एक पाव भाजी एक वा दोन व्यक्तिला पुरेल. >>>

मी परत पाकृ शोधायला लागले की भाजीत पावभाजी मसाला कुठे घातलाय का म्हणुन Wink

छान आहे भाजी.. माझ्या अनुभवाप्रमाणे ताज्या भाजीपेक्षा फ्रोझन जास्त चांगली लागते ! भारतात खुपदा भाजीवाले याला हिरवा फ्लॉवर म्हणतात.